Sunday, September 22, 2013

ज्योती बसू – एक जिवंत आख्यायिका

ज्योती बसू एक जिवंत आख्यायिका

८ जुलै २०१३ ते ८ जुलै २०१४ हे वर्ष भारतातील क्रांतिकारी चळवळीचे एक जनक आणि महान नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचे जन्मशताब्धी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
सिटू चे एक संस्थापक आणि भारताच्या राजकीय पटलावरील एक महान व लोकप्रिय नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचा जन्म ८ जुलै १९१४ रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांचे माता, पिता यांचे मूळ गाव आता बांगलादेशात असलेल्या ढाका जिल्ह्यात होते. त्यांच्या आईचा जन्म उच्च मध्यम वर्गातील जमीन धारक कुटुंबात झाला होता तर वडिल तुलनेनी निम्न मध्यम वर्गात जन्मलेले व परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर होते.
त्यांनीच त्यांच्या आठवणींमध्ये नोंद केलेली आहे की त्यांच्या कुटुंबात तिळमात्र देखील राजकीय वातावरण नव्हते. परंतु राजकारण जरी त्यांच्या कुटुंबातील एक विषय नसला तरी त्या काळातील क्रांतिकाऱ्यांबद्दल एक सहानुभूतीची व आदराची सुप्त भावना मात्र अवश्य होती. झपाट्याने वाढणाऱ्या क्रांतिकारी चळवळी, चित्तगांव शस्त्रागारावरील हल्ला, गांधीजींचे उपोषण, प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर होणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झंजावाती भाषणे अश्या वातावरणात मोठे होणारे कॉम्रेड बसू राजकीय घडामोडींकडे आकर्षित होणे स्वाभाविकच होते. ज्योती बसू यांनी त्यांच्या आठवणींमध्ये त्यांना व त्यांच्या भावाला नेताजींच्या जाहीर सभेच्या वेळी पोलिसांच्या हातून खाव्या लागलेल्या माराचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात तो सर्व भाग त्यावेळी एखाद्या रणांगणासारखा दिसत होता. अश्वारूढ पोलीस तसेच गणवेशांतील शिपाई तिथे होते. जेव्हा पोलिसांनी हल्ला केला तेव्हा सुरक्षित जागी पळून न जाण्याचा आम्ही निर्णय घेतला व आम्ही त्यांच्या समोरून शांतपणे जात असताना पोलिसांच्या काही लाठ्या आमच्याही पाठीवर पडल्या. पण तरीदेखील आम्ही पळून न जाता बाबांच्या चेंबरपर्यंत चालत गेलो.
ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला पुढील आयुष्यात सर्व आव्हाने समर्थपणे पेलू शकणारे नेतृत्व देण्याची क्षमता असलेला, पोलिसांच्या मारहाणीला निर्भयपणे सामोरे जाणारा व स्वातंत्र्य चळवळीने भारला गेलेला एक १६ वर्षाचा मुलगा पहायला मिळतो.   
लंडनमध्ये
१९३५ मध्ये ज्योतीबाबू पदवीधर झाले व पुढील कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनमधील शिक्षणाच्या 4 वर्षांच्या ह्या कालखंडात त्यांचे रुपांतर व्ही. के कृष्ण मेनन, जे पुढे नेहरूंच्या काळात कॅबिनेट मंत्री झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या इंडियन लीगच्या एका कार्यकर्त्यात झाले. नंतरच्या काळात लंडनमध्ये लंडन मजलीस नावाच्या एका संघटनेचे गठन झाले ज्याचे ते पहिले सचिव बनले. ही संघटना भारतातील स्वातंत्र्य चळवळींसाठी पाठींबा मिळविण्याचे तसेच लंडनला भेट देणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांचे स्वागत करण्याचे कार्य करीत असे. ह्यातून जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि अन्य नेत्यांच्या संपर्कात ते आले. ज्योती बसुंसह भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट त्याच काळात साम्राज्यशाही विरोधी चळवळ आणि मार्क्सवादी विचारसरणीकडे आकर्षित होऊन सक्रीय झाला व ब्रिटीश कम्युनिस्ट पार्टीशी त्यांचे जवळिकेचे संबंध निर्माण झाले.
१९४० मध्ये आपल्या परीक्षेनंतर निकालाचीही वाट न पाहता ज्योतीबाबू ताबडतोब भारतात परतले व त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क प्रस्थापित केला. जरी कोलकत्ता हायकोर्टात त्यांनी बॅरिस्टर म्हणून नोंदणी करून घेतली तरी प्रत्यक्षात ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून सक्रीयपणे काम करू लागले.
कामगार संघटना व निवडणुका
१९४४ मध्ये त्यांनी बंगाल- नागपूर रेल्वे वर्कर्स युनियन संघटीत करण्यास सुरवात केली व त्यात त्यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली. त्यांच्या कामगार चळवळीतील सहभागाची तिथून सुरवात झाली व जीवनाच्या अखेरच्या दिवसांपर्यंत हा सहभाग असाच चालू राहिला. ह्याच काळात त्यांचा निवडणुकीच्या क्षेत्रातदेखील प्रवेश झाला. १९४६ मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या रेल्वे कामगार मतदारसंघा मधील कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून त्याना उभे करण्यात आले. तिथे त्यांचा मुकाबला प्रामुख्याने कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या व रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेल्या हुमायून कबीर यांच्याशी झाला. त्यांच्या विधान सभेतील दीर्घ कारकिर्दीची सुरवात ह्याच निवडणुकीपासून झाली जी त्यांनी सर्व गैरप्रकारांचा मुकाबला करत जिंकली. १९४६ मधील निवडणुकीच्या अनुभवाबद्दल त्यांचे कथन नोंद घेण्यासारखे व मजेदार आहे. ते म्हणतात माझ्या पहिल्याच निवडणुकीत मला भांडवलदारी निवडणुका म्हणजे काय असतात ह्याची चव चाखायला मिळाली. जणू काही मला त्यांचा जळजळीत बाप्तीस्माच मिळाला. एका बाजूला मते खरेदी करण्याचे जाणून बुजून प्रयत्न करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणा आणि आदर्शवाद कसा असतो तेही पहायला मिळाले. मतदार असलेल्या रेल्वे कामगारांपैकी एकानेही गद्दारी केली नाही. आमच्या कॉम्रेड्सच्या समर्पण, चिकाटी आणि एकनिष्ठेमुळेच माझा विजय झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे हा विजय म्हणजे रेल्वे कामगारांचाच विजय होता. १९४६ च्या ह्या निवडणुकीत झालेल्या विजयाने दिलेली शिकवण त्यांना त्यांच्या विधानसभेतील पुढच्या सर्व निवडणुकींमध्ये चांगलीच कामी आली.  
स्वातंत्र्यानंतरही ज्योती बसू पश्चिम बंगालच्या विधान सभेचे सदस्य म्हणून कायम राहिले. बंगालच्या विभाजनानंतर देखील १९४६ मध्ये पश्चिम बंगाल मधून विधान सभेवर निवडून आलेल्या सर्वांची सदस्यता कायम राहिली. स्वातंत्र्यानंतर १९४७च्या नोव्हेंबरमध्ये भरविण्यात आलेल्या सत्राच्या पहिल्या दिवसाबद्दल ते आपल्या आठवणींमध्ये ते नमूद करतात, मला अजून आठवतंय की सत्राच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना बंगाल प्रांत कृषक सभेनी संघटीत केलेल्या किसान व विद्यार्थ्यांच्या २५,०००च्या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करावा लागला. पुढील काळात घडणाऱ्या गोष्टींची ही जणू चुणूकच होती.
ज्योती बसूंनी पश्चिम बंगाल तसेच राष्ट्रीय पातळीवर जनवादी आणि डावी चळवळ विकसित करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका वठवली. राज्यात एक सशक्त कामगार चळवळ उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दरम्यान जेव्हा जेव्हा कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांना अटक करण्यात येत असे. इतके  हल्ले होऊनही चळवळ शक्तिशाली होत गेली. ज्योती बसूंनी १९५२ तसेच १९५७ मध्ये देखील  निवडणूक जिंकली. त्यांनी विधान सभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले. १९६२मध्ये ते त्याच बडानगर मतदार संघातून निवडून आले.
१९६२ ते १९६७ हा काल भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा कालावधी होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला फुटीचा सामना करावा लागला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गठन झाले. ज्योती बसूंची पक्षाच्या ९ सदस्यीय पोलिट ब्युरोत निवड झाली व पक्षाच्या ह्या सर्वोच्च समितीचे ते त्यांच्या मृत्युपर्यंत सन्माननीय सदस्य राहिले.
जनतेच्या बाजूची सरकारे
१९६७ मध्ये अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला. पश्चिम बंगाल मध्ये कॉंग्रेसचा पराभव करणाऱ्या नवीन समीकरणाचे रचनाकार होते कॉम्रेड ज्योती बसू. तिथे झालेल्या त्रिकोणी निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील एक आघाडी व बांगला कॉंग्रेसच्या नेतृवाखालील दुसरी आघाडी यांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी सरकार स्थापन केले, ज्याचे मुख्यमंत्री होते बांगला कॉंग्रेसचे अजॉय मुखर्जी व उपमुख्यमंत्री होते ज्योती बसू. ही बंगालमधील संयुक्त सरकारांच्या दीर्घ इतिहासाची नांदीच म्हणावी लागेल. हे सरकार फक्त आठच महिने टिकले पण ह्या आठच महिन्यात ह्या सरकारने ट्राम कंपनीचे राष्ट्रीयीकरण, जनतेच्या चळवळी दडपण्यासाठी वापरण्यात येणारा राक्षसी पश्चिम बंगाल सुरक्षा कायदा रद्द करणे अशी अनेक जनतेच्या बाजूची पावले उचलून इतिहास घडवला. ह्या सरकाने हे देखील जाहीर केले की कामगार तंट्यांमध्ये पोलीस व्यवस्थापनाच्या बाजूने पक्षपाती भूमिका घेणार नाही.
१९६९ मध्ये झालेल्या त्यानंतरच्या निवडणुकीत ह्या दोन्ही आघाड्यांनी कॉंग्रेसविरुद्ध एकत्रित निवडणूक लढवली. ज्योती बसू पुन्हा उपमुख्यमंत्री बनले व त्यांनी गृह व पोलीस खाते सांभाळले. ह्या सरकारने राज्यात जमीन सुधारणांचा पाया रचला व जनतेच्या बाजूचे  अनेक निर्णय घेतले. हे सरकार फक्त १३ महिने चालले व २९ मार्च १९७०ला राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. हा काळ पश्चिम बंगालच्या इतिहासातील एक अशांत काळ होता. नक्षलवादी चळवळीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या समर्थकांवर खुनी हल्ले करायला सुरवात केली. त्यात त्यांना कॉंग्रेसने देखील साथ दिली. ३१ मार्च १९७० रोजी पटना रेल्वे स्टेशनवर ज्योती बसू यांच्यावर गोळी झाडून खुनी हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांना घ्यायला आलेल्या एका कॉम्रेडचा मृत्यू झाला. ज्योती बसुंच्या हाताला खरचटले परंतु त्यांचा जीव वाचला.
सिटूची स्थापना
त्याच वेळी कामगार संघटना आघाडीवर देखील नवीन घडामोडी होत होत्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध क्षेत्रात होणाऱ्या प्रचंड लढयांच्या हाताळणीबद्दल आयटकमध्ये वर्चस्व असलेल्या नेतृत्वाला अनेक प्रश्न विचारले जात होते. अश्या परिस्थितीत नव्या केंद्रीय कामगार संघटनेचे गठन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय कामगार संमेलन घेण्याचा निर्णय घेतला गेला. कॉम्रेड बी टी रणदिवे, कॉम्रेड पी आर राममूर्ती सारख्या नेत्यांच्या बरोबरीने ज्योती बसू यांनी देखील त्यात पुढाकार घेतला. पश्चिम बंगाल प्रांतीय कामगार संघटना कौन्सिलने ह्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला. ज्योती बसू कोलकत्त्यातील संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या स्वागतपर भाषणात त्यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थिती व दोन्ही संयुक्त आघाडी सरकारांनी अल्पावधीत मिळवलेले यश याबाबत विवेचन केले. त्यांनी अधिवेशानासमोरचे कार्य, लढ्यांसाठी कामगार वर्गीय एकजुटीची बांधणी करण्याची गरज, कामगार वर्गाची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सहयोगी दोस्तांची एकजूट करण्याची आवश्यकता इत्यादी महत्वाच्या विषयांचा समाचार घेतला. स्थापना अधिवेशनात ते सिटूचे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडले गेले तर दुसऱ्या अधिवेशनात उपाध्यक्ष म्हणून, ज्या पदावरून त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सिटूला मार्गदर्शन केले.
ज्योती बसूंनी १९७० नंतरच्या अशांत दिवसांमध्ये कष्टकरी जनतेच्या लढयांना नेतृत्व दिले आणि पश्चिम बंगाल मध्ये सिटूची देशातील सर्वात बलशाली शाखा बांधण्यासाठी मार्गदर्शन केले. १९७० ते १९७७च्या कालखंडातील पश्चिम बंगालमधील जनतेचे लढे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू आणि अन्य जनसंघटनांच्या अगणित नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या हा सर्व इतिहासाचा भाग आहे. 
पश्चिम बंगालमधील जनतेनी ह्या सर्व क्रूरतेला तोंड दिले, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष केला आणि शेवटी विजय मिळवला. १९७० पासून त्यांनी डाव्या आघाडी साठी प्रयत्न केले. १९७७ मध्ये पहिले डाव्या आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि ज्योती बसू यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सातत्याने ५ निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करत ते २३ वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर त्यांनी त्या पदावरून निवृत्ती घेतली आणि स्वतः उभे न राहता पुढील 2 निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा किल्ला लढवला. भांडवली व्यवस्थेत सातत्याने ३४ वर्षे डाव्या आघाडीचे सरकार चालवणे हा एक विक्रमच आहे.
ज्योती बसू यांनी सर्वात जास्त काल पदावर राहून सेवा देणारे मुख्यमंत्री म्हणून एक इतिहास घडवला. पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारांच्या अनेक उपलब्धींमध्ये लोकशाही  अधिकारांची पुनःस्थापना तसेच सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता ह्यांचा देखील समावेश होतो.
१९७७मध्ये पदग्रहण केल्याबरोबर ताबडतोब ज्योती बसू यांनी घोषणा केली की, हे सरकार फक्त रायटर्स बिल्डींग मधून कारभार करणार नाही. राज्य सरकारच्या मर्यादांची स्पष्ट कल्पना देखील पश्चिम बंगाल मधील जनतेला देण्यात आली. एका मुलाखतीत त्यांनी डाव्या आघाडीचे सरकार चालवण्याच्या ह्या प्रयोगाबद्दल म्हटले की, इथे समाजवादी आर्थिक किंवा राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही आहे. आम्ही लोकांना कोणतीही अवास्तव आश्वासने दिलेली नाहीत. जे आम्ही करू शकतो ते आम्ही त्यांना सांगितले आहे. आम्ही मूलभूत बदल घडवून आणू शकत नाही कारण आम्ही प्रजासत्ताक पश्चिम बंगाल नाही तर भारताचा एक भाग आहोत.
पश्चिम बंगाल मधील ३४ वर्षांच्या डाव्या आघाडी सरकारने देशात डावी आणि जनवादी चळवळ उभी करण्यात तसेच जनतेच्या बाजूचे, विशेषतः कामगार, किसान व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या बाजूचे कार्यक्रम सुरु करण्यात महत्वाचे योगदान दिलेले आहे.
जनतेच्या हितासाठी
२००९च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला पीछेहाटीला सामोरे जावे लागले. त्यावेळी ते म्हणाले, लोकच इतिहासाची दिशा ठरवित असतात. काही लोकांमध्ये आपल्याबद्दल काही काळासाठी गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण जर आपण वारंवार लोकांकडे जात राहिलो आणि स्वतःला त्यांच्या प्रेमाच्या योग्य बनविले तर ते निश्चितपणे आपल्याला समजून घेतील. जे लोक पंचायत किंवा लोकसभा निवडणुकीत आपल्या विरोधात गेले त्यांना आपल्याला परत आपल्याकडे वळवावे लागेल. 
पश्चिम बंगालमधील कष्टकरी वर्गाच्या चळवळीतील नेत्यांना ज्योती बसू यांनी हे तातडीचे कार्य आखून दिले आहे. ज्या उदात्त आदर्शांसाठी ते आपल्या ७० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये लढले, ते आदर्श साध्य करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. आज ज्योती बसू आपल्याला कायमचे सोडून गेले असले तरी त्यांनी दिलेली शिकवण नक्कीच आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत घेऊन जाईल. त्यांचे हे म्हणणे आपण कधीच विसरता कामा नये, लोकांच्या प्रेमाइतकी मौल्यवान गोष्ट आपल्या आयुष्यात कोणतीही असू शकत नाही... महान उद्दिष्टांसाठी आपल्या आयुष्याचा त्याग करायला आपण नेहमीच तयार असले पाहिजे....शेवटी मी हेच सांगेन की आपले आयुष्य कसे घालवले याबद्दल आपल्याला पश्चात्ताप वाटता कामा नये.
महान क्रांतीकारी नेते कॉम्रेड ज्योती बसू यांचा वारसा चिरंतन राहो!

No comments:

Post a Comment