Thursday, May 18, 2017

राजकीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण आणि कामगार वर्गाची भूमिका

भांडवलशाहीतील वर्गीय शोषण-

सिटूच्या घटनेत सिटूचे उद्दीष्ट स्पष्टपणे विषद केले आहे, सिटूची अशी मान्यता आहे की फक्त उत्पादन, वितरण आणि विनिमयाच्या सर्व साधनांचे सामाजीकरण करून आणि समाजवादी राज्याची स्थापना करूनच कामगार वर्गाच्या शोषणाचा अंत केला जाऊ शकतो. सिटू समाजवादाच्या आदर्शांवर दृढ राहून समाजाला सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त करण्यासाठी प्रतिबद्ध आहे........ वर्ग संघर्षाशिवाय कोणतेही सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही आणि कामगार वर्गाला वर्ग समन्वयाच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या सर्व प्रयत्नांचा कायम विरोध व प्रतिरोध केला पाहिजे या आपल्या दृष्टिकोणावर सिटू खंबीरपणे कायम आहे.....
आपण भांडवलशाही व्यवस्था बदलू इच्छितो कारण ही व्यवस्था अन्यायावर आधारित आहे, शोषणकारी आहे आणि म्हणूनच ती दमनकारी देखील आहे. भांडवलशाही व्यवस्थेत श्रमाद्वारे निर्माण केलेली संपत्ती व मूल्य यांची लूट करूनच भांडवलशाही व्यवस्था जिवंत राहू शकते. भांडवलशाहीने कितीही दावे केले तरी वास्तव हेच आहे की त्यांनी मिळवलेला नफा हा प्रत्यक्षात कामगारांनी निर्माण केलेले मूल्यच असते, ज्याची भांडवलदार लूट करतात. कामगार ज्या मूल्याची निर्मिती करतो, ते त्याच्या जीवन निर्वाहावर होणारा खर्च किंवा त्याला दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा नेहमीच अधिक असते. कामगारांना जगण्यापुरते वेतन देऊन, भांडवलदार त्याने निर्माण केलेले सर्वच्या सर्व मूल्य हडप करतो.

उत्पादनाची भांडवली प्रणाली- भांडवलशाही वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची एक प्रणाली आहे. ही प्रणाली उत्पादनाच्या साधनांवरील खाजगी मालकी आणि वेतनावर काम करणाऱ्या कामगारांच्या शोषणावर आधारलेली आहे. भांडवलशाहीने उत्पादनाच्या सरंजामी प्रणालीला हटवून तिची जागा घेतली आहे. भांडवलाच्या आदिम संचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकरी व छोट्या कारागिरांपासून त्यांची उत्पादनाची साधने हिरावून घेऊन त्यांना वेतनभोगी कामगार बनवले गेले. उत्पादनाच्या साधनांचे भांडवलात रूपांतर केले गेले. कामगारांनी निर्माण केलेल्या अतिरिक्त मूल्याच्या, भांडवलाच्या मालकांनी म्हणजेच भांडवलदारांनी केलेल्या लुटीच्या माध्यमातून  उत्पादनाची भांडवली प्रक्रिया चालत असते.
.
मालाचे किंवा वस्तूंचे उत्पादन- भांडवली व्यवस्थेत उत्पादन बाजारासाठी केले जाते, म्हणजेच वस्तूंचे उत्पादन सार्वभौम बनले असून सर्व ठिकाणी याचाच बोलबाला आहे. मनुष्यांच्या द्वारा उत्पादित सर्व वस्तूच फक्त नाही तर मानवी श्रम देखील एक वस्तूच बनली आहे. भांडवलदारी व्यवस्थेच्या अगोदर वस्तूंचे उत्पादन कामगार फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी करीत असत परंतु भांडवलदारी व्यवस्थेत त्यांचे उत्पादन जरी वेतनभोगी कामगार करत असले तरी उत्पादनाच्या साधनांची मालकी भांडवलदारांकडे असल्यामुळे त्या उत्पादित वस्तूंची मालकी देखील आपोआपच त्यांच्याचकडे जाते. भांडवलदार त्यांचे उत्पादन समाजाच्या गरजा भागवण्यासाठी नाही तर नफा कमविण्यासाठी करतात, हा नफा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कामगारांच्या श्रमातून निर्माण झालेले अतिरिक्त मूल्यच असते.  

मूल्याचा श्रम सिद्धांत- मूल्याच्या श्रम सिद्धांताच्या माध्यमातून कार्ल मार्क्सने भांडवली शोषणाचे खरे स्वरूप उलगडून दाखवले. मार्क्सने मूल्याच्या नियमांचे निर्धारण या प्रकारे केले, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती वेळ लागला आणि त्याची सामाजिक आवश्यकता किती आहे यावरून त्याचे मूल्य ठरते किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे उत्पादनासाठी लागलेली श्रम वेळ हीच सामाजिक आवश्यकता असते. म्हणूनच वस्तूचे मूल्य त्याच्या उत्पादनासाठी लागलेल्या श्रम वेळेइतके असते. भांडवलशाहीच्या अंतर्गत उत्पादित वस्तूंचे उत्पादन श्रमशक्तीशिवाय होऊ शकत नाही.
श्रमशक्ती फक्त जिवंत स्त्री- पुरुषांमध्येच असू शकते. जिवंत राहण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र, ईंधन, निवारा या सारख्या जगण्याच्या साधनांची आवश्यकता असते. कामगारांना त्यांचा वंश देखील पुढे न्यायचा असतो. त्यांना मुले, बाळे देखील असतात म्हणूनच त्यांना फक्त त्यांच्या स्वत:च्याच नाही तर आपल्या मुलाबाळांच्या देखील निर्वाहासाठी पुरेशी साधने मिळणे आवश्यक आहे.

जेव्हा मनुष्य काम करतो तेव्हा तो एकाच वेळी दोन गोष्टी करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे तो एखाद्या विशिष्ठ काम धंदा किंवा व्यापारात स्वत:ला गुंतवतो (उदाहरणार्थ खुर्च्या, टेबल बनविण्यासाठी सुतारकाम, कापड तयार करण्यासाठी विणकाम इत्यादी) दुसरी गोष्ट म्हणजे त्या सर्व काम करणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक श्रमशक्ती बनतात आणि त्यांच्या सामूहिक श्रमातून फक्त त्यांच्या समूहासाठी गरजेच्या वस्तूंचीच निर्मिती करीत नाहीत तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधांची पूर्तता करतात. सुतार किंवा विणकर म्हणून ते जरी एक विशिष्ठ प्रकारचे काम करत असले आणि ते त्यांचे ठोस श्रम असले तरी समाजाच्या समग्र श्रमशक्तीचा भाग म्हणून त्यांची गणना केवळ त्यांच्या विशिष्ठ कामामध्ये न होता ते काम समाजाच्या अमूर्त श्रमाचा एक भाग बनते. भांडवलशाही समाजात श्रमशक्तीचा एक मोठा भाग असंघटित श्रमशक्तीवर आधारित असतो आणि हे श्रमिक उत्पादन प्रक्रियेत नियमितपणे रोजमर्राची विविध कामे करीत असतात. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात जिथे जिथे गरज पडेल तिथे ते आपली श्रमशक्ती विकत असतात. 
  
भांडवलशाही उत्पादन आणि नफा- भांडवलदार थोड्याशा पैशांमधून (एम) आपले काम सुरु करतो. तो त्या पैशाचे रूपांतर यंत्रसामुग्री, कच्चा माल व श्रमशक्तीत करून त्यांना कामाला लावतो. यातून तो ज्या वस्तूंचे उत्पादन करतो, त्यांना जास्त पैसे मिळवण्यासाठी बाजारात विकतो. अशा तऱ्हेने मिळवलेल्या जास्तीच्या पैशातून (एम१) तो आपल्या कामात वाढ करत जातो. उत्पादित वस्तूंची बाजारात विक्री करून तो जो जास्तीचा पैसा मिळवतो, तो त्याचा नफा असतो. भांडवलदाराच्या अधिक आणि अधिक नफा कमविण्याच्या लालसेला कधीही अंत नसतो. ती वाढतच जाते. आता प्रश्न हा येतो की हा भांडवलदार एम चे रूपांतर एम१ मध्ये कसा काय करत जातो? त्याने सुरवातीला लावलेल्या पैशात वाढ कशी होते?  त्याचे अतिरिक्त धन किंवा नफा कुठून येतो? हा नफा त्या मूल्यातून येतो जे कामगार कच्च्या मालावर प्रक्रिया करून, त्यामधून तयार माल बनवून निर्माण करतो.

वेतन- भांडवलदार आपल्या नफ्याचा एक छोटा हिस्सा वेतनाच्या रूपात श्रमशक्तीच्या मालकांना म्हणजेच कामगारांना देत असतात. कामगारांची श्रमशक्ती मिळवण्याच्या बदल्यात त्यांना देण्यासाठी भांडवलदारांनी निर्धारित केलेले मूल्य म्हणजेच वेतन होय. अशा प्रकारे कामगार, जे उत्पादनाच्या साधनांचे मालक नसतात, त्यांच्यापासून वंचित असतात, गरीब असतात, त्यांना काम करावेच लागते, अन्यथा उपाशी मरण्याचा एकच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो. कामगारांची विशाल सेना भांडवली उत्पादन प्रणाली कायम ठेवण्यासाठीची अनिवार्य अट आहे. एखाद्या कामगाराची जागा घेण्यासाठी जोपर्यंत दुसरा कामगार नेहमी हजर असतो तोपर्यंत भांडवलदार वर्ग त्यांच्या वेतनात कपात करीत राहतो. तो त्यांना इतकेच वेतन देतो, जे त्याला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असते. परंतु आपल्या उत्पादनाच्या कार्यामधून कामगार जे मूल्य निर्माण करतो, ते त्याच्या निर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांपेक्षा, म्हणजेच भांडवलदार वेतन देऊन जे खरेदी करतो, त्या श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा कितीतरी अधिक असते.

अतिरिक्त मूल्य- भांडवलदार कच्चा माल, कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री इत्यादीच्या रूपात जे मूल्य मिळवतो, त्यामुळे नवीन मूल्य निर्माण होत नाही, त्याचे रूपांतर तयार मालात अथवा उत्पाद मूल्यात होत नाही, ते तसेच्या तसे राहते. त्याचे मूल्य स्थिर राहते, म्हणून ते स्थिर भांडवलाच्या रूपात त्याला लावणाऱ्याच्या स्थिर भांडवलाचा एक हिस्सा असते. दुसऱ्या बाजूला ज्या मूल्याचा वापर भांडवलदार वेतन देण्यासाठी करतात, ते वाढत जाते. कामगारांना कामावर ठेवताना जे मूल्य निर्धारित होते, त्याची रक्कम वाढत जाते. ही रक्कम बदलत राहते म्हणूनच तिला परिवर्तनीय भांडवल म्हटले जाते. कामगारांच्या श्रमशक्तीचे मूल्य (वेतन) आणि उत्पादनानंतर बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूचे मूल्य यातील फरकच भांडवलदारासाठी नफ्याचा स्रोत असतो. कामगार उत्पादन करून जे मूल्य निर्माण करतो, ते त्याच्या श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, यालाच अतिरिक्त मूल्य असे म्हटले जाते.

अतिरिक्त मूल्याचा दर- जास्तीत जास्त नफा मिळवणे व आपले भांडवल वाढवत नेणे हे भांडवलदाराचे उद्दीष्ट असते आणि ते कधीच पूर्णपणे प्राप्त होत नाही. ते अंतहीन असते. नफा मिळविण्याची त्यांची तृष्णा कधीच समाप्त होत नाही. कामगारांनी निर्माण केलेल्या मूल्यातील आपला हिस्सा वाढवत नेण्यासाठी आणि वेतनाच्या रुपात कामगारांना द्यायचा हिस्सा सतत कमीत कमी करीत नेण्यासाठी ते वाटेल ते करतात, अगदी उचित, अनुचित याची पर्वा न करता. अतिरिक्त मूल्याच्या वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणाला अतिरिक्त मूल्याचा दर म्हटले जाते. भांडवलदार अतिरिक्त मूल्यातील आपल्या हिश्श्याचा दर नेहमी वाढता ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो प्रामुख्याने खालील उपाय करतो-
1.       वेतनात वाढ न करता कामाचे दिवस वाढवणे.
2.       कामाचे दिवस किंवा उत्पादनात कपात न करता कामगारांचे वेतन कमी करणे.
3.       क. कामगारांना त्याच वेतनावर ताशी जास्त काम करण्यासाठी बाध्य करणे. ख. तंत्रज्ञानात व उत्पादन प्रणालीत सुधारणा करून ताशी उत्पादनात वाढ करणे.

वर्ग संघर्ष- भांडवलदार आणि कामगार यांचे हित एकमेकांच्या पूर्णपणे विपरीत किंवा विरोधी असते. कामाच्या दिवसाच्या विभाजनाच्या विषयावर दोघांचा संघर्ष होत राहतो. त्या दोघांची दिशा वेगवेगळी म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जाणारी असते. भाडवलदारांना वाटते की त्यांचा नफा वाढत रहावा. त्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात, मग तो उचित असो वा अनुचित याच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नसते, त्यांना मतलब असतो फक्त त्यांच्या वाढत जाणाऱ्या नफ्याशी. त्यासाठी ते आपल्या कामगारांच्या फक्त कामगार संघटनेबाबतच्याच नाही तर मानवी अधिकारांचे दमन करायला देखील मागे पुढे पाहत नाही. याउलट कामगारांना असे वाटते की त्यांचे वेतन वाढावे कारण ही त्यांच्या कष्टाची कमाई आहे. त्यांच्या श्रमशक्तीमुळे भांडवलदार अतिरिक्त मूल्याची निर्मिती करतात. पण जेव्हा त्या अतिरिक्त मूल्यामधून कामगारांचा हिस्सा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र भांडवलदार कचरतात. कामगार मागणी करतात की त्यांचे वेतन वाढवले जावे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करावी आणि त्यांच्या कामगार संघटना विषयक व मानवी अधिकारांचे हनन केले जाऊ नये. हीच ती कारणे आहेत, ज्यांच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अंतर्विरोधाची परिस्थिती तयार होते आणि हाच अंतर्विरोध पुढे जाऊन वर्ग संघर्षाचे रूप धारण करतो.

कामगार चळवळीचे कार्य- आपल्या रोजच्या मागण्या व समस्यांवर लढा करत असतानाच कामगार संघटनांनी  कामगारांची शोषण आणि अन्यायावर आधारित व्यवस्थेच्या बाबतीमधील समजदारी वाढवणे देखील खूप आवश्यक आहे. उत्पादन व्यवस्थेतील कामगारांची महत्वाची व मूलभूत भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे. निसर्गात मिळणाऱ्या कच्च्या मालाला वापरण्या योग्य बनवणे व त्यातून मानवजातीच्या गरजा भागवणे यासाठी कामगारांची श्रमशक्ती अनिवार्य आहे. वस्तू व सेवांचे उत्पादन हे सर्वस्वी कामगारांच्या श्रमशक्तीवर अवलंबून आहे. केवळ भांडवलदारांनी गुंतवलेले स्थिर भांडवल यांचे उत्पादन करू शकत नाही आणि म्हणूनच कामगारांना त्यांच्या शक्तीची, फक्त उत्पादनातीलच नाही तर वर्ग संघर्षातील त्यांच्या महत्वाच्या भूमिकेची ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी भांडवली उत्पादन प्रक्रिया नीट समजून घेतली पाहिजे.
ह्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचा पाया आहे उत्पादन व्यवस्था आणि त्या उत्पादन व्यवस्थेतील उत्पादन संबंध, वर्गीय अंतर्विरोध, वर्ग संघर्ष. आजपर्यंतचा इतिहास आहे की उत्पादक शक्तींमधील संघर्षामुळे व त्यातील संतुलन बदलल्यामुळे उत्पादन व्यवस्था बदलली आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था. आजच्या भांडवली व्यवस्थेतील प्रमुख उत्पादक शक्ती आहे कामगार वर्ग, हे आपण वर पाहिले आहे आणि म्हणूनच ही शोषणावर आधारित व्यवस्था बदलण्याची शक्ती देखील ह्याच वर्गाकडे आहे. ह्या परिवर्तनाची प्रक्रिया देखील कामगारांनी समजून घेतली पाहिजे.

भांडवली उत्पादन- सामाजिक उत्पादन- आधीच्या उत्पादन व्यवस्थांपेक्षा वेगळे असे वैशिष्ठ्य आहे, भांडवली उत्पादनाचे सामाजिक स्वरूप. मानवजातीच्या गरजा भागवणाऱ्या आणि त्याचे जीवन समृद्ध करणाऱ्या वस्तू व सेवांचे भांडवलशाहीतील उत्पादन सामाजिक पातळीवर होत असते. अनेक कामगार एकत्र येऊन वापरण्या योग्य वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. परंतु त्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या अतिरिक्त मूल्याचा कब्जा मात्र भांडवलदार उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीच्या जोरावर, वैयक्तिक पातळीवर स्वत:कडे घेतात. यातूनच निर्माण होते विषमता. विषमता ही भांडवलदारी उत्पादन व्यवस्थेतील अंगभूत शोषणामधूनच निर्माण होते. आणि भांडवलदारी व्यवस्था नष्ट केल्याशिवाय शोषण आणि विषमता नष्ट होऊ शकणार नाही.

आदिम संचय- भांडवल निर्मितीची सुरवात- निसर्ग, कृषी आणि कारागिरांच्या घरेलू उत्पादनाच्या लुटीमधून सुरवातीचे म्हणजेच आदिम भांडवल निर्माण झाले. ते इमारत, यंत्र सामुग्री आणि कच्चा माल यात छोट्या प्रमाणात गुंतवून कामगारांची श्रमशक्ती कामाला लावून, सामाजिक उत्पादनामधून कामगारांनी निर्माण केलेले अतिरिक्त मूल्य, उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीच्या जोरावर स्वत:च्या ताब्यात घेऊन भांडवलदार वर्ग आपले भांडवल वाढवत नेतो. अशा रितीनेच भांडवली व्यवस्थेची सुरवात झाली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या, कारागिरांच्या लुटीमधून सावकारांनी, व्यापाऱ्यांनी भांडवलाचा संचय केला आणि त्यानंतर भांडवली उत्पादनात अंगभूत असलेल्या कामगारांच्या शोषणामधून भांडवलशाहीचा पुढचा विकास झाला.

सुरवातीला स्पर्धा- नंतर केंद्रीकरण- भांडवलदारी व्यवस्थेच्या सुरवातीला भांडवलदारांमध्ये मुक्त स्पर्धा होती पण नंतर कच्चा माल आणि बाजाराच्या कमतरतेमुळे हळू हळू या स्पर्धेने जीवघेणे स्वरूप धारण केले व परिणामी भांडवलाचे केंद्रीकरण होऊ लागले. मुक्त स्पर्धेची जागा मक्तेदारी भांडवलशाहीने घेतली. या प्रक्रियेतून प्रचंड मोठ्या कंपन्या निर्माण झाल्या. त्यांना कच्चा माल व बाजाराची कमतरता जाणवू लागली आणि त्यांनी ह्या दोघांच्या शोधात आपल्या देशाच्या सीमा ओलांडल्या.

वसाहतवाद व साम्राज्यवाद- भांडवलाचे एक वैशिष्ठ्य आहे. ते विस्तार केल्याशिवाय व स्वत:च्या नफ्यात जास्तीत जास्त वाढ केल्याशिवाय जगू शकत नाही. सुरवातीच्या काळात भांडवलशाहीने कामगारांचे प्रचंड शोषण करून स्वत:चा विकास करून घेतला. त्या विकासात सर्वात मोठा अडसर होता, तो म्हणजे कच्च्या मालाची व बाजाराची कमतरता. ह्या दोन्ही गोष्टींच्या शोधात युरोपातील देशांनी संपूर्ण जग पालथे घातले. यातूनच अमेरिकेचा शोध, आफ्रिका, आशिया खंडातील देशामध्ये वसाहतींचा विस्तार ह्या सर्व घडामोडी घडल्या. कच्चा माल, बाजाराबरोबरच स्वस्त मजूर मिळवण्यासाठी देखील जगभरात विस्तार केला गेला. या देशांचे शोषण करणे सुकर होण्यासाठी त्यांना गुलाम करण्यात आले आणि भांडवली देशांचे रुपांतर साम्राज्यशहांमध्ये आणि तिसऱ्या जगातील देशांचे रुपांतर वसाहतींमध्ये झाले. या सर्व वसाहतींचे प्रचंड साम्राज्यवादी शोषण करून भांडवलशाहीचा विकास झाला. अमेरिकेचा इतिहास तर अमानवी आणि रक्तरंजित कत्तलींनी भरलेला आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या कत्तली, तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा आणि अमानुष पद्धतीने गुलाम करून जबरदस्तीने आणलेल्या आफ्रिकेतील रहिवाश्यांचे ओरबाडून घेतलेले श्रम यामुळे अमेरिकेचे रुपांतर एका विकसित भांडवलशाही देशात झाले. ह्या भांडवलशाही व्यवस्थेच्या विकासाबरोबरच युरोप, अमेरिकेत अजून एका शक्तीचा उदय झाला. ती शक्ती म्हणजेच कामगार वर्ग.

कामगार वर्गाचा उदय- भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेने जन्म दिलेली परंतु भांडवलशाही शोषणामुळे पिचलेली आणि भांडवलशाहीचा अंत होण्यामुळेच जिची शोषणापासून मुक्तता होऊ शकते अशी शक्ती म्हणजे कामगार वर्ग. ज्याच्या श्रमामुळे भांडवलशाहीचा विकास होतो, तंत्रज्ञानात क्रांती होऊन उत्पादन प्रक्रियेचा विकास होतो पण ज्याच्या शोषणाशिवाय भांडवलशाही जिवंत राहू शकत नाही अशी ही शक्ती. ह्या शक्तीचा याच काळात उदय झाला आणि तिने लवकरच आपल्या शोषणाविरुद्ध लढा द्यायला सुरवात केली. भांडवलाचे स्वरूप जागतिक असल्यामुळे कामगार वर्गाच्या लढ्याचे स्वरूप देखील जागतिक असणे अनिवार्य आहे. १५० वर्षांपूर्वी कार्ल मार्क्सने भांडवलशाहीच्या गर्भातून जन्म घेणारा हा वर्गच भांडवलशाहीचा कर्दनकाळ ठरणार आहे हे ओळखले होते.  भांडवलशाहीला सातत्याने आर्थिक संकटाच्या खाईत लोटले जाईल आणि कामगार वर्गच त्यातून मार्ग काढेल आणि त्या संकटाशी झुंज देऊन स्वत: बरोबरच संपूर्ण समाजाची मुक्ती देखील हाच वर्ग करेल असे शास्त्रीय विश्लेषण त्याने केले.

भांडवलशाहीतील अंगभूत आर्थिक संकट- श्रमशक्तीचे शोषण केल्याशिवाय जशी भांडवलशाही वाढू शकत नाही तसेच भांडवलशाहीचे अजून एक वैशिषठ्य म्हणजे ती समाजाच्या सर्वच घटकांची लूट करते. राज्यव्यवस्था ताब्यात ठेऊन तिच्या मदतीने कच्चा माल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची बाजारपेठेत प्रचंड लूट करते. खाणी, जंगल, जमीन आणि पाणी ह्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी स्थानिक आदिवासी, आदिम जमाती यांची निर्मम लूट आणि विस्थापन करते. वेतनाचा स्तर खाली ठेवण्यासाठी बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी निर्माण करणारी आर्थिक धोरणे आखते. चंगळवाद, मानवी मूल्यांचा ऱ्हास व स्त्रियांसहित सर्व घटकांचे वस्तूकरण करणाऱ्या भणंग संस्कृतीला जन्म देते. ह्या सर्व परिस्थितीमधून एका बाजूला बाजारीकरण वाढते तर दुसऱ्या बाजूला शोषणाचा स्तर वाढल्यामुळे कामगारांची, आणि एकूणच सर्व जनतेची क्रयशक्ती कमालीची घटत जाते. भांडवली उत्पादन प्रणालीमधून उत्पादन प्रचंड वाढते, बाजारात वस्तूंचा भडीमार होतो पण त्या वस्तू खरेदी करण्याची लोकांची शक्ती कमी होत जाऊन शेवटी अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले जाते. अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर जोडली गेल्यामुळे हे संकट हळू हळू सर्व जगाला व्यापते. आज युरोप, अमेरिका, आशियातील अनेक देशांना २००८ मध्ये सुरु झालेल्या मंदीने अजूनही जखडूनच ठेवले आहे. ह्या मंदीचा कामगारांच्या जीवनमानावर भयंकर परिणाम झाला. लोकांच्या २०११च्या वास्तविक वेतनाचा स्तर १९६८ च्या स्तराच्याही खाली गेला होता.   

वित्तीय भांडवलाचा विकास आणि जागतिकीकरण- संजामी व्यवस्थेत आणि भांडवलशाहीच्या अगदी सुरवातीच्या काळात उद्योग उभे करू इच्छिणाऱ्या पण त्यासाठी स्वत:कडे पुरेसे भांडवल नसलेल्या उद्योजकांना खजगी सावकार व्याजावर भांडवल पुरवत असत. भांडवलशाहीचा विकास झाल्यावर अशा सावकारांनी एकत्र येऊन पेढ्या व खाजगी बँकांची स्थापना केली व प्रत्यक्ष उत्पादनाक भांडवलापेक्षा स्वतंत्र अशा वित्त भांडवलाने जन्म घेतला. भांडवलदारी व्यवस्थेच्या जागतिकीकरणाची फार मोठी प्रेरक शक्ती म्हणजे हे वित्त भांडवल. भांडवलाच्या आवक, जावकावरची सर्व बंधने काढून टाकून त्याला मुक्त करणे व जिथे जास्त नफा मिळेल तिथे गुंतवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे हेच जागतिकीकरणाचे खरे उद्दीष्ट होते. भांडवल आणि वस्तूंच्या बाजाराला पूर्ण मुक्त करून जग म्हणजे जणू काही एक गाव असल्याचा भ्रम निर्माण करणे हे प्रत्यक्षात मात्र ह्या बाजाराच्या किल्ल्यांवर मात्र साम्राज्यवादी, बहुराष्ट्रीय भांडवलदारांचा एकाधिकार निर्माण करणे हेच त्यांचे खरे उद्दीष्ट आहे. उत्पादन प्रक्रिये व्यतिरिक्त नफा कमवण्याचा एक मार्ग जागतिकीकरणानंतर भांडवलाच्या पूर्ण प्रवाहीपणामधून आणि त्याच्या मुक्त वावरामधून तयार झालेला आहे. तो म्हणजे सट्टा बाजार आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजार. ह्या प्रक्रियेत नफा कमविण्यासाठी उत्पादनात भांडवल गुंतवण्याचे कोणतेही बंधन तर नाहीच उलट ते भांडवल अल्प कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवून त्याच्या प्रवाहीपणाचा फायदा घेऊन ते कधीही काढून घेऊन दुसरीकडे गुंतवता येते. ह्या प्रक्रियेत वित्त भांडवल, उत्पादक भांडवलाच्या वरचढ होते. त्यातून कोणतीही लांब पल्ल्याची गुंतवणूक होत नाही, रोजगारात वाढ होत नाही आणि एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते. शिवाय अशा मार्गाने काळा पैसा गुंतवून पांढरा करण्याचा, कर बुडवेगिरी करण्याचा मार्ग देखील सहज चोखाळता येतो. 
        
संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग- आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग हा कामगारांवर आणि जनतेवर त्या संकटाचे सर्व ओझे लादून जनतेचे जगणे कठीण करण्याच्या वाटेने जातो. उत्पादनात कपात करून बेरोजगारीत वाढ करणे, कामगारांच्या अधिकारांचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्यांच्या संरक्षणावर गदा आणून त्यांची कामाची सुरक्षा काढून घेणे, कायम कामाऐवजी कंत्राटीकरण, रोजंदारीकरण करून कामगारांच्या वास्तविक वेतनात आणि अन्य लाभांमध्ये कपात करणे, जनतेच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या तरतुदींमध्ये कपात करून जनतेला जो काही थोडाफार दिलासा मिळतो त्यातही पाचर ठोकणे अशी सर्व कामगार विरोधी, जनविरोधी पावले उचलून भांडवलदार वर्ग त्या संकटातून बाहेर पडायला बघतो पण प्रत्यक्षात अर्थव्यवस्था मात्र त्या संकटातून बाहेर न पडता अजूनच जास्त रुतत जाते. म्हणूनच संकटातून बाहेर पडण्याचा भांडवली मार्ग कधीच यशस्वी होत नाही. 

संकटातून बाहेर पडण्याचा समाजवादी मार्ग- हा मार्ग कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांतामधून आणि १९१७च्या रशियन ऑक्टोबर समाजवादी क्रांतीने प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिला आहे. भांडवलदार वर्गाचा पराजय, भांडवलशाही राज्याचा पराजय हाच तो खरा मार्ग. खऱ्या अर्थाने वर्गीय दृष्टीकोणातून शिक्षित कामगार वर्ग, भांडवली उत्पादन प्रक्रियेला नीट समजून घेऊन शोषण समाप्त करण्यासाठी वर्ग संघर्ष तीव्र करून परिवर्तन आणू शकतो. भांडवली संकटाला त्याच व्यवस्थेच्या विरोधात वापरून कामगार वर्ग हा मार्ग काढतो. जगात पसरणारा फॅसिझम, विश्व युद्धानंतर आलेली मंदी यामधून रशियन कामगार वर्गाने समाजवादी क्रांतीचा मार्ग दाखवला. केन्स सारख्या काही अर्थतज्ञांनी राज्याचा बाजारात हस्तक्षेप, सार्वजनिक खर्चात वाढ असेही काही उपाय सुचवले परंतु भांडवलशाही त्यातून पूर्ण सावरत नाही तर वारंवार तेजी, मंदीच्या चक्राकार संकटातून जाते कारण भांडवलशाही व्यवस्थेतील सामाजिक उत्पादन आणि वैयक्तिक नफा या मूलभूत अंतर्विरोधामध्ये त्यातून कोणताच बदल होत नाही. उत्पादनाच्या साधनांवरील आपल्या खाजगी मालकीच्या जोरावर जास्तीत जास्त नफा आपल्याकडे वळवण्याची भांडवली व्यवस्था तशीच राहते. विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व समाजाच्या भल्यासाठी न करता त्याचा वापर फक्त नफा वाढवून घेण्यासाठी करण्याची वृत्ती तशीच राहते. आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे कामगार वर्गाचे शोषण आणि जनतेची लूट करणारी अन्याय्य, दमनकारी व्यवस्था तशीच राहते. म्हणूनच कामगार वर्गाच्याच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे शोषण, अन्याय, लूट, दमन यावर आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था व त्याची सामाजिक, राजकीय व्यवस्था नष्ट करून समतामूलक, शोषणविरहित समाजवादी व्यवस्था निर्माण करणे. आणि हा मार्ग केवळ आणि केवळ कामगार वर्गच सातत्याने तीव्र होत जाणाऱ्या वर्गसंघर्षाच्या माध्यमातून अंतिमत: समाजवादी क्रांती करूनच प्रत्यक्षात आक्रमू शकतो व फक्त कामगार वर्गालाच नाही तर समस्त मानवजातीला शोषण, अन्याय व विषमतेपासून मुक्ती मिळवून देऊ शकतो. अशा समाजवादी क्रांतीसाठी कामगार वर्गाला तयार करणे, कामगारांना त्यांच्या कामावरच्या रोजच्या प्रश्नांवर संघटित करत असतानाच त्यांची भांडवलशाही व्यवस्थेबाबतची वर्गीय चेतना उंचावणे आणि भांडवलशाहीला समाजवादच हा एकमेव पर्याय आहे व त्यासाठी वर्गसंघर्षाद्वारे ही शोषणावर आधारित राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था नष्ट करणे हे एक वर्ग म्हणून त्यांचे कार्य आहे ही क्रांतिकारी चेतना त्यांच्यामध्ये निर्माण करणे हे सिटू सारख्या क्रांतिकारी कामगार संघटनेचे काम आहे.