असं
म्हटलं जातं की निसर्गावरची कुरघोडी हे मनुष्यजातीच्या प्रगतीचे सूत्र राहिले आहे.
निसर्गावर
कुरघोडी करण्याचे सूत्र तर आहेच पण फक्त तेवढेच नाही. एकमेकांवरच्या कुरघोडीचाही
तो इतिहास आहेच की. आणि या कुरघोडीत उत्पादनाच्या साधनांवरची मालकी कोणाची या
संघर्षाचे सूत्र मध्यवर्ती राहिले आहे. कष्ट करणाऱ्या वर्गाला मालकी हक्कापासून
वंचित ठेवण्यासाठी, त्याच्या
कष्टातून तयार झालेल्या संपत्तीवर आपला कब्जा कायम ठेवण्यासाठी सर्व शास्त्रं, उपनिषदं तयार
करण्यात आली. मनु ही काही व्यक्ती नसेलही कदाचित पण त्याच्या नावावर विषमतेला
न्याय संगत सिद्ध करणारी एक संस्कृती निर्माण केली गेलीच ना?
पण भारतात एकाच वेळेला दोन प्रकारच्या संस्कृती नांदत
होत्या. एक विषमता प्रस्थापित करणारी स्वार्थाची,
संकुचित अशी तथाकथित उच्चवर्णियांची संस्कृती तर
दुसरी कष्टकऱ्यांची, विद्रोहाची, भाईचाऱ्याची
मनमोकळी संस्कृती. ह्या दोन्हीत काही समान धागे आहेत पण बऱ्याच अंशी त्या स्वतंत्र
राहिल्या. उच्चवर्णियांनी कितीही प्रयत्न केला तरी ती पूर्णपणे नष्ट झाली नाही. मात्र
काही अंशी प्रभावाखाली राहिली. वेळोवेळी ह्यात कधी संघर्ष तर कधी सरमिसळ होत
राहिली. ह्या दोन्ही संस्कृतींमध्ये अर्थातच नियमाप्रमाणे जेत्यांची संस्कृती वरचढ
झाली. त्यांची विषमतेवर आधारित वर्ग, वर्ण, पुरुष
वर्चस्ववादी मानसिकता वरचढ झाली. ह्या सत्तेला टिकवून धरण्यासाठी भौतिक
कारणांबरोबरच ह्या मानसिकतेचीही फार मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळेच आज वर्ण
वर्चस्वाची भौतिक कारणे खिळखिळी झाली तरी सत्ताधाऱ्यांची मानसिकता मात्र
अजूनही तीच आहे. आज ह्या दोन संस्कृतींचा संघर्ष तीव्र झालेला आहे मात्र सत्तेची
वास्तविकता बदललेली नाही. सत्ता अजूनही उच्च वर्ग,
वर्ण आणि सरंजामी पुरुषी मानसिकतेचीच आहे. भांडवलदारी
सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आजही सरंजामी मानसिकता शिल्लक आहेच. भारताचे ते एक
वैशिष्ठ्य आहे. ह्याच मानसिकतेतूनच हिंसा, अत्याचार
पूर्वी देखील होत होते आणि आजही होत आहेत. अशा घटनांमध्ये एका बाजूला वाढ होत आहे
तर दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध करण्याचे, त्यांच्यामुळे
समाजमन विचलित होण्याचे, सर्वांनी
त्याविरोधात एकत्र येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पूर्ण
भारतात दलित आणि महिला यांच्यावरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली आहे. ह्या दोन्ही
घटकांमध्ये काही साम्य आहे का? नक्कीच
आहे. सरंजामी सत्ता ज्या घटकांना दडपल्याशिवाय टिकूच शकणार नाही असे हे दोन्ही घटक
आहेत. दलितांना (शूद्र, अतिशूद्र)
शिक्षण आणि जमिनीची मालकी ह्यापासून वंचित ठेवण्याचा अर्थ काय तर त्यांना प्रगतीची
कोणतीही संधी न देता केवळ त्यांच्या श्रमाचा वापर करून वरिष्ठ जातींनी आयती
मिळालेली संपत्ती उपभोगणे व आपल्या संपत्तीत सातत्याने वाढ करणे, त्या संपत्तीच्या
जोरावर राजकीय, सामाजिक वर्चस्व
कायम ठेवणे. आता स्त्रियांचा ह्या सर्वाशी काय संबंध?
जातीव्यवस्था आहे तशीच चालू ठेवण्याची एक पूर्व अट
आहे, स्त्रियांच्या
लैंगिक व व्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्ण बंधन. हे बंधन सामाजिक पातळीवर कोण
प्रत्यक्ष लागू करू शकतं? अर्थातच
ज्यांच्याकडे आर्थिक, सामाजिक, राजकीय सत्ता आहे, ते. भारतापुरते
बोलायचे तर उच्च वर्गीय, उच्च
वर्णीय गट. स्त्रियांना शिक्षण आणि संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवले कारण
त्यांना जर हे अधिकार मिळाले तर त्या स्वतंत्र होतील आणि मग सरमिसळ होऊन जात
भ्रष्ट होईल ही भिती ब्राह्मणवाद्यांना वाटत होती.
आता
सरंजामी सत्ता काहिशी खिळखिळी झाल्यावर दलित आणि स्त्रिया पुढे यायला लागले.
शिकायला लागले. आर्थिक परिस्थिती थोडी बदलू लागली. ते आपल्या टाचेखाली राहिले
नाहीत तर आपल्या आयतखाऊ सत्तेचं काय होईल याबद्दल ह्या वरिष्ठ जाती वर्गाच्या
गटाला असुरक्षा वाटू लागली. शेती आणि उद्योगात दलित व अन्य निम्न जातींच्या स्त्री, पुरुषांची गुलामी
आणि घरात स्त्रियांची गुलामी तशीच राखता आली नाही तर आपल्या बिन कष्टाच्या ऐशआरामी
आयुष्याचे काय होणार ह्या जळफळाटामधूनच अशा अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
सरंजामी
सत्तेवरची आपली एकाधिकारशाही टिकवण्याची ही धडपड आहे. त्याला उत्तर देण्यासाठी
त्यांच्या मूळ जातीयवादी, सरंजामी, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पुरूष
वर्चस्ववादी सत्तेला आव्हान देण्याची गरज आहे. त्यासाठी सरंजामी सत्तेत भरडल्या
गेलेल्या सर्वच घटकांनी एकत्र येवून लढा पुकारण्याची गरज आहे. सरंजामी सत्तेला
भारतातील एका विशिष्ठ ऐतिहासिक परिस्थितीमुळे ब्राह्मणवाद हे देखील नाव दिले
गेलेले आहे आणि काही दशकांपूर्वी बहुजन समाजाला समाजातील स्वत:चे त्यावेळी खालच्या
सामाजिक स्तरावरील स्थान उंचावण्यासाठी आपली खच्ची झालेली अस्मिता जागी करून
वरच्या स्तरावर जाण्यासाठी ब्राह्मणवादाशी लढणे आवश्यक होते व असे लढे भारतातील
अनेक राज्यांमध्ये उभे राहिले. हे लढे तेव्हा शेती कसणाऱ्या परंतु शेतीचे मालक
नसलेल्या मध्यम जातींच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी झाले. त्या लढ्यांमुळे अनेक
भागांमध्ये उच्चवर्णियांची जमिनीवरील मक्तेदारी खिळखिळी होऊन त्या प्रत्यक्ष
कसणाऱ्या मध्यम जातींकडे आल्या. अर्थातच ही प्रक्रिया सार्वत्रिक नव्हती तर काही
राज्यांमध्येच झालेली दिसते. याचे कारण अर्थातच सर्वत्र परिस्थिती समान नसणे हेच
आहे. ह्या सर्व प्रक्रियेला आता काही दशके लोटली आहेत. जातीवाद नष्ट झालेला नाही
परंतु त्यात अनेक बदल घडून आलेले आहेत.
ब्राह्मणवाद
आता फक्त ब्राह्मणांपर्यंतच राहिला नाही. तो खाली झिरपलेला आहे. काही दशकांपूर्वी
जे ब्राह्मणवादाविरुद्ध लढले तेही याला अपवाद नाहीत. त्या जातींमधील एक गट आता
उत्पादनाच्या साधनांचा मालक झाला आहे. त्यांच्याकडे आर्थिक,
राजकीय, सामाजिक
सत्ता एकवटली आहे. ती सत्ता त्यांना अर्थातच कुणाही बरोबर वाटून घ्यायची नाहीये.
त्यांनी आता ब्राह्मणी, सरंजामी
मानसिकता अंगिकारली आहे कारण ती त्यांना त्या सत्तेबरोबरच मिळाली आहे. ज्यांना
कोणत्याही एका विशिष्ठ जातीचा अभिमान वाटतो, त्या
जातीसमोर इतर जातीमधील लोक कनिष्ठ वाटतात, जातीची
सरंजामी सत्ता टिकवण्यासाठी जे जातीमधील सर्व सामान्य जनतेला भडकवून त्यांचा वापर
करून त्यांच्यातही सरंजामी मानसिकतेचा शिरकाव कसा होईल याचा प्रयत्न करतात, जे समता, न्याय, बंधुता, लोकशाही, सामाजिक सौहार्द, उदारमतवाद, माणुसकी ह्या
मूल्यांऐवजी जातीचा अहंकार, उद्दामपणा, अन्य जातीच्या
लोकाबद्दल तुच्छता, विषमता अशा समाज
विघातक मानसिकता अंगिकारतात ते सर्व ब्राह्मणी मानसिकतेचेच बळी असतात मग त्यांची
जात तथाकथित बहुजन समाजात गणली गेली असली तरीही. पुरुष सत्तात्मक सरंजामी मानसिकता
आणि जातीवाद ही आता कोणत्याही एका जातीची मक्तेदारी राहिलेली नाही. सत्ता केवळ
स्वत:कडे ठेवू पाहणाऱ्या आपल्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील जात,
वर्गाकडे ती जाऊ नये हा हितसंबंधीय स्वार्थ आता मध्यम
जातींपर्यंत पोहोचला आहे. विषमता, जातीवाद, सत्तेचे
केंद्रीकरण नष्ट करणे हे त्यांच्या हितसंबंधांच्या सरळ सरळ विरोधात आहे. अर्थातच
ती संपूर्ण जात सरंजामी, ब्राह्मणवादी
झालीय असे मला म्हणायचे नाही तर त्यातील उच्चवर्गीय गटच पूर्णपणे ह्या विचारांच्या
आहारी गेलेला आहे. परंतु मी वर म्हटल्याप्रमाणे हा गट आपल्या जातीच्या वापर
मात्र करून घेत आहे. ह्या मानसिकतेतूनच दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ
झाली आहे. अत्याचार तिथेच होतात जिथे प्रचंड विषमता आहे,
सर्व प्रकारच्या सत्तेपासून वंचित असा समाज आहे पण
त्या विषम परिस्थितीला भेदण्याची धडपडही सुरू झाली आहे. अत्याचार थांबवायचे असतील
तर विषमता, जातीवाद नष्ट
होणे आवश्यक आहे.
जातीवाद
कायमचा नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. फक्त कुणाशी तरी
जोडून न घेणे व त्यांचे शेपूट न बनणे इतकेच पुरेसे नाही. जातीवाद नष्ट करायचा तर
विषमतेवर आधारित संपूर्ण समाज व्यवस्था बदलावी लागेल. समाज व्यवस्थेत आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे अनेक
पैलू आहेत. ह्या सर्व आघाड्यांवरील विषमता नष्ट करण्यासाठी एक समग्र लढा पुकारावा
लागेल. फक्त दलित, आदिवास्यांनीच
नव्हे तर समस्त कष्टकरी वर्गाने हातात हात घालून पुढे जावे लागेल. जसे दलित
आदिवास्यांच्या संघटनांना एकत्र यावे लागेल. तसेच कामगार कष्टकऱ्यांच्या संघटनांना
देखील बरोबर घ्यावेच लागेल. सर्वांनी एकत्र यायचे तर तशी समग्र विचारसरणी, कार्यक्रम असावा
लागेल. थोडे आम्हाला बदलावे लागेल, थोडे
तुम्हाला बदलावे लागेल. एकत्र यावे लागेल. त्याशिवाय समाजात बदल घडून येणार नाही जातीवादी
मानसिकता आपली फार मोठी शत्रू आहे पण मानसिकता काही हवेत तयार झालेली नाही. ती
मानसिकता निर्माण होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी काही भौतिक कारणे सुद्धा आहेत.
ह्या भौतिक कारणांचा धांडोळा घेऊन, त्यांचे मूळ शोधून काढावे लागेल. भौतिक कारणे
तशीच ठेवून मानसिकता बदलण्याची अपेक्षा करणे म्हणजे विषारी झाड तोडण्यासाठी मुळावर
घाव घालण्याऐवजी फांद्या तोडण्यासारखेच आहे. शत्रू फक्त ब्राह्मणवाद, जातीवाद नाही, पुरुषसत्ता, सरंजामशाही, भांडवलदारी आणि
साम्राज्यवाद देखील आहेत. सत्ता राबवण्यासाठी, टिकवण्यासाठी हे सर्व एकत्र आले
आहेत. एकमेकांशी संगनमत करतायत. शत्रूंची जर आपल्याविरुद्ध आघाडी आहे तर आपण
वेगवेगळे राहून कसे चालेल? भांडवलदारी
पक्षांशी जोडून घेण्यामुळे दलित चळवळीचे आजपर्यंत नुकसान झालेले आहे, मान्य आहे. पण कुणाशीच जोडून न घेण्याची
भूमिका योग्य आहे का? मानसिकता
जर संपूर्ण व्यवस्थेशीच निगडित असेल तर लढा व्यवस्थेविरुद्ध करावाच लागेल. आणि व्यवस्था
बदलण्यासाठी सर्व जाती, जमातींमधील कष्टकऱ्यांनी,
महिलांनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि
परिवर्तनवाद्यांनी एकत्र यावेच लागेल. परिवर्तनाच्या वाटेवर जे सोबत येतील त्यांना
घेऊनच पुढे वाटचाल करावी लागेल. दलित, आदिवास्यांचे पक्ष, संघटना, चळवळी, गट,
डाव्या, कम्युनिस्ट विचारांचे सर्व पक्ष आणि गट यांना एकत्र आणणे हेच आज
आपल्यापुढील सर्वात मोठे कार्य आहे. आणि वेळ न घलवता आपल्याला त्यासाठी कंबर कसली
पाहिजे.