Friday, December 6, 2013

मला कधी कधी प्रश्न पडतो










मला कधी कधी प्रश्न पडतो...
मी खरंच एका गोंडस मुलीला
कधी जन्म दिला होता का?
की मला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न होतं?
खरंच तिच्यासाठी मी छोटी छोटी
रंगरंगीत झबली शिवली होती,
तुकडे तुकडे जोडून दुपटी बनवली होती
की ते देखील एक स्वप्नच होतं?
शाळेचा गणवेश घालून मागे वळूनही न
पाहता धावत पुढे जाणारी तू....
आजही माझ्या डोळ्यासमोर आहेस.
तुला पाहून तेव्हाच मला कळायला हवं होतं,
कधी ना कधी तू अशीच मागे न बघता
पुढेच जाणार आहेस.
आज तुला पंख पसरून आकाशात
झेप घेताना पाहून वाटतं,
दुडक्या चालीने माझ्याकडे झेप घेणारी
चिमुकली तूच होतीस
की मला पडलेलं ते एक स्वप्नच होतं?

No comments:

Post a Comment