Sunday, September 22, 2013

आयसीडीएस मिशन –अभियान की खाजगीकरणाचे कारस्थान आयसीडीएस मिशनचा पुनर्विचार करा

आयसीडीएस मिशन अभियान की खाजगीकरणाचे कारस्थान
आयसीडीएस मिशनचा पुनर्विचार करा

आयसीडीएस ची भूमिका
लोकसंख्येच्या पुनर्निर्माणासाठी सुरक्षित व निरोगी परिस्थिती निर्माण करणे ही निश्चितच कोणत्याही समाजाची मूलभूत गरज आहे म्हणूनच माता आणि बालकांच्या जगण्याची  आणि जन्माची सुरक्षितता, आरोग्य आणि पोषण इत्यादीच्या स्तराच्या आधारे समाजाच्या विकासाचे निर्धारण व मूल्यांकन केले जाते. आणि म्हणूनच बहुतेक सर्व देशांमध्ये त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य मानले गेले आहे.
पण भारत मात्र ह्याला अपवाद आहे. भारतात सुरक्षित पुनरुत्पादन आणि माता व बालकांच्या पोषण आणि आरोग्याच्या स्तराची हमी देण्यासाठी आवश्यक त्या चांगल्या सेवा सार्वत्रिक पातळीवर पुरविणे हे शासनाचे अनुषंगिक आणि मूलभूत कर्तव्य मानण्याऐवजी अगोदर योजना स्वरूपात आणि आता तर मिशन रूपात ही सेवा दिली जात आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अस्तित्व मुळातच शासनाच्या मूलभूत कर्तव्याचा एक अत्यावश्यक भाग म्हणून नव्हे तर केवळ एक स्वतंत्र योजना म्हणून असणे हा  देशातील विशिष्ठ सामाजिक राजकीय संरचनेचा परिपाक आहे. हे स्पष्टपणे दिसून येते की आपल्या लोकांचे अस्तित्व राखून जिवंत राहणे हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला न जाणे हा शासनाच्या धोरणाचाच एक भाग आहे. स्वातंत्र्य मिळून  सहा दशके झाली तरी हा अधिकार दिला गेलेला नाहीच पण आता तर नव उदारवादाच्या काळात शासनाच्या कर्तव्यांचा वेगवेगळ्या मार्गाने उतरोत्तर जास्तच संकोच केला जात  आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना भारत सरकारद्वारा १९७५ मध्ये संपूर्ण देशातील निवडक ३३ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली. गरोदर व स्तनदा माता व ० ते ६ वयोगटातील बालकांचा पोषण व आरोग्याचा स्तर सुधारणे, बालमृत्यूदर, मतिमंदत्व, अनारोग्य, कुपोषण, शाळा मधेच सोडण्याचे प्रमाण कमी करून त्यांच्या मानसिक, शारीरिक सामाजिक विकासाचा पाया विकसित करणे ही ह्या योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये होती. कालांतराने ह्या योजनेचा एक राज्यांनी चालविण्याचा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम म्हणून देशभर विस्तार करण्यात आला.
एनआयपीपीसीसीडी (राष्ट्रीय सार्वजनिक सहकार व बाल विकास संस्था) आणि एनसीएई आर (राष्ट्रीय आर्थिक उपयोजना संशोधन) आदींनी केलेल्या स्वतंत्र अभ्यासांमध्ये आयसीडीएस बालकांमधील कुपोषणाचा मुकाबला करण्यात व शाळा भरतीचे प्रमाण सुधारण्यात प्रभावी ठरली असल्याचे सिद्ध झाले आहे परंतु तरीही सरकारने तिचे सार्वत्रिकीकरण करण्यात कमालीची ढिलाई दाखविली आहे आणि तिच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत अपुरा निधी पुरवला आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संघटनांनी विशेषतः अखिल भारतीय सेविका व मदतनीस फेडरेशनने सातत्याने केलेल्या संघर्षांमुळे आयसीडीएसची सेवा व क्षमता आणि त्याच प्रमाणे सेविका व मदतनीसांच्या समस्यांबाबत राष्ट्रीय पातळीवर जागृती झाली आहे.
२००१ मध्ये दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने भारतातील बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यात आयसीडीएसने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेची नोंद घेतली आणि केंद्र सरकारने ह्या योजनेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा व देशातील सर्व बालकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्याचा व त्यासाठी अंगणवाडी उघडण्यासाठीचा लोकसंख्येचा निकष शिथिल करण्याचा आदेश दिला. कोर्टाने फक्त लाभार्थ्यांसाठी पोषणाचे प्रमाणच ठरवून दिले नाही तर आयसीडीएसच्या अंमलबजावणी आणि कामकाजातील सुधारणेचा वेळोवेळी अहवाल देण्याचे देखील निर्देश दिले.
ह्या निकालानंतर देखील आयसीडीएसच्या विस्ताराची धीमी गती, आणि निधी देण्यात केलेली कंजूषी तशीच चालू राहिली. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा केंद्र शासनाची खरडपट्टी काढल्यानंतर शेवटी २००५ मध्ये योजनेच्या सार्वत्रिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. आतापर्यंत आयसीडीएसचा देशभरातील ७०७६ तालुक्यांमधील १४ लाख निर्धारित वस्त्यांमध्ये  विस्तार करण्यात आला आहे.
हा विस्तार जरी झाला असला तरी शासनाच्या ह्या सर्वात महत्वाच्या योजनेबाबातचा निष्ठुर दृष्टीकोन ते ह्या योजनेला दिलेल्या देत अत्यल्प निधीवरूनच दिसून येतो. आयसीडीएसचा ११व्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यानुसार लागणारा खर्च ७२,८७७.५२ कोटी रुपये होता परंतु अंदाजपत्रकात मात्र प्रत्यक्षात फक्त ३७,८९१ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले जे आवश्यकतेपेक्षा फक्त निम्मेच होते. आता देण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दयनीय मानधनासाहित आयसीडीएसच्या सार्वत्रिकीकरणासाठी लागणारा एकूण निधी २५८,००० कोटी आहे परंतु १२व्या पंचवार्षिक योजनेट फक्त १७७,४५६ कोटी राखून ठेवण्यात आले आणि त्यातील १२३,५८० कोटीच फक्त केंद्र सरकारचा वाटा असून राज्याचा वाटा ५३,८७६ कोटी अपेक्षित आहे. परंतु २०१३- १४च्या अंदाजपत्रकात त्यातील फक्त १७,७७० कोटीच मंजूर करण्यात आले.
आयसीडीएसची कामगिरी
माता आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि एकूणच आरोग्याचा स्तर सुधारणे ह्या बाबींमधील आयसीडीएसच्या यशाची जरी वाखाणणी होत असली तरी एकूण कामगिरी काही समाधानकारक आहे असे म्हणता येत नाही. भारतातील जवळजवळ निम्मी बालके कुपोषित आहेत. म्हणजेच संपूर्ण जगातील कुपोषित बालकांमध्ये  आपल्याच देशातील बालकांची संख्या सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणाच्या (National Sample Survey) आकडेवारीने हे दाखवून दिले आहे की परिस्थिती अजूनच बिघडणार आहे कारण आणि एकूणच सर्व आणि तळाच्या अर्ध्या लोकसंख्येतील बालकांच्या आहारातील उष्मांकाचे सरासरी प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. २०१० मध्ये भारतातील बालमृत्यूचे सरासरी प्रमाण जन्माला आलेल्या प्रत्येक हजार बालकांमध्ये ६३ होते म्हणजेच हे प्रमाण तुलनेने नवीन सहस्त्राब्धीतील निर्धारित ३० ह्या लक्ष्यापेक्षा तसेच चीनमधील १७ व श्रीलंकेतील १४ पेक्षा खूपच जास्त होते.
गेल्या ६ वर्षांपेक्षा जास्त काळात देशात लोकसांख्यिक व आरोग्य विषयक सर्वेक्षण झालेले नाही. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey III) नी २००५-०६ मधील आकडेवारीनुसार ५ वर्षांखालील बालकांपैकी निम्मी तर ६ ते ३५ महिन्यांच्या ५  बालकांमधील ४ बालके कमी वजनाची आढळून आली. विवाहित महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ५६% तर गरोदर महिलामध्ये हे प्रमाण ५८% आहे. ह्याचाच अर्थ हा आहे की ही धोरणे काही उपयोगाची नाहीत. काही लोक तर त्यातून असाही निश्कर्ष काढतात की ही आकडेवारी आयसीडीएसचे अपयशच दर्शवते. पण हा चुकीचा अर्थ लावला जात आहे. खरे तर ह्या संपूर्ण कालखंडात ह्या योजनेसाठी अत्यंत अपुरा निधी मंजूर करण्यात आला आणि तोदेखील आयसीडीएसला पूर्ण क्षमतेने व परिणामकारकरीत्या काम करू न देणाऱ्या उदरनिर्वाहाचे संकट आणि अपुऱ्या रोजगार निर्मितीच्या व्यापक आर्थिक पार्श्वभूमीवर.
ह्या निष्कर्षाला कॅगच्या आयसीडीएसच्या कामकाजाबाबतच्या नुकत्याच आलेल्या अहवालात दुजोरा देण्यात आलेला आहे. हा अहवाल २००६-०७ ते २०१०-११ दरम्यान १३ राज्यांमधील ६७ जिल्ह्यांतील २७३० अंगणवाड्यांच्या पूरक पोषक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि पोषण व आरोग्यविषयक शिक्षणाबाबतीतील कामगिरीच्या लेखापरीक्षणाच्या आधारावर बनविला होता. ह्या परीक्षणाच्या मुख्य निष्कर्षामध्ये ह्या कार्यक्रमाला आवश्यक त्या पायाभूत सेवासुविधा पुरविण्यात दिलेली कंजुसाईची वागणुक व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती देण्यात केलेली कुचराई ह्या विषयी भरभरून टीका केली आहे.
इतकी वर्षे होऊन गेली तरी ६१% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत तर आणखीन २५% अंगणवाड्या कच्च्या इमारतींमध्ये भरतात. ४० ते ६५ % अंगणवाड्यांमध्ये आहार शिजविण्यासाठी, अन्नधान्य साठविण्यासाठी तसेच बालकांच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा नाहीत. ५२ % म्हणजे निम्म्यांपेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहांची तर ३२ % मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. ३२ % अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठीचे तर ५८ % मध्ये मोठ्यांसाठीचे वजनकाटे नव्हते. राज्य सरकारे खर्च करण्यात कुचराई करत असल्यामुळे ३३-४९ % अंगणवाड्यांमध्ये औषधांचे किट नव्हते. ५३ % ना राज्य शासनांनी वार्षिक किरकोळ खर्चासाठीचा १००० रुपये वार्षिक निधी दिलेला नव्हता. कॅगला  सर्व स्तरांवर महत्वाच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेपेक्षा १९ % पासून ५८ % पर्यंत कमतरता असल्याचे देखील आढळून आले.
ह्या मर्यादा व कमतरतांमुळे कामगिरीच्या निर्देशांकांवर परिणाम झाला हे उघडच आहे. वजनकाटे उपलब्ध नसल्यामुळे ३३ ते ४७ % बालकांचे वजन त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे घेतले जाऊ शकत नव्हते. ३३ ते ४५ % गरजू बालकांना व मातांना पूरक पोषण मिळत नव्हते. ४१ ते ५१ % अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण संच उपलब्ध नव्हते. बहुतेक राज्य सरकारे ह्या कार्यक्रमावर नियमितपणे देखरेख ठेवत नसल्यामुळे ह्या सर्व मर्यादांची त्यांना जाणीव देखील नव्हती.
साधनसामुग्रीची कमतरता हे आयसीडीएसला अपेक्षे एवढी सफलता न मिळण्याचे एक महत्वाचे कारण आहे हे कॅगच्या अहवालाने सुचवले आहे आणि मंजूर झालेल्या निधीचे आकडे पाहता हे सिद्धही होते. म्हणूनच त्यातील बऱ्याच शिफारशींनी केंद्र व राज्य सरकारांनी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा, संच आणि पूरक पोषण इत्यादींसाठी पुरेशी साधनसामुग्री द्यावी असे सुचविले आहे. 
जिचा कॅगच्या अहवालात उल्लेख नाही- पण जी कदाचित त्याहूनही मोठी मर्यादा असू शकते- ती म्हणजे आयसीडीएसची मूळ संरचना एक नियमित सार्वजनिक व्यवस्थेऐवजी केवळ एक योजना म्हणून केली गेली आहे आणि म्हणूनच अंगणवाडी सेविका मदतनिसांना नियमित शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची त्यांना आवश्यकता भासत नाही. जरी ह्या सर्व वेगवेगळ्या परंतु अत्यावश्यक सेवा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली असली तरी त्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यासाठीच त्यांना कामगारांचा दर्जा सुद्धा नाकारण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या संसदीय स्थायी समितीने त्यांना महागाई निर्देशांकाला जोडलेले किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षा देण्याची शिफारस करून सुद्धा त्यांना मानधनाच्या नावावर निष्ठूरपणे एक दयनीय रक्कम दर महिन्याला दिली जात आहे जी किमान वेतनापेक्षा अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. ह्यामुळे फक्त कर्मचाऱ्यांना खालच्या पातळीवर नेऊन ठेवलेले नाही तर एकूणच कार्यक्रमाचे अवमूल्यन होऊन त्याच्या यशाची शक्यता घटली आहे.  
                      आय सी डी एस मिशन  
जरी तिसऱ्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणासारख्या अनेक सर्वेक्षणांमध्ये कुपोषणाच्या गंभीर परिस्थितीबाबत मांडणी केलेली असली तरी सरकारने पाहिजे तेवढ्या तत्परतेने कधीही कृती केलेली नाही. सरकारने आपल्या अंदाजपत्रकात आयसीडीएससाठी आवश्यक निधी देण्याची कधी खबरदारी घेतली नाही उलट सरकारचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी पंतप्रधानांनी नांदी फौन्डेशन या संस्थेने तयार केलेला एक अहवाल प्रकाशित केला आणि ह्या परिस्थितीला राष्ट्रीय लांच्छन असे नाव देत आयसीडीएस आता मिशन प्रणाली वर चालविले जाणार असल्याची घोषणा केली. एकाच श्वासात त्यांनी त्यांनी ही देखील जाहीर केले की आता कुपोषणाचे आव्हान पेलण्यासाठी आयसीडीएसच्या पलीकडे पहावे लागेल. ह्या घोषणेद्वारे त्यांनी एकप्रकारे खाजगीकरणाचा मार्गच खुला केल्याचे स्पष्ट केले.   
कॅग अहवालाच्या परिणामी केंद्र सरकारने २०१२मध्ये वचन दिले की सर्व शिफारशी स्वीकारल्या जातील आणि हे देखील घोषित केले की १२व्या योजनेत आयसीडीएसचे सशक्तीकरण व पुनर्रचनेचे कार्य प्रस्तावित करण्यात आले आहे. पण नुकत्याच उडत आलेल्या बातम्यांनी मात्र सरकारचा काही वेगळाच हेतू असल्याचे दर्शविले आहे. वाढीव सार्वजनिक निधी, उत्तम सेवेची हमी घेणारी काळजीपूर्वक देखरेख आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवा नियमित करणे ही पावले उचलण्याऐवजी केंद्र सरकार एक नवीन प्रणाली प्रस्तावित करून प्रत्यक्षात अंगणवाड्यांचे खाजगीकरण करून पूर्ण व्यवस्था दुर्बल करण्याचा घाट घालत आहे.  
२०१२मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने एक दस्तावेज प्रसिद्ध केला ज्यात त्यांनी आयसीडीएसला मिशन प्रणाली मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रस्ताव मांडला. ह्या प्रणालीत संस्थात्मक संरचना, पायाभूत सोयी सुविधा, व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्था या सर्वांमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक बनते. ह्या बदलांचा फार मोठा परिणाम होणार आहे हे माहित असून देखील हा दस्तावेज तयार करण्याअगोदर शासनाला त्यातील कोणत्याही अत्यंत महत्वाच्या हितधारकांशी म्हणजेच योजनेतील कर्मचाऱ्यांच्या संघटना, महिला, किसान, शेतमजूर आदी लाभार्थींच्या संघटना यांच्याशी सल्लामसलत करण्याची गरज वाटली नाही. त्याऐवजी सरकारला अमेरिकेतून चालविल्या जाणाऱ्या केअर (Co-0perative for Assistance and Relief  Everywhere) सारख्या स्वयंसेवी संस्था तसेच युसैड (United States Agency for International Development) सारख्या एजन्सीज् आणि जागतिक बँक यांच्याशी सल्लामसलत करणे जास्त महत्वाचे वाटले.  
मिशनची कल्पनाच मुळात संशयास्पद आहे. त्यात अत्यंत छुपेपणानी हे सुचविले आहे हा एक अल्पकालीन कार्यक्रम आहे जो त्यात नमूद केलेली काही उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यावर गुंडाळला जाईल. पण आपण सुरवातीलाच हे मांडले आहे की ह्या सेवा अत्यावश्यक आणि कोणत्याही समाजाच्या कायमस्वरूपी गरजा भागविण्यासाठी चालूच ठेवणे आवश्यक अश्या आहेत आणि म्हणूनच कार्यक्रमात आधी ठरविलेली काही उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यावर त्या बंद न करता नियमित सार्वजनिक कामकाज ह्याच रूपात कायम चालविल्या गेल्या पाहिजेत.
ह्याचा अर्थ हा आहे की ही संकल्पनाच मुळात अपुर्ण आहे. परंतु ह्या अपुऱ्या संकल्पनेच्या अंतर्गत का होईना, जर उद्दिष्ट किमान पायाभूत सोयीसुविधांचा आवश्यक तो स्तर गाठण्याचा असेल तर मात्र त्याबाबतीत फार काही अपेक्षा पूर्ण होईल असे दिसत नाही. अंगणवाडी केंद्रांच्या चांगल्या इमारतींचा एवढा मोठा अनुशेष असून देखील केवळ १५ % केंद्रांसाठी निधी मंजूर केला गेला आहे. उरलेला निधी अन्य योजनांमधून याचना करून  आणावा किंवा इमारतींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मनधरणी करावी अशी अपेक्षा आहे. म्हणजेच ज्या परिस्थितीत अंगणवाड्या चालविल्या जाणार आहेत त्या मूळ परिस्थितीत अजिबात सुधारणा होणार नाही.  
एक महत्वाचा बदल ह्याद्वारे प्रस्तावित आहे तो म्हणजे आयसीडीएसचे लक्ष पुढील काळात लाभार्थ्यांना पूरक पोषक आहार पुरविण्याऐवजी पोषण विषयक शिक्षण व समुपदेशन करण्यावर केंद्रित होणार आहे. ज्या देशात जवळजवळ तीन चतुर्थांश लोकांच्या आहारातील उष्मांक किमान गरजेपेक्षा म्हणजेच ग्रामीण भागात २२०० व शहरी भागात २१०० पेक्षा कितीतरी कमी आहे आणि त्याचा सर्वात जास्त फटका महिला व बालकांना बसतो त्या देशात असे धोरण आखणे हा विचीत्रपणाचा कळस आहे. बेरोजगारी आणि गरीबीसारख्या  अनेक कारणांमधून निर्माण झालेले कुपोषण असे पूरक पोषण आहार पुरविण्याऐवजी जागृती करण्याचे धोरण आखून दूर तर होणार नाहीच उलट त्यामुळे परिस्थिती अजूनच खालावेल.
मिशन दस्तावेजामध्ये सेवा देण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे व त्याचे व्यावसायिकीकरण करणे अशी काही धोरणे प्रस्तावित केली आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या भरतीसाठी किमान शिक्षण एसएससी करण्यात येणार आहे तर किमान वय ४४ वरून ३५ वर नेण्यात येईल. सेवा समाप्तीचे वय मात्र ६५ हेच कायम ठेवले आहे. सेविका मदतनिसांना जास्त प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. कुपोषणाशी दोन हात करण्यासाठी २०० अती बाधित जिल्ह्यांमध्ये एक अतिरिक्त पोषण समुपदेशक सेविका नेमण्यात येईल. अन्य जिल्ह्यांमध्ये लिंक किंवा आशा वर्करवर ही जबाबदारी टाकली जाईल पण तिला मोबदला मात्र कामाच्या निष्पत्तीशी जोडला जाणार आहे.  
अखिल भारतीय फेडरेशनने सातत्याने अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरदेखील सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे जेणेकरून गरीब कामकरी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आपल्या बालकांना सुरक्षित हातांमध्ये सोपवून कामाला जाता येईल. सरकारने ५ %  अंगणवाडी केंद्रांचे रुपांतर अंगणवाडी व पाळणाघराच्या संयुक्त केंद्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात पूर्ण वेळ कर्मचारी नेमण्याऐवजी अंगणवाडी सेविका व पाळणाघर कर्मचारी यांनी आळीपाळीने प्रत्येकी ६ तास काम करावे असे हुशारीने निर्देश दिले आहेत. ही दोघींना अंशकालीन कर्मचारीचे पद देऊन किमान वेतन व अन्य लाभांपासून वंचित ठेवण्याच्या हेतूने दोघींची केलेली शुद्ध फसवणूक आहे कारण प्रत्यक्षात दोघींनाही पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे.
व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थेमधील काही प्रस्तावित बदलांमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कामाच्या ओझ्यात खूपच वाढ होणार आहे. कामाची अधिकृत वेळ आता ६ तास निश्चित करण्यात आली आहे. (खरे पाहता प्रत्यक्षात ६ तासांपेक्षा जास्त वेळ कामासाठी द्यावा लागतो.) विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी विशेष तरतुदी आहेत. सर्व काही आहे पण ज्यांच्या कष्टाशिवाय हा कार्यक्रम उत्तमरीत्या राबविण्याची कल्पना देखील करता येऊ शकणार नाही त्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि कामाच्या परिस्थिती बद्दल म्हणजे सर्वात महत्वाच्या घटकाबद्दल मात्र हा दस्तावेज मूग गिळून गप्प आहे. उलट सध्या अस्तित्वात असलेली कर्मचाऱ्यांना तात्पुरते सेवक म्हणून वागवणारी, अन्यायकारक आणि कमी कार्यक्षम व्यवस्था तशीच चालू राहणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन सर्व कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने राबवून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० वरून २२५० पर्यंत वाढवण्याचा त्यात उल्लेख आहे परंतु नियमित सेविकांएवढी शैक्षणिक पात्रता असली तरच. मदतनीस नसल्यामुळे एकटीनेच सेविकेइतक्याच जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविकेवर अन्यायच करण्यात आला आहे. आपले फेडरेशन ही मागणी करत आहे की सर्व मिनी अंगणवाड्यांचे नियमित अंगणवाड्यांमध्ये रुपांतर करावे, त्यात मदतनिसांची नियुक्ती करून दोघींनाही पूर्ण मानधन देण्यात यावे.
अतिरिक्त लिंक वर्करला फक्त कामाच्या निष्पत्तीच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता किंवा कामाप्रमाणे मोबदला देणे म्हणजे एक प्रकारे जिथे कामाची निष्पत्ती फक्त कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून नाही अश्या क्षेत्रात ते काम किरकोळ दराने बाहेर सुपूर्त केल्यासारखेच (outsource) आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या नियमित कामाचे कंत्राटीकरण करण्याच्या सातत्याच्या प्रयत्नाचाच हा एक भाग आहे. ह्या पूर्ण दस्तावेजात पंतप्रधानांनी ह्या पूर्वी ज्याचे आश्वासन दिले होते त्या पेन्शनचा देखील अजिबात उल्लेख नाही.
ज्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य आणि पोषण समुपदेशन आदी कामांवर परिणाम होतो, ते सेविकांवर असलेले कामाचे प्रचंड ओझे पाहता अजून एका सेविकेची नियुक्ती ही स्वागतार्ह बाब आहे परंतु काही हितसंबंधीय व्यक्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या केंद्रातील ह्या जास्तीच्या सेविकेच्या भरतीबद्दल धास्ती निर्माण करत आहेत. अश्या वेळी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून सामंजस्यपूर्ण कामाचे वातावरण निर्माण केले पाहिजे आणि प्रत्येकाची कामाची जबाबदारी स्पष्ट केली पाहिजे. सध्या असलेल्या सेविका, मदतनीस, पाळणाघर कर्मचारी, अतिरिक्त सेविका ह्या सर्वांना कर्मचारी म्हणून मान्यता देऊन किमान वेतन आणि अन्य सर्व सुविधा दिल्या पाहिजेत. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय फेडरेशनला विश्वासात घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामाची नियमावली बनवली पाहिजे तसेच गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे.  
सध्या चालू असलेल्या आयसीडीएस कार्यक्रमामध्येसुद्धा १०% अंगणवाड्या खाजगी म्हणजेच स्वयंसेवी संस्थांना चालवायला देण्याचे प्रावधान आहे. परंतु पूर्ण देशात असे फक्त ६७ प्रकल्प आहेत आणि त्यांचा अनुभवही अपेक्षाभंग करणारा आहे. तरीसुद्धा मिशन दस्तावेजात खाजगी सहभागाचा मुद्दा खूपच जोरात पुढे रेटला आहे. पुनर्रचित आयसीडीएस मध्ये नागरी समाज, नेटवर्क्स, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित जन- संघटना, संस्था आणि स्वयंसेवी कृती गटांच्या महत्वपूर्ण भूमिकेची कल्पना करण्यात आली आहे. अश्या विविध संघटना आणि संस्थांना आयसीडीएसच्या नियोजन, व्यवस्थापन आणि सेवा देण्याच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच स्वयंसेवी संस्थांकडे सोपवायच्या सक्तीच्या १०% अंगणवाडी केंद्रांव्यतिरिक्त पंचायती राज संस्थाकडे अजून १०% केंद्र सोपविणे बंधनकारक आहे. ह्या संस्थांना आपल्या स्वतःच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतूद एका शीर्षातून दुसऱ्या शीर्षात वर्ग करण्याची लवचिकता दिली गेली पाहिजे.
शैशवातील देखभाल व शिक्षण- आयसीडीएसच्या पलीकडे ही संकल्पना बळकट करण्याच्या नावाखाली आयसीडीएसमधून खाजगी बालवाड्यांकडे आर्थिक तरतूद वर्ग करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिथे शिक्षण ही एक सेवा नाही तर नफा कमविणारा धंदा आहे जो शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळांच्या बड्या खाजगी साखळीकडून नियंत्रित केला जातो. त्यांना निधी देणे याचाच अर्थ आहे बड्या कॉर्पोरेट सहित खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी सार्वजनिक पैशाचा अपहार.
त्याहूनही भयंकर चिंताजनक प्रस्ताव आहे सामाजिक सहभागाच्या नावाखाली पूरक पोषण आहाराचा पुरवठा स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्याचा. महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे  घोटाळे उघडकीला येणे आणि इस्कॉन व नांदी फौन्डेशन सारख्या संस्थांनी काही वर्षांपासून आयसीडीएस व शालेय पोषण आहार पुरवण्याचे ठेके घेतल्यापासून त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होणे ह्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव म्हणजे सार्वजनिक योजनांच्या जिवावर नफा कमविण्यासाठी मिळालेले आमंत्रणच आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी च्या नावावर बड्या औद्योगिक संस्थांना देखील ह्या क्षेत्रात येण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे. हा कॉर्पोरेट कंपन्यांना लोकांची सहानुभूती आणि पाठींबा मिळवून देण्याचा मार्ग आहे जेणेकरून सार्वजनिक आणि नैसर्गिक साधन संपत्ती हडप करण्याच्या त्यांच्या कारस्थानाविरुद्धचा लोकांचा विरोध कमी व्हावा. उदाहरणार्थ वेदान्ता कंपनीने खाणकामासाठी जंगल जमीन ताब्यात घेण्याविरुद्ध स्थानिक आदिवास्यांचा असलेला विरोध कमी व्हावा म्हणून वेदान्ता कंपनी ओडीशा मध्ये अंगणवाड्या चालवत आहे. म्हणजेच नागरिकांचा एक मूलभूत हक्क म्हणून ज्या सेवा त्यांना सार्वजनिक संस्थांद्वारे मिळाल्या पाहिजेत त्यांना खाजगी कंपन्यांचा दानशूरपणा म्हणून दाखवून जनतेच्या दृष्टीकोणात बदल घडवून आणला जात आहे.
खाजगीकरणाकडे जाणारी ही सर्व पावले खाजगी पुरवठादारांच्या जास्त कार्यक्षमतेबद्दल  किंवा उत्तरदायित्वाबद्दल कोणतेही वाजवी तर्क आहेत म्हणून आवश्यक गणली जात नाहीएत तर हा कार्यक्रम योग्य पद्धतीने चालविण्यासाठी आवश्यक किमान आर्थिक साधनसंपत्ती देण्याची केंद्र सरकारची तयारी नसल्यामुळे टाकली जात आहेत. गरीबातल्या गरिबांसाठी असलेली ही योजना मूठभर लोकांच्या फायद्यासाठी वापरली जात आहे.
आयसीडीएसची मिशन प्रणाली खरे तर सरकारच्या बळकटीकरणाच्या दाव्याच्या अगदी उलट आयसीडीएसला कमकुवत करून अंतिमतः पूर्णपणे उध्वस्त करून टाकणार आहे. हा  फक्त साडेसात कोटी बालके आणि १.८ कोटी गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आणि आरोग्याची सेवा देणाऱ्या व आपल्या अल्प मानधनावरील कामामधून सरकारला त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील खर्चावर अनुदान देणाऱ्या २७ लाख अंगणवाडी सेविका, मदतनिसांचाच प्रश्न नाही, तर प्रश्न आहे आयसीडीएसचे लाभ मिळणाऱ्या व अजूनही न मिळालेल्या कोट्यावधी बालकांच्या अन्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या अधिकाराचा. हा प्रश्न आहे निरोगी गर्भावस्था, सुरक्षित बाळंतपण आणि आनंदी मातृत्व मिळवणे ज्यांचा हक्क आहे अश्या लाखो गरोदर व स्तनदा मातांचा. हा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबांचा. म्हणजेच हा प्रश्न आहे ह्या देशातील सर्व नागरिकांचा ज्यांना खरा विकास हवा आहे. फक्त जीडीपीच्या भाषेत नव्हे तर मानवी विकासाच्या रूपात.    
हा फक्त लाखो महिलांचा त्या करीत असलेल्या कामाला व समाजाला देत असलेल्या सेवांना सामाजिक व कायदेशीर मान्यता मिळावण्यासाठीचा लढा नाही. हा फक्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा त्यांच्या सन्माननीय कामासाठीचा आणि महिलांच्या कामाबद्दलचा  चुकीचा सामाजिक ग्रह आणि अवमूल्यनाविरुद्धचाच लढा नाही. हा लढा आहे समाजाच्या निरोगी पुनरुत्पादनाच्या नागरिकांच्या अधिकारासाठीचा. ज्यांना आपल्या बालकांच्या निरोगी भविष्यात, निरोगी भारतामध्ये रस आहे त्यांनी मिशन प्रणालीच्या नावावर आणल्या जात असलेल्या आयसीडीएसमधील हानिकारक बदलांना विरोध करण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे. हा आयसीडीएस वाचवा लढा फक्त लाखो अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा त्यांच्या कामाला, आपल्या देशाचे भविष्य असलेल्या बालकांसाठी, समाजाला त्या देत असलेल्या अफाट सेवेला, सामाजिक व कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठीचा लढा नाही तर हा लढा भारताला जगातील सर्वात जास्त कुपोषित बालकांचा देश अश्या बदनामीतून बाहेर काढण्यासाठीचा आणि सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या निरोगी नागरिकांची पूर्ण क्षमता उपयोगात आणणारा देश अशी प्रतिमा घडविण्याचा देखील आहे.
म्हणूनच आम्ही वर्गीय विचारसरणीवर चालणाऱ्या सिटू या केंद्रीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या देशातील सर्वात लढाऊ कामगार संघटना अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (AIFAWH), च्या झेंड्याखाली संघटीत झालेल्या देशातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मागणी करतो की सरकारने आयसीडीएसच्या  खाजगीकरणासाठी उचललेली पावले ताबडतोब मागे घ्यावीत आणि देशातील प्रत्येक बालकाला त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अन्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या अधिकाराची तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सन्माननीय रोजगार याची हमी देण्यासाठीची संपूर्ण जबाबदारी उचलली पाहिजे.
आम्ही देशातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना आवाहन करतो की त्यांनी आयसीडीएस वाचविण्याच्या लढ्यात पूर्ण ताकदीनिशी सामील व्हावे.
आम्ही आयसीडीएसच्या लाभार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी देखील आयसीडीएसचे  खाजगीकरण करून त्याला पूर्णपणे मोडकळीस आणण्याच्या शासनाचा धोरणापासून आयसीडीएसला वाचवण्याच्या लढ्यात सामील व्हावे.
आपल्या मागण्या
1.     आयसीडीएसला नियमित करून त्याचे विभागात रुपांतर करावे.
2.     सर्व अंगणवाडी केंद्रांचे पूर्ण वेळ अंगणवाडी आणि पाळणाघरात रुपांतर करावे.
3.     स्वयंसेवी संस्थांचा सहभाग तसेच सार्वजनिक व खाजगी संस्थांचा संयुक्त सहभाग या नावाखाली कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण करू नये, आयसीडीएसला स्वयंसेवी संस्थांकडे सोपवून सेवांचे नुकसान करू नये.
4.     अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वर्ग III IV च्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. तोपर्यंतच्या काळात सेविका, मदतनिसांना महागाई निर्देशांकाला जोडलेले अनुक्रमे रुपये १५,००० व १०,००० किमान वेतन द्या.
5.     अंगणवाडी सेविका व मदतनिसांना निश्चित अशी किमान पेन्शन व ग्राचुईटी, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधांसारख्या सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे. पेन्शन व अन्य लाभ दिल्याशिवाय त्यांना सेवामुक्त करू नये.
6.     अंगणवाडी सेविका व मदतनिसांना संघटन करण्याचा व सामूहिक वाटाघाटी करण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. आयसीडीएसच्या कामकाजासंबंधी सर्व मुद्द्यांवर संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करा.
7.     १२व्या योजनेत आयसीडीएससाठी रु ३ लाख कोटी निधी मंजूर करा.
8.     अंगणवाडी केंद्रांसाठी वीज, पाणी इत्यादींची सोय असलेल्या पक्क्या इमारतींची व्यवस्था करा. सर्व केंद्रांना वाढलेल्या दराने भाडे द्या.
9.     पूर्व प्राथमिक शाळा नवीन पायाभूत सुविधा आणि अन्य सोयी पुरवताना पारदर्शक व्यवहार करा. सर्व पातळींवरील भ्रष्टाचार रोखा.
10. संपूर्ण देशात अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कामाची स्पष्ट व्याख्या करा व त्यांना कामाची समान नियमावली लागू करा. आयसीडीएसच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामे देऊ नयेत.
11. शाळेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुट्ट्या देण्यात याव्या.
सेविका पदाच्या नवीन भरतीमध्ये मदतनीस व आशांना प्राधान्य देण्यात यावे.

ज्योती बसू – एक जिवंत आख्यायिका

ज्योती बसू एक जिवंत आख्यायिका

८ जुलै २०१३ ते ८ जुलै २०१४ हे वर्ष भारतातील क्रांतिकारी चळवळीचे एक जनक आणि महान नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचे जन्मशताब्धी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
सिटू चे एक संस्थापक आणि भारताच्या राजकीय पटलावरील एक महान व लोकप्रिय नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचा जन्म ८ जुलै १९१४ रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांचे माता, पिता यांचे मूळ गाव आता बांगलादेशात असलेल्या ढाका जिल्ह्यात होते. त्यांच्या आईचा जन्म उच्च मध्यम वर्गातील जमीन धारक कुटुंबात झाला होता तर वडिल तुलनेनी निम्न मध्यम वर्गात जन्मलेले व परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर होते.
त्यांनीच त्यांच्या आठवणींमध्ये नोंद केलेली आहे की त्यांच्या कुटुंबात तिळमात्र देखील राजकीय वातावरण नव्हते. परंतु राजकारण जरी त्यांच्या कुटुंबातील एक विषय नसला तरी त्या काळातील क्रांतिकाऱ्यांबद्दल एक सहानुभूतीची व आदराची सुप्त भावना मात्र अवश्य होती. झपाट्याने वाढणाऱ्या क्रांतिकारी चळवळी, चित्तगांव शस्त्रागारावरील हल्ला, गांधीजींचे उपोषण, प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर होणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झंजावाती भाषणे अश्या वातावरणात मोठे होणारे कॉम्रेड बसू राजकीय घडामोडींकडे आकर्षित होणे स्वाभाविकच होते. ज्योती बसू यांनी त्यांच्या आठवणींमध्ये त्यांना व त्यांच्या भावाला नेताजींच्या जाहीर सभेच्या वेळी पोलिसांच्या हातून खाव्या लागलेल्या माराचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात तो सर्व भाग त्यावेळी एखाद्या रणांगणासारखा दिसत होता. अश्वारूढ पोलीस तसेच गणवेशांतील शिपाई तिथे होते. जेव्हा पोलिसांनी हल्ला केला तेव्हा सुरक्षित जागी पळून न जाण्याचा आम्ही निर्णय घेतला व आम्ही त्यांच्या समोरून शांतपणे जात असताना पोलिसांच्या काही लाठ्या आमच्याही पाठीवर पडल्या. पण तरीदेखील आम्ही पळून न जाता बाबांच्या चेंबरपर्यंत चालत गेलो.
ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला पुढील आयुष्यात सर्व आव्हाने समर्थपणे पेलू शकणारे नेतृत्व देण्याची क्षमता असलेला, पोलिसांच्या मारहाणीला निर्भयपणे सामोरे जाणारा व स्वातंत्र्य चळवळीने भारला गेलेला एक १६ वर्षाचा मुलगा पहायला मिळतो.   
लंडनमध्ये
१९३५ मध्ये ज्योतीबाबू पदवीधर झाले व पुढील कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनमधील शिक्षणाच्या 4 वर्षांच्या ह्या कालखंडात त्यांचे रुपांतर व्ही. के कृष्ण मेनन, जे पुढे नेहरूंच्या काळात कॅबिनेट मंत्री झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या इंडियन लीगच्या एका कार्यकर्त्यात झाले. नंतरच्या काळात लंडनमध्ये लंडन मजलीस नावाच्या एका संघटनेचे गठन झाले ज्याचे ते पहिले सचिव बनले. ही संघटना भारतातील स्वातंत्र्य चळवळींसाठी पाठींबा मिळविण्याचे तसेच लंडनला भेट देणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांचे स्वागत करण्याचे कार्य करीत असे. ह्यातून जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि अन्य नेत्यांच्या संपर्कात ते आले. ज्योती बसुंसह भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट त्याच काळात साम्राज्यशाही विरोधी चळवळ आणि मार्क्सवादी विचारसरणीकडे आकर्षित होऊन सक्रीय झाला व ब्रिटीश कम्युनिस्ट पार्टीशी त्यांचे जवळिकेचे संबंध निर्माण झाले.
१९४० मध्ये आपल्या परीक्षेनंतर निकालाचीही वाट न पाहता ज्योतीबाबू ताबडतोब भारतात परतले व त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क प्रस्थापित केला. जरी कोलकत्ता हायकोर्टात त्यांनी बॅरिस्टर म्हणून नोंदणी करून घेतली तरी प्रत्यक्षात ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून सक्रीयपणे काम करू लागले.
कामगार संघटना व निवडणुका
१९४४ मध्ये त्यांनी बंगाल- नागपूर रेल्वे वर्कर्स युनियन संघटीत करण्यास सुरवात केली व त्यात त्यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली. त्यांच्या कामगार चळवळीतील सहभागाची तिथून सुरवात झाली व जीवनाच्या अखेरच्या दिवसांपर्यंत हा सहभाग असाच चालू राहिला. ह्याच काळात त्यांचा निवडणुकीच्या क्षेत्रातदेखील प्रवेश झाला. १९४६ मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या रेल्वे कामगार मतदारसंघा मधील कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून त्याना उभे करण्यात आले. तिथे त्यांचा मुकाबला प्रामुख्याने कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या व रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेल्या हुमायून कबीर यांच्याशी झाला. त्यांच्या विधान सभेतील दीर्घ कारकिर्दीची सुरवात ह्याच निवडणुकीपासून झाली जी त्यांनी सर्व गैरप्रकारांचा मुकाबला करत जिंकली. १९४६ मधील निवडणुकीच्या अनुभवाबद्दल त्यांचे कथन नोंद घेण्यासारखे व मजेदार आहे. ते म्हणतात माझ्या पहिल्याच निवडणुकीत मला भांडवलदारी निवडणुका म्हणजे काय असतात ह्याची चव चाखायला मिळाली. जणू काही मला त्यांचा जळजळीत बाप्तीस्माच मिळाला. एका बाजूला मते खरेदी करण्याचे जाणून बुजून प्रयत्न करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणा आणि आदर्शवाद कसा असतो तेही पहायला मिळाले. मतदार असलेल्या रेल्वे कामगारांपैकी एकानेही गद्दारी केली नाही. आमच्या कॉम्रेड्सच्या समर्पण, चिकाटी आणि एकनिष्ठेमुळेच माझा विजय झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे हा विजय म्हणजे रेल्वे कामगारांचाच विजय होता. १९४६ च्या ह्या निवडणुकीत झालेल्या विजयाने दिलेली शिकवण त्यांना त्यांच्या विधानसभेतील पुढच्या सर्व निवडणुकींमध्ये चांगलीच कामी आली.  
स्वातंत्र्यानंतरही ज्योती बसू पश्चिम बंगालच्या विधान सभेचे सदस्य म्हणून कायम राहिले. बंगालच्या विभाजनानंतर देखील १९४६ मध्ये पश्चिम बंगाल मधून विधान सभेवर निवडून आलेल्या सर्वांची सदस्यता कायम राहिली. स्वातंत्र्यानंतर १९४७च्या नोव्हेंबरमध्ये भरविण्यात आलेल्या सत्राच्या पहिल्या दिवसाबद्दल ते आपल्या आठवणींमध्ये ते नमूद करतात, मला अजून आठवतंय की सत्राच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना बंगाल प्रांत कृषक सभेनी संघटीत केलेल्या किसान व विद्यार्थ्यांच्या २५,०००च्या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करावा लागला. पुढील काळात घडणाऱ्या गोष्टींची ही जणू चुणूकच होती.
ज्योती बसूंनी पश्चिम बंगाल तसेच राष्ट्रीय पातळीवर जनवादी आणि डावी चळवळ विकसित करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका वठवली. राज्यात एक सशक्त कामगार चळवळ उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दरम्यान जेव्हा जेव्हा कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांना अटक करण्यात येत असे. इतके  हल्ले होऊनही चळवळ शक्तिशाली होत गेली. ज्योती बसूंनी १९५२ तसेच १९५७ मध्ये देखील  निवडणूक जिंकली. त्यांनी विधान सभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले. १९६२मध्ये ते त्याच बडानगर मतदार संघातून निवडून आले.
१९६२ ते १९६७ हा काल भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा कालावधी होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला फुटीचा सामना करावा लागला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गठन झाले. ज्योती बसूंची पक्षाच्या ९ सदस्यीय पोलिट ब्युरोत निवड झाली व पक्षाच्या ह्या सर्वोच्च समितीचे ते त्यांच्या मृत्युपर्यंत सन्माननीय सदस्य राहिले.
जनतेच्या बाजूची सरकारे
१९६७ मध्ये अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला. पश्चिम बंगाल मध्ये कॉंग्रेसचा पराभव करणाऱ्या नवीन समीकरणाचे रचनाकार होते कॉम्रेड ज्योती बसू. तिथे झालेल्या त्रिकोणी निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील एक आघाडी व बांगला कॉंग्रेसच्या नेतृवाखालील दुसरी आघाडी यांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी सरकार स्थापन केले, ज्याचे मुख्यमंत्री होते बांगला कॉंग्रेसचे अजॉय मुखर्जी व उपमुख्यमंत्री होते ज्योती बसू. ही बंगालमधील संयुक्त सरकारांच्या दीर्घ इतिहासाची नांदीच म्हणावी लागेल. हे सरकार फक्त आठच महिने टिकले पण ह्या आठच महिन्यात ह्या सरकारने ट्राम कंपनीचे राष्ट्रीयीकरण, जनतेच्या चळवळी दडपण्यासाठी वापरण्यात येणारा राक्षसी पश्चिम बंगाल सुरक्षा कायदा रद्द करणे अशी अनेक जनतेच्या बाजूची पावले उचलून इतिहास घडवला. ह्या सरकाने हे देखील जाहीर केले की कामगार तंट्यांमध्ये पोलीस व्यवस्थापनाच्या बाजूने पक्षपाती भूमिका घेणार नाही.
१९६९ मध्ये झालेल्या त्यानंतरच्या निवडणुकीत ह्या दोन्ही आघाड्यांनी कॉंग्रेसविरुद्ध एकत्रित निवडणूक लढवली. ज्योती बसू पुन्हा उपमुख्यमंत्री बनले व त्यांनी गृह व पोलीस खाते सांभाळले. ह्या सरकारने राज्यात जमीन सुधारणांचा पाया रचला व जनतेच्या बाजूचे  अनेक निर्णय घेतले. हे सरकार फक्त १३ महिने चालले व २९ मार्च १९७०ला राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. हा काळ पश्चिम बंगालच्या इतिहासातील एक अशांत काळ होता. नक्षलवादी चळवळीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या समर्थकांवर खुनी हल्ले करायला सुरवात केली. त्यात त्यांना कॉंग्रेसने देखील साथ दिली. ३१ मार्च १९७० रोजी पटना रेल्वे स्टेशनवर ज्योती बसू यांच्यावर गोळी झाडून खुनी हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांना घ्यायला आलेल्या एका कॉम्रेडचा मृत्यू झाला. ज्योती बसुंच्या हाताला खरचटले परंतु त्यांचा जीव वाचला.
सिटूची स्थापना
त्याच वेळी कामगार संघटना आघाडीवर देखील नवीन घडामोडी होत होत्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध क्षेत्रात होणाऱ्या प्रचंड लढयांच्या हाताळणीबद्दल आयटकमध्ये वर्चस्व असलेल्या नेतृत्वाला अनेक प्रश्न विचारले जात होते. अश्या परिस्थितीत नव्या केंद्रीय कामगार संघटनेचे गठन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय कामगार संमेलन घेण्याचा निर्णय घेतला गेला. कॉम्रेड बी टी रणदिवे, कॉम्रेड पी आर राममूर्ती सारख्या नेत्यांच्या बरोबरीने ज्योती बसू यांनी देखील त्यात पुढाकार घेतला. पश्चिम बंगाल प्रांतीय कामगार संघटना कौन्सिलने ह्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला. ज्योती बसू कोलकत्त्यातील संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या स्वागतपर भाषणात त्यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थिती व दोन्ही संयुक्त आघाडी सरकारांनी अल्पावधीत मिळवलेले यश याबाबत विवेचन केले. त्यांनी अधिवेशानासमोरचे कार्य, लढ्यांसाठी कामगार वर्गीय एकजुटीची बांधणी करण्याची गरज, कामगार वर्गाची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सहयोगी दोस्तांची एकजूट करण्याची आवश्यकता इत्यादी महत्वाच्या विषयांचा समाचार घेतला. स्थापना अधिवेशनात ते सिटूचे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडले गेले तर दुसऱ्या अधिवेशनात उपाध्यक्ष म्हणून, ज्या पदावरून त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सिटूला मार्गदर्शन केले.
ज्योती बसूंनी १९७० नंतरच्या अशांत दिवसांमध्ये कष्टकरी जनतेच्या लढयांना नेतृत्व दिले आणि पश्चिम बंगाल मध्ये सिटूची देशातील सर्वात बलशाली शाखा बांधण्यासाठी मार्गदर्शन केले. १९७० ते १९७७च्या कालखंडातील पश्चिम बंगालमधील जनतेचे लढे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू आणि अन्य जनसंघटनांच्या अगणित नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या हा सर्व इतिहासाचा भाग आहे. 
पश्चिम बंगालमधील जनतेनी ह्या सर्व क्रूरतेला तोंड दिले, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष केला आणि शेवटी विजय मिळवला. १९७० पासून त्यांनी डाव्या आघाडी साठी प्रयत्न केले. १९७७ मध्ये पहिले डाव्या आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि ज्योती बसू यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सातत्याने ५ निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करत ते २३ वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर त्यांनी त्या पदावरून निवृत्ती घेतली आणि स्वतः उभे न राहता पुढील 2 निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा किल्ला लढवला. भांडवली व्यवस्थेत सातत्याने ३४ वर्षे डाव्या आघाडीचे सरकार चालवणे हा एक विक्रमच आहे.
ज्योती बसू यांनी सर्वात जास्त काल पदावर राहून सेवा देणारे मुख्यमंत्री म्हणून एक इतिहास घडवला. पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारांच्या अनेक उपलब्धींमध्ये लोकशाही  अधिकारांची पुनःस्थापना तसेच सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता ह्यांचा देखील समावेश होतो.
१९७७मध्ये पदग्रहण केल्याबरोबर ताबडतोब ज्योती बसू यांनी घोषणा केली की, हे सरकार फक्त रायटर्स बिल्डींग मधून कारभार करणार नाही. राज्य सरकारच्या मर्यादांची स्पष्ट कल्पना देखील पश्चिम बंगाल मधील जनतेला देण्यात आली. एका मुलाखतीत त्यांनी डाव्या आघाडीचे सरकार चालवण्याच्या ह्या प्रयोगाबद्दल म्हटले की, इथे समाजवादी आर्थिक किंवा राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही आहे. आम्ही लोकांना कोणतीही अवास्तव आश्वासने दिलेली नाहीत. जे आम्ही करू शकतो ते आम्ही त्यांना सांगितले आहे. आम्ही मूलभूत बदल घडवून आणू शकत नाही कारण आम्ही प्रजासत्ताक पश्चिम बंगाल नाही तर भारताचा एक भाग आहोत.
पश्चिम बंगाल मधील ३४ वर्षांच्या डाव्या आघाडी सरकारने देशात डावी आणि जनवादी चळवळ उभी करण्यात तसेच जनतेच्या बाजूचे, विशेषतः कामगार, किसान व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या बाजूचे कार्यक्रम सुरु करण्यात महत्वाचे योगदान दिलेले आहे.
जनतेच्या हितासाठी
२००९च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला पीछेहाटीला सामोरे जावे लागले. त्यावेळी ते म्हणाले, लोकच इतिहासाची दिशा ठरवित असतात. काही लोकांमध्ये आपल्याबद्दल काही काळासाठी गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण जर आपण वारंवार लोकांकडे जात राहिलो आणि स्वतःला त्यांच्या प्रेमाच्या योग्य बनविले तर ते निश्चितपणे आपल्याला समजून घेतील. जे लोक पंचायत किंवा लोकसभा निवडणुकीत आपल्या विरोधात गेले त्यांना आपल्याला परत आपल्याकडे वळवावे लागेल. 
पश्चिम बंगालमधील कष्टकरी वर्गाच्या चळवळीतील नेत्यांना ज्योती बसू यांनी हे तातडीचे कार्य आखून दिले आहे. ज्या उदात्त आदर्शांसाठी ते आपल्या ७० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये लढले, ते आदर्श साध्य करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. आज ज्योती बसू आपल्याला कायमचे सोडून गेले असले तरी त्यांनी दिलेली शिकवण नक्कीच आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत घेऊन जाईल. त्यांचे हे म्हणणे आपण कधीच विसरता कामा नये, लोकांच्या प्रेमाइतकी मौल्यवान गोष्ट आपल्या आयुष्यात कोणतीही असू शकत नाही... महान उद्दिष्टांसाठी आपल्या आयुष्याचा त्याग करायला आपण नेहमीच तयार असले पाहिजे....शेवटी मी हेच सांगेन की आपले आयुष्य कसे घालवले याबद्दल आपल्याला पश्चात्ताप वाटता कामा नये.
महान क्रांतीकारी नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचा वारसा चिरंतन राहो!

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, बंदी आणि निवारण) कायदा, २०१३

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, बंदी आणि निवारण) कायदा, २०१३

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध त्यांना संरक्षण देण्यासाठी, छळाचा प्रतिबंध करण्यासाठी आणि लैंगिक छळाविरुद्धच्या किंवा त्याच्याशी संबंधित किंवा त्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीचा कायदा महिलांचा लैंगिक छळ हा त्यांना राज्य घटनेच्या कलम १४ व १५ नुसार मिळालेला समानतेचा अधिकार व कलम २१ नुसार मिळालेला सन्मानानी जगण्याचा अधिकार तसेच त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार काम वा व्यवसाय करण्याचा व त्यासाठी लैंगिक छळपासून मुक्त वातावरण मिळवण्याचा अधिकार ह्या मूलभूत अधिकारांचे हनन आहे. त्याचप्रमाणे लैंगिक छळापासून संरक्षण मिळवण्याच्या आणि सन्मानाने काम करण्याच्या महिलांच्या अधिकाराबाबतच्या तसेच महिलांबाबत होणाऱ्या सर्व प्रकारच्या भेदभावांविरुद्धच्या, आंतरराष्ट्रीय सनदीद्वारा मान्य असलेल्या सार्वत्रिक मानवी हक्कांचे उल्लंघन आहे ज्यांना भारत सरकारने मान्यता दिली आहे. ह्या सनदीला मान्यता दिल्यानंतर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध महिलांचे संरक्षण करणारी उपाययोजना आखणे सरकारवर बंधनकारक बनते.
 कायद्यातील प्रमुख मुद्दे

  1.  ‘महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, बंदी आणि निवारण) कायदा, २०१३’ नावाचा हा कायदा संपूर्ण भारतात केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून लागू होईल. 
  2. काही व्याख्या- बाधित महिला- कामाच्या ठिकाणच्या संपर्कातील कोणत्याही वयाची त्याठिकाणी कामास असलेली किंवा नसलेली, किंवा एखाद्या राहत्या घरात वा वास्तूत कामाला असलेली, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळापासून बाधित महिला. सक्षम शासन- केंद्र शासन, केंद्रशासित प्रदेश यांच्या मालकीचे वा नियंत्रणात असलेले किंवा त्यांचा थेट किंवा अन्य माध्यमातून निधी मिळत असल्यास केंद्र शासन; राज्य शासनाच्या मालकीचे वा नियंत्रणात असलेले किंवा त्यांच्याकडून निधी मिळत असल्यास राज्य शासन; असा निधी मिळत नसल्यास ज्या राज्यात हे कामाचे ठिकाण आहे ते राज्य शासन. घर कामगार- घरकाम करण्यासाठी रोख किंवा वस्तू रूपात मोबदला देऊन थेट किंवा एखाद्या संस्थेमार्फत तात्पुरत्या वा कायम स्वरूपी, अर्धवेळ अथवा पूर्णवेळासाठी नेमलेली परंतु त्या घरमालकाच्या कुटुंबाची सदस्य नसलेली महिला. कर्मचारी- एखाद्या कामाच्या ठिकाणी नियमित, तात्पुरती, नैमित्तिक किंवा रोजंदारीने, थेट अथवा ठेकेदारासहित एखाद्या माध्यमामार्फत मुख्य मालकाला माहित असताना किंवा नसताना, पगारी अथवा बिनपगारी किंवा स्वयंसेवी पद्धतीने, कामाचे नियम स्पष्ट असताना किंवा अस्पष्ट, सहाय्यक कर्मचारी, कंत्राटी कामगार, कच्ची वा शिकाऊ अथवा कोणत्याही अन्य नावाने नियुक्त केली गेलेली महिला. मालक अथवा नियोक्ता- कोणत्याही खाते, संस्था, नियंत्रणातील उद्योग, कार्यालय, शाखा अथवा युनिट यांच्याशी संबधित कोणतेही सक्षम शासन किंवा स्थानिक प्रशासन, वर उल्लेख न केलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन, निरीक्षण किंवा नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेली कोणतीही व्यक्ती, मंडळ अथवा कमिटी जी त्या संस्थेसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यास व अंमलात आणण्यास जबाबदार असेल. किंवा ती जबाबदारी त्याला ठेक्याने मिळाली असेल. राहत्या घराच्या बाबतीत जी व्यक्ती घर कामगाराला कामाला लावत असेल किंवा तिच्या कामाचा लाभ घेत असेल, मग घर कामगार कितीही संख्येत असोत, कितीही वेळासाठी नियुक्त केलेले असोत किंवा त्यांच्या नियुक्तीचे वा कामाचे स्वरूप कोणतेही असो. लैंगिक छळ- खाली नमूद केलेली थेट अथवा गर्भितार्थ कृती किंवा वागणूक- शारीरिक संपर्क किंवा त्याबाबत पुढाकार; लैंगिक स्वरूपाची मागणी किंवा विनंती; लैंगिक अर्थाच्या टिप्पणी; अश्लील चित्र किंवा तत्सम गोष्टी दाखवणे; अन्य कोणतीही नको असताना केलेली शारीरिक, तोंडी किंवा शब्दात व्यक्त न केलेली लैंगिक स्वरूपाची कृती. कामाचे ठिकाण- अ) सक्षम शासन, स्थानिक प्रशासन, सार्वजनिक कंपनी, महामंडळ किंवा सहकारी संस्था संचलित कोणतेही खाते, संस्था, उद्योग, कार्यालय, शाखा किंवा युनिट. ब) खाजगी क्षेत्रातील संस्था किंवा कंपनीने संचालित केलेली संस्था, उद्योग, सोसायटी, विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था; व्यापारी, व्यावसायिक, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण, मनोरंजन, उद्योग, आरोग्य, वित्त आदी क्षेत्रात निर्माण, पुरवठा, विक्री, वितरण किंवा अन्य सेवा देणारी संस्था. क) रुग्णालये किंवा शुश्रुषागृह. ड) खेळांशी संबंधित संस्था, स्टेडीयम, वास्तू, स्पर्धा किंवा ठिकाण निवासी असो वा प्रशिक्षण, खेळ किंवा तत्सम कामासाठी वापरात नसलेले असो. ई) कर्मचारी कामासंदर्भात भेट देत असलेली ठिकाणे किंवा नियोक्त्याने पुरवलेली वाहतुकीची साधने. फ) नियोक्त्याचे निवासाचे ठिकाण अथवा घर. असंगठीत क्षेत्र- असे कामाचे ठिकाण ज्याची मालकी वस्तूंचे उत्पादन वा विक्री करणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांकडे असेल आणि ज्या ठिकाणी कामगार लावले गेलेले असतील, त्यांची संख्या १० पेक्षा जास्त नसेल. 
  3. लैंगिक छळाळा प्रतिबंध- अ) कोणत्याही महिलेचा लैंगिक छळ होता कामा नये. ब) खालील परिस्थितीत लैंगिक स्वरूपाचे वर्तन केले गेल्यास तो लैगिक छळ समजला जावा. महिलेला कामाबाबत खास प्राधान्य देण्याचे गर्भित वा स्पष्ट वचन देऊन; तिच्या कामाबाबत नुकसान करण्याची धमकी देऊन; तिच्या कामाच्या सध्याच्या किंवा भविष्यातील पदाबाबत धमकी देऊन; तिच्या कामात हस्तक्षेप करून किंवा तिच्यासाठी असुरक्षित, विरोधी व आक्रमक असे कामाचे वातावरण निर्माण करून; तिला अपमानास्पद वागणूक देऊन तिचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आणून. 
  4. अंतर्गत तक्रार कमिटीचे गठन- प्रत्येक नियोक्त्याने लिखित आदेशानुसार ‘अंतर्गत तक्रार कमिटी’ चे गठन करावे. अनेक ठिकाणी कामकाज असलेल्या नियोक्त्याने आपल्या प्रत्येक विभागामध्ये आणि प्रशासकीय शाखा किंवा कार्यालयांमध्ये त्या स्तरावरील अंतर्गत कमिटी बनविली पाहिजे. अंतर्गत कमिटीचे सदस्य- अ) अध्यक्षपदी त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांधून वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी अशी वरिष्ठ महिला उपलब्ध नसल्यास त्याच मालकाच्या अन्य शाखांमधील वरिष्ठ महिलेला अध्यक्षपद देण्यात यावे. ब) कर्मचाऱ्यांमधून कमीत कमी दोन सदस्य असे नेमण्यात यावेत ज्यांची महिलांच्या प्रश्नांवर बांधिलकी असेल व ज्यांना समाजकार्याचा अनुभव असेल किंवा कायद्याची माहिती असेल. क) स्वयंसेवी संस्था किंवा संघटनांमधून एक सदस्य असा घेण्यात यावा ज्यांची महिलांच्या प्रश्नांशी बांधिलकी असेल तसेच लैंगिक छळाच्या सर्व मुद्द्यांबाबत जाण असेल. कमिटीमधील किमान ५०% सदस्य महिला असल्या पाहिजेत; अध्यक्ष व कमिटीचे अन्य सदस्य त्यांची नेमणूक झाल्यापासून जास्तीत जास्त 3 वर्षे त्या कमिटीवर काम करतील; स्वयंसेवी संस्थेमधून घेण्यात आलेल्या सदस्याला नियोक्ता सुचविण्यात आलेली फी किंवा भत्ता देईल; अध्यक्ष किंवा एखाद्या सदस्यावर एखादी गुन्हेगारी स्वरूपाची किंवा शिस्तभंगाची कारवाई सुरु असल्यास त्या सदस्याला कामिटीवरून काढण्यात येईल व रिक्त जागा नियमाप्रमाणे भरण्यात येईल. 
  5. स्थानिक तक्रार कमिटीचे गठन- सक्षम शासन जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारीपैकी एकाची नेमणूक ह्या कायद्यातील कामकाजाची पूर्तता करण्यासाठी जिल्हा अधिकारी म्हणून करतील.
  6.  प्रत्येक जिल्हा अधिकारी आपल्या जिल्ह्यासाठीच्या ‘स्थानिक तक्रार कमिटी’ चे गठन करतील जी १० पेक्षा कमी कामगार असल्यामुळे अंतर्गत तक्रार कमिटीचे गठन होऊ न शकलेल्या सर्व कामाच्या ठिकाणांमधील लैगिक छळाच्या तक्रारींची नोंद करून घेतील व त्यांची सुनवाई करतील. जिल्हा अधिकारी ग्रामीण व आदिवासी भागात प्रत्येक तालुक्यासाठी एक व शहरी भागात प्रभाग किंवा महानगरपालिका स्तरावर एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करतील जे त्यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारी ७ दिवसांच्या आत स्थानिक तक्रार कमिटीकडे पाठवतील. स्थानिक तक्रार कमिटीचे अधिकारक्षेत्र संबंधित जिल्हा हे असेल. 
  7. स्थानिक तक्रार कमिटीचे स्वरूप, कार्यकाल आणि नियम- समाजकार्याच्या क्षेत्रामधील व महिलांच्या प्रश्नांशी बांधिलकी असलेल्या प्रथितयश महिला कार्यकर्त्यांमधून अध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी; एक सदस्य तालुका, महानगरपालिका इत्यादीत काम करणाऱ्या महिलांमधून घ्यावा; दोन सदस्य ज्यातील किमान एक महिला असेल, महिला प्रश्नांशी बांधिलकी असलेल्या स्वयंसेवी संस्थेमधून किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नाची जाण असलेल्यांमधून घेण्यात यावेत. त्यातील एका सदस्याची पार्श्वभूमी कायदे क्षेत्रातील असावी किंवा त्याला कायद्यांची चांगली जाण असावी. किमान एक सदस्य अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास जाती, अल्पसंख्यक समाजातील महिला असावी; जिल्हा समाज कल्याण किंवा महिला बाल विकास अधिकारी ह्या कमिटीचे पदसिद्ध सदस्य असतील; स्थानिक तक्रार कमिटीचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल नेमणूक केल्यापासून 3 वर्षांपेक्षा जास्त असणार नाही; बाकी सर्व नियम अंतर्गत कमिटी प्रमाणेच असतील. 
  8. केंद्र शासन फी व भत्ते देण्यासाठी राज्य शासनाकडे लोकसभेने मंजूर केलेला निधी वर्ग करेल व तो निधी आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासानांकडे वर्ग करण्यात येईल. 
  9. तक्रार- बाधित महिलेने अंतर्गत तक्रार कमिटी व ज्या ठिकाणी अशी कमिटी नसेल तिथे स्थानिक तक्रार कमिटीकडे घटना घडल्याच्या 3 महिन्यांच्या आत किंवा वारंवार लैंगिक छळाच्या घटना घडत असतील तर शेवटची घटना घडल्याच्या 3 महिन्यांच्या आत लेखी तक्रार करू शकेल. तिला लेखी तक्रार देणे शक्य नसल्यास कमिटीचे अधिकारी, अध्यक्ष यांनी तशी व्यवस्था करावी. बाधित महिलेची शारीरिक किंवा मानसिक अक्षमता किंवा तिचा मृत्यू झालेला असल्यास तिचा कायदेशीर वारस किंवा अन्य नेमलेली व्यक्ती तिच्या वतीने तक्रार दाखल करू शकेल. 
  10. तडजोड- बाधित महिलेच्या विनंतीवरून तक्रारदार व जाब देणार यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्याची कार्यवाही अंतर्गत किंवा स्थानिक तक्रार कमिटी आर्थिक तडजोड न करण्याच्या अटीवर करू शकेल. घडून आलेल्या तडजोडीबाबत अंतर्गत कमिटी नियोक्त्यांना किंवा स्थानिक कमिटी जिल्हा अधिकारी यांना लेखी माहिती देतील. तसेच तडजोडीच्या प्रती बाधित महिला व जाब देणार यांना देण्यात येतील. तडजोड घडून आल्यानंतर पुढील चौकशीची कारवाई थांबविण्यात येईल.
  11.  तक्रारींची चौकशी- जाब देणारी व्यक्ती कर्मचारी असल्यास व त्यांना कामाचे नियम लागू असल्यास त्या नियमांप्रमाणे पुढील चौकशी सुरु होईल तसेच ज्यांना असे नियम लागू नाहीत त्यांच्याबाबतीत विशेषतः तक्रारदार घरकामगार असल्यास भारतीय दंड संहिता कलम ५०९ अथवा अन्य योग्य कलमानुसार तक्रार नोंदविल्यापासून ७ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला जाईल. मात्र त्यासाठी ह्या तक्रारीबाबत कोणतीही तडजोड झालेली नसल्याचा निर्वाळा तक्रारदाराने दिलेला असला पाहिजे. दोन्ही पक्ष कर्मचारी असल्यास दोघांनाही एकमेकांनी दिलेल्या जबाबांची प्रत देण्यात येईल जेणेकरून त्यांना त्यांची उत्तरे देता येतील. अंतर्गत किंवा स्थानिक तक्रार कमिटीला दिवाणी कोर्टाप्रमाणे पुढील अधिकार असतील- कोणत्याही व्यक्तीला समजपत्र पाठवून बोलावून घेणे व त्यांना कमिटीसमोर उपस्थित राहण्यास व शपथेवर जबाब द्यायला बाध्य करणे; आवश्यक ती कागदपत्रे शोधणे किंवा बनविणे; आवश्यक ती अन्य कोणतीही कार्यवाही करणे. 
  12. चौकशी चालू असताना करावयाची कृती- लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी चालू असताना बाधित महिलेच्या विनंतीवरून संबंधित कमिटी नियोक्त्याकडे खालील शिफारस करू शकेल- तक्रारदार महिलेची किंवा जाब देणाऱ्याची अन्य कामाच्या ठिकाणी बदली करावी. किंवा बाधित महिलेला 3 महिन्यांपर्यंतची रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा तिच्या अन्यथा मिळणाऱ्या रजेच्या व्यतिरिक्त असावी; आवश्यकतेनुसार अन्य कोणताही दिलासा द्यावा. नियोक्ता वरील शिफारसीनुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित कमिटीला देईल. 
  13. चौकशीचा अहवाल- (1) ह्या कायद्यानुसार केल्या जाणारी चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यामधून निघालेल्या निष्कर्षांचा अहवाल संबंधित तक्रार कमिटी नियोक्ता किंवा जिल्हा अधिकारी यांना चौकशी पूर्ण झाल्याच्या १० दिवसाच्या आत देईल. त्याची प्रत संबंधित पक्षांना उपलब्ध करून देण्यात येईल. (2) अंतर्गत तक्रार कमिटी अथवा स्थानिक तक्रार कमिटीच्या चौकशीत जाब देणाऱ्या विरुद्धचा आरोप सिद्ध न झाल्यास कमिटी नियोक्ता किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना जाब देणाऱ्या विरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची शिफारस करेल. (3) संबंधित तक्रार कमिटीच्या चौकशीत जाब देणाऱ्या विरुद्धचा आरोप सिद्ध झाल्यास कमिटी नियोक्ता अथवा जिल्हा अधिकाऱ्यांकडे खालील शिफारसी करू शकतात- (i) जाब देणाऱ्याला लागू असलेल्या कामाच्या नियमावलींमधील लैंगिक गैरवर्तुणूकीविरुद्ध केल्या जाणाऱ्या शिक्षा त्याला देण्यात याव्यात. (i i) बाधित महिलेला किंवा तिच्या वारसाला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणारी रक्कम जाब देणाऱ्याच्या पगारातून कपात करण्यात यावी. त्याला नोकरीतून काढणे अथवा गैहजरीमुळे पगारातून कपात शक्य नसल्यास त्याने ती रक्कम थेट भरावी असा हुकुम देण्यात यावा. त्याने ती रक्कम न भरल्यास थकबाकी कायदेशीर कारवाई करून वसूल करण्यात यावी. (4) नियोक्ता किंवा जिल्हा अधिकारी त्यांना शिफारसी प्राप्त झाल्याच्या ६० दिवसांच्या आत त्यांची अंमलबजावणी करेल. 
  14. खोट्या किंवा खोडसाळपणे केलेल्या तक्रारी आणि बनावट पुरावे दिल्याबद्दल शिक्षा- (1) संबधित कमिटीला बाधित महिलेनी किंवा अन्य व्यक्तीने जाब देणाऱ्याविरुद्ध केलेली तक्रार खोटी आढळून आल्यास अथवा त्यांनी पुरावा म्हणून दिलेली कागदपत्रे खोटी अथवा बनावट आढळून आल्यास त्या तक्रारदार महिलेविरुद्ध किंवा अन्य तक्रारदाराविरुद्ध कामाच्या नियमावलीनुसार अथवा कमिटीच्या शिफारसीनुसार कारवाई करता येईल. परंतु केवळ आरोप सिद्ध करणे अथवा पुरावे देण्यास अक्षम असणे ह्या गोष्टी शिक्षा देण्यासाठी पुरेश्या ठरणार नाहीत. त्याही पुढे जाऊन तिच्यावर कारवाई करण्याआधी तक्रारदार महिलेचा खोडसाळ हेतू तिच्याविरुद्ध्च्या चौकशीत निर्विवादपणे सिद्ध करावा लागेल. (2) चौकशीच्या दरम्यान एखाद्या साक्षीदाराने खोटी साक्ष अथवा चुकीची माहिती दिल्याचे संबंधित तक्रार कमिटीला आढळून आल्यास त्याला लागू असलेल्या कामाच्या नियमावलीनुसार किंवा कमिटीच्या शिफारसीनुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस कमिटी नियोक्ता किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे करता येईल. 
  15. नुकसान भ्ररपाईची रक्कम निश्चित करणे- बाधित महिलेला देण्याच्या नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना पुढील गोष्टी विचारात घ्याव्यात- बाधित महिलेला सहन करावा लागलेला मानसिक शारीरिक त्रास, भावनिक दुःख; लैंगिक छळामुळे सहन करावे लागलेले व्यावसायिक संधीचे नुकसान ; बाधित महिलेचा शारीरिक मानसिक उपचारांवर झालेला खर्च; जाब देणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न व आर्थिक स्तर; रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्याने देण्याची क्षमता.
  16.  बाधित महिला, तिची तक्रार व त्याबाबतच्या चौकशीची प्रक्रिया या सर्व गोष्टींबाबत गुप्तता- माहितीच्या अधिकाराचा अपवाद वगळता अन्यथा कोणालाही बाधित महिला, तिची तक्रार व चौकशी याबाबत माहिती देता येणार नाही. त्यांना प्रसिद्धी देता येणार नाही. तक्रारदार महिला व साक्षीदार यांचे नाव, पत्ता, ओळख किंवा त्या दिशेने जाण्यास मदत करणारी माहिती गुप्त ठेवावी लागेल.
  17.  वरील माहिती गुप्त ठेवण्याच्या कलमाचा भंग करून तिला प्रसिद्धी दिल्यास अश्या व्यक्तीविरुद्ध त्या व्यक्तीला लागू असलेल्या कामाच्या नियमावलीनुसार अथवा कमिटीने सुचविल्यानुसार कारवाई करता येईल.
  18. अपील- कमिटीच्या शिफारसी वा अंमलबजावणी याबाबत कामाच्या नियमावलीनुसारचे कोर्ट अथवा ट्रिब्युनलकडे व अशी नियमावली लागू नसल्यास सक्षम त्या कोर्टात शिफारसी पाठवल्याच्या ९० दिवसांच्या आत अपील करता येईल. 
  19. मालक अथवा नियोक्त्याचे कर्तव्य- प्रत्येक नियोक्त्याने अ) कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे. ह्यात कामाच्या ठिकाणी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपासूनची सुरक्षा समाविष्ट आहे. ब) लैंगिक छळाविरुद्ध होणाऱ्या कारवाई बाबत तसेच अंतर्गत तक्रार कामितीबाबत सर्वांना दिसेल  अश्या ठिकाणी माहिती प्रदर्शित करावी. क) ह्या कायद्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, जन जागृतीचे कार्यक्रम नियमितपणे घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना कायदा, त्यातील तरतुदी, अंतर्गत तक्रार कमिटी व त्याचे सदस्य याबाबत अवगत करावे. ड) अंतर्गत किंवा स्थानिक तक्रार कमिटीला कामकाज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावीत. ई) अंतर्गत किंवा स्थानिक कामिटीसमोर जाब देणाऱ्या व्यक्तीला व साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी कमिटीला सहकार्य करावे. फ) तक्रारीच्या चौकशीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे व माहिती कमिटीला उपलब्ध करून द्यावी. ग) बाधित महिला भारतीय दंड संहिता किंवा त्यावेळी लागू असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याची मदत घेऊ इच्छित असल्यास तिला सर्व सहाय्य द्यावे. ह) लैंगिक छळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता किंवा त्यावेळी लागू असलेल्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ती व्यक्ती कर्मचारी असल्यास त्याची लैंगिक छळाची कृती ही गैरवर्तणूक आहे असे मानून त्याच्या विरुद्ध कामाच्या नियमावलीत गैरवर्तणूकीबाबत असलेली कारवाई सुरु करावी. ती व्यक्ती कर्मचारी नसल्यास अन्य कायद्यांच्या आधारे कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अंतर्गत कमिटी वेळेत कारवाई करत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवावे.
  20. जिल्हा अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्ये- जिल्हा अधिकारी स्थानिक कमिटी वेळेत अहवाल सादर करीत आहे काय यावर लक्ष ठेवतील तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लोकांमध्ये लैंगिक छळाबाबतचा कायदा व महिलांचे अधिकार याबाबत जागृती घडवून आणतील. 
  21. कमिटीने द्यावयाचा वार्षिक अहवाल- अंतर्गत कमिटी व स्थानिक कमिटी दर वर्षी आपल्या कामकाजाचा अहवाल तयार करेल व अनुक्रमे नियोक्ता किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना देईल. ह्या अहवालांच्या आधारे जिल्हा अधिकारी एक संक्षिप्त अहवाल राज्य शासनाला देतील.
  22.  नियोक्त्याने कंपनीच्या वार्षिक अहवालात द्यावयाची माहिती- नियोक्ता आपल्या कंपनीच्या वार्षिक अहवालात कंपनीत नोंद झालेल्या तक्रारी, आणि त्यावरील कार्यवाही याबाबतच्या अहवालाचा समावेश करेल. जर असा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जात नसेल तर हा अहवाल जिल्हा अधिकाऱ्याला सादर करेल.
  23. सक्षम शासनाचे कर्तव्य- सक्षम शासन कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल व नोंदलेल्या तक्रारी व त्यांच्यावरील कार्यवाहीची माहिती व आकडेवारी गोळा करील.
  24. सक्षम शासनाने कायद्याला द्यावयाची प्रसिद्धी- सक्षम शासन उपलब्ध निधी व साधनांच्या मर्यादेत- आवश्यक ती माहिती, शिक्षण, संपर्क आणि प्रशिक्षणाची साधने विकसित करेल तसेच महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून सुरक्षा देण्यासाठीच्या ह्या कायद्यातील तरतुदिंबाबत  जनजागृतीचे व लोकांची त्याबाबत समज वाढविण्यासाठीचे कार्यक्रम करेल. तसेच स्थानिक तक्रार कमिटीच्या सदस्यांची समज तयार करणे व त्यांची प्रशिक्षण करणे यासाठीचे कार्यक्रम करेल.
  25. माहिती मागवण्याचा व रेकॉर्ड तपासण्याचा अधिकार- (1) सक्षम शासन जनहित व महिला कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणचे हित लक्षात घेऊन लिखित आदेशांद्वारे- आवश्यकता भासल्यास कोणत्याही नियोक्ता अथवा जिल्हा अधिकाऱ्यांना बोलावून लैंगिक छळाबाबतची माहिती मागवून घेईल तसेच लैंगिक छळाच्या संदर्भात एखादे रेकॉर्ड किंवा कामाचे ठिकाण तपासण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक करेल जो ठराविक कालावधीत आपला तपासणीबाबतचा अहवाल सादर करेल. (2) प्रत्येक नियोक्ता किंवा जिल्हा अधिकारी व तपासणी अधिकाऱ्याच्या मागणीनुसार संबंधित विषयाची माहिती, रेकॉर्ड व त्यांच्या ताब्यातील अन्य कागदपत्रे त्याच्यासमोर सादर करतील.
  26.  कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल दंड- (1) नियोक्त्याने अंतर्गत तक्रार कमिटीचे गठन; तक्रारींबाबत कार्यवाही; हा कायदा व त्याचे नियम यांचे पालन न केल्यास नियोक्त्याला ५०,००० रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.(2) एखाद्या नियोक्त्याला वरील कोणत्याही कारणाने दंड झालेला असेल व त्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केल्यास त्याला- पहिल्यावेळी झालेल्या दंडाच्या दुप्पट दंड होईल किंवा त्याचा व्यवसाय करण्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.
  27. कोर्टाची दखल- ह्या कायद्याच्या तरतूदिंमध्ये कोणतेही कोर्ट दखल घेणार नाही; मेट्रोपोलिटन किंवा जुडीशियल कोर्टाच्या खालील कोर्ट ह्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करणार नाही; ह्या कायद्यातील प्रत्येक गुन्हा अदखलपात्र असेल. 
  28.  ह्या कायद्यातील तरतुदी अन्य कायद्यांचा भंग करणार नाहीत पण त्यांना पूरक असू शकतील.
  29. सक्षम शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार- केंद्र शासन ह्या कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यासाठी खालील मुद्द्यांवर आवश्यक नियम बनवू शकेल- सदस्यांना देण्याची फी व भत्ते; सदस्यांची नेमणूक; अध्यक्ष व सदस्यांना देण्याची फी व भत्ते; तक्रार करु शकणारी व्यक्ती; चौकशीची पद्धत; चौकशी करण्याचा अधिकार; दिलासा देण्यासंबंधीची शिफारस; कायद्यातील विविध कलमान्वये करावयाच्या कारवाईची पद्धत; कार्यशाळा, कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीचे, सदस्यांसाठी समज वाढविण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची पद्धत आणि कामिट्यांनी वार्षिक अहवाल देण्याची पद्धत
  30. अडचणी दूर करण्याचा अधिकार- ह्या कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात कोणतीही अडचण किंवा अवरोध निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी 2 वर्षांच्या आत त्या तरतुदींना पूरक आदेश काढेल व ते लोकसभेसमोर मांडेल. 


 

योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न, लढे व संघटना बांधणी

                                   योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न, लढे व संघटना बांधणी पार्श्वभूमी-

आपल्या देशाच्या संविधानात आपल्या शासनाची काही मुलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत. आपल्या शासनाचे वर्णन घटनेत कल्याणकारी शासन असे केलेले आहे. शासनाचे काम केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणे व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसून नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे हे देखील कल्याणकारी शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. अन्न, आरोग्य, शिक्षण, रोजगार ह्या अश्या गोष्टी आहेत ज्यांच्याशिवाय माणसाला माणूस म्हणून जगता येणे केवळ अशक्य आहे. ज्या देशात हजारो वर्षे सरंजामी व्यवस्था राहिली, स्वातंत्र्यापूर्वी शेकडो वर्षे साम्राज्यवादी सत्ता राहिली, आणि स्वातंत्र्यानंतर भांडवलशाहीने एका हातात सरंजामी संबंधाचे तर दुसऱ्या हातात साम्राज्यवादी हस्तक्षेपाचे हत्यार वापरूनच सत्ता प्रस्थापित केली, जिथे सरकारी पाहणीनुसार ७७% जनता दिवसाकाठी केवळ २० रुपये खर्च करू शकते त्या देशातील जनतेला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी बाजार व्यवस्थेवर सोडणे म्हणजे त्याना उपासमार, अशिक्षा, अनारोग्याच्या हातात सोडल्यासाराखेच आहे. अश्या परिस्थितीत अन्न, निवारा, रोजगार, शिक्षण, आरोग्यव वृद्धापकाळातील सहाय्य ह्या नागरिकांच्या किमान गरजा शासनाने भागवणे हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे तर ह्या सर्व क्षेत्रांबाबत कायदे करून त्यांना ह्या सर्व सोयी उपलब्ध करून देणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य. परंतु शासनाने ह्याकडे कधीही नागरिकांचा वैधानिक अधिकार ह्या दृष्टिकोणातून पाहिले नाही तर काही मर्यादित प्रमाणात लोकांना तात्पुरता दिलासा देण्याच्या दृष्टीने थातूर मातूर योजना बनवणे आणि थोडासा आधार देणे ह्या दृष्टीनेच पाहिले. जागतिकीकरणानंतर तर सरकारचा खर्च कमी करण्याच्या नावाखाली कल्याणकारी योजनांवरील अनुदानात अजूनच कपात करण्याचे धोरण शासनाने आखले व त्यासाठी दारिद्र्यरेषेची एक अत्यंत अशास्त्रीय व काल्पनिक रेषा सरकारने अस्तित्वात आणली व बहुतांश योजना केवळ बी पी एल च्या लोकांपुरत्या मर्यादित ठेवल्या. कुपोषण निर्मूलन, आरोग्य, रोजगार, शिक्षण अश्या क्षेत्रात सरकारने जनतेच्या गरजा भागवण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवर पुरेश्या निधीची अंदाजपत्रकीय व्यवस्था करून कायम स्वरूपी विभागांमार्फत व नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सर्व सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याऐवजी सरकारने ह्या सर्व मूलभूत कामांना तात्पुरत्या स्वरूपाच्या योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचे धोरण अवलंबले आहे. अर्थातच सेवा तात्पुरती, ती लोकांपर्यंत नेण्यासाठी योजना तात्पुरती आणि त्यासाठी नेमणूक देखील तात्पुरत्या मनुष्यबाळाचीच. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील(आय सी डी एस) अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील( एन आर एच एम) आशा, रोजगार हमी योजनेतील रोजगार सेवक, पंतप्रधान शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी, सर्व शिक्षण अभियानातील शिक्षण सेवक हे सर्व मानधनी, कमिशन किंवा प्रोत्साहन भत्त्यावर काम करणारे, स्वयंरोजगार ह्या नावाखाली राबणारे, कंत्राटी पद्धतीवर नेमले गेलेले कर्मचारी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अल्प मोबदल्यावर इमाने इतबारे करीत आहेत. त्यांना कामाची सुरक्षितता नाही, नियमित वेतन नाही, सामाजिक सुरक्षा व पेन्शनचा अधिकार नाही. काम मात्र पूर्ण जबाबदारीने करायची अपेक्षा व कामात हयगय झाल्यास कर्मचार्यांप्रमाणे मेमो, निलंबन, काढून टाकण्याची सोय. ह्या सर्व योजनांमधील कर्मचार्यांच्या बाबत आपण थोडक्यात विचार करू. योजना कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी संख्या महिलांची आहे. त्यांना ‘मानधन’ किंवा ‘प्रोत्साहन भत्ता’ या नावावर एक नगण्य अशी रक्कम दिली जाते. काहींना तर काहीच दिले जात नाही, उलट स्वतःच्या उपजीविकेसाठी लाभार्थ्यांकडूनच ‘युजर फी’च्या नावावर पैसे वसूल करायला सांगितले जाते. महिला, ज्या त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात सर्वसामान्यपणे अन्न पुरवणे, मुलांची, वृद्धांची व आजारी व्यक्तींची काळजी घेणे इत्यादी कामांची जबाबदारी उचलतात, तेच काम त्यांनी समाजासाठी कुठल्याही वेतन किंवा सामाजिक सुरक्षा लाभांची अपेक्षा न ठेवता करावे यासाठी त्यांना बाध्य केले जाते. अश्या प्रकारे ज्या सरकारकडून ‘आदर्श मालक’ बनण्याची अपेक्षा ठेवली जाते, तेच सरकार ‘आदर्श शोषक’ ठरत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)-
ही योजना १९७७ साली सुरु झाली व ती शासनाची एक अशी सेवा आहे जी आपल्या देशातील भावी नागरिकांना म्हणजेच ० ते ६ वयोगटातील बालकांना जगवण्यासाठीच निर्माण झाली. ही योजना महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. बालमृत्यू रोखणे, १००% लसीकरण करणे, कुपोषण दूर करून बालकांना पुढील आव्हाने पेलण्यासाठी सुदृढ बनवणे, ३ ते ६ वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, गरोदर व स्तनदा मातांना पोषक आहार व लसीकरणाची सेवा देऊन जन्माला येणारया व नवजात शिशूंचे वजन व आरोग्य चांगले असावे यासाठी प्रयत्न करणे इत्यादी महत्वाच्या सेवा ह्या योजनेमार्फत दिल्या जातात. परंतु इतक्या महत्वाच्या व देशाच्या मनुष्यबळाचा विकास घडवून आणण्याच्या शासनाच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित कामाबाबत शासनाचा दृष्टीकोण काय आहे? मुळातच शासनाने हे आपले कायम स्वरूपी काम आहे हे मान्यच केलेले नाही तर ही योजना तात्पुरत्या स्वरूपातच चालवली जावी व दर ५ वर्षांनी योजना आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यावर तिला पुढील ५ वर्षासाठी जीवदान मिळावे अश्या लटकत्या तलवारीखाली गेली ३६ वर्षे चालवली जात आहे. मग अशी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचे रान करणारया आपल्यासारख्या सेविका मदतनिसांची काय परिस्थिती असणार? 'तात्पुरत्या' योजनेत काम करणारे 'मानधनी' सेवक! ज्यांना ना मानानी वागवलं जातंय ना पोटापुरते धन दिले जातंय. ह्या महागाईच्या काळातही सेविकांना केंद्राचे ३००० व राज्याचे १०५० म्हणजे एकूण ४०५० रुपये आणि मदतनिसांना तर त्यांच्या अर्धे म्हणजे केंद्राचे १५०० व राज्याचे ५०० म्हणजे एकूण २००० रुपये मानधन दिले जात आहे. साधी आजारपणाची रजा नाही की सेवासमाप्तीनंतर पेन्शन नाही. सेवाशर्ती निश्चित नसल्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार त्यांना सहन करावा लागतो. आय सी डी एसचा दर्जा उंचावून कायम स्वरूपी विभागात रुपांतर, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, तोपर्यंत किमान वेतनाच्या समकक्ष मानधन, नियमित मानधन, आहाराचा चांगला दर्जा व नियमित अनुदान, अधिकाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक, पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा आदी मागण्यांसाठी गेली २५/३० वर्षे त्यांचा लढा चालू आहे.

आशा कर्मचारी-
आरोग्य खात्याअंतर्गत चालणारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ( एन आर एच एम) ही योजना लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी २००७ मध्ये सुरु करण्यात आली. लसीकरण, दवाखान्यातच बाळंतपण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, क्षय आदी दुर्धर रोगांची तपासणी व औषध उपचार, सामान्य आजारांचा गावातच इलाज, साथीच्या रोगांवर प्रतिबंधक व उपचारात्मक उपाय योजना, अश्या सेवा देण्यासाठी Accredited Social Health Activist म्हणजेच आशांची (ASHA) नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन तर दिले जात नाहीच पण नेमणूक देखील कर्मचारी म्हणून नव्हे तर स्वयंसेविका म्हणून केली जाते. प्रत्येक छोट्या मोठ्या कामाचा प्रोत्साहनपर भत्त्याचा दर ठरलेला असून बैठक भत्ता व त्यांच्या नावावर नोंद झालेल्या कामाचा अल्प मोबदला मिळून महिन्याकाठी एक नगण्य अशी रक्कम पदरात पडते व त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. एन आर एच एम कायम करणे, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, तोपर्यंत किमान वेतन, प्राथमिक आरोग्य केंद्रात खोली, औषधांचे किट, चांगले प्रशिक्षण, सन्मानाची वागणूक आदी मागण्यांवर त्यांचा लढा सुमारे ३/४ वर्षांपासून चालू आहे.

शालेय पोषण आहार कर्मचारी-
शाळेत जाणारया बालकांना मधल्या वेळचे भोजन मिळून त्यांची शाळेतील उपस्थिती सुधारावी व त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र शासनाने ही योजना सुरु केली व ती शालेय शिक्षण खात्याअंतर्गत चालवली जाते. महाराष्ट्रात बहुसंख्य शाळांमध्ये आहार पुरवण्याचे काम बचत गटांच्या महिलांना देण्यात आले असून फारच कमी ठिकाणी कामगार नेमले आहेत. मध्यान भोजन मिळणे हा कष्टकर्यांच्या मुलांच्या शिक्षण व अन्न अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे व त्यांना ते पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे हा शासनाचा दृष्टीकोण नाही तर केवळ थातूरमातुर पणे ही योजना राबवणे हे शासनाचे धोरण आहे. हे भोजन देण्यासाठी पुरेसा निधी देऊन कायम व स्वतंत्रपणे ह्याच कामासाठी कर्मचारी नेमण्याऐवजी मुख्याध्यापकांवर सर्व जबाबदारी सोपवून व स्वयंरोजगाराच्या नावाखाली बचतगटाकडे भोजन पुरवण्याचा ठेका देऊन शासन ही योजना मोडीत काढत आहे. अनेक लढ्यांनंतर शासनाने किमान २५ ते १०० विद्यार्थ्यांच्या मागे १ व त्या पुढील प्रत्येक १०० विद्यार्थ्यांच्या मागे १ कर्मचारी ह्या प्रमाणात प्रत्येक कर्मचाऱ्यांला रुपये १००० मंजूर केले आहेत परंतू प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. ही योजना कायम स्वरूपी राबवून त्यातील कामगारांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, चांगले व पुरेसे धान्य व साहित्य वेळेत मिळणे, इंधन भत्ता व मानधन नियमितपणे मिळणे ह्या मागण्यांवर त्यांना संघटीत करता येईल.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा-
ह्या कायद्याखाली प्रत्येक गावात रोजगार हमीच्या मजुरांची नोंद करणे, त्यांना जॉबकार्ड देणे. मागणी आल्यास कामाची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करणे, कामाचे एस्टीमेट काढून घेणे, काम सुरु झाल्यावर हजेरी, पेमेंट आदी काम करणे ह्यासाठी खरे तर शासकीय कर्मचार्यांची नितांत आवश्यकता आहे परंतु शासन मुळात हा कायदा राबवण्याबाबतीत गंभीर नसल्यामुळे कायम कर्मचारी नेमणे तर सोडाच परंतु नेमलेल्या रोजगार सेवकांना अल्प का होईना कमिशनच्या स्वरूपातील मोबदला देण्याच्या बाबतीतही टाळाटाळ करत आहे. रोजगार सेवकांना ह्या कायद्याच्या अंमलबजावणीतील महत्वाचे माध्यम म्हणून कायम शासकीय कर्मचार्याचा दर्जा देणे, त्यांना तृतीय श्रेणीचे वेतन देणे ह्या मागण्यांसाठी त्यांचे संघटन बळकट करण्याची आवश्यकता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रोजगार सेवकांच्या नेमणुका अजून केल्या गेलेल्या नाहीत. त्या करण्यासाठीदेखील बेरोजगार युवकांचे लढे उभारावे लागतील.
गेल्या २,3 वर्षांपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवर सिटूच्या झेंड्याखाली योजना कर्मचाऱ्यांचे अनेक लढे आयोजित करण्यात आले. नोव्हेंबर २०१२मध्ये लोकसभेजवळ दोन दिवसीय ऐतिहासिक महापडावाचे आयोजन केले. ज्यात सुमारे दिल्लीच्या थंडीची पर्वा न करता ३५००० योजना कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्याच्यात प्रचंड मोठी संख्या महिलांची होती. अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा भरणा जरी यात जास्त असला तरी शासनाने चालवलेल्या, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प शाळा, आयकेपी अनिमेटर्स, संगणक शिक्षक, साक्षर भारती, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना मधील शिक्षक, शिक्षण सेवक, मनरेगा रोजगार सेवक, सहायक एएनएम, लिंक आरोग्य सेविका, शक्ती सहायिका, कृषक साथी इत्यादी १० हून अधिक योजनांमधील कर्मचाऱ्यांनी देखील महापडावात भाग घेतला. भारतीय श्रम परिषदेचे (ILC) चे ४४ व ४५वे सत्र ह्या सर्व मोहिमा व लढ्यांच्या पार्श्वभूमीवर २०१२ मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४४व्या सत्रात किमान वेतनावर चर्चा करून महत्वाची शिफारस केली. परिषदेने ह्याचा पुनरुच्चार केला की किमान वेतन निश्चित करताना भारतीय श्रम परिषदेच्या १५व्या सत्राच्या शिफारसी आणि राप्टोकास आणि ब्रेट केस मधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चलनवाढीचा परिणाम पूर्णपणे निष्प्रभ करण्यासाठी महागाई भत्ता (VDA) समाविष्ट केला पाहिजे. कंत्राटी कामगाराला संबंधित उद्योग, आस्थापनातील नियमित कामगाराइतके वेतन दिले पाहिजे अशी शिफारस भारतीय श्रम परिषदेने केली आहे. अश्याच प्रकारे सिटूने घेतलेली देशव्यापी मोहीम आणि महापडावामुळे योजना कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रकाशझोतात आला. ‘योजना कर्मचारी’ हा कामगार संघटना पडताळणीसाठीचा एक विभाग म्हणून मान्य करण्यात आला. मे २०१३मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४५व्या सत्रात ‘योजना कर्मचाऱ्यांची’ परिस्थिती हा विषय अजेंड्यावर घेऊन काही महत्वाच्या आणि लक्षणीय शिफारसी केल्या ज्यात कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ आणि त्यांचा संघटना बांधण्याचा आणि सामुहिक वाटाघाटी करण्याचा अधिकार ह्यांचा समावेश होता. परिषदेनी अशी देखील शिफारस केली की त्या त्या संबंधित खात्याने ह्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियमन व सेवाशर्ती निश्चित करण्यासाठी ‘रोजगार स्थायी आदेश’ सूत्रबद्ध करावेत. ह्या सर्व विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे संघटीत करून त्यांच्या ‘योजना कर्मचारी’ म्हणून असलेल्या समान समस्या व मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सिटूने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे. परंतु सरकारने ह्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचललेली नाहीत. आपल्याला आपले प्रयत्न अजून तीव्र केले पाहिजेत आणि भारतीय श्रम परिषदेच्या ४४व्या व ४५व्या सत्राने केलेल्या शिफारसी सरकारने अंमलात आणाव्या या मागणीसाठीची मोहीम अशीच चालू ठेवली पाहिजे. आपण योजना कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांना संघटीत करण्यासाठी देखील पुढाकार घेऊन आपले प्रयत्न तीव्र केले पाहिजेत.

योजना कर्मचार्यांच्या लढ्याबाबत सिटूचे नियोजन-
वर नमूद केलेल्या सर्व योजना व अश्या प्रकारच्या अन्य बहुतांश योजना केंद्र शासन पुरस्कृत असून असून शासनाच्या कामगार व जनविरोधी धोरणांमुळे तसेच त्यांच्या अंमलबजावणीबाबतच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व चुकीच्या कार्यपद्धतीमुळे एका बाजूला लाभार्थी असलेली कष्टकरी जनता आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहे तर दुसऱ्या बाजूला कर्मचार्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. ह्या एकाच धोरणाचे हे सर्व कर्मचारी बळी असून हे धोरण बदलण्यासाठी सर्व कर्मचार्यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्रत्येक योजनेच्या कर्मचार्यांनी एकत्रितपणे आपला एक कार्यकर्त्यांचा गट तयार केल्यास एकमेकांच्या मदतीने संघटीत होणे, शासनाविरुद्ध लढा देणे व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी दबावगट तयार करणे जास्त सोपे जाईल. म्हणूनच सिटू जिल्हा केंद्राने ह्या सर्व योजना कर्मचार्यांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे.
त्यासाठी खालील गोष्टी कराव्यात-
• आपल्या जिल्ह्यात ह्यापैकी ज्या क्षेत्रात काम आहे त्या संघटनेचे काम पक्के करत असतानाच व लढे उभारत असतानाच त्यातील कर्मचार्यांना शासनाच्या एकाच धोरणाचा फटका बसलेल्या अन्य योजना कर्मचार्यांच्या प्रश्नांची जाणीव करून द्यावी व त्यांना संघटीत होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
• सर्व योजना कर्मचार्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील स्वतंत्र संघटना नोंदणीकृत कराव्यात व त्यासाठी अन्य कर्मचार्यांची मदत घ्यावी. उदा. अंगणवाडीची संघटना असल्यास त्यांच्या मदतीने आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, रोजगार सेवक आदींशी संपर्क करावेत व त्यांच्या संघटना बांधाव्यात.
• प्रचार मोहिमा संयुक्त रीत्या घ्याव्यात. शासनाच्या धोरणांविरुद्ध संयुक्त पत्रके छापून वाटावीत.
• प्राथमिक आरोग्य केंद्र, बीट/सेक्टर, तालुका पातळीवर संयुक्त आंदोलने आयोजित करून स्थानिक प्रश्न सोडवावेत व एकजूट निर्माण करावी.
• जिल्हा पातळीवर कार्यशाळा आयोजित कराव्या, राज्यपातळीवरील कार्यशाळेत विविध योजनेत काम करणाऱ्या कर्मचार्यांना सहभागी करून त्यांची वैचारिक पातळी वाढवावी. व त्यांची संघटनक्षमता विकसित करावी.

योजना कर्मचार्यांच्या मागण्या-
• लोकांना आरोग्य, शिक्षण,रोजगार आदी क्षेत्रात मूलभूत सेवा देणाऱ्या सर्व केंद्र शासन पुरस्कृत योजनांना कायम स्वरूपी शासकीय उपक्रमांचा दर्जा द्या.
• ह्या योजनांना पुरेसा निधी देऊन त्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्व पावले उचला.
• अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, रोजगार सेवक, शालेय पोषण आहार कर्मचारी आदी सर्वांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्या.
• तोपर्यंतच्या काळात त्यांना किमान वेतन, निवृत्ती वेतन, कामाची सुरक्षितता, सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा स्तर सुधारा.

अखिल भारतीय कामकाजी महिला समन्वय समिती (सिटू) १० वे संमेलन

                  अखिल भारतीय कामकाजी महिला समन्वय समिती (सिटू) १० वे संमेलन 
               २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१३ लक्ष्मी सेहगल नगर, जगन्नाथ पुरी, ओडिशा 
                                                            संयोजकांचा अहवाल 

कामगार महिला 
ह्या कालावधीत कामगार महिलांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. उलट बहुसंख्य कामगार महिलांसाठी कामाची व जगण्याची परिस्थिती अजूनच खालावली आहे. काजू, काथ्या, मळे, बिडी, मत्सोद्योग इत्यादींसारखी पारंपारिक क्षेत्र जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, सरकारच्या धोरणांमुळे तसेच जागतिक व्यापार संघ आणि आसियान मुक्त व्यापार करार व जागतिक मंदीमुळे संकटात आली आहेत. परिणामी लाखो महिला कामगारांपासून त्यांचे रोजगार व उपजीविकेची साधने हिरावून घेतली जात आहेत. कामगार महिलांसाठी जे काही मोजके संरक्षक कायदे उपलब्ध आहेत ते असंघटीत क्षेत्रात प्रचंड मोठ्या संख्येने काम करणाऱ्या बहुसंख्य कामगार महिलांना लागूच नाहीत. संघटीत क्षेत्रातही विशेषतः सेझमध्ये, जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, कायदे मोडणाऱ्यांना कोणतेही शासन न करता त्यांचे सरासर उल्लंघन करायची सरकार एक प्रकारे मुभाच देत आहे. सरकार स्वतःच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये अनिश्चित स्वरूपाच्या रोजगाराला उत्तेजन देत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यांमध्ये, लाखो महिलांना कामाला तर लावत आहे परंतु त्यांना कामगार म्हणून अधिकार द्यायला मात्र नकार देत आहे. आजही कामगार महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोपदी भेदभावाचा सामना करावा लागतो. देशाच्या सर्व भागांमध्ये आणि सर्व क्षेत्रांमध्ये महिलांवर होणारा हिंसाचार, छळवणूक आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यात वाढ झाली आहे. त्यांना सुरक्षितता व भयमुक्त वातावरण देण्यासाठी सरकार कोणतीही परिणामकारक पावले उचलत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी- II सरकारच्या ह्या दरम्यानच्या धोरणांचा पूर्ण भर आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल आणि देशी, विदेशी बड्या औद्योगिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्यावरच राहिला आहे. सर्व सामान्य लोकांच्या व्यथांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. आपल्या राष्ट्रीय हितांची देखील ते तिलांजली देत आहेत.

 एकूण कामगारांमधील महिलांचे घटते प्रमाण 
अशी एक सामान्य धारणा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसाठीच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे आणि पूर्वीपेक्षा आता जास्त महिला काम करत आहेत. परंतु राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संस्था (एनएसएसओ) च्या नुकत्याच प्रसारित केलेल्या आकडेवारी नुसार ही एक भाकडकथाच ठरली आहे. २०११-२०१२ मध्ये एकूण ४७.२९ कोटी कामगारांमध्ये महिला कामगारांची अंदाजे संख्या १२.९१ कोटी (२७.3%) होती तर २००४-२००५ मध्ये एकूण महिला कामगारांची संख्या १४.८५ कोटी होती. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कामगार महिलांची एकूण संख्या गेल्या ५ वर्षात वाढण्याऐवजी जवळ जवळ २ कोटींनी घटली आहे. एनएसएसओ आकडेवारी स्पष्ट दर्शवतेय की गेल्या ३ दशकांपासून एकूण महिलांमधील कामकाजी महिलांचे प्रमाण घटत चालले आहे. १९८३ मध्ये ग्रामीण भागात एकूण महिलांच्या ३४% व शहरी भागात १५.१% महिला काम करत होत्या. पण २०११-१२ मध्ये हेच प्रमाण ग्रामीण भागात २४.८% आणि शहरी भागात १४.७% पर्यंत खाली उतरले. इथे ‘काम करणे’ म्हणजे महिलांचा दुय्यम काम म्हणजेच वर्षातील काही महिने किंवा काही दिवसांच्या तात्पुरत्या कामासहित कोणत्याही प्रकारच्या रोजगारात सहभाग असणे. २००९-१० आणि २०११-१२ ह्या दोन वर्षांमध्ये मुख्य रोजगारात गुंतलेल्या (म्हणजे वर्षातील मोठा हिस्सा काम करणाऱ्या) महिलांची संख्या ग्रामीण भागात ९० लाखांनी कमी झाली. शहरात किंचितश्या वाढलेल्या आकड्याने हा खड्डा भरून निघू शकत नाही. एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की ही भयावह घट अश्या काळात झाली आहे जेव्हा देशात आर्थिक विकासाचा दर तुलनेनी जास्त नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनी नोंद केलेली आहे की महिलांच्या कामातील सह्भागामधील घट सर्व वयोगटातील, सर्व शैक्षणिक स्तरांमधील ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिलांमध्ये दिसून येते. महिला उच्च शिक्षणासाठी जात असल्यामुळे त्यांचा श्रमिक वर्गातील सहभाग कमी झाला असल्याचा तर्क चुकीचा आहे. तसेच कुटुंबाचे उत्पन्न वाढल्यामुळे महिला कामातून माघार घेत असल्याच्या तर्काशी देखील तज्ञांनी असहमती दर्शवली आहे. देशातील गरीबी, बेरोजगारी आणि रोजगाराच्या नुकसानाचे आकडे ह्या युक्तिवादाला दुजोरा देत नाहीत. २००४-०५ आणि २०११-१२ ह्या वर्षांच्या दरम्यान गेली कित्येक वर्षे देशाला ग्रासणाऱ्या कृषी संकटाच्या परिणामी शेतीत काम करणाऱ्या महिलांमध्ये २.६ कोटींनी घट झाली. पण महिलांच्या बिगर कृषी क्षेत्रातील रोजगारामध्ये देखील वाढ झालेली नाही. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत प्रचंड घट, विस्तार सेवांमधील तीव्र कपात, यांत्रीकीकरणातील वाढ, ग्रामीण भागात सिंचन व वीज पुरवठा ह्या मूलभूत सुविधांमधील वाढीची धीमी गती इत्यादी गोष्टीमुळे कृषी संकट अजूनच गहिरे झाले आहे, परिणामी ग्रामीण भागातील रोजगारामध्ये अजूनच तीव्रतेने घट होत आहे. तरीदेखील अजूनही शेतीत काम करणाऱ्या ४३.६% पुरुषांच्या मानाने सर्व कामकरी महिलांपैकी शेतीत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण कितीतरी जास्त म्हणजे ६२.७% आहे. संपूर्ण देशात कृषी क्षेत्रातील मजुरांपैकी ३५% प्रमाण महिलांचे आहे. २०११-१२ मध्ये ग्रामीण भागातील ५९.3% व शहरी भागातील ४२.८% महिला स्वयंरोजगारात गुंतलेल्या असल्याचे ह्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ह्या ‘स्वयं रोजगार’ करणाऱ्यांमध्ये स्वतः ‘मालक’ (ज्यांची टक्केवारी नगण्य म्हणजे १% आहे), ‘स्वतः खातेदार कामगार’ आणि ‘हेल्पर’ असे गट आहेत. यातील ‘मालक’ व ‘स्वतः खातेदार कामगार’ यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो पण ‘हेल्पर’ना मात्र कोणतेही वेतन मिळत नाही. ते विना मोबदला काम करतात. बहुतांश महिला ह्या ‘विना मोबदला’ गटात मोडतात. एका अंदाजानुसार १९९३-९४ पासून ते २०११-१२ पर्यंत ह्या विना मोबदला काम करणाऱ्या महिलांचे स्वयंरोजगारातील प्रमाण सातत्याने ७०% इतके राहिले. २००९- १० मध्ये ग्रामीण भागात त्यांचे प्रमाण ७१% इतके होते. स्वतः खातेदार कामगारांचे प्रमाण एक चतुर्थांश होते. शहरी भागात विना मोबदला काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण २००९-१० मध्ये ४०% होते. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की ह्या विना मोबदला कामात स्वयंपाक, सफाई, बाल संगोपन इत्यादीचा समावेश नाही तर शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रांमधील आर्थिक कार्यकलापांबाबतचा हा उल्लेख आहे. त्यामध्ये वस्तू आणि सेवांचे देवाण घेवाणीसाठी उत्पादन, स्वतःच्या वापरासाठी उत्पादन आणि घरगुती उत्पादनामध्ये मजूर किंवा मुकादम ह्या नात्याने केलेल्या कामाचा समावेश होतो. ह्या महिला कामगार राष्ट्रीय उत्पन्नात मोलाची भर घालतात. पण त्यांना कोणतीही मजुरी किंवा व्यक्तिगत वेतन दिले जात नाही त्यामुळे त्या पितृसत्ताक वर्चस्वाच्या अंमलाखाली आर्थिक दृष्ट्या आश्रिताचे जिणे जगत राहतात. सर्वात ताज्या (२०११-१२) सर्वेक्षणानुसार फक्त १२.७% महिला कामगार ह्या नियमित वेतनभोगी कामगार आहेत. ग्रामीण भागात फक्त ८.७% तर शहरी भागात जास्त म्हणजे ४२.८% नियमित कामगार आहेत. पण ह्याच्यातही फार मोठा हिस्सा कामाची कोणतीही सुरक्षा नसलेल्या घर कामगारांसारख्या विविध प्रकारच्या कामगारांचा आहे. १.७३ कोटी महिला (सर्व महिला कामगारांपैकी १३.४% आणि शहरातील महिला कामगारांपैकी २३.६%) उत्पादनात काम करतात. २००४-०५ आणि २००९-१० ह्या दरम्यान उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख महिलांकडून त्यांचा रोजगार हिरावून घेतले गेले. २००९-१० आणि २०११-१२ मध्ये त्यातील काही नोकऱ्या परत निर्माण झाल्या पण सर्व नाही. हे नव उदार अंमलामध्ये नोकऱ्यांचे स्वरूप किती लहरी आणि असुरक्षित झाले आहे ह्याचे द्योतक आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि अस्थिर जागतिक मागणीच्या परिणामी अनेक पारंपारिक घरगुती उद्योग बंद पडले. घरातून उत्पादनाचे काम करून देण्याच्या आउटसोर्स केलेल्या कामांमध्ये देखील कपात झाली आहे. आउटसोर्स केलेल्या कामांसहित रोजगाराचे अनिश्चित आणि अस्थिर स्वरूप हे उत्पादन क्षेत्राचे एक कायम स्वरूपी लक्षण बनले आहे. आज बिडीव्यातिरिक्त शिलाई, लेस, पत्रावळ्या, फुलांचे हार, पतंग, कागदी पिशव्या, विजेची व इलेक्ट्रोनिक वस्तूंची जुळणी, खेळ साहित्य निर्मिती इत्यादी विविध क्षेत्रात घर खेप कामगार म्हणून काम करणाऱ्या लाखो महिलांना हे अत्यल्प मोबादाल्याचे कामही पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. अश्या प्रकारे उत्पादन क्षेत्र कृषी क्षेत्रामधील कामातून बेदखल झालेल्या महिला कामगारांना रोजगार देण्यास अक्षम ठरत आहे. उत्पादन क्षेत्रात वर्षानु वर्षे काम करणाऱ्या महिला कामगार स्वतःच त्यांच्या रोजगाराच्या अस्थिरतेला तोंड देत आहेत. देशातील २.१९ कोटी कामगार महिला (एकूण कामगार महिलांपैकी १२.२ व शहरी कामगार महिलांपैकी ४२%) सेवा क्षेत्रात काम करत आहेत. त्यांमध्ये शिक्षण कर्मचारी, घरकामगार, विविध कार्यालयांमधील कर्मचारी, इतर सामाजिक किंवा व्यक्तिगत सेवा (अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी इत्यादी) हे सर्व कामगार/कर्मचारी मोडतात. शहरातील बहुसंख्य सेवाक्षेत्र कर्मचारी सन्माननीय व सुरक्षित नोकरी करतात हा समज मात्र खरा नाही. विमा, बँक, राज्य व केंद्र सरकारी खाती, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये सेवा क्षेत्रातील एक अत्यंत छोटा हिस्सा काम करत आहे. उदाहरणार्थ माहिती आणि संपर्क क्षेत्रात शहरी महिला कामगारांपैकी फक्त २% महिला नोकरी करतात. एका स्वतंत्र सर्वेक्षणानुसार भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची त्यातील एकूण कर्मचाऱ्यांमधील टक्केवारी २०१० मधल्या २६% वरून २०१२ मध्ये २२% पर्यंत खाली उतरली आणि ते देखील अश्या काळात जेंव्हा त्या क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली. सेवांमधील महिला कामगारांमध्ये प्रामुख्याने शिक्षण- (लाखो शिक्षण सेवकांसहित एकूण २५.४७%), व्यापार (१९.२६%), घर कामगार (१५.८८%). वित्त आणि विमा क्षेत्रात सेवा क्षेत्रातील मुश्किलीने ४.२६% महिला काम करतात. ह्या दरम्यान घर कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशातील घर कामगारांच्या एकूण संख्येबद्दल वेगवेगळे अंदाज केले जात आहेत. घर कामगारांची एकूण संख्या १९९९-२००० मधील १६.२ लाखांवरून २००९-१० मध्ये २५.२ लाखावर गेली. आयएलओ चा अंदाज ४२ लाख आहे तर काही संस्था अजून मोठी संख्या असल्याचा दावा करतात. अजून एक क्षेत्र असे आहे ज्यात महिला कामगारांची संख्या खूप वाढली आहे आणि ते म्हणजे बांधकाम. हे क्षेत्र ‘कायमचे तात्पुरते’ काम, कामगारांची खालावलेली परिस्थिती आणि त्याच वेळी बडे कॉर्पोरेटस् व स्थावर मालमत्ता विकसकांसाठी मात्र प्रचंड नफा कमावण्याचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. २००४-०५ पासून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या ५१ लाखांनी वाढली. एकूण बांधकाम कामगारांपैकी १५.६% महिला आहेत. ही वाढ काही प्रमाणात कदाचित महिलांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या कामांमध्ये मध्ये सहभाग वाढल्यामुळेही दिसत असावी. अजून एक महत्वाचा विभाग जो हल्ली प्रकाशझोतात आला आहे, परंतु ज्याला एनएसएसओच्या सर्वेक्षणात स्वतंत्रपणे गणती करण्याचा दर्जा दिला गेलेला नाही तो म्हणजे ‘योजना कर्मचारी’. भारत सरकार द्वारा आपल्या नागरिकांच्या पोषण, अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी मूलभूत व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक ‘योजना’ किंवा ‘कार्यक्रम’ चालवले जातात. सत्तेत असलेले पक्ष अश्या ‘योजना’ आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतात, ज्या त्यांच्या लहरीनुसार कधीही मागे घेतल्या जाऊ शकतात. एका बाजूला लोकांची म्हणजेच लाभार्थींची फसवणूक केली जाते तर दुसऱ्या बाजूला ह्या ‘योजनांमध्ये’ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘कामगार’ म्हणून मान्यता दिली जात नाही. त्याना अनेक चित्र विचित्र नावांनी संबोधित केले जाते जसे ‘सामाजिक कार्यकर्ता’, ‘कार्यकर्ती’ ‘मित्र’, ‘अतिथी’, ‘स्वयंसेवक’ इत्यादी. भारत सरकारने चालवलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मध्यान्न भोजन कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, पोस्टल अल्प बचत योजना, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (Agriculture Technology Management Agency- ATMA) इत्यादी योजनांमध्ये जवळपास 1 कोटी कर्मचारी काम करतात. योजना कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी संख्या महिलांची आहे. त्यांना ‘मानधन’ किंवा ‘प्रोत्साहन भत्ता’ या नावावर एक नगण्य अशी रक्कम दिली जाते. काहींना तर काहीच दिले जात नाही, उलट स्वतःच्या उपजीविकेसाठी लाभार्थ्यांकडूनच ‘युजर फी’च्या नावावर पैसे वसूल करायला सांगितले जाते. महिला, ज्या त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात सर्वसामान्यपणे अन्न पुरवणे, मुलांची, वृद्धांची व आजारी व्यक्तींची काळजी घेणे इत्यादी कामांची जबाबदारी उचलतात, तेच काम त्यांनी समाजासाठी कुठल्याही वेतन किंवा सामाजिक सुरक्षा लाभांची अपेक्षा न ठेवता करावे यासाठी त्यांना बाध्य केले जाते. अश्या प्रकारे ज्या सरकारकडून ‘आदर्श मालक’ बनण्याची अपेक्षा ठेवली जाते, तेच सरकार ‘आदर्श शोषक’ ठरत आहे. महिलांच्या प्रामुख्याने ‘मुख्य दर्जा’ असलेल्या वर्षातील जास्त काळासाठी मिळणाऱ्या व चांगले उत्पन्न देणाऱ्या कामात घट झाली आहे. त्यामानाने ‘दुय्यम दर्जा’ असलेल्या म्हणजेच तात्पुरत्या, काही दिवसांसाठी मिळणाऱ्या व कमी उत्पन्नाच्या कामांमध्ये झालेली घट कमी आहे. बहुसंख्य महिला त्यांच्या कुटुंबाला जगविण्यासाठी मिळेल ते काम, मिळेल त्या वेळी, कोणत्याही अटीवर व परिस्थितीत करायला तयार होतात. एकूणच २००९-१० च्या उपलब्ध आकडेवारीनुसार फक्त १४% महिलांना त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात मजुरी/वेतन मिळते त्या तुलनेत ५१% पुरुष कष्टाच्या मोबदल्यात वेतन मिळवतात. ८५% महिला आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे आश्रित होत्या आणि उत्पादनात मोलाची भर घालून देखील त्यांना कोणतेही वेतन/उत्पन्न मिळत नाही. ही परिस्थिती अश्या वेळी आहे जेंव्हा आपला देश सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा (GDP) सर्वात जास्त दर मिळवत असल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. टोकाचे आर्थिक अवलंबित्व हे आपल्या समाजात असलेल्या महिलांच्या दुय्यम आणि खालावलेल्या दर्जाचे एक प्रमुख कारण आहे. हे दुय्यम स्थान कामगार महिलांच्या रोजच्या जीवनात अनेक अंगांनी व्यक्त होत असते. त्यांना आईच्या गर्भात आल्यापासून मृत्युपर्यंत, कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, घरी व समाजात वाढत चाललेल्या बलात्कार, ऍसिड हल्ले अश्या हिंसक हल्यांच्या रूपाने, भेदभाव व त्रासांना तोंड द्यावे लागते. कामगार महिलांची परिस्थिती ९६% कामगार महिला असंघटीत क्षेत्रात काम करतात. बहुतेक कामगार कायदे त्यांना लागूच नाहीत आणि जे लागू आहेत ते देखील अंमलात येत नाहीत. बहुसंख्य कामगार महिलांना किमान वेतन, समान वेतन किंवा सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाहीत. बहुतेक महिलांना त्यांना लागू असलेल्या मातृत्व लाभ, पाळणाघर इत्यादी लाभांची माहितीदेखील नसते. अगदी संघटीत क्षेत्रातही असमान वेतन, बढती द्यायला नकार अश्या स्वरूपात भेदभाव होतच आहेत. संघटीत व असंघटीत अश्या दोन्ही क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. कामाचे जास्त तास, रात्रपाळी इत्यादीची सक्ती केली जाते मात्र स्वतंत्र स्वच्छता गृह, विश्राम कक्ष, पाळणाघर इत्यादींची व्यवस्था मात्र क्वचितच केली जाते.
समान वेतन समान वेतन कायदा, १९७६ नुसार समान व सारख्या स्वरूपाच्या कामाला समान वेतन देण्याची जबाबदारी मालकाची आहे. त्यात कामावर नेमणूक करताना पुरुष व स्त्री असा भेद न करण्याचेही निर्देश दिले आहेत. पण हा कायदा लागू होऊन ३७ वर्षे उलटली तरी अजूनही महिलांना विशेषतः असंघटीत क्षेत्रात त्याच कामाला पुरुषांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतनच मिळत आहे. श्रम ब्युरोनी एप्रिल २०१३ मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशक भरात पुरुष व स्त्रियांच्या वेतानामधील फरक वाढत चालला आहे. ही आकडेवारी दर्शवते की नांगरणीसाठी पुरुषांना २१२ व स्त्रियांना १२३ रुपये; पेरणीसाठी पुरुषांना १८५ व स्त्रियांना १४८ रुपये तर कापणीसाठी पुरुषांना १७९ व स्त्रियांना १४९ रुपये मिळतात. विहीर खणण्यासाठी पुरुषांना २५४ रुपये मजुरी मिळत होती तर स्त्रियांना फक्त १३५. समान वेतन कायदा १९८७ मध्ये खास करून बढती, प्रशिक्षण किंवा बदलीबाबत होणारे भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने दुरुस्त करण्यात आला. पण तरीदेखील संघटीत क्षेत्रातही अजूनही असा भेदभाव सुरूच आहे. काही हलक्या आणि कमी पगाराच्या कामांवर ‘महिलांची कामे’ असा शिक्का मारून कामांची विभागणी करण्याची पद्धत अजूनही सुरुच आहे. ह्या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल दंड करण्याचे प्रावधान असले तरी आजपर्यंत स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव केल्याबद्दल एकाही मालकाला कधी शिक्षा झालेली नाही. समान वेतन कायद्या अंतर्गत गठीत करण्यात आलेली केंद्रीय सल्लागार समिती अजिबात काम करत नाही. बऱ्याच वर्षांपासून तिचे पुनर्गठन करण्यात आलेले नव्हते. ३ वर्षांच्या अवकाशानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये तिची शेवटची बैठक झाली. बैठक घ्यायला लागलेला विलंब आणि बैठकीच्या वृत्तांतामधील तपशील सरकारच्या वरवरच्या हाताळणीचे निदर्शक आहेत. मातृत्व लाभ मातृत्व लाभाचा कायदा १९६१ पासून अस्तित्वात आहे. देशभरातील कारखाने, खाणी, मळे, घोडेस्वारी किंवा शारीरिक चपळतेचे सादरीकरण करणारे व्यवसाय, दुकाने व अन्य संस्था ह्या सर्वांना तो लागू आहे. जिथे मालक बालकाच्या जन्माआधीची व नंतरची मोफत आरोग्य सेवा पुरवत नाहीत तिथे बाळंतपणाच्या पगारी रजेबरोबरच मातृत्व भत्ता मिळवण्याचा अधिकार कामगार महिलांना देण्यात आला आहे. त्यात गर्भपात, गरोदरपण व बाळंतपण तसेच मुदतीआधी झालेल्या बाळंतपणामुळे झालेले आजारपणात सुट्टी, बाळ १५ महिन्यांचे होईपर्यंत स्तनपानासाठी कामामधून अवकाश आदींचे देखील प्रावधान आहे. त्याशिवाय ह्या कारणांसाठीच्या गैरहजेरीवरून महिलांना कामावरून न काढण्याचे देखील निर्देश ह्या कायद्याद्वारे मालकांना दिले गेले आहेत. उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते. २००८ मध्ये मातृत्व लाभ कायद्यात दुरुस्ती केली गेली. त्याअन्वये वैद्यकीय भत्ता २५० वरून १००० वर नेण्यात आला आणि ती रक्कम २०००० पर्यंत वाढवण्याची सरकारला मुभा देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशांनुसार बाळाला किमान ६ महिन्यांपर्यंत आईचे दूध पाजता आले पाहिजे ह्या दृष्टीकोनातून भारत सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बाळंतपणाची रजा ६ महिन्यांपर्यंत वाढवली. काही राज्य सरकारांनी देखील ती वाढवली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिसांना देखील ६ महिन्यांची बाळंतपणाची रजा लागू आहे पण काही राज्यांमध्ये ती अंमलात येत नाही. परंतु बाळंतपणाची पगारी रजा व मातृत्व लाभ असंघटीत क्षेत्रातील महिला कामगारांसाठी अस्तित्वातच नाहीत. ह्या कायद्याचे बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या व सेझ सहित खाजगी क्षेत्रातील अनेक आस्थापने पालन करीत नाहीत. अगदी सरकार देखील त्यांच्या विविध ‘योजनांमध्ये’ काम करणाऱ्या, शालेय पोषण आहार कामगार, आशा, शिक्षण सेवक इत्यादी लाखो महिलांना ‘कर्मचारी’ म्हणून मान्यता देण्यास नकार देऊन बाळंतपणाच्या पगारी रजेपासून वंचित ठेवत आहे. पाळणाघर संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसहित बहुतांश कामगार महिलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील कामकरी महिलांना आपल्या लहान बालकांना मोठे भावंड, बहुतेक वेळा बहिणीकडे किंवा कुणा शेजाऱ्यांकडे सोडून कामावर जावे लागते. अनेकदा त्यामुळे मुलींना शाळा मधेच सोडून द्यावी लागते. हल्लीच सरकारने ५% अंगणवाड्यांचे पाळणाघरात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे पुरेसे नाही. त्यायोगे फक्त काही थोड्या गरजू महिलांचीच नड भागू शकेल. शिवाय ह्या पाळणाघरातील कर्मचाऱ्यांची नेमणूक नियमित कर्मचारी म्हणून न करता ३००० रुपये मानधनावर केली जाणार आहे व त्यांना अन्य कोणतेही लाभ मिळणार नाहीत. शहरी भागात रुग्णालये, शाळा, दुकाने, कारखाने इत्यादींसारख्या विविध आस्थापनांपासून घर कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांसकट कुणालाच सहज वापरता येण्यासारखी व परवडण्याजोगी पाळणाघराची सुविधा उपलब्ध नाही. कारखान्यांसाठीचा कायदा (The Factories Act) आणि बिडी व सिगार (कामाच्या शर्ती) कायदा मालकांना पाळणाघराची सुविधा पुरवण्याचे बंधन घालतो. मळे कामगार कायदा (The Plantation Labour Act) देखील असे बंधन घालतो की मालकाने महिला कामगारांना बालकांना स्तनपान करविण्यासाठी कामातून अवकाश दिला पाहिजे व जिथे ५० किंवा त्याहून जास्त महिला, अथवा ६ वर्षांखालील बालके असलेल्या २० हून अधिक महिला काम करत असतील तिथे मालकाने पाळणाघराची सोय केली पाहिजे. खाण विभाग पाळणाघर नियम, १९६६ (The Mines Crèche Rules, 1966 ) पाळणाघर तसेच बालके व स्तनदा मातांच्या आरोग्य तपासणीचे प्रावधान केले आहेत. पण ह्या प्रावधानांचे पालन केले जात नाही.

रात्रपाळीतील काम 
कारखान्यांसाठीचा कायदा (The Factories Act), १९४८ ने सायंकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत महिलांना कामाला लावण्यावर प्रतिबंध घातला आहे. राज्य सरकारला ही वेळ बदलण्याचा अधिकार आहे परंतु रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत स्त्रियांना काम करायची परवानगी देण्याचा अधिकार नाही. २००५ मध्ये सरकारने लोकसभेत ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून राज्य सरकारांना राजपत्रात अधिसूचना जाहीर करून रात्र पाळीची परवानगी देण्याची मुभा दिली आहे. त्यात कारखान्यापासून घराच्या जवळ वाहतुकीची सोय करण्याचेच फक्त प्रावधान आहे. आता अनेक राज्य सरकारांनी स्त्रियांकडून रात्रपाळीत काम करवून घेण्याची परवानगी दिली आहे. हजारो महिला आता रुग्णालये व सुश्रुषागृहाव्यतिरिक्त कापड, तयार कपडे, सेझ, मत्स्य प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान इत्यादी विभागांमध्ये रात्रपाळीत काम करत आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा अथवा घरापर्यंत वाहतुकीची सोय पुरविण्यात येत नाही. हे सर्वांना माहीतच आहे की बेंगळूरु, दिल्ली सारख्या अनेक शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक शोषण, हल्ले आणि अगदी हत्या सारख्या अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आपण स्त्रियांकडून रात्रपाळीत काम करवून घेण्यास सरसकट परवानगी देण्याला सातत्याने विरोध करत आलेलो आहोत. आपली मागणी आहे की कोणत्याही क्षेत्रात महिलांसाठी रात्रपाळीचे काम करवून घेण्याची परवानगी देण्या अगोदर त्यातील कामगार संघटनेला विश्वासात घेतले पाहिजे, नियोक्त्यांनी त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहतुकीची सोय केली पाहिजे आणि रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी सुरक्षित कामाचे ठिकाण देण्याची हमी घेतली पाहिजे. आपल्या कामकाजी महिला समन्वय समित्यांनी जिथे जिथे महिला रात्रपाळीत काम करतात त्या त्या ठिकाणी ह्या मागण्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मोहिमा आखल्या पाहिजेत. विश्राम कक्ष व स्वच्छतागृह कारखाने आणि खाणी विषयक कायद्यांनुसार (Factories Act and the Mines Act) मालकांनी महिला कामगारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोयीच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था केली पाहिजे व त्यांची नीट देखरेख ठेवली पाहिजे. आंतर राज्य स्थलांतरित कामगार (कामाचे नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, १९७९ मध्ये स्थलांतरित महिला कामगारांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहांची व्यवस्था करण्याचे प्रावधान आहे. परंतु स्वतंत्र शौचालायासारखी मूलभूत निकडीची सोय देखील फक्त खाणी, कारखाने, शेती, बांधकाम, वीटभट्ट्या, दुकानांचे संकुल इत्यादी ठिकाणीच नाही तर शाळा, कार्यालये ह्या ठिकाणी सुद्धा बहुतांश कामगार महिलांना उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांची केवळ गैरसोयच होते असे नाही तर त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. कामगार संघटना देखील हा प्रश्न तितक्या गंभीरपणे घेत नाहीत. सिटू संलग्न युनियन्स आणि कामकाजी महिला समन्वय समित्यांनी हे प्रश्न उचलले पाहिजेत.

लैंगिक छळ
संघटीत आणि असंघटीत दोन्ही क्षेत्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची प्रकरणे वाढत चालली आहेत. एका खाजगी सर्वेक्षणानुसार ९१% महिलांना व १५ ते २० वर्षे वयोगटातील ९५% तरुण महिलांना पाठलाग केला जाणे, चिडवणे, किंवा लैंगिक छळ ह्या त्रासाला तोंड द्यावे लागते. पण ८८% महिला कधीही पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. फक्त २४% महिलांच्या कार्यालयांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्याची काहीतरी व्यवस्था होती. महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मज्जाव आणि निवारण) एप्रिल २०१३ मध्ये ह्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाच्या १५ वर्षानंतर पारित करण्यात आला. ह्या कायद्यात लैंगिक छळाची व्याख्या शारीरिक स्पर्श आणि पुढाकार, किंवा लैंगिक संबंधांची मागणी वा विनंती किंवा लैंगिक अर्थाची शेरेबाजी करणे, अश्लील साहित्य दाखवणे, अन्य कोणतेही नकोसे वाटणारे शारीरिक, शाब्दिक किंवा शब्दात व्यक्त न केलेले लैंगिक स्वरूपाचे वागणे अशी व्यापक केली आहे. त्यात लैंगिक छळाच्या परिस्थितीची व्याख्या अशी केली आहे- खालील परिस्थितीत लैंगिक स्वरूपाचे वर्तन केले गेल्यास तो लैगिक छळ समजला जावा. महिलेला कामाबाबत खास प्राधान्य देण्याचे गर्भित वा स्पष्ट वचन देऊन; तिच्या कामाबाबत नुकसान करण्याची धमकी देऊन; तिच्या कामाच्या सध्याच्या किंवा भविष्यातील पदाबाबत धमकी देऊन; तिच्या कामात हस्तक्षेप करून किंवा तिच्यासाठी असुरक्षित, विरोधी व आक्रमक असे कामाचे वातावरण निर्माण करून; तिला अपमानास्पद वागणूक देऊन तिचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आणून इत्यादी. ह्या कायद्यात सर्व प्रशासकीय कार्यालय व शाखांमध्ये अंतर्गत तक्रार कमिटी व जिल्हा, नगरपालिकांमध्ये स्थानिक तक्रार कमिटीचे प्रावधान करण्यात आले आहे. कामगार संघटना व महिला संघटनांच्या आग्रहामुळे घर कामगार जिथे काम करतात त्या ‘राहण्याचे ठिकाण किंवा घर’ ह्याचा समावेश ‘कामाचे ठिकाण’च्या व्याख्येत करण्यात आला. परंतु ह्या कायद्यात ‘खोट्या किंवा खोडसाळपणे केलेल्या तक्रारीबद्दल किंवा बनावट वा दिशाभूल करणारी कागदपत्रे दिल्याबद्दल’ तक्रारदार किंवा साक्षीदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आजही सामाजिक कलंक मानला जात असल्यामुळे फारच कमी महिला तक्रार करायला पुढे येतात. पीडित महिलेवरच दोषारोप केले जातात व तिला कुटुंब आणि समाजात प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. अश्या परिस्थितीत हे प्रावधान महिलांना लैंगिक छळाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्यासाठी बाधक ठरेल. कामगार संघटना आणि महिला संघटनांनी विरोध करूनदेखील हे कलम काढण्यात आलेले नाही. बाधित महिलेच्या ‘विनंती’ वरून का होईना, चौकशीच्या आधी ह्या प्रकरणात सलोख्याच्या मार्गाने तोडगा काढण्याच्या कलमाचा देखील पुनर्विचार केला पाहिजे.

महिला कामगारांना लागू असलेल्या कल्याणकारी योजना 
कामगार संघटनांनी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर २००८ मध्ये पारित झालेल्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा कायद्यामधील काही योजना असंघटीत क्षेत्रातील कामगार महिलांना लागू आहेत. काही बिडी आणि सिगार कामगार कल्याणकोष कायदा, इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकोष कायदा असे विभाग निहाय कल्याणकारी कायदे त्या विभागात काम करणाऱ्या महिलांना लागू आहेत. पण ह्यातील बऱ्याच कल्याणकारी योजना कागदावरच राहिल्या आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन, आम आदमी बिमा योजना, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना, हातमाग विणकर सर्वंकष कल्याण योजना, मत्स्योद्योग कामगारांसाठी राष्ट्रीय कल्याण योजना अश्या काही योजना असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत लागू आहेत. परंतु ह्यातील बहुतांश योजना दारिद्र्य रेषेखालील कामगारांनाच लागू आहेत. भारत सरकार एका राष्ट्रीय योजनेचा जोरदार प्रचार करत आहे आणि फुशारक्या मारत आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना. ह्या योजनेच्या अनेक मर्यादा लक्षात घेऊन देखील ही गोष्ट मान्य करावी लागेल की असंघटीत कामगारांच्या कुटुंबाला किमान काही आरोग्य सुविधा ही योजना देऊ शकलेली आहे. सुरवातीला फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठीच जाहीर झालेली ही योजना आता असंघटीत कामगारांच्या दारिद्र्य रेषेखालील व वरील अनेक विभागांना लागू करण्यात आली आहे. त्यांमध्ये किमान १५ दिवस काम केलेले मनरेगाचे मजूर, बांधकाम कामगार, घर कामगार, बिडी कामगार, सफाई कामगार, फेरीवाले, कचरावेचक, रिक्षा ओढणारे आणि ऑटो व टॆक्सी चालक असे अनेक विभाग त्यात मोडतात. त्यातील अनेक विभागांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात काम करतात. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये काही राज्य पातळीवरील कल्याणकारी योजना कामगार महिलांसाठी लागू करण्यात आल्या आहेत. महिला मोठ्या संख्येने काम करत असलेल्या काही विभागांमधील कामगारांसाठी उदाहरणार्थ घर कामगारांसाठी राज्य पातळीवरील कल्याणकारी मंडळांचे देखील गठन करण्यात आलेले आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कामगार महिला किंवा एकूणच कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जे काही कायदे केले जातात किंवा कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात त्या काही सत्ताधारी वर्गाच्या उदारपणामुळे नाही तर कामगार संघटना, महिला संघटना आणि जनवादी चळवळीच्या दीर्घ काळापर्यंतच्या सातत्याच्या लढ्यांची व मोहिमांची ती निष्पत्ती आहे. सिटू अनेक वर्षांपासून सर्व असंघटीत कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करवून घेण्यासाठी लढा देत आहे. सिटू कमिट्या व कामकाजी महिला समन्वय समित्यांनी कामगार महिलांमध्ये सध्या लागू असलेल्या लाभांबाबत जागृती केली पाहिजे व ते प्रत्यक्ष पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना एकत्रित केले पाहिजे. आपण संबंधित कायदा किंवा योजनेखाली कामगारांची नोंद करवून घेण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. त्याच बरोबर आपण ह्या प्रयत्नांच्या माध्यमातून त्या योजनांच्या मर्यादा देखील उघडकीला आणून सरकारच्या धोरणांबाबत त्यांच्यात जागृती केली पाहिजे व त्यांना ही धोरणे बदलायच्या लढ्यामध्ये उतरवले पाहिजे.
महिलांना लाभ देणाऱ्या व लाखो महिलांकडून त्यासाठी काम करवून घेणाऱ्या अन्य महत्वाच्या योजना महणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) व राष्ट्रीय ग्रामीण आरीग्य अभियान (एनआरएचएम). ह्या योजनांमध्ये अंगणवाडी कर्मचारी व आशा मिळून जवळपास ३५ लाख महिला काम करत आहेत. त्यांना ‘मानधन’ किंवा ‘प्रोत्साहन भत्ता’ म्हणून एक दयनीय रक्कम दिले जाते. कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी तसेच ह्या योजनांच्या खाजगीकरणाविरुद्ध त्या सातत्याने लढा देत आहेत. सरकार माध्यमांमध्ये ह्या योजनाबद्दल मोठमोठे दावे करत आहे पण ह्या योजनांसाठी पुरेसा निधी मात्र मंजूर करत नाही. अंमलबजावणीतही अनेक दोष आढळून येतात. परिणामी ह्यात काम करणाऱ्या महिला ह्या योजनांचा दर्शनी चेहरा असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते. ह्या योजनांच्या लाभार्थींमध्ये देखील कामकरी महिलांचाच भरणा अधिक आहे. कामकाजी महिला समन्वय समित्या आणि ह्या योजना कर्मचाऱ्यांच्या युनियन्सनी कर्मचारी आणि लाभार्थी महिलांमध्ये एकजुटीचे दृढ संबंध विकसित केले पाहिजेत. ह्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या प्रयत्नांबरोबरच लाभार्थ्यांमध्ये त्या योजनांच्या मर्यादा व कमजोऱ्या व त्यांना खिळखिळे करणारी सरकारची धोरणे उघडकीला आणणेही तितकेच आवश्यक आहे. ह्या योजना वाचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या लढ्यात लाभार्थ्यांचा पाठींबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत.

महिलांविरुद्धचा हिंसाचार
गेल्या काही दिवसांमध्ये स्त्रिया व मुलींवर होणाऱ्या हिंसाचारात भयावह वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचार, बलात्कार, सामुहिक बलात्कार आणि महिला आणि लहान मुलींच्या हत्या, ऍसिड हल्ले इत्यादींची पूर्ण देशभरातून नोंद होत आहे. जवळ जवळ एक तृतीयांश महिलांना लैंगिक किंवा शारीरिक हिंसाचाराला बळी पडावे लागते. महिलांच्या हत्यांपैकी ३८% हत्या त्यांच्या जिवलग साथींकडून केल्या जातात. प्रत्येक ३ मिनिटाला महिलांविरुद्धचा एक गुन्हा घडतो, प्रत्येक ९ मिनिटाला एक महिला पती किंवा नातेवाइकांच्या क्रूरतेला बळी पडते. प्रत्येक २९ मिनिटांना एका महिलेवर बलात्कार होतो आणि प्रत्येक ७७ मिनिटांना देशात एक हुंडाबळी घडून येत असतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या २०१३ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात १९७१ ते २०१२ या दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ९०२% नी वाढ झाली. २०१० मध्ये बलात्कार, लैंगिक हल्ले, छळ आणि महिलांना पळवून नेण्याचे वर्षभरात २.१३ लाख म्हणजे रोज सरासरी ५८५ गुन्हे घडले. हा खऱ्या आकड्याचा केवळ एक छोटा अंशच आहे कारण बहुतांश महिला तक्रार न नोंदवता गप्प बसून सहन करतात. ही धक्कादायक आकडेवारी म्हणजे आपल्या देशातील महिलांच्या दर्जाचेच प्रतिबिंब आहे. सर्व मानवी नाती व भावनांचे वस्तूकरण आणि व्यापारीकरण, स्त्रियांचे व त्यांच्या शरीराचे अश्लील चित्रण इत्यादी गोष्टींवर भर देणाऱ्या जागतिकीकरणाच्या नवउदार धोरणांमुळे आधीच पितृसत्ताक समाजात प्रचलित असलेल्या स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. युनिसेफच्या किशोरवयीन मुला, मुलींबाबतच्या जागतिक अहवालामुळे पितृसत्ताक वृत्तीची पातळी कळून येते, ज्यात नमूद केले आहे की भारतात ५७% किशोरवयीन मुले व ५३% किशोरवयीन मुली असे मानतात की पतीने पत्नीला मारण्यात कोणताही अन्याय नाही. ज्याचे प्राबल्य आज वाढत चालले आहे अश्या कंत्राटी, प्रासंगिक, रोजंदारी किंवा तात्पुरत्या प्रकारच्या रोजगारातील महिला, आणि स्थलांतरित महिला कामगार लैंगिक छळाला सहज बळी पडू शकतात. आर्थिक शोषणाबरोबरच त्यांना मुकादम, ठेकेदार आणि मालकाच्या लैंगिक छळाला देखील बळी पडावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि खाजगीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची अनुपलब्धता, वीजपुरवठा नसणे ह्यामुळे कामगार महिलांच्या असुरक्षिततेत अजूनच वाढ होत आहे. महिलांवरील वाढता हिंसाचार हे महिलांनी सार्वजनिक अवकाशावर हक्क दाखवल्याबद्दल आणि नवउदार अंमलाखाली आधीच आक्रसत चाललेल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी शर्यतीत उतरल्याबद्दल वाटणाऱ्या असहीष्णुतेचेच प्रतिबिंब आहे. काही मोजक्या महिला आपले आर्थिक स्वातंत्र्य ठामपणे बजावण्याच्या स्थितीत आल्यामुळे वाटणारी असूया, मग त्या तसे वागो अथवा न वागो, ह्या हिंसाचारातून व्यक्त होते. हे अजूनही समाजात महिलांबाबत व्यापकपणे प्रचलित असलेल्या पितृसत्ताक वृत्तीचे द्योतक आहे. कामकाजी महिलांची बालके देखील हिंसा आणि गैरवर्तनाला बळी पडतात. परंतु बाजारवादी विचारसरणीशी बांधील असलेले सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मूलभूत सामाजिक जबाबदारीमधून माघार घेत आहे दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या भयानक घटनेमुळे देशभर संतापाची आणि तीव्र विरोधाची लाट उसळली. त्या पार्श्वभूमीवर सरकारने गठीत केलेल्या न्यायमूर्ती वर्मा कमिटीने काही अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. सध्या असलेल्या कायद्याची मुळातून संपूर्ण तपासणी, तपासाच्या, खटला चालवण्याच्या पद्धतीत बदल ह्या त्यातील काही शिफारसी आहेत. कमिटीने महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठीच्या अगोदरच्या शिफारसींकडे दुर्लक्ष करण्यात सरकारने दाखवलेल्या निष्ठुरतेबद्दल सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्यानंतर सरकारने गुन्हेगारी कायदे(दुरुस्ती) कायदा पारित केला ज्यात पाठलाग, धोका पोहोचवणे, ऍसीड हल्ले आदी कृत्यांसाठी देखील कारवाईचे प्रावधान आहे. खरे तर सर्वात चिंतेची बाब आहे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये सजा लागण्याचे अत्यल्प प्रमाण. एका अहवालाप्रमाणे सजा लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमालीचे घसरले आहे. २०१० मध्ये अनेक राज्यांमध्ये हे प्रमाण फक्त १५% होते. हलक्या प्रतीचा तपास आणि पुरेश्या निधीचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे आहेत. हे एकप्रकारे बलात्कार आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॆनर्जी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा सहित काही प्रमुख राजकीय नेते त्यांच्या असंवेदनशील शेरेबाजीमुळे समाजात अजूनही आणि सरंजामी वृत्ती असल्याचेच प्रमाण देतात. सत्ताधाऱ्यांच्या अश्या वक्तव्यामुळे पोलीसांच्या क्रीयाशून्यतेला चालना मिळते. ही वृत्ती पाहता महिलांसहित सर्व समाजात प्रचलित असलेल्या पितृप्रधान व सरंजामी विचारसरणी विरुद्ध लढा मजबूत करण्याची गरज अधोरेखित करते. कामगारांची परिस्थिती संपुआ II सरकारच्या धोरणांमुळे कामगार महिलांवरीलच नव्हे तर संपूर्ण कष्टकरी जनतेवरील ओझ्यात वाढ झालेली आहे. वेतन मिळवणाऱ्या असो वा नसो, संघटीत क्षेत्रात असो वा असंघटीत, शेतीत असो, उत्पादनात वा सेवा क्षेत्रात, ९९% पेक्षा अधिक कामगार महिलांवर, त्यांच्या कष्टकरी भावांप्रमाणेच केंद्रात एका पाठोपाठ आलेल्या सरकारांनी राबवलेल्या नवऊदार धोरणांचा विपरीत परिणाम झाला आहेच. परंतु समाजातील त्यांचे दुय्यम स्थान आणि त्यांच्या विशिष्ठ गरजा पाहता ह्या धोरणांचा कामगार महिलांवर होणारा परिणाम सर्वात वाईट आणि बहुतेक वेळा त्यांना उद्ध्वस्त करणारा असतो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याच्या फुशारक्या मारत असला तरी संपुआ II च्या अंमलाखालील भारत राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत अमेरिकन साम्राज्यवादाच्या दबावापुढे जास्तच झुकत चालले आहे. भाववाढ वस्तूंची, विशेषतः सर्व अत्यावश्यक वस्तूंची भाववाढ ही आज लोकांसमोरील सर्वात गंभीर समस्या आहे. कामगार महिलांसाठी ती अजूनच जास्त तीव्र आहे कारण त्यांना आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करावे लागते. ह्या दरम्यान अन्नपदार्थांचे भाव आकाशाला भिडले आहेत. ह्याचा विशेष परिणाम स्त्रियांच्या अन्नसेवन आणि पोषणाच्या स्तरावर होतो. आणि अर्थातच त्याचा प्रभाव त्यांच्या बालकांच्या पोषणाच्या स्तरावर पडतो. ६६व्या एनएसएसओ सर्वेक्षणावर आधारित अहवालानुसार आपल्या देशातील पोषण सेवनाचा स्तर १९७२-७३ आणि २००९-१० दरम्यान सातत्याने खालावत आहे. ही घट १९९३-९४ ते २००९-१० यादरम्यान जास्त तीक्ष्ण होती. प्रथिनांचे सेवनही ह्या दरम्यान कमालीच्या तीव्रतेने घटली. हा अहवाल जरी स्त्रिया व पुरुषांचे स्वतंत्र आकडे देत नसला तरी आपण अनुमान काढू शकतो की त्यातही स्त्रियांच्या पोषणातील घट जास्तच तीव्र असणार आहे हे केवळ एकाच आकड्यावरून सिद्ध होते. ग्रामीण भागातील ६०% तर शहरी भागातील ५४% गरोदर स्त्रिया रक्तक्षयाने बाधित आहेत. ही भाववाढ अपघाताने किंवा पुरवठ्याच्या कमतरतेमुळे झालेली नाही. सरकार जाणून बुजून सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडकळीला आणून भाववाढीला चालना देणारी धोरणे राबवत आहे. बडे व्यापारी व कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी सरकार अन्नधान्याच्या भविष्यातील व्यापारास म्हणजेच सट्टेबाजीस प्रोत्साहन देत आहे. इंधन आणि खतांवरील अनुदानात प्रचंड कपात, वीज, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे विनियंत्रण, अनुदानित गॆस सिलेंडरच्या संख्येत कपात आदी गोष्टींमुळे भाववाढीला चालना मिळून सामान्य लोकांवर त्याचे ओझे टाकले जाते.

अन्न सुरक्षा
संपुआ II सरकारने सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांच्या आत अन्न सुरक्षा कायदा पारित केला जाईल असे वचन दिले होते. इतकी वर्षे त्यांनी टाळाटाळ केली, आणि आता लोकसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेऊन त्यांनी अन्न सुरक्षेवर अचानक एक वटहुकुम जारी केला, जेंव्हा लोकसभेचे अधिवेशन एका महिन्यात भरणारच होते. ह्या वटहुकुमात अनुदानित दरात प्रती व्यक्ती फक्त ५ किलो तांदूळ किंवा गव्हाचे प्रावधान आहे तेही फक्त ६७% लोकसंख्येसाठीच. त्याची व्याप्ती सार्वत्रिक नसल्यामुळे ज्या राज्यांमध्ये सार्वत्रिक रेशन व्यवस्था आहे त्यांच्यावर उलट प्रतिकूल परिणाम होणार आहे. लक्ष्य आधारित व्यवस्थेत नेहमीच गरजूंमधला एक विभाग वगळला जात असतो. डाव्या पक्षांनी सातत्याने सार्वत्रिक सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून २ रु. किलोने प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३५ किलो धान्य देण्याची मागणी लावून धरली आहे. सरकार भविष्यात आधार कार्डांचे काम पूर्ण झाल्यावर अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचाही विचार करत आहे. नवउदार धोरणांशी घट्ट बांधिलकी असलेल्या सरकारवर जबरदस्त प्रभाव असलेली जागतिक बँक, रोख हस्तांतरणाच्या कल्पनेची जोरदार वकिली करत आहे. काही जिल्ह्यांमध्ये ह्या आधीच ‘आधार’ आधारित थेट लाभ हस्तांतरण योजना ‘आपके पैसे आपके हाथ’ ही जोरदार घोषणा देत सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना आता देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, वृद्धापकाळ, विधवा व अपंग पेन्शन आदींसाठी राबवली जात आहे. परंतु रोख हस्तांतरणाला पाठींबा देणाऱ्या नांदी फौन्डेशनसारख्या काही संस्थांनी देलेल्या सर्वेक्षणासहित कित्येक सर्वेक्षणांमध्ये हे दिसून आले आहे की ९५% महिलांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या जागी रोख हस्तांतरणाची व्यवस्था आणायला विरोध केला. त्यांच्या रोजच्या अनुभवावरून त्यांना असे दृढतेने वाटते की पुरुषांच्या हातात गेलेला पैसा मूलभूत गरजा भागवण्यासाठी खर्च होत नाही. पिण्याच्या पाण्यापेक्षादेखील दारू मुक्तपणे उपलब्ध करून देण्यासाठी बांधील असलेल्या सरकारच्या राज्यात पुरुषांच्या हातात पैसे येणे म्हणजे दारूच्या दुकानासाठी पैसे आणि कुटुंबासाठी भूक असे त्यांना स्पष्टपणे वाटते. संयुक्त कामगार चळवळीच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायच्या मागणीला लोकांकडून खूपच व्यापक पाठींबा मिळाला. आपल्याला ह्या मागणीवरील मोहीम अजूनच बळकट केली पाहिजे.

वाढती बेरोजगारी
एनएसएसओची आकडेवारी दर्शवते की रोजगारवाढीच्या २०००-२००५ मधील २.७% ह्या दरामध्ये घट होऊन २००५-१० मध्ये तो केवळ ०.८%च राहिला. आपल्याला नोंद घेतली पाहिजे की ही घट अश्या कालावधीत होती जेंव्हा देशात सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) ८.५% सरासरी वार्षिक वाढीचा दर नोंदला गेला. जो त्याअगोदरच्या २०००-२००५ ह्या ५ वर्षांतील वाढीच्या दरापेक्षा कितीतरी जास्त होता. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे १५-२९ वयाच्या तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण तुलनेनी एकूण लोकसंख्येतील बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. शिक्षित तरुणांमध्ये हे अजूनच जास्त आहे. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेपर्यंत शिकलेल्या युवकांमध्ये बेकारीचे प्रमाण ८% तर शहरामध्ये १०% आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिक्षित महिलांमध्ये ते अनुक्रमे १८% आणि २३% आहे. सध्याच्या विकासाची झेप कितीही मोठी असली तरी ती रोजगारविहीन वाढ आहे हेच ह्यातून सिद्ध होते. विकोपाला गेलेले दारिद्र्य आणि विस्तारणारी विषमता रोजगारात घसरण होत असताना आणि बहुतांश कामगारांचे वेतन बाजारभावा पेक्षा खूप पिछाडीवर असताना, सरकार विशेषतः योजना आयोग, चमत्कारिकपणे हा दावा करत आहे की गरीबीत वेगाने घट होत चालली आहे. अधिकृत दारिद्र्य रेषेची व्याख्या प्रती व्यक्ती उत्पन्न/खर्च ग्रामीण भागात २२.४ आणि शहरी भागात २८.६ रुपये इतक्या हास्यास्पदरित्या खालच्या पातळीवर ठेवूनच योजना आयोगाने ही युक्ती साधली आहे. विषमता असहनीय पातळीपर्यंत वाढली आहे. २०१३ला प्रकाशित झालेल्या जागतिक पातळीवरील फोर्ब्सच्या यादी नुसार सर्वात श्रीमंत लोक अधिकच संपन्न झाले आहेत. संपूर्ण जगातील एकूण ७.२ अब्ज लोकांपैकी १४२६ व्यक्तींकडे ५.४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती होती. त्यांची एकत्रित संपत्ती मागच्या वर्षीच्या ४.६ च्या मानाने वाढली. (१ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर= १ लाख कोटी अमेरिकन डॉलर. याचा अर्थ १४२६ व्यक्तींची एकूण संपत्ती रुपयांमध्ये ३२४० लाख कोटी म्हणजेच भारताच्या २०१३-१४च्या वार्षिक बजेटच्या १९४ पट आहे.) भारतातील अमेरिकन डॉलर अब्जाधीशांची (बिलीयनैर) संख्या २०११ मध्ये आणि २०१३ मध्ये देखील ५५ आहे. मुकेश अंबानी जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत २२वा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती २१.५ बिलियन अमेरिकन डॉलर आहे म्हणजेच भारताच्या २०१३-१४च्या बजेटच्या ७७ पट! त्यांचे मासिक वेतन (अन्य लाभ सोडून) १.२५ कोटी आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसाचे ४.८० लाख रुपये. भारतीय वंशाचे स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल १६.५ बिलियन अमेरिकन डॉलरवर (बजेटच्या ६० पट) ४१व्या क्रमांकावर आहेत, सावित्री जिंदाल ७.६ बिलियन अमेरिकन डॉलरवर (भारतीय बजेटच्या १७.३८ पट) जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत १७व्या आणि भारतातील श्रीमंतांमध्ये ७व्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या टोकाला ग्रामीण भागातील सर्वात गरीब १०% लोकसंख्या रोज दर दिवशी १५ रुपयांवर गुजराण करते तर शहरी भागातील सर्वात गरीब १०% लोकसंख्या रोज दर दिवशी २० रुपयांवर गुजराण करते. २००९-१० मध्ये आपल्या देशातील ३८ कोटींपेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात दर महिना ७६३ व शहरी भागात ८६० रुपयांवर स्वतःला जगवतात अशी माहिती लोकसभेत दिली गेली. हे लोक काही स्वस्थ बसून रहात नाहीत तर ते काम करून राष्ट्रीय उत्पादनात व सरकारी तिजोरीत भर घालतात. पण त्यांच्या कष्टाचे फळ हिसकावून घेऊन त्यांना गरीबच ठेवण्यासाठी सरकारची धोरणे श्रीमंतांना मदत करतात. 

कामगारांच्या अधिकारांवर हल्ले
कामगार कायद्यांचे पालन न करणे ही गोष्ट काही फक्त कामगार महिलांपुरती मर्यादित नाही. देशातील सर्व कामगार कायदे- किमान वेतन, कामगारांची नोंद ठेवणे, कामाचे तास, कंत्राटी काम, सामाजिक सुरक्षा, सुरक्षितता आणि कामगारांचे संघटीत होण्याचा व सामुहिक सौदेबाजीचा अधिकार आदी सर्वांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कायद्याचे पालन करवून घेणारी यंत्रणा ह्या कामात नेहमीच मालकांना साथ देते. कायदा मोडणाऱ्या मालकांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. उलट कायद्याच्या पालनाचा आग्रह धरणाऱ्या कामगारांवरच पोलीस आणि मालकांचे गुंड हल्ले करतात. औद्योगिक तंट्यांमध्ये मालकांच्या बाजूने हस्तक्षेप करणे हे पोलिसांचे नेहमीचेच काम झाले आहे. औद्योगिक तंट्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनवून त्यांना हाताळण्यासाठी बळाचा वापर वाढत चालला आहे. आपल्याला हवी ती युनियन निवडून त्यात सामील होण्याच्या व सामूहिक वाटाघाटी करण्याच्या कामगारांच्या मूलभूत अधिकारावर भीषण हल्ले होत आहेत. कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस कस्टडीत मारहाणीमुळे मृत्यू, पोलिसांच्या समोर खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातून हत्या आणि व्यवस्थापकाच्या कक्षात खून अश्या घटना वाढत आहेत. कामगार कायद्यांमध्ये जे काही सुरक्षेचे उपाय उपलब्ध आहेत ते मोडकळीला आणून कामगारांना हवे तेंव्हा कामावर ठेवण्याचे व काढून टाकण्याचे अधिकार मालकांना देण्याचे भयानक प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र सरकारने कामगारांचे कामगार संघटना अधिकार मर्यादित करण्यासाठी व संप करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी कायदेशीर उपाय केलेले आहेत. निर्यात प्रक्रिया विभाग (EPZs- Export Processing Zones), सेझ (SEZs- Special Economic Zones), निर्यात केंद्रित युनिट्स (EOUs- Export Oriented Units) आणि आता राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन विभाग (NIMZs- National Investment and Manufacturing Zones) इत्यादी विशेष विभाग, राष्ट्राच्या जीवावर बड्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड सवलती देण्यासाठीच निर्माण करण्यात आले आहेत. ह्या विभागांमध्ये कामगार कायदे पाळले जात नाहीत. मालकांना कामगारांच्या अधिकारांचे हनन करण्याचे स्वातंत्र्य देऊन सरकार संपूर्ण देशाला मालकांसाठी स्वर्ग बनवू पहात आहे. वेतनाच्या हिस्श्यातील घसरण नवउदार धोरणांच्या अंमलाखाली रोजगार संबंधांचे स्वरूप मालकांसाठी जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या दृष्टीने बदलण्यात आले आहे. कामगारांना वेगवेगळ्या नावांनी कामावर ठेवले जात आहे- कंत्राटी, प्रासंगिक, हंगामी, तात्पुरते, अर्ध वेळ, रोजंदारी, शिकाऊ इत्यादी. त्यांना देय लाभांपासून वंचित ठेवण्यासाठीच सरकार अशी चित्र विचित्र नावं वापरत आहे. खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात अश्या कामगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अश्या कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्या खूप मोठी आहे. वेतनाचा खर्च कमी करण्याची मालक वर्गाची एक जागतिक पद्धती आहे अशी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनी (ILO) नोंद घेतली आहे. आयएलओने नोंदले आहे की कामगारांचे वेतन त्यांच्या उत्पादकतेच्या मानाने खूपच मागे पडलेले आहे. भारतात वेतनाच्या हिस्श्यामध्ये कमालीची घसरण नोंदवली गेली आहे- ८०च्या दशकात ३०% वरून ९०च्या दशकात २०% आणि २०१० मध्ये जोडलेल्या निव्वळ मूल्याच्या केवळ ९.४% इतकाच राहिला.

कृषी संकट
कृषी क्षेत्र अजूनही संकटाला तोंड देतच आहे. नवउदार धोरणे राबवण्याची सुरुवात झाल्यापासून कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कित्येक महिलांसहित २ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीत लागणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशके, वीज, पाणी इत्यादी साधनांच्या किंमती सरकारच्या खाजगीकरण आणि शेती क्षेत्रासाठी करावयाच्या खर्चात कपात करण्याच्या धोरणामुळे वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव मिळत नाहीत आणि ग्राहकांसाठी बाजारभाव मात्र वाढत चालले आहेत. व्यापारी, दलाल आणि बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्स मात्र सरकारच्या धोरणांमुळे नफा कमावत आहेत. बी, बियाणे आदी शेतीच्या साधनांचा पुरवठा करण्यात बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्सची भूमिका वाढत चालली आहे. ते प्रचंड शोषण करणाऱ्या कंत्राटी शेती व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहेत जी शेतकऱ्यांची जोखीम अजूनच वाढवत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कमी व्याजदराने संस्थात्मक कर्ज उपलब्ध नसल्यामुळे छोटे व मध्यम शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात ढकलले जातात. ज्या घरातील पुरुष शेतकरी आत्महत्या करतात त्या घरातील बाईवर कुटुंब आणि शेती दोन्हीची जबाबदारी येऊन पडते. शेतकरी महिलेनी आत्महत्या केल्यास बरेचदा तिच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई पण मिळत नाही कारण बहुतेक वेळा तिच्या नावावर जमीन देखील असत नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागात तीव्र दुष्काळ आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत द्यायला सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अजूनही चालूच असलेले कृषी संकट आणि शेतीतील घटत जाणारा रोजगार यामुळे महिलांसहित कित्येक कामगारांना कामाच्या शोधात गाव सोडून शहराकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. ह्या महिलांना बहुतांश वेळा घर कामगार, बांधकाम किंवा वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार, भाजी किंवा फूल विक्रेती म्हणून काम करावे लागते. त्यांना तीव्र शोषण आणि अनेकदा लैंगिक छळाला बळी पडावे लागते. त्यांना गैरमार्गाने विक्री किंवा देहविक्रय अश्या धोक्यांना सामोरे जावे लागते. सामाजिक दडपशाही महिलांशिवाय समाजात असे दुसरेही विभाग आहेत जसे दलित, आदिवासी आणि मुस्लीम अल्पसंख्याक, ज्यांना आर्थिक शोषणाबरोबरच सामाजिक भेदभाव व दडपशाहीचे दु:ख भोगावे लागते. ह्या विभागातील महिला कामगारांना दुहेरी दडपशाहीला तोंड द्यावे लागते. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षांहून जास्त वर्षे झाली तरीही अजून देशाच्या अनेक भागांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. दलित महिला मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी, झाडूवाले, चामडे कमावणारे, इत्यादिसारखी कमी वेतनाची आणि तथाकथित ‘अस्वच्छ’ समजली जाणारी कामं करतात. रस्ते बांधणी आणि तत्सम कामांमध्ये दलित आणि आदिवासींना इतरांपेक्षा कमी मजुरी मिळते. सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारच्या खात्यांमध्येदेखील भेदभावाच्या कार्यपद्धती चालू आहेत. अंगणवाडी कर्मचारी,आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या दलित आणि आदिवासी महिलांना देशातील अनेक भागांमध्ये अश्या भेदभावांना तोंड द्यावे लागते. मुस्लीम महिला खूप मोठ्या संख्येने घर खेप कामगार (Home based workers) म्हणून विशेषतः बिडी, जरी इत्यादी मध्ये अत्यंत कमी मोबदल्यात काम करतात. ग्रामीण भागातील दलित महिलांना त्यांची जमीन हडपण्याच्या उद्देशाने ‘चेटकीण’ असल्याचा आरोप करून छळ केला जातो व प्रसंगी त्यांना मारून टाकले जाते. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने आपल्या सर्व कमिट्यांना सामाजिकदृष्ट्या दडपलेल्या विभागांमधील कामगारांना ज्या विशिष्ठ समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि आपल्या युनियनच्या मंचावरून त्यांच्या मागण्या उचलण्याची हाक दिली आहे. आपल्या कामकाजी महिला समन्वय समित्यांनी ह्या विभागांमधील महिला कामगारांच्या विशिष्ठ प्रश्नांना ओळखण्याचा आणि संबंधित युनियन्स आणि सिटू कमिट्यांनी त्यांचे सामाजिक प्रश्नसुद्धा उचलावेत ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संपुआ II सरकार संपुआ II सरकार सामान्य लोकांच्या दु:ख कष्टाशी काही देणेघेणे नाही. एकतर त्यांना आपल्या बहुसंख्य लोकांच्या हितांचे रक्षण करण्याची चिंता नाही किंवा त्यांना आत्मनिर्भर अर्थव्यवस्था निर्माण करण्यात रस तरी नाही. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने देशात प्रचलित असलेल्या राजकीय, आर्थिक परिस्थितीचा परामर्श घेतला आहे. गेल्या ५ महिन्यात या परिस्थितीत फरक पडलेला नाही. म्हणून त्याचा तपशीलात पुन्हा परामर्श घेण्याची आवश्यकता नाही. सरकारने लोकांवर टाकलेल्या ओझ्यात सातत्याने होणारी वाढ आणि त्यांच्या कामाच्या व जगण्याच्या परिस्थितीत होणारी घसरण ह्यामुळे संपुआ II सरकारबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
ह्यादरम्यान काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, नोकरशहा आणि बडे भांडवलदार इत्यादींच्या भ्रष्टाचारांची एका मागोमाग एक प्रचंड मोठी आणि किळसवाणी प्रकरणे वेगाने बाहेर आली आहेत. त्यातून सत्ताधारी राजकारणी, नोकरशहा आणि भांडवलदारांच्या आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाच्या हुकुमाप्रमाणे चालणाऱ्या नवउदार धोरणांच्या अंमलाखालील व्यवस्थात्मक अभद्र युतीचेच प्रत्यक्ष दर्शन होते. ह्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमुळे लोकांच्या क्रोधात अजूनच भर पडली आहे. कामगारांनी तीन प्रचंड मोठे संयुक्त सार्वत्रिक संप आणि असंख्य विभागवार संप व निदर्शने ह्यामधून हा असंतोष आणि क्रोध व्यक्त केला आहे. लोकांनी मनापासून ह्या संपांना पाठींबा दिला व ते मोठ्या संख्येने ह्या देशव्यापी बंदमध्ये सामील झाले. काँग्रेस पक्ष लोकांपासून तुटत चालला आहे. पण लोकांच्या असंतोषाचे आणि क्रोधाचे प्रतिबिंब अजूनही राजकीय रिंगणात पडलेले नाही. भाजपाकडे देखील गरिबांच्या बाजूचे कोणतेही पर्यायी धोरण नाही. कर्नाटकच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे भाजपाचे मागील विक्रम काँग्रेसपेक्षा फार काही वेगळे नाहीत. कामगार आणि सामान्य लोक जेंव्हा त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी आवाज बुलंद करतात तेंव्हा काँग्रेस आणि भाजपाशासित दोघांच्याही राज्यांमध्ये त्यांना ज्याप्रकारे शासनाच्या दमनाला तोंड द्यावे लागते, त्यात काहीही फरक नाही. त्याव्यतिरिक्त भाजपा जो फासीवादी संघ परिवाराचा सदस्य आहे, त्यांच्या धर्मांध आणि फूट पाडणाऱ्या राजकीय रणनीतीचा अजेंडा पुढे रेटत आहे. त्यांचे मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आणणे आणि अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करणे यातून देशासमोर असलेल्या धोक्याची घंटाच जणू ऐकू येत आहे. प्रादेशिक पक्षांनी कधीही नवउदार धोरणांना सातत्याने विरोध केलेला नाही. विरोध करण्याऐवजी उलट त्यांनी अनेकदा संधिसाधू भूमिका घेतली आहे. डावे पक्ष वगळता अन्य कोणत्याही बिगर काँग्रेस पक्षांनी वित्त विषयक संसदीय स्थायी समितीमध्ये पेन्शन विधेयक आणि विमा व बँक विषयक विधेयकाला विरोध केला नाही. निवडणुकीत पैसा आणि गुंडगिरीचा वापर, बड्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्सचा देशाची धोरणे ठरवण्यातील वाढते नियंत्रण काही राजकीय पक्षांचा उघड संधिसाधूपणा ह्या सर्व गोष्टी लोकाशाहीची क्रूर थट्टाच करत आहेत. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने नोंद घेतली आहे की संपुआ II सरकारच्या राष्ट्राचे हित अमेरिकी साम्राज्यवादाकडे गहाण ठेवण्याच्या धोरणाला फक्त डाव्या पक्षांनीच सातत्याने विरोध केला आहे. मजबूत स्वयंनिर्भर व्यवस्था विकसित करण्याची त्यांनी आग्रहाने मागणी केलेली आहे. ते सरकारच्या जन विरोधी, कामगार विरोधी आणि राष्ट्र विरोधी धोरणांच्या विरोधात संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार आवाज उठवत आहेत. ते नेहमी लढणाऱ्या कामगारांच्या आणि दडपलेल्या सामाजिक विभागांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले आहेत आणि त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला आहे. डाव्या पक्षांच्या १ जुलैला झालेल्या संमेलनात मंजूर करण्यात आलेल्या पर्यायी धोरणांच्या ठरावात संयुक्त कामगार संघटना चळवळीने उचललेल्या अनेक मागण्यांचा समावेश आहे. डाव्यांनी नवउदार अजेंड्याला खंबीरपणे केलेल्या मजबूत विरोधाची आणि त्यांच्या लोकांच्या बाजूची धोरणे राबवणाऱ्या सरकारशी असलेल्या बांधिलकीची गळचेपी करण्यासाठी सत्ताधारी वर्ग डाव्यांवर भयंकर हल्ले चढवत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ४ वर्षांत शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांची हत्या करण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सिटूच्या प्रदीप ता, दिलीप सरकार सारख्या नेत्यांना आपला जीव गमवावा लागला. सिटूच्या हजारो कार्यालयांवर तृणमूलच्या गुंडांनी हल्ले करून ती जाळली किंवा बळकावली. कितीतरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पळवून नेले गेले, त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आले व काहींना तर मारून टाकण्यात आले. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये टीएमसीने प्रचंड मोठ्या हिंसाचाराचे थैमान घातले. डाव्या किंवा अन्य विरोधी पक्षाच्या शेकडो उमेदवारांना त्यांनी एकतर अर्ज तरी भरू दिले नाहीत किंवा प्रचार तरी करू दिला नाही. महिला नेत्या व डावी आघाडी सरकारच्या काही माजी मंत्र्यांसहित विरोधी पक्षाच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर प्रचारादरम्यान शारीरिक हल्ले देखील करण्यात आले. डाव्यांच्या मतदारांवर आणि समर्थकांवर दहशत बसवण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, अगदी मतमोजणीत देखील खोटेपणा करण्यात आला. केरळमध्ये हल्ले प्रामुख्याने खोट्या आणि विखारी प्रचाराच्या रूपाने केले जातात. सत्ताधारी वर्ग कॉर्पोरेट कंपन्यांद्वारा नियंत्रित प्रचार माध्यमांच्या सक्रीय सहकार्याने वैचारिक हल्ले चढवून डावे कसे अप्रासंगिक झाले आहेत हे लोकांना पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व प्रयत्न डाव्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये दहशत आणि गोंधळ माजवून डाव्या शक्तींना देशातील राजकीय पटलावरून विशेषतः त्यांच्या बालेकिल्ल्यातून दूर करण्यासाठीच केले जात आहेत. सत्ताधारी वर्गाचे हे दिवास्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कामगार वर्ग हे कधीही घडू देणार नाही. आपण एका गोष्टीची नोंद घ्यायला हवी की असा अपप्रचार किंवा विरोधकांनी राष्ट्रविरोधी, दहशदवादी आणि विघटनकारी शक्तींशी हातमिळवणी करून देखील त्रिपुरामध्ये डावी आघाडी निर्णायक बहुमत घेऊन, विधानसभेत आपली ताकद वाढवत पुन्हा सत्तेत आली. काँग्रेस आणि भाजपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही ह्या सत्ताधारी वर्गाने बिंबवलेल्या खोट्या कल्पनेच्या आपण चिंध्या चिंध्या केल्या पाहिजेत. खरा पर्याय म्हणजेच धोरणांचा पर्याय आपण कामगार वर्ग आणि लोकांसमोर जोरदारपणे मांडला पाहिजे. लोकांच्या बाजूच्या पर्यायी धोरणांच्या भोवती मोहिमा आखून लोकांची ताकद एकत्रित करून लढे संघटीत केले पाहिजेत. सध्या राबविल्या जाणारी नवउदार धोरणे अमुलाग्र बदलल्याशिवाय त्यांच्या मूलभूत मागण्या पूर्ण होऊ शकणार नाहीत याबाबत लोकांमध्ये जागृती करणे हे कामगार महिलांसहित कामगार वर्गाचे कर्तव्य आहे. हीच खऱ्या अर्थाने सिटूच्या १४व्या अधिवेशनाने दिलेली हाक आहे. कामगार वर्गाचे लढे गेली ३ वर्षे संयुक्त कामगार संघटना चळवळीच्या मंचावरून सातत्याने झालेल्या मोहिमा आणि लढयांमध्ये कामगार महिलांनी महत्वाची भूमिका बजावली. ह्या दरम्यान तीन मोठे देशव्यापी सार्वत्रिक संप, लोकसभेवर प्रचंड मोर्चा, जेल भरो इत्यादी कार्यक्रम झाले. सर्व क्षेत्रातील कामगार महिला ह्यात मोठ्या संख्येनी सामील झाल्या ज्या एकूण जमलेल्या लोकांच्या ४० ते ५०% होत्या. संयुक्त संघर्षांबरोबरच सिटूने नोव्हेंबर २०१२मध्ये लोकसभेजवळ दोन दिवसीय ऐतिहासिक महापडावाचे आयोजन केले. ज्यात सुमारे दिल्लीच्या थंडीची पर्वा न करता ३५००० योजना कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्याच्यात प्रचंड मोठी संख्या महिलांची होती. अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा भरणा जरी यात जास्त असला तरी शासनाने चालवलेल्या, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प शाळा, आयकेपी अनिमेटर्स, संगणक शिक्षक, साक्षर भारती, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना मधील शिक्षक, शिक्षण सेवक, मनरेगा रोजगार सेवक, सहायक एएनएम, लिंक आरोग्य सेविका, शक्ती सहायिका, कृषक साथी इत्यादी १० हून अधिक योजनांमधील कर्मचाऱ्यांनी देखील महापडावात भाग घेतला. भारतीय श्रम परिषदेचे (ILC) चे ४४ व ४५वे सत्र ह्या सर्व मोहिमा व लढ्यांच्या पार्श्वभूमीवर २०१२ मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४४व्या सत्रात किमान वेतनावर चर्चा करून महत्वाची शिफारस केली. परिषदेने ह्याचा पुनरुच्चार केला की किमान वेतन निश्चित करताना भारतीय श्रम परिषदेच्या १५व्या सत्राच्या शिफारसी आणि राप्टोकास आणि ब्रेट केस मधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चलनवाढीचा परिणाम पूर्णपणे निष्प्रभ करण्यासाठी महागाई भत्ता (VDA) समाविष्ट केला पाहिजे. कंत्राटी कामगाराला संबंधित उद्योग, आस्थापनातील नियमित कामगाराइतके वेतन दिले पाहिजे अशी शिफारस भारतीय श्रम परिषदेने केली आहे. अश्याच प्रकारे सिटूने घेतलेली देशव्यापी मोहीम आणि महापडावामुळे योजना कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रकाशझोतात आला. ‘योजना कर्मचारी’ हा कामगार संघटना पडताळणीसाठीचा एक विभाग म्हणून मान्य करण्यात आला. मे २०१३मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४५व्या सत्रात ‘योजना कर्मचाऱ्यांची’ परिस्थिती हा विषय अजेंड्यावर घेऊन काही महत्वाच्या आणि लक्षणीय शिफारसी केल्या ज्यात कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ आणि त्यांचा संघटना बांधण्याचा आणि सामुहिक वाटाघाटी करण्याचा अधिकार ह्यांचा समावेश होता. परिषदेनी अशी देखील शिफारस केली की त्या त्या संबंधित खात्याने ह्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियमन व सेवाशर्ती निश्चित करण्यासाठी ‘रोजगार स्थायी आदेश’ सूत्रबद्ध करावेत. ह्या सर्व विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे संघटीत करून त्यांच्या ‘योजना कर्मचारी’ म्हणून असलेल्या समान समस्या व मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सिटूने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे. परंतु सरकारने ह्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचललेली नाहीत. आपल्याला आपले प्रयत्न अजून तीव्र केले पाहिजेत आणि भारतीय श्रम परिषदेच्या ४४व्या व ४५व्या सत्राने केलेल्या शिफारसी सरकारने अंमलात आणाव्या या मागणीसाठीची मोहीम अशीच चालू ठेवली पाहिजे. आपण योजना कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांना संघटीत करण्यासाठी देखील पुढाकार घेऊन आपले प्रयत्न तीव्र केले पाहिजेत. कामगार वर्गाचा जागतिक लढा युएसए, फ्रांस, जर्मनी, इटाली, इंग्लंड सारख्या पुढारलेल्या भांडवलदारी देशांत आणि स्पेन, ग्रीस इत्यादींसहित जगभरातील अनेक ठिकाणी कामगार वर्गाचे असे लढे होत आहेत. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या सरकारांनी आपापल्या देशात लादलेल्या काटकसरीच्या उपायांना विरोध करत हजारो लोक संप आणि निदर्शनांमध्ये सह्भागी होत आहेत. ग्रीस, पोर्तुगाल आणि स्पेन इत्यादी देशांमध्ये ह्या दरम्यान अनेक वेळा प्रचंड संप झाले आहेत. मुळात ह्या संकटाला कारणीभूत असणाऱ्या बँका व वित्त संस्थांना आर्थिक मदत (बेल आउट) देण्याला आक्षेप घेत लोकांनी भांडवलशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या न्यूयॉर्कमधील वॉल स्ट्रीट वर मोठ्या संख्येने जमून निदर्शने केली. १%ना लाभ मिळवून देण्यासाठी ९९% लोकांवर ओझे लादण्याच्या विरोधात आवाज उठवला गेला. भाववाढ, बेरोजगारी, कामगारांच्या अधिकारांवर अंकुश ह्या गोष्टी इजिप्त आणि अन्य अरब देशांमधील प्रचंड निदर्शनांसाठी कारणीभूत घटक ठरल्या आणि इजिप्तमध्ये ही निदर्शने तर हुकुमशाही उलथवून टाकण्याच्या दिशेने जाऊ शकली. साम्राज्यशाहीच्या हुकुमानुसार नवउदार धोरणे राबवणाऱ्या सत्तांचे कामगारांवर होणारे वाढते हल्ले आणि ह्या धोरणांना कामगार वर्गाचा जगभरातील वाढता विरोध ह्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कामाचा आढावा घेतला पाहिजे.