Tuesday, December 17, 2013

अस्तित्व

अस्तित्व

मी एक मुलगी...
शाळेत जाते, रस्त्याने चालताना
नजर भिरभिरत असते...
कुणी चिडवणार तर नाही,
कुणी पाठलाग तर करत नाही,
कुणी धक्का मारला तर?
सारखी धाकधूक..
कुणी त्रास दिला तर सांगणार कुणाला?
घरी सांगायची तर सोयच नाही
पट्कन कुणीतरी म्हणायचे..
उद्यापासून जाऊ नकोस शाळेला
घरी अभ्यास करताना कधी कधी
आतली कुजबुज ऐकू येते
शिक्षणावर पैसा घालवला तर...
लग्नाला कुठून आणणार?
जास्त शिकली तर स्थळ मिळेल का?
शेवटचेच वर्ष..महत्वाचे वर्ष..
पण पुढे काय?
मला पुढे शिकायचय..कुणीतरी बनायचय..
माझं अस्तित्व सिद्ध करायचय..
दुसरी मुलगीच..दुसरी मुलगीच
लहानपणापासून हेच ऐकत आलेय..
एकदा तर धक्काच बसला..
आज्जी आईला म्हणत होती..
तरी मी म्हणत होते..हिच्या वेळेला..
तपासून घे...मुलगीच असेल तर.........
पण तू माझं ऐकलं नाहीस....  
आईच्या गर्भात तरी होते का मी सुरक्षित...
प्रश्न माझ्या अस्तित्वाचा होता..

आणि आजही अस्तित्वाचाच आहे.

Friday, December 6, 2013

मला कधी कधी प्रश्न पडतो










मला कधी कधी प्रश्न पडतो...
मी खरंच एका गोंडस मुलीला
कधी जन्म दिला होता का?
की मला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न होतं?
खरंच तिच्यासाठी मी छोटी छोटी
रंगरंगीत झबली शिवली होती,
तुकडे तुकडे जोडून दुपटी बनवली होती
की ते देखील एक स्वप्नच होतं?
शाळेचा गणवेश घालून मागे वळूनही न
पाहता धावत पुढे जाणारी तू....
आजही माझ्या डोळ्यासमोर आहेस.
तुला पाहून तेव्हाच मला कळायला हवं होतं,
कधी ना कधी तू अशीच मागे न बघता
पुढेच जाणार आहेस.
आज तुला पंख पसरून आकाशात
झेप घेताना पाहून वाटतं,
दुडक्या चालीने माझ्याकडे झेप घेणारी
चिमुकली तूच होतीस
की मला पडलेलं ते एक स्वप्नच होतं?