कार्ल मार्क्सचा वरकड मूल्याचा सिद्धांत
कार्ल मार्क्स आपल्या वरकड मूल्याच्या सिद्धान्ताला अर्थशास्त्राच्या विश्लेषणामधील स्वतःचे सर्वात महत्वाचे योगदान मानतो. ह्या सिद्धांतामुळेच मार्क्सला आपल्या समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक विचारांमधील अत्यंत महत्वाची अशी भांडवली उत्पादन पद्धती, त्यात अंतर्भूत असलेल्या आर्थिक अंतर्विरोधाचे मूळ, उत्पादन पद्धतीच्या गतीचा नियम इत्यादींची ऐतिहासिक संदर्भांसहित मांडणी करता आली.
मार्क्सचा वर्ग सिद्धांत हा प्रत्येक वर्गीय समाजातील एक वर्ग म्हणजेच सत्ताधारी वर्ग वरकड (अतिरिक्त) सामाजिक उत्पादनावर कब्जा करतो ह्या मान्यतेवर आधारित आहे. हे वरकड मूल्य तीन वेगवेगळ्या प्रकारे किंवा तिन्हीच्या मिश्रणाद्वारे काढून घेतले जाऊ शकते. एक तर सरळ गुलाम युगातील उत्पादन पद्धती किंवा सरंजामदारीच्या सुरवातीच्या काळातील विना मोबदला वरकड श्रमाद्वारे, सरंजामी व्यवस्थेतील किंवा आजही काही ठिकाणी मालकाला दिल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या वस्तू स्वरूपातील हिश्श्याद्वारे किंवा भांडवलदारी व्यवस्थेतील पैशांच्या स्वरुपातील वरकड श्रमाद्वारे ह्या वरकड मूल्याची वसूली केली जाते. याचा अर्थ हा की सर्व प्रकारच्या वरकड मूल्याचे मूळ समान आहे आणि ते आहे विना मोबदला श्रम.
याचा सरळ अर्थ हाच निघतो की मार्क्सचा वरकड मूल्याचा सिद्धांत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सत्ताधारी वर्गाच्या उत्पन्नाबाबतीतील वजावट सिद्धांतच होय. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्येच संपूर्ण सामाजिक उत्पादन तयार होते. बाजारात फक्त त्या आधीच उत्पादित झालेल्या उत्पादनाचे वाटप आणि फेरवाटप होते. वरकड उत्पादन आणि त्याचे पैशाच्या स्वरूपातील वरकड मूल्य म्हणजेच प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या वर्गाला दिली जाणारी भरपाई किंवा भांडवलदारीमधील मजूरी दिल्यानंतर वर उरलेले उत्पादन होय. सत्ताधारी वर्गाचा हा वजावट सिद्धांत म्हणजेच प्रत्यक्षात शोषणाचाच सिद्धांत होय. सत्ताधारी वर्गाचे उत्पन्न हे विना मोबदला श्रमामधून निर्माण होते हा सारांश म्हणजे मार्क्सच्या शोषणाच्या सिद्धांताचा गाभा होय.
मार्क्सने वरकड मूल्याला नफ्यापेक्षा (जो औद्योगिक नफा, बँकेचा नफा व व्यापारी नफा यात विभागला जातो.) जास्त आणि स्वतंत्र स्थान दिले त्याचे देखील हेच कारण आहे. नफा, व्याज आणि भाडे हे सर्व कामगारांनी निर्माण केलेल्या वरकड उत्पादनाचाच भाग आहेत. वरकड मूल्याचे हे स्थानच आपल्याला त्यावर जगणाऱ्या सत्ताधारी वर्गाच्या अस्तित्वाचे आणि भांडवलदारीतील वर्ग संघर्षाचे मूळ दाखवून देते.
ज्यामधून वरकड मूल्य निर्माण होते ती आर्थिक प्रक्रिया देखील मार्क्सने आपल्याला उलगडून दाखवली. ह्या प्रक्रियेमुळे प्रचंड सामाजिक स्थित्यंतर घडून आले. पश्चिम युरोपमध्ये 15व्या शतकात सुरु झालेले हे स्थित्यंतर जगातील काही देशांमध्ये, विशेषतः अविकसित देशांमध्ये अजूनही घडतच आहे. ह्या आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, राजकीय, आणि सांस्कृतिक बदलांच्या प्रक्रियेमुळे शेतकरी व कारागिरांसारख्या थेट उत्पादक वर्गाला आपल्या जमिनीसहित अन्य उत्पादनाच्या साधनांना मुकावे लागते. त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या भरवश्यावर रोजीरोटी कमवता येणे शक्य होत नाही व त्यांना स्वतःला व आपल्या कुटुंबियांना जिवंत ठेवण्यासाठी साठी उत्पादनाच्या साधनांचा मालक असलेल्या वर्गाला आपले हात, स्नायू आणि मेंदू वपरण्यासाठी द्यावे लागतात. जेव्हा या मालकाकडे कच्चा माल घेण्यासाठी, कामगारांची मजूरी देण्यासाठी पुरेसे भांडवल येते तेव्हाच त्यांना आपल्याकडच्या यंत्रसामुग्रीच्या मदतीने, कामगारांची श्रमशक्ती वापरून कच्च्या मालाचे रूपांतर उत्पादित वस्तूंमध्ये करता येते. ह्या उत्पादित वस्तूंची मालकीही आपोआपच त्यांच्याकडेच येते.
उत्पादकाच्या श्रमशक्तीचे क्रयवस्तूत रूपांतर होणे हे भांडवली उत्पादन पद्धतीसाठी एक आवश्यक गृहीततत्व आहे. अन्य क्रयवस्तूंप्रमाणे श्रमशक्तीला देखील वापर मूल्य व देवाण घेवाण मूल्य असते, जे त्याला लागणाऱ्या आवश्यक सामाजिक श्रमशक्तीइतके म्हणजेच त्याच्या पुनरनिर्मितीच्या खर्चाइतके असते. हे मूल्य त्याने दिवसांमागून दिवस, आठवड्या मागून आठवडे, महिन्यांमागून महिने त्याच ताकदीने काम करण्यासाठी तसेच कामगार वर्गीय मुलांना अन्न, शिक्षण देऊन त्यांच्या आई, वडलांच्या मृत्यू किंवा निवृत्तीनंतर त्यांची जागा घेण्यासाठी तयार करून भविष्यकाळातील कामगार वर्गाची संख्या व त्यांचे कौशल्य याचे सातत्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व सेवांच्या मूल्याइतके असते. पण कामगाराच्या श्रमशक्तीचे खरे मूल्य त्याला दिल्या जाणाऱ्या त्याच्या श्रमशक्तीच्या पुनरनिर्मितीच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच त्याने आपली श्रमशक्ती वापरून निर्माण केलेल्या नव्या मूल्याइतके असते. वरकड मूल्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्याने स्वतःची श्रमशक्ती वापरून निर्माण केलेले मूल्य आणि त्याच्या श्रमशक्तीच्या पुनरनिर्मितीचे मूल्य या दोघांमधील फरक होय. वरकड मूल्याच्या मार्क्सवादी सिद्धांताचा आधार श्रमशक्तीचे खरे निर्मिती मूल्य आणि श्रमाचे प्रत्यक्षात दिले जाणारे मूल्य यातील फरक हा आहे. ह्यात गूढ असे काहीच नाही तर तर हे रोज लाखो ठिकाणी नियमितपणे घडून येणाऱ्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण आहे.
भांडवलदार कामगाराचे श्रम विकत घेत नाहीत कारण त्याने कच्च्या मालावर लावलेल्या श्रमातून निर्माण केलेल्या मूल्यापेक्षा त्याची मजूरी कमी असल्यामुळे ती चोरी ठरेल. म्हणूनच तो त्याच्या खऱ्या मूल्यासहित त्याची श्रमशक्ती विकत घेतो. ह्यामध्ये कामगार खुल्या चोरीचा जरी नव्हे तरी सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरतो, जी त्याला आधी त्याच्या उत्पादन क्षमतेचे क्रयवस्तूत रूपांतर करायला लावते, नंतर त्या श्रमशक्तीला विषमतेवर उभारलेल्या श्रमाच्या बाजारात विकायला लावते आणि शेवटी त्याला स्वतःच्या श्रमशक्तीच्या बाजारातल्या किमतीवर समाधान मानायला लावते, मग ती श्रमशक्ती वापरून निर्माण झालेल्या उत्पादनाचे मूल्य कितीही जास्त असो. भांडवलदाराने विकत घेतलेल्या श्रमशक्तीमुळे कच्चा माल व यंत्र व अन्य साधन सामग्रीचे मूल्य वाढत असते. जर हे वाढीव मूल्य कामगाराच्या मजूरीपेक्षा जास्त नसेल किंवा तेवढेच असेल तर वरकड मूल्याची निर्मिती होऊ शकत नाही आणि ह्या परिस्थितीत भांडवलदाराला कामगाराची श्रमशक्ती विकत घेण्यात रस असणार नाही. भांडवलदार केवळ मूल्य वाढवण्याच्या कामगाराच्या क्षमतेमुळेच त्याची श्रमशक्ती विकत घेतो. हे जास्तीचे वाढलेले मूल्य म्हणजेच वरकड मूल्य असून उत्पादनाच्या प्रक्रियेतील वरकड मूल्याची निर्मिती ही भांडवलदारांनी श्रमशक्ती विकत घेण्यासाठीची व भांडवली उत्पादन पद्धतीच्या अस्तित्वाची पूर्वअट आहे.
श्रमाच्या बाजारातील विषमता ह्याच वास्तवातून उत्पन्न होते की भांडवली उत्पादन पद्धती, वस्तूंचे उत्पादन व बाजाराच्या अर्थव्यवस्थेवर आधारित असते. संपत्तीविहिन कामगार, ज्याच्याकडे कोणतेही भांडवल नसते, ज्याच्याकडे आपल्या कुटुंबासाठी अन्न, वस्त्र घेण्यासाठी, घराचे भाडे भरण्यासाठी आणि घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी सुद्धा कोणतीही राखीव रक्कम नसते. आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी त्याला सतत पैश्यांची गरज असते व त्याला त्यासाठी सतत आपल्याकडे असलेली एकमेव वस्तू म्हणजेच श्रमशक्ती बाजारात विकण्यावाचून गत्यंतर नसते. तो श्रमशक्तीच्या बाजारातून माघारही घेऊ शकत नाही आणि मजूरी वाढवण्यासाठी फार काळ वाटही बघू शकत नाही. पण भांडवलदाराकडे मात्र भरपूर राखीव पैसा असतो. तो श्रमाच्या बाजारातून काही काळासाठी बाहेरही पडू शकतो. तो कामगारांना काढून टाकू शकतो. काम बंद ठेऊ शकतो. कारखाना बंदही करू शकतो आणि दोन वर्षे थांबून पुन्हा नवीन धंदा सुरु करू शकतो.
कामगाराच्या किमान गरजा भागण्यासाठी त्याला समाजाने काही नियमित उत्पन्नाची सोय करून दिली तर तो आपली श्रमशक्ती विकायची की नाही, कोणाला विकायची, कोणत्या किंमतीला विकायची ह्याचा निर्णय घेण्याच्या स्थितीत असेल. पण भांडवलदारी व्यवस्थेत त्याला हा निर्णय घेण्याची मुभा नसते. आर्थिक अनिवार्यतेमुळे मिळेल त्या किंमतीला आपली श्रमशक्ती विकायला त्याला भाग पाडले जाते.
ह्याच परिस्थितीत कामगार संघटनांची भूमिका महत्वाची ठरते. भांडवलदार मजूरी कमी करून अतिरिक्त मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करतात तर कामगार आपल्या श्रमशक्तीची किंमत वाढवायचा प्रयत्न करतात. ह्याच प्रयत्नातून ते एकत्र येऊन कधी कधी संपाद्वारे श्रमाच्या बाजारातून तात्पुरत्या स्वरूपात मागेही हटतात पण ह्यात कोणताही अन्याय नसून भांडवलदार तर कधी कधी ह्याहूनही जास्त काळासाठी माघार घेत असतात ज्याची संपाशी तुलना देखील होऊ शकत नाही. कामगार आपल्या सशक्त कामगार संघटनांच्या माध्यमातून श्रमाच्या बाजारातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा ते स्वतः बळी असतात. ही विषमता हा बाजार अस्तित्वात असेपर्यंत ते कधीही कायमची संपवू शकत नाहीत कारण हा बाजार मुळातच भांडवलदारी व्यवस्थेच्या स्वतःच्या विशिष्ठ बांधणीमुळे पूर्णपणे भांडवलाच्या बाजूने झुकलेला असतो व वेळोवेळी स्वतःमध्ये त्याला अनुकूल बदल घडवून आणत असतो. ह्या झुकावाचा सर्वात मोठा आधार आहे, श्रमिकांची राखीव फौज, ज्यात प्रामुख्याने भांडवलदारी व्यवस्था अस्तित्वात येण्याअगोदरचा, शेती उत्पादन, स्वयं रोजगार, कारागिरी इत्यादीत गुंतलेला वर्ग, गृहिणी व अल्पवयीन बालके आणि काम गेल्यामुळे बेरोजगार झालेले कामगार यांचा समावेश असतो.
एखाद्या ठिकाणी भांडवलाचा अतिरिक्त संचय होऊन श्रमिकांची गरज निर्माण झाली की ज्या ठिकाणी राखीव फौज मोठ्या प्रमाणात असते तिथून अश्या ठिकाणी श्रमिकांचे स्थलांतर होते व ही गरज भागवली जाते. कामगारांची राखीव फौज समाजात नेहमी राहणे हे भांडवलदारांच्या फायद्याचे असते कारण जर श्रमाची मागणी वाढल्यामुळे वेतनाचे दर वाढले तर त्यांचा नफा कमी होतो. मार्क्सने भांडवलदारी व्यवस्थेला अन्यायी, जुलमी आणि अमानुष व्यवस्था म्हटले कारण ती सर्वांना रोजगार तर देऊच शकत नाही, उलट ज्यावेळी श्रमाची मागणी वाढते तेव्हा भांडवलदार, आपल्या भांडवल गुंतवणुकीचा दर कमी करून देखील श्रमाची मागणी आटोक्यात ठेवण्याचा मार्ग अवलंबत असतो व त्यामुळे अनेकांना बेकारीच्या संकटाला तोंड द्यावे लागते व ते आपल्या मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नाहीत.
मार्क्सने ह्याच्यावर पण भर दिला की प्रत्येक भांडवलदाराला दुसऱ्या भांडवलदारांनी वाढवलेले वेतन म्हणजे उत्पादन खर्चात वाढ न वाटता कामगार वर्गाच्या क्रयशक्तीत झालेली वाढ वाटते पण स्वतःच्या बाबतीत मात्र तो असा विचार करत नाही. मार्क्सने कामगारांच्या वेतनाच्या म्हणजेच श्रमशक्तीच्या पुनरनिर्मितीच्या खर्चाच्या दोन प्रकारात फरक केला आहे. एक प्रकार पूर्णपणे शारिरिक पातळीवर म्हणजेच कामगाराला लागणाऱ्या उष्मांक आणि ऊर्जेच्या प्रमाणावरून ठरतो, जो अत्यंत निम्नतर स्तरावर असतो ज्याच्या अजून खाली जाणे कामगाराच्या काम करण्याच्या क्षमतेचा हळू हळू ऱ्हास केल्याशिवाय शक्यच होणार नाही. आणि दुसरा ज्याला मार्क्स ऐतिहासिक-नैतिक म्हणतो, जो अनेक वर्षांच्या विजयी वर्ग संघर्षामुळे कामगार वर्गाच्या सरासरी वेतनामध्ये अतिरिक्त वस्तू व सेवांच्या वापरामुळे वाढलेला, श्रमशक्तीच्या पुनरनिर्मितीचा सामाजिक दृष्ट्या आवश्यक खर्च धरून तयार होतो, जो लवचिक असतो. जो देशा, देशात, खंडा, खंडात आणि माणसा, माणसातही वेगवेगळा असू शकतो. पण हा स्तर कितीही वाढला तरी वर निर्देशित केल्याप्रमाणे त्याची कमाल मर्यादा स्पष्ट असते आणि ती म्हणजे वेतनाचा स्तर वाढवल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भांडवलदाराचा नफा म्हणजेच वरकड मूल्य नष्ट होता कामा नये, ते अबाधित राहिले पाहिजे, किंवा भांडवलदाराच्या अपेक्षेपेक्षा कमी देखील होता कामा नये. त्यांचा नफा कमी झाल्यास भांडवलदार गुंतवणुकीचा संप करण्यासही मागे पुढे पहात नाहीत.
सारांश हा की मार्क्सचा वेतनाचा सिद्धांत हा मूलतः भांडवल संचयाचा सिद्धांत असून तो आपल्याला पुन्हा मार्क्सच्या अगदी पहिल्या भांडवलाच्या गतीच्या नियमाकडे घेऊन जातो- भांडवल संचयाचा दर सतत वाढवत नेण्याच्या अनिवार्यतेचा भांडवलदारांसाठीचा नियम. म्हणजेच भांडवलदाराला जास्तीत जास्त भांडवल संचय करायचा असतो व त्यासाठी तो कामगाराच्या वेतनाचा स्तर कमीत कमी म्हणजे, कामगाराची झिजलेली श्रमशक्ती भरून निघण्याच्या खर्चापुरताच ठेवतो. भांडवलदाराची टिकून राहण्याची, बाजारातून काही दिवस माघार घेण्याची क्षमता, कामगार वर्गाची राखीव फौज आणि उत्पादनाच्या साधनांवर मालकी ह्या सर्वाच्या जोरावर श्रमाचा बाजार भांडवलदारांच्या बाजूने झुकलेला असतो व त्याचा पुरेपूर फायदा घेऊन भांडवलदाराला कामगाराच्या वेतनाचा स्तर कमीत कमी ठेवण्यात यश मिळत असते. भांडवली उत्पादन प्रक्रियेत कामगार त्याला मिळालेल्या वेतनापेक्षा कितीतरी जास्त नवीन मूल्य निर्मिती करतो. ह्या दोन्हीतील फरक म्हणजेच वरकड मूल्य होय. आणि ह्या वरकड मूल्यावर उत्पादनाच्या साधनांवर मालकीच्या जोरावर भांडवलदार कब्जा करतो व आपले उत्पन्न म्हणजेच नफा मिळवतो. ह्या वरकड मूल्याचा संचय म्हणजेच भांडवल होय. अश्याप्रकारे मार्क्सने आपल्या वरकड मूल्याच्या सिद्धांताद्वारे कामगाराच्या शोषणाचे मूळ उलगडून दाखवले आहे.
No comments:
Post a Comment