२०१७ हे महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचे शतकपूर्ती वर्ष
आहे. त्या निमित्ताने वर्षभर योग्य पद्धतीने कार्यक्रम आयोजित
करण्याचा ठराव सिटूच्या २६ ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान पुरी, ओडिशा येथे
झालेल्या १५व्या अधिवेशनाने मंजूर केला होता. आपले नेतृत्व, तळागाळातील कार्यकर्ते
आणि कामगार यांना सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन प्रचार आणि
मोहीमेचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन अधिवेशनाने केले आहे.
मानवी इतिहासात
पहिल्यांदाच गरीब शेतकरी आणि शेतमजूरांना बरोबर घेऊन कामगार वर्गाच्या
नेतृत्वाखाली झालेल्या यशस्वी समाजवादी क्रांतीचा चिरंतन संदेश अजून खोल व व्यापक
पातळीवर नेण्याबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत. ऑक्टोबर क्रांतीच्या विजयाने हे
सत्य कायमचे प्रस्थापित केले की भांडवलशाही सत्ता उलथवून समाजवादी समाज प्रस्थापित
करण्याचे ऐतिहासिक ध्येय प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकते.
आठ तासांचा
कामाचा दिवस मिळवण्यासाठीचे लढे आणि भांडवली शोषणाच्या ओझ्यापासून मुक्ती
मिळवण्याची गरज यामध्ये परस्परसंबंध असून कामगारांनी जेव्हा कामाचा दिवस लहान
करण्याचा लढा दिला त्या दिवसांपासूनच कामगार वर्गाने समाजवाद प्रस्थापित करण्याचे
अंतिम उद्दीष्ट प्रत्यक्ष मिळवून घेण्यास सुरवात केली होती. आठ तासांचा कामाचा
दिवस मिळवण्याच्या लढ्याच्या नोंदित इतिहासात ह्या दृष्टीकोनाची पुष्टी करणारे
अनेक पुरावे आपल्याला सापडतात. म्हणूनच ह्या ऐतिहासिक दृष्टीकोनाच्या मुळाशी जाऊन
जगभरातील आठ तासांच्या कामाच्या दिवसासाठीचे लढे आणि महान ऑक्टोबर क्रांतीच्या
घटनाक्रमाचा मागोवा घेणे योग्य आणि चित्तवेधक ठरेल.
अधिक लहान कामाच्या दिवसाच्या लढ्याला सैद्धांतिक व कृतीशील
मार्गदर्शन करण्यामधील मार्क्स आणि एंगल्सच्या महत्वाच्या मूलभूत योगदानाचा आत्ताच्या
चर्चेच्या संदर्भात पुन्हा एकदा शोध घेणे खूप आवश्यक आहे. ज्यामुळे वैभवशाली ‘मे दिन’ प्रस्थापित झाला त्या
शिकागोतील हे मार्केट संघर्षातील शहिदांसाठी मार्क्स आणि एंगल्स प्रेरणेचे फार
मोठे स्रोत होते. कामगार वर्गाच्या ऐक्याचा आणि कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून
मे दिनाचा उदय हा जगभरातील कामगार वर्गाच्या समाजवादाचे अंतिम उद्दीष्ट प्राप्त
करण्याच्या लढ्यातील एक मैलाचा दगड ठरला. महान ऑक्टोबर क्रांतीचा विजय रशियातील
आणि एकूणच जगातील कामगारांसाठी एक युगप्रवर्तक यश होते.
कामाच्या तासांसाठीच्या लढ्याचा सुरवातीचा काळ
कामाच्या अधिक
लहान दिवसाची मागणी ही भांडवलशाहीच्या इतिहासातील वर्ग संघर्षाची अगदी सुरवातीची
आणि सातत्याची प्रेरणा राहिली आहे. खरे पाहता कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्गाच्या
वर्ग लढ्यातील हा एक ज्वलंत मुद्दा होता ज्यानी जगभरातील कामगार चळवळीला आकार
देण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. ह्याच लढ्याने कामगार चळवळीचा पाया रचला.
दिवसाच्या
कामाचे लांबलचक, कधी कधी १६ तासांपेक्षा जास्त तासांमुळे, कामगारांच्या आरोग्य आणि
एकूणच जीवनावर घातक परिणाम होत होते. अगदी महिला आणि बालकांना देखील अमानुष
परिस्थितीत खूप जास्त तास काम करावे लागत होते ज्यामुळे त्यांच्यावर विशी किंवा
तिशीतच मरण पत्करायची वेळ येत होती. चळवळीच्या सुरवातीच्या गतीला संपूर्ण
इंग्लंडमध्ये झालेल्या संपांमुळे प्रसिध्दी मिळाली आणि चार्टिस्ट चळवळीच्या रूपाने
राजकीय महत्व देखील प्राप्त झाले. सातत्याच्या लढ्यामुळे अनेक व्यवसायांमध्ये
दिवसाचे दहा किंवा नऊ कामाचे तास मंजूर झाले. जनतेच्या रेट्यामुळे मंजूर करण्यात
आलेल्या फॅक्टरी कायद्यामुळे कामगारांच्या, विशेषत:
महिला व बालकांच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली.
दरम्यानच्या
काळात तडीपार केलेल्या चार्टीस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली ऑस्ट्रेलियन कामगार वर्गाने
१८४०च्या उस्फुर्त लढ्यांमुळे आणि १८५६ मधील मेलबर्न आणि सिडनीमधील दगडी
बांधकामातील गवंड्यांच्या लढ्यांमुळे काही व्यवसायांमध्ये ८ तासांचा कामाचा दिवस
मिळवून घेण्यात यश मिळाले. टप्प्या टप्प्याने ८ तासांच्या कामाच्या दिवसाचा लढा
जगभर पसरला. अधिक लहान कामाच्या दिवसाचा अमेरिकेतील संघर्ष विस्ताराने पाहिला पाहिजे
कारण शिकागोतील हे मार्केटमधील संघर्ष जगभरातील ८ तासाच्या कामाच्या दिवसाच्या
लढ्याचे प्रतिक बनला.
अमेरिकेतील
८ तासांचा लढा
चार्टीस्ट चळवळीनंतर कामाचे तास कमी करण्यासाठी सर्वात आक्रमक
लढा एटलांटिकच्या पलिकडे उत्तर अमेरिकेत झाला. अमेरिकेत १८२७ पासूनच कामगार
संघटनांनी जरी कामाचे तास कमी करण्यासाठी अनेक वेळा संप पुकारले असले तरी ८
तासांच्या कामाच्या दिवसाची ठोस मागणी विल्यम एच सिल्विस यांच्या नेतृत्वाखालील
नॅशनल लेबर युनियनच्या स्थापना मेळाव्यात सर्वप्रथम करण्यात आली. मेळाव्याने हे
घोषित केले की ह्या “देशातील कामगारांना भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी” कामाचा दिवस छोटा करणे आवश्यक आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून अमेरिकेत
अनेक ‘८ तास संघ’ तयार करण्यात आले. शेवटी अमेरिकन
काँग्रेसला १८६८ मध्ये सार्वजनिक उद्योगांसाठी ८ तासांच्या कामाच्या दिवसाचा कायदा करावा लागला.
अमेरिकेतील नॅशनल लेबर युनियनची चळवळ जरी संपुष्टात आली,
तरी सार्वत्रिक ८ तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी, ऑक्टोबर १८८४ मध्ये नव्याने
स्थापन झालेल्या अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने १ मे १९८६ पासून कामगारांसाठी
कायद्याने ८ तासांचा कामाचा दिवस असेल असा ठराव मंजूर केल्यामुळे पुढे आली.
अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर व्यतिरिक्त नाइटस ऑफ लेबरसहित कामगारांचे इतर गट देखील
ह्या प्रस्तावाच्या पाठिशी उभे राहिले व १८८४ ते १८८६ या काळात कामगार वर्गीय
चळवळीमध्ये खूपच उत्साह संचारला. ८ तासांच्या कामाच्या दिवसासाठी १ मे रोजी
झालेल्या संपात जवळ जवळ ५ लाख कामगार थेटपणे सहभागी झाले. ह्या चळवळीने हे
मार्केटच्या संघर्षात हिंसक वळण घेतले.
या घटनेची सुरवात १८८६ मधील १ मे च्या संपापासून झाली.
शिकागोमध्ये हा संप सर्वात जास्त जोमाने केला गेला ज्यात हजारो कामगार ८ तासांच्या
कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. संप आक्रमक परंतु शांततापूर्ण
होता. पण त्यामुळे सत्ताधारी वर्ग अंतर्बाह्य हादरला. ३ मे रोजी मॅककॉर्मिक रीपर
वर्क्समधील कामगारांच्या संपकरी कामगारांवर पोलिसांनी हल्ला केला, ज्यात ६
कामगारांचा मृत्यू झाला. ह्या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी कामगारांनी हे मार्केटमध्ये
निषेध मोर्चा आयोजित केला. १ मे ते ४ मे दरम्यान शिकागोत घडलेल्या ह्या घटनांनी
आंतरराष्ट्रीय कामगार वर्गीय चळवळीला, १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार ऐक्य दिवस
म्हणून साजरा करण्यासाठी प्रेरित केले.
४ मे १८८६ रोजी शिकागोत पाऊस पडत होता. बैठक संपायलाच आली
होती. आदल्या दिवशीच्या पोलिसी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सुरवातीला जमलेल्या
३००० कामगारांपैकी फक्त २००च मागे राहिले होते. संपकरी कामगारांवर पोलिसांनी
केलेल्या अत्याचाराविरुद्ध ऑगस्ट स्पायज यांच्या समारोपाच्या भाषणातील धगधगत्या
शब्दांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
होते. तथाकथित ‘प्रक्षोभक भाषणामुळे’ जमावाला पांगवण्यासाठी पोलीस दल चाल करून येत होते. त्याच
क्षणी अचानक कुठून तरी जमावाच्या दिशेने एक बॉम्ब भिरकावला गेला. त्यानंतर
झालेल्या पोलिसांचा गोळीबार व दगडफेकीच्या चकमकीत ७ पोलीस व ४ कामगार मृत्यूमुखी
पडले. हे मार्केट घटना म्हणून नंतर प्रसिद्ध झालेल्या ह्या संघर्षामुळे आल्बर्ट
पार्सन्स, ऑगस्ट स्पायज, एडॉल्फ फिशर, जॉर्ज एंगेल यांना फाशी झाली तर लुईस लिंग
यांनी आत्महत्या केली. मे दिनाच्या ह्या शहिदांनी वर्गसंघर्षाच्या इतिहासात आपल्या
वैभवशाली पाऊलखुणा
चिन्हांकित केल्या आहेत. हेमार्केटच्या स्मारकावर फाशी होण्याच्या काही वेळ अगोदर
उच्चारलेले, ऑगस्ट स्पायज यांचे भविष्यसूचक शब्द कोरलेले आहेत – ‘एक दिवस असा येईल की आज तुम्ही
दाबलेल्या आवाजांपेक्षा, आमचे मौन जास्त शक्तीशाली ठरेल.’
मे
दिन शिकागोत का सुरु झाला
शिकागोमधल्या वर दिलेल्या घटनेच्या
पार्श्वभूमीचे वस्तूनिष्ठ आकलन करण्यासाठी त्या
काळात शिकागोत असलेली औद्योगिक आणि आर्थिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. ८
तासांच्या लढ्याबाबत लिहिणाऱ्या अनेक इतिहासकारांनी ह्यावर तपशीलवर चर्चा केली
आहे. कामगार वर्गाचे इतिहासकार सुकोमल सेन यांच्या लिखाणामधून खालील काही उद्धरणे
दिलेली आहेत.
१८७० च्या
दशकात शिकागो मध्य पश्चिम विभागाची वित्तीय आणि औद्योगिक राजधानी, तसेच अमेरिकेतील
तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर बनले होते, जिची लोकसंख्या १८७३मध्ये ५ लाखावर गेली
होती. त्यातील एक पंचमांश जर्मन होते शिवाय आयरिश, स्कॅन्डेनेवियन्स आणि
बोहेमियन्स देखील मोठ्या प्रमाणात होते.
सर्व मोठ्या
शहरांप्रमाणे शिकागो देखील विरोधाभासांनी भरलेले होते. भव्य आणि सातत्याने धडधडत
राहणारे महानगर, प्रचंड वाढ आणि त्याच वेळेला वांशिक चकमकी, कामगारांचे लढे आणि
पोलीस दमन. सतत वाढणारा कामगार वर्ग, मंदी, तेजीने ग्रासलेली अर्थव्यवस्था, स्वस्त
श्रमाची उपलब्धता, अनेक कामांचे हंगामी स्वरूप, दारिद्र्य, बेरोजगारी, हजारो
कामगारांना कामावरून काढले जाणे नेहमीचेच झालेले होते. निदर्शानांमागून
निदर्शनांवर पोलिस हल्ले करीत असत. कामगारांचे एकत्र जमण्याचे आणि निषेध करण्याचे
प्राथमिक अधिकारही नाकारले जात होते.
हे मार्केटच्या
भावी नायकांची राजकीय विचारसरणी ह्या विशिष्ठ राजकीय परिस्थितीमुळे घडवली गेली.
त्यामधील एक, आल्बर्ट पार्सन्स हा समाजवादी बनला होता. शिकण्यासाठी आतूर असलेल्या पार्सन्सने
कम्युनिस्ट मॅनिफेस्टोसहित सर्व उपलबध समाजवादी साहित्याच्या फडशा पाडला होता.
ह्या सर्व
काळात शिकागो कामगार वर्गीय चळवळीचे खोलवर मुळे असलेले केंद्र बनले होते. ते
अराजकवादी चळवळीचे वादळी केंद्र बनले, ज्याच्याकडे संपूर्ण देशातील अनुयायी सल्ला
व पाठिंब्यासाठी पाहत असत. वाढती स्थलांतरित लोकसंख्या आणि कामगार चळवळीचा मोठा
इतिहास यामुळे अराजकवादी प्रचार आणि संघटनांसाठी ती सुपिक जमीन बनली होती.
अमेरिकेतील दुसऱ्या कोणत्याही शहरात वर्गभेद इतका तीव्र बनला नव्हता आणि श्रीमंत,
गरिबांमधील दरी इतकी स्पष्ट बनली नव्हती. हे सर्वात क्रूर पोलीस दल आणि अत्यंत
विखारी कामगार विरोधी प्रेस यांचे देखील ठिकाण बनले होते.
म्हणजेच
राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पार्श्वभूमी पूर्णतया परिपक्व होती आणि हे मार्केट
संघर्षासाठी पुरेश्या प्रमाणात तयार झाली होती.
मार्क्स,
एंगल्स आणि पहिले व दुसरे आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची
स्थापना बैठक २८ सप्टेंबर १८६४ रोजी लंडनच्या सेंट मार्टिन्स हॉलमध्ये आयोजित केली
गेली होती. इंग्लंडमधील कामगारांव्यतिरिक्त त्यात फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड,
स्वित्झर्लंड, हंगेरी आणि डेन्मार्क मधील कामगारांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले
होते. कार्ल मार्क्सने त्याचे नियम आणि उद्घाटनपर भाषण लिहिण्याची विनंती आनंदाने
मान्य केली होती.
आजच्या भांडवलशाहीच्या वाढत्या व्यवस्थात्मक संकटात जेव्हा
जगभरातील भांडवलदार वर्ग पुनरुत्थान, विकास आणि सकल घरेलू उत्पादनातील वाढ याबाबत
बोलतात तेव्हा हे जाणून घेणे खूप मनोरंजक ठरेल की कार्ल मार्क्सने त्याच्या
उद्घाटनपर भाषणात त्यावेळच्या अशाच परिस्थितीचा समाचार घेतला होता. आम्ही
मार्क्सच्या भाषणातील उद्धरण खाली देत आहोत:
“युरोपमधील सर्व देशांमध्ये
पूर्वग्रहरहित मनांना स्पष्ट दिसणारे, पण लोकांना मुर्खांच्या नंदनवनात अडकवून
ठेवू इच्छिणाऱ्या लोकांनीच फक्त नाकारलेले सत्य हे आहे की यंत्रांमधील सुधारणा,
उत्पादनाला विज्ञानाची जोड, संपर्काच्या नवीन योजना, नव्या अर्थव्यवस्था, देशांतर,
बाजारांचा खुलेपणा, मुक्त व्यापार ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे सुद्धा औद्योगिक
कामगारांची दु:खं दूर करू शकणार नाहीत, उलट, आजच्या भ्रामक पायावर उभा असलेल्या, झिंग
आणणाऱ्या आर्थिक प्रगतीच्या काळातील ब्रिटिश साम्राज्याच्या महानगरांमधला कामगारांच्या
उत्पादक शक्तींचा प्रत्येक उच्च दर्जाचा ताजा विकास ... जागतिक इतिहासात लगेच
मिळणारे परतावे, वाढणारा आवाका आणि व्यावसायिक आणि औद्योगिक संकटाच्या सामाजिक
किडीचे भयंकर परिणाम यांनी चिन्हांकित केला आहे.”
त्या काळातील भांडवली संकटाचे स्वरूप चक्राकार होते आणि
आता ते भांडवलशाहीचे व्यवस्थागत संकट बनले आहे. आज परिस्थिती अजूनच बिघडली आहे.
आपल्या भाषणात मार्क्सने ठामपणे घोषित केले होते की नवीन अर्थव्यवस्थेचा मार्ग
बाजारांचे खुलेकरण, मुक्त व्यवसाय, देशांतर इत्यादी असून तो मार्ग भांडवलशाहीचे
चक्राकार संकट रोखू शकत नाही. मार्क्सच्या भाषणाला १५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर
भांडवलशाहीने स्वत:ला व्यवस्थागत संकटाच्या टप्प्यावर पोहोचण्याइतक्या उंचीवर नेले आहे. अगदी
आजही वर उल्लेख केलेल्या त्याच जुन्या ‘प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला’ प्रकारचे उपाय सुचवले जात आहेत. पण ते आजारी भांडवलदारी व्यवस्थेला रोगमुक्त करण्यात
अपयशीच ठरणार हे निश्चित आहे. ह्या कठीण वास्तवाने पुन्हा एकदा मार्क्सवादाची
सामाजिक विज्ञान म्हणून शाश्वतता आणि त्यानी सुचवलेल्या उपायांची अचूकता
प्रस्थापित केली आहे- कष्टकरी जनतेची संपूर्ण मुक्ती भांडवलशाहीला उलथवून त्या
जागी वैज्ञानिक समाजवाद प्रस्थापित करूनच होऊ शकते. हा मे दिनाच्या संघर्षाचा मूळ गाभा
आणि संदेश आहे.
१८६६ साली जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची
पहिली परिषद झाली होती. ऑगस्ट १८६६ मध्ये अमेरिकेतील नॅशनल लेबर युनियनच्या
स्थापना मेळाव्यात सुप्रसिद्ध ८ तासांचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर काही
दिवसांनीच मार्क्सने जिनिव्हातील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील प्रतिनिधींना
लिहिले की:
“ज्याच्याशिवाय सुधारणांचे आणि
मुक्तीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात, ती प्राथमिक अट आहे कामाच्या तासांवर
मर्यादा. प्रत्येक देशाची महान शक्ती असलेल्या कामगार वर्गाचे आरोग्य आणि शारिरिक
शक्तींचे संवर्धन करण्यासाठी तसेच त्यांचा बौद्धिक विकास, आस्थावाईक परस्पर संबंध,
सामाजिक आणि राजकीय कार्याची निश्चिती करण्यासाठी ते आवश्यक आहे. आम्ही दिवसाच्या
८ तासाच्या कामाची कायदेशीर मर्यादा प्रस्तावित करतो. ह्या मर्यादेची अमेरिकेच्या
कामगारांनी या आधीच मागणी केली आहे. ह्या परिषदेच्या मतामुळे त्या मागणीचा
जगभरातील कामगार वर्गाच्या संयुक्त मंचापर्यंत विस्तार होणार आहे.”
मार्क्सच्या प्रस्तावाचा स्वीकार करून जिनिव्हा परिषदेने
पुढील ठराव मंजूर केला: “कामाच्या तासांची कायदेशीर मर्यादा एक प्राथमिक अट आहे, ज्याच्याशिवाय
कामगार वर्गाची सुधारणा व मुक्तीचे भविष्यातील सर्व प्रयत्न निष्फळ सिद्ध होतात...
ही परिषद कामाच्या दिवसाची ८ तासांची कायदेशीर मर्यादा प्रस्तावित करीत आहे.” आणि त्यापुढे “ही मर्यादा उत्तर अमेरिका, युएस
मधील सर्व कामगारांच्या मागणीचे प्रतिनिधित्व करीत आहे, म्हणून ही परिषद त्या
मागणीला संपूर्ण जगातील कामगारांच्या संयुक्त मंचाच्या मागणीमध्ये रुपांतरित करीत
आहे.”
पहिल्या आंतरराष्ट्रीयच्या पुढील परिषदा लाउसान्न (१८६७),
ब्रुसेल्स (१८६८), बॅसल् (१८६९) आणि हेग (१८७२) इथे भरविण्यात आल्या. हेग
काँग्रेसमध्ये कामगार वर्गाच्या ८ तासांच्या लढ्यातील वेगवेगळ्या घडामोडी पाहून
आणि संघटनेच्या अंतर्गत निर्माण झालेल्या काही विवादित परिस्थितीमुळे पहिल्या आंतरराष्ट्रीयचे
मुख्यालय १८७३ मध्ये लंडनहून न्युयॉर्कला हलविण्यात आले. ह्या बदलाबाबत मार्क्सने अशी नोंद घेतली, “हेग काँग्रेसने जनरल कौन्सिलचे ठिकाण लंडनहून न्युयॉर्कला हलवले आहे. बरेच
लोक, अगदी आपले मित्र देखील ह्या निर्णयावर खुष नाहीत. ते हे विसरत आहेत की अमेरिका
कामगारांचा देश बनत चालला आहे, दर वर्षी सुमारे ५ लाख कामगार ह्या नव्या जगात
स्थलांतर करतात. आणि म्हणून आंतरराष्ट्रीयने कामगार वर्ग जिथे सर्वोच्च आहे अशा
जमिनीत आपली मुळे खोलवर रुजवायला हवीत.”
मे दिन
आंतरराष्ट्रीय बनला
दुसऱ्या आंतरराष्ट्रीयची स्थापना
१४ जुलै १८८९ रोजी पॅरीसमधल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या अधिवेशनात झाली.
अधिवेशनाने १८८४-१८८६ या कालावधीत अमेरिकेत झालेल्या ८ तासांच्या लढ्याबद्दल, आणि
त्या चळवळीत नुकत्याच आलेल्या नव्या जोमाबाबत अमेरिकेच्या प्रतिनिधींकडून सर्व
माहिती ऐकली. अमेरिकन कामगारांच्या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन पॅरीस काँग्रेसने
खालील ठराव मंजूर केला:
“काँग्रेसने सर्व देशांमध्ये आणि
सर्व शहरांमध्ये एका ठरलेल्या दिवशी कामाच्या दिवसाच्या ८ तासांची मागणी आणि पॅरीस
काँग्रेसच्या अन्य निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी, शासकीय अधिकाऱ्यांसमोर कष्टकरी
जनतेची प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय
घेतला आहे. डिसेंबर १८८८ ला सेंट लुईसच्या संमेलनात अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने, १
मे १९९० रोजी अशाच प्रकारची निदर्शने करण्याचा निर्णय या अगोदरच घेतलेला
असल्यामुळे हाच दिवस आंतरराष्ट्रीय निदर्शनांसाठी निर्धारित करण्यात येत आहे.
वेगवेगळ्या देशांमधील कामगारांनी त्यांच्या देशात असलेल्या परिस्थितीनुसार ही
निदर्शने आयोजित करावीत.”
मे दिन हा लढ्याचा आणि कामगार वर्गाच्या ऐक्याचा आंतरराष्ट्रीय
दिवस म्हणून उदयाला यायची ही पार्श्वभूमी आहे. भांडवलदार वर्गाने आणि वर्ग
समन्वयाची भूमिका घेणाऱ्या कामगार संघटनांनी मे दिनाच्या वैभवशाली संघर्षांची आठवण
कामगार वर्गाच्या मनामधून पुसून टाकण्यासाठी खूप कारस्थाने केली. वाईट हेतूने प्रेरित
असलेल्या त्यांच्या या कारस्थानात ते संपूर्णपणे अपयशी तर ठरलेच आहेत, उलट १८९०
पासून कामगार वर्गाने मे दिन जगभरात, विस्तारित व वाढत्या प्रमाणात साजरा करायला
सुरवात केली.
त्यानंतर ब्रुसेल्समध्ये १८९१ साली झालेल्या काँग्रेसने
मागील ठरावात दुरुस्ती करून ८ तासांच्या दिवसासाठीच्या “१ मे च्या निदर्शनांचे वर्गीय स्वरूप” आणि “वर्गसंघर्ष आणखी खोलवर नेणे” यावर भर देण्यात आला.
ठरावाद्वारे अशी देखील मागणी करण्यात आली जिथे जिथे शक्य असेल तिथे मे दिनी काम
बंद करावे.
मार्क्स १ मे १८८६चा ऐतिहासिक उठाव पाहू शकला नाही कारण ३
वर्षे आधी १४ मार्च १८८३ला त्याचा मृत्यू झाला. परंतु ८ तासाच्या चळवळीच्या
सुरवातीपासून त्याच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मार्क्स पूर्ण जगभर ह्या
चळवळीचा प्रसार, प्रचार आणि विस्तार करण्यासाठी झटत राहिला. परंतु त्यानंतरही
एंगेल्सने संपूर्ण जगातील कामगार वर्गाला भांडवलावरच्या त्यांच्या अंतिम विजयासाठी
तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीयवादाचा बॅनर चिकाटीने आणि निष्ठेने उचलून धरला.
कम्युनिस्ट जाहीरनाम्याच्या जर्मन आवृत्तीच्या १ मे १८९०
रोजी लिहिलेल्या प्रस्तावनेत सर्वहारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या इतिहासाचा
आढावा घेताना, एंगेल्सने पहिल्या आंतरराष्ट्रीय मे दिनाच्या महत्वाकडे लक्ष वेधले.
“मी ह्या ओळी लिहित असताना युरोप आणि अमेरिकेतील सर्वहारा
आपल्या ताकदीचे मूल्यांकन करीत आहेत. पहिल्यांदाच ते एक सैन्य म्हणून एका
झेंड्याखाली आणि कायद्याद्वारा मान्य, ८ तासांच्या कामाच्या दिवसाच्या एका
तातडीच्या उद्दीष्टासाठी लढण्यासाठी संघटित झाले आहेत ... आपण आता पाहत असलेल्या
दृष्यामुळे भांडवलदार आणि जमीनमालकांच्या हे लक्षात येईल की सर्व देशांमधील
सर्वहारा आज खऱ्या अर्थाने संघटित झाले आहेत. अरेरे! आपल्या डोळ्यानी हे पाहण्यासाठी मार्क्स आज आपल्यात नाही!”
युरोपातील देशांमध्ये मे दिनाचे कार्यक्रम
पश्चिमेत मे दिन साजरा
करण्याची सुरवात १८९० साली काहीश्या छोट्या प्रमाणात झाली. अर्थातच ऐतिहासिक
नोंदींवरून हे लक्षात येते की सुरवातीला हा दिवस पश्चिमेतील अशाच देशातील कामगार
साजरा करत होते, ज्या देशाने त्या आधीच कामगार वर्गाच्या मोठ्या संघटित कृती
पाहिलेल्या होत्या. जर्मनी अगदी सुरवातीला म्हणजे १९९० मध्ये मे दिन साजरा
करणाऱ्यांपैकी एक देश होता. मे दिनानंतर झालेल्या टाळेबंदीला विरोध करण्यासाठी
कामगारांनी हॅम्बर्ग पोर्टमध्ये संप पुकारला आणि संप अन्य कामगारांच्या पाठिंबा व
साहित्याच्या मदतीमुळे काही महिने चालू राहिला.
१८९० सालचा मे
दिन इंग्लंडमध्ये अगदी साजेश्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फ्रेडरिक एंगेल्स
स्वत: त्यात फक्त
सहभागीच झाले नाहीत तर हाइड पार्क, लंडन मधल्या कार्यक्रमाच्या तयारीत देखील ते
सक्रीय होते. ऑस्ट्रीयन सोशल डेमॉक्रॅटसच्या वर्तमानपत्रात त्यांनी हाइड पार्कच्या
प्रचंड सभेच्या यशाबद्दल लिहिले, “वाद्य आणि बॅनर्स घेऊन येणाऱ्या
लोकांच्या न संपणाऱ्या दाट रांगा आपल्याला दिसत होत्या. १ लाखाहून अधिक लोक
शिस्तबद्ध रांगांमध्ये येत होते आणि त्यांना स्वत:
होऊन आलेले लोक येऊन मिळत होते. सर्वदूर एकमत आणि उत्साह
पसरला होता आणि त्याच वेळेला संपूर्ण शिस्त आणि संघटन देखील होते.” एंगेल्सने पुढे
लिहिले आहे, “मला असे वाटले की ४ मे १८९० रोजी
इंग्लंडमधला सर्वहारा त्याच्या वर्ग चळवळीत सामील होण्यासाठी ४० वर्षांच्या
निष्क्रीयतेतून जागा झाला ..., महान आंतरराष्ट्रीय सैन्य हा त्याचा महत्वाचा आणि
आश्चर्यकारक परिणाम होता. ह्याला खरोखरच ऐतिहासिक महत्व आहे ... जुन्या
चार्टीस्टसची नातवंडे ह्या लढाऊ रांगांमध्ये सामील होत आहेत.” हाइड पार्क मधील सभेचे महत्वाचे
वैशिष्ठ्य हे होते की ती खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय होती. एंगेल्स व्यतिरिक्त पॉल
लफार्ज, सर्गेई स्टेपन्याक-क्रॅवचिन्स्की, बर्नार्ड शॉ व एडुआर्ड बर्नस्टेइन हे
आंतरराष्ट्रीय नेते देखील उपस्थित होते.
ऑस्ट्रीया- हंगेरीत संप लढे सुरु झाले
होते. नव्याने स्थापना झालेल्या सोशल- डेमॉक्रॅटिक पार्टीने संप पुकारला होता आणि
मे दिनाची निदर्शने आयोजित केली होती. सरकारने कामगार संघटनांची विनंती मान्य
करण्याचा निर्णय घेतला आणि शांततापूर्ण मोर्च्यांना परवानगी देण्यात आली. फ्रेडरिक
एंगेल्सने लिहिले की ऑस्ट्रियामध्ये सर्वहारांची ही सुट्टी “अत्यंत उत्साहात आणि साजेश्या पद्धतीने” साजरी करण्यात आली.
फ्रान्समध्ये, पॅरीस गॅरिसनचे ३४०००
सैनिक तैनात करून आणि दडपशाहीचा प्रयत्न करून सुद्धा १३८ महानगरे आणि शहरांमध्ये
मे दिन साजरा करण्यात आला. अनेक उद्योगांनी काम बंद ठेवले आणि बोलेवार्डसच्या
जोडीने कामगारांचे जत्थेच्या जत्थे द ला कॉन्कॉर्डच्या दिशेने निघाले.
बेल्जियममध्ये प्रशासनानी लादलेली बंदी झुगारून,
कोळसा खाणींमधील १ लाखाहून जास्त कामगारांनी काम थांबवले. चार्लेरॉयमध्ये
कामगारांनी बॅनर घेऊन संपूर्ण शहरात मोर्चा काढला. मे दिनी युरोपमधल्या राजधान्या
आणि इतर मोठ्या शहरांमध्ये प्रचंड मोर्चे, बैठका, निदर्शने आणि प्रशासनाला निवेदन देण्याचे
कार्यक्रम आयोजित केले गेले. काही ठिकाणी काम बंद करून तर बाकीच्या ठिकाणी
कामाच्या वेळेनंतर कार्यक्रम घेण्यात आले. हे सर्व कार्यक्रम शांततापूर्ण होते.
स्वीडन, डेन्मार्क, हॉलंड, पोर्तुगाल, स्पेन- माद्रीद आणि बार्सेलोनामधले कामगार
देखील मोठ्या संख्येने मे दिनाच्या मोर्च्यांमध्ये सहभागी झाले.
इटालीत प्रशासनाने सर्व शहरांमध्ये
मार्शल लॉची घोषणा केली आणि सैन्य दलांना सावध राहण्याचा इशारा दिला. तरीसुद्धा
रोममध्ये संप आणि त्या बरोबर मोर्चा देखील झाला, जो पोलिसांनी पांगवला. तुरीन,
बोलोग्ना आणि मिलानमध्ये देखील चकमकी झाल्या.
इतर
खंडांमध्ये मे दिन
हे स्पष्ट दिसते की, आंतरराष्ट्रीय
कामगार संघटनेनी पॅरीस काँग्रेसमध्ये जागतिक कामगार वर्गाला मे दिन, ऐक्य आणि
कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून १९९० पासून साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनाला
इतर खंडांमधील अनेक देशामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिका आणि युरोप
व्यतिरिक्त आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकन देशांमधील कामगार
वर्गाने देखील मे दिन साजरा करण्यास सुरवात केली. लॅटिन अमेरिकेत मेक्सिको सिटी,
हवाना, क्युबा ह्यांनी लवकर सुरवात केली आणि खंडातील बाकी देशांनी त्यांच्या
पाठोपाठ. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्नसबर्ग, केप टाऊन, दर्बान, पोर्ट एलिझाबेथ आणि
इतर औद्योगिक केंद्रांनी देखील मे दिन साजरा करण्याची सुरवात केली.
मे दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यास सुरवात
झाल्यावर एंगेल्सने नोंद केली की, “हा एक इतिहास होता-फक्त त्याच्या सार्वत्रिक स्वरूपामुळेच
तो कामगार वर्गाच्या लढ्यामधील आंतरराष्ट्रीय कृती कार्यक्रम बनला नाही तर, अनेक
देशांमधील चळवळीच्या उत्साहवर्धक प्रगतीमुळे देखील हे शक्य झाले.”
जसा जसा काळ गेला आणि कामगार वर्गाची चळवळ हळू हळू परिपक्व
बनली, मे दिनांनी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी सर्वहारांसाठी वर्गीय स्वरुपाच्या
मूलभूत राजकीय मागण्या उचलल्या. ८ तासांच्या दिवसाच्या मूळ मागणी बरोबरच
भांडवलदारी शोषणापासून कामगार वर्गाची मुक्ती आणि समाजवादाचे अंतिम उद्दीष्ट, इतर
महत्वाच्या तातडीच्या घोषणा आणि मुद्दे उचलले होते. त्यामध्ये सार्वत्रिक
मताधिकार, साम्राज्यवादी युद्धाचा विरोध, वसाहतवादी दडपशाहीला विरोध, रस्त्यावर
संघर्ष करण्याचा अधिकार, राजकीय कैद्यांची सुटका, कामगार वर्गाच्या राजकीय आणि
आर्थिक संघटन बांधणीचा अधिकार हे मुद्दे होते. सर्वात जास्त महत्व दिले गेले
आंतरराष्ट्रीय ऐक्याला.
भारतातील
कामाच्या तासांचा लढा
भारतात आधुनिक उद्योगांचा पाया १८५० ते १८७० दरम्यान घातला
गेला. साहजिकच हा काळ औद्योगिक कामगार वर्गाच्या उदयाचा देखील होता. त्यानंतरच्या
काही वर्षांमध्ये देश औद्योगीकरणाच्या प्रगतीचा साक्षिदार होता. भारतातील औद्योगिक
कामगारांच्या संख्येत कारखान्यांच्या संख्येच्या बरोबरच वाढ झाली. त्या काळातील
भारतीय कामगारांच्या शोषणाची पातळी कल्पनेच्याही पलिकडे होती. सलग १५, १६ तास काम
त्या सुरवातीच्या काळातील सामान्य पद्धत होती. महिला आणि बालकांचा देखील त्याला
अपवाद नव्हता.
भारतातील ८ तासांच्या कामाच्या दिवसाचा लढा हावड़ा रेल्वे
कामगारांच्या १८६२ मधील संपापासून सुरु झाला. मद्रास, कलकत्ता आणि मुंबईतील कामगार
वर्ग, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात शशीपाद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे
यांसारख्या पुरोगामी उदारमतवादी मानवतावाद्यांच्या मदतीने कामाच्या अमानुष
परिस्थितीविरुद्ध संघर्ष करू लागला होता. अनेक उद्योगांमध्ये अधिक चांगल्या
कामाच्या परिस्थितीच्या आणि लहान कामाच्या तासांच्या मागणीसाठी अनेक उस्फुर्त संप झाले. त्याच काळात
मे दिन साजरा करण्याची सुरवात झाली. ८ तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी ही
महत्वाच्या मागण्यांपैकी एक होती. स्वतंत्र भारतातील १९४८च्या फॅक्टरी कायद्याने
कामगारांच्या सर्व विभागांसाठी दर रोज ९ तास आणि आठवड्याला ४८ तास अशी कामाच्या
तासांची कमाल मर्यादा निर्धारित केली.
परंतु पश्चिम युरोप आणि अमेरिकेच्या मानाने भारतातील
कामगार चळवळ बरीच उशीरा सुरु झाली. शोषणाविरुद्धचे कामगारांचे संघर्ष सुरवातीच्या
काळात उस्फुर्तपणे झाले होते. भांडवलदार वर्गाच्या अमानुष शोषणाविरुद्धच्या वर्गीय
अंत:प्रेरणेमुळे उचललेली ती पावले
होती. पहिले जागतिक महायुद्ध आणि १९१७च्या ऑक्टोबर समाजवादी क्रांतीनंतरच्या काळात
भारतातील कामगार चळवळीने नोद घेण्याइतका उठाव घेतला. ऐतिहासिक नोंदी दाखवतात की
भारतातील कामगार चळवळीला राजकीय आणि सैद्धांतिक दिशा १९२० मधील ऑल इंडिया ट्रेड
युनियन काँग्रेसच्या (एआयटीयुसी) स्थापनेनंतरच मिळाली.
भारतातील
मे दिनाची परंपरा
भारतात १९२३
मध्ये पहिल्यांदा क्रांतिकारी उत्साहाने मे दिन साजरा करण्यात आला. सुरवातीला तो
प्रामुख्याने वैयक्तिक पुढाकाराने साजरा
केला गेला. याचे श्रेय सिंगारवेलू चेट्टियार यांच्या क्रांतिकारी दृष्टीला जाते,
जिच्यामुळे त्यांनी भारतात मे दिन साजरा करण्यासाठी सर्वप्रथम वैयक्तिक पुढाकार
घेतला. सिंगारवेलू चेट्टियार हे अगदी सुरवातीच्या मार्क्सवाद्यांपैकी एक होते. ते
एम एन रॉय यांच्या संपर्कात होते. सिंगारवेलू यांनी १९२३ साली हिंदुस्तान लेबर किसान पार्टीची स्थापना केली.
त्यांनी त्याच वर्षी मे दिनाला एका सभेचे आयोजन केले आणि स्थळ होते मद्रासमधील
मरीना बीचची वाळू. त्यांना १९२४ मध्ये ‘कानपूर बोल्शेविक कट खटल्यासाठी’ अटक झाली होती. लक्षात घेण्यासारखे सत्य हे आहे की ह्या बैठकीत प्रचंड
संख्येने तैनात असलेल्या गणवेषधारी पोलीसांच्या समोर काही थोडेच कामगार उपस्थित
होते.
१९२६ साली लाहोरमध्ये देखील मे दिन साजरा करण्यात आला. अधिकृत नोंदीनुसार
दिवान चमन लाल यांनी १९२६ साली लाहोरमध्ये मे दिन साजरा करण्यासाठी मुख्य भूमिका
निभावली. हळू हळू भारतातील आणि देशाबाहेरील भारतीय जास्त चांगल्या प्रकारे मे दिन
साजरा करायला लागले आणि देशभर त्याचा प्रसार व्हायला लागला.
भारतात १९२७ पासून देशातील पहिली संयुक्त कामगार संघटना- एआयटीयुसीने
पुढाकार घेतल्यानंतर मे दिन सर्वात जास्त संघटित आणि व्यापक प्रकारे साजरा होऊ
लागला. त्यानंतर कामगार चळवळीची अजून प्रगती झाल्यावर भारतातील कामगार वर्गाच्या अनेक
मोठ्या केंद्रांमध्ये मे दिन वाढत्या प्रमाणात आणि अधिक खोल विश्वासाने साजरा केला
जाऊ लागला.
आज भारत खूप मोठ्या प्रमाणात मे दिन
साजरा करणाऱ्या देशांमधील आघाडीचा देश बनला आहे. १९८६ मध्ये भारतातील कामगार वर्गाने
मे दिनाचे शतक खूपच चांगल्या प्रकारे साजरे केले, ज्यात देशभरात भव्य कार्यक्रम
आयोजित केले गेले. परंतु आपल्या देशातील वर्गीय दृष्टीकोनातून चालवल्या जाणाऱ्या
कामगार चळवळीने हे तपासून पाहिले पाहिजे की ते हा दिवस लेनीनने अधोरेखित केलेल्या
दृष्टीकोनानुसार साजरा करीत आहेत काय.
रशियातील मे दिन, ऑक्टोबर क्रांतीची नांदी
रशियातील
क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी मे दिनाच्या लढ्याचे प्रचंड महत्व लेनीनने अधोरेखित
केले होते. हे यावरून समजून येते की त्याने स्वत: रशियन कामगारांसाठी १८९६ पासून अनेक
वर्षे मे दिनाची आवाहने लिहिली आणि अनेकदा मे दिनाच्या कार्यक्रमात कामगारांना
संबोधित केले होते. लेनीननेच रशियन कामगारांनी मे दिन निदर्शने आणि लढ्यांद्वारे
साजरा करावा असा विचार रुजवला.
१८९६ मध्ये
तुरुंगात असताना लेनीनने सेंट पिटर्सबर्ग युनियनमधील ‘कामगारांच्या
मुक्तीसाठी संघर्ष’ ह्या रशियातील
पहिल्या मार्क्सवादी राजकीय गटांपैकी एक असलेल्या गटासाठी मे दिनाचे पत्रक लिहिले.
हे पत्रक तुरुंगातून गुप्तपणे बाहेर काढले गेले आणि ४० कारखान्यांमधील
कामगारांमध्ये वाटण्यात आले. ज्या कारखान्यात कामगार काम करतात त्याचे मालक स्वत:च्या
फायद्यासाठी कामगारांचे कसे शोषण करतात, आणि सरकार कश्या प्रकारे आपल्या
जगण्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या कामगारांचा छळ करते हे
कामगारांना सांगितल्यानंतर, लेनीनने पत्रकात फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आणि इतर
देशांमध्ये कामगार कसे या आधीच शक्तीशाली युनियन्समध्ये संघटित झाले आहेत आणि
त्यांनी कसे अनेक अधिकार मिळवून घेतले आहेत याबाबत देखील लिहिले. “गुदमरून टाकणाऱ्या कारखान्याबाहेर पडून
ते बॅनर फडकावून, शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढून आपल्या मालकांना दाखवून
देत आहेत की कसे ते एक सातत्याने वाढणारी शक्ती आहेत. ते प्रचंड मोठ्या
निदर्शनांमध्ये जमत आहेत, जिथे ते मागील वर्षात त्यांनी आपल्या वरिष्ठांवर कसे
विजय मिळवले आणि भविष्यातील लढ्यांबाबत त्यांचे काय नियोजन आहे यावर भाषणे देत
आहेत. संपाच्या भितीमुळे त्या दिवशी कामावर न येणाऱ्या कामगारांना दंड ठोठावण्याची
हिंमत त्यांचे अधिकारी करत नाहीत. ह्या दिवशी कामगार त्यांच्या वरिष्ठांना
त्यांच्या मुख्य मागण्यांची आठवण करून देत आहेत- ८ तास काम, ८ तास आराम आणि ८ तास
मनोरंजन. इतर देशांमधील कामगार नेमकी हीच मागणी करीत आहेत.”
रशियन
क्रांतिकारी चळवळीने मे दिनाचा उपयोग वर्गीय दृष्टीकोनातून चालवली जाणारी कामगार
चळवळ पुढे नेण्यासाठी करून घेतला. शिवाय लेनीन संघटित क्षेत्रातील वर्गीय
जाणिवांनी भारलेल्या कामगारांना मोठ्या संख्येने संघटित करण्यावर भर देत असे.
नोव्हेंबर १९०० मध्ये प्रकाशित झालेल्या खारकोव मधील मे दिन या पत्रकाच्या
प्रस्तावनेत लेनीनने लिहिले होते:
‘येत्या
६ महिन्यांमध्ये, रशियन कामगार नवीन शतकाचा पहिला मे दिन साजरा करणार आहेत, आणि तो
जास्तीत जास्त केंद्रांमध्ये, शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व
व्यवस्था करण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे. मे दिनाची भव्यता फक्त त्यात
सहभागी होणाऱ्या कामगारांच्या प्रचंड मोठ्या संख्येच्या रूपात नाही तर ती दिसली
पाहिजे, त्यांच्या संघटितपणाच्या स्वरुपामधून, त्यांनी दाखवलेल्या वर्गीय
जाणीवेमधून, आणि, या सर्वाच्या परिणामी रशियन जनतेच्या राजकीय मुक्तीसाठी,
सर्वहारांसाठी वर्गीय विकासाच्या अमर्याद संधी मिळवण्या आणि समाजवादासाठीच्या
खुल्या संघर्षाचा दुर्दम्य लढा सुरु करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या निर्धारामधून.’
लेनीनने मे
दिनाच्या निदर्शनांना किती महत्व दिले होते हे यावरून दिसते की त्यानी ६ महिने
आधीच त्याकडे लक्ष वेधले. त्याच्यासाठी मे दिन म्हणजे “रशियन जनतेच्या
राजकीय मुक्तीसाठी, सर्वहारांसाठी वर्गीय विकासाच्या अमर्याद संधी मिळवण्या आणि
समाजवादासाठीच्या खुल्या संघर्षाचा दुर्दम्य लढा देण्यासाठी” एकत्र येण्याचा
बिंदू होता.”
मे दिनाचे कार्यक्रम कसे “महान राजकीय निदर्शने बनतील” यावर बोलताना लेनीनने विचारले की १९००
सालचा खारकोव येथील मे दिनाचा कार्यक्रम “अत्यंत महत्वाची आणि
चित्तवेधक घटना” का आहे, आणि या प्रश्नाच्या
उत्तरादाखल त्यांनी म्हटले की, “कामगारांचा
संपामधील प्रचंड सहभाग, रस्त्यावर होणाऱ्या प्रचंड मोठ्या बैठका, फडकवलेले लाल
झेंडे, पत्रकात दिलेल्या मागण्यांचे सादरीकरण आणि ८ तासांचा दिवस व राजकीय
स्वातंत्र्य या मागण्यांचे क्रांतिकारी स्वरूप.” त्याच वेळेला लेनीनने खारकोव पार्टीच्या
नेत्यांवर ८ तासांच्या दिवसाच्या मागणीला इतर लहान आणि फक्त आर्थिक मागण्यांबरोबर
मिसळण्यावरून टीका देखील केली, कारण तो मे दिवसाचे राजकीय लक्ष्य सौम्य करण्याच्या
विरोधात होता.
“यातील पहिली मागणी (८
तासांचा दिवस) सर्व देशांमधील सर्वहारांनी पुढे केलेली समान मागणी आहे. खरे तर ही
मागणी पुढे करण्यावरूनच हे दिसून येते की खारकोवच्या आघाडीच्या कामगारांना
आंतरराष्ट्रीय समाजवादी कामगार चळवळीशी असलेल्या त्यांच्या ऐक्याची जाणीव होती. ८
तासांच्या दिवसाची मागणी सर्व सर्वहारांची मागणी आहे, जी त्यांच्या वैयक्तिक
मालकाकडे नाही तर आजच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून
सरकारकडे, सर्व उत्पादनाच्या साधनांचे मालक असलेल्या संपूर्ण भांडवलदार वर्गाकडे
आहे.”
एप्रिल १९१२ मध्ये सायबेरियातील लेना
सोन्याच्या खाणींमधील कामगारांनी मोठा संप पुकारला होता. शासकीय यंत्रणेनी या
संपाला क्रूर वागणूक दिली आणि संपकऱ्यांचे हत्याकांड केले. हा तो काळ होता जेव्हा
सर्वहारांची क्रांतिकारी सामुहिक कृती रशियात रोजमर्राचीच गोष्ट बनली होती.
अर्थातच १९१२ चा लगेच येणारा मे दिन हा त्यांच्याशी ऐक्य दर्शविणाऱ्या समर्थक
कृतीसाठीची एक संधी बनला. १९०५ सालच्या पहिल्या क्रांतीच्या अपयशानंतर हेलकावे
खाणाऱ्या हजारो रशियन कामगारांनी त्या मे दिनी काम बंद केले आणि ते सायबेरियन
कामगारांच्या शासन पुरस्कृत दडपशाहीला आव्हान देण्यासाठी रस्त्यावर उतरले. लेनीनने
त्या मे दिनाबद्दल लिहिले:
“संपूर्ण
रशियातील कामगारांचा मे दिनाचा संप, आणि त्याला जोडून रस्त्यावरील निदर्शने,
क्रांतिकारी घोषणा, कामगारांसमोर दिली गेलेली क्रांतिकारी भाषणे हे स्पष्ट
दर्शवतात की रशियाने पुन्हा एकदा उदयोन्मुख क्रांतिकारी काळात प्रवेश केला आहे.”
१९१७चा मे दिन,
जुलैचे दिवस आणि शेवटी ऑक्टोबर दिवस हे सर्व रशियन क्रांतीच्या विकासाचे टप्पे
आहेत, ज्यामध्ये त्झार या सर्वात अत्याचारी शासनकर्त्याला उलथवून टाकत
राज्यसत्तेवर रशियन कामगार वर्गाने कब्जा मिळवला. रशियन कामगार वर्गाने यशस्वी केलेल्या
महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीमध्ये भूमी तयार करण्यात व कामगार वर्गाला
क्रांतीसाठी प्रेरित करण्यात रशियातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मे दिनाचे फार
मोठे योगदान होते हे योग्य दृष्टीकोनातून समजून घेतले पाहिजे. ऑक्टोबर क्रांती हे
खरोखरच मे दिनाचे एक जिवंत क्रांतिकारी
मूर्त स्वरूप होते.
रशिया: क्रांतीची
पार्श्वभूमी
क्रांतीच्या वादळाच्या घडणीच्या काळात
रशियातील आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अगदी धक्कादायक अवस्थेत होती. लोकांच्या
अमानुष आर्थिक शोषणाच्या जिवावर देशात औद्योगिक आणि वित्तीय भांडवलाचे प्रचंड केंद्रीकरण
झाले होते. रशियाच्या आर्थिक पटलावर अवाढव्य
मक्तेदार उद्योगांचे साम्राज्य निर्माण झाले होते. कष्टकरी जनतेच्या हाल
अपेष्टांना पारावार राहिला नव्हता. त्झारच्या हुकुमशाही अत्याचारांनी कहर केला
होता. अशा परिस्थितीत कामगार वर्गाने आणि रशियन कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या
रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक) ने लेनीन यांच्या नेतृत्वाखाली
लोकांचा प्रतिरोध संघटित करण्यात आणि १९१७च्या रशियन क्रांतीच्या दिशेने कूच
करण्यात बिनीच्या दलाची म्हणजेच व्हॅनगार्डची भूमिका बजावली.
ऑक्टोबर
क्रांतीच्या इतिहासाच्या पानांमधून काही तथ्य गोळा करून रशियात त्या वेळेस
असलेल्या आर्थिक परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला, तर आपल्याला मार्क्सवाद-लेनीनवाद
आणि सर्वहारा क्रांतीची अटळता समजून घेता येईल.
रशियाचे साम्राज्यवादी अवस्थेत पदार्पण
१९व्या शतकाच्या
शेवटी आणि २०व्या शतकाच्या सुरवातीला इतर पुढारलेल्या भांडवलशाही देशांप्रमाणेच
आणि जवळ जवळ त्यांच्या बरोबरीने रशियाने देखील साम्राज्यवादी अवस्थेत पदार्पण केले
होते. परंतु लेनीनने म्हटल्याप्रमाणे, ‘साम्राज्यवादी रशियाची अनेक खास वैशिष्ठ्ये होती. देशाच्या मागास
अवस्थेबरोबरच उच्च पातळीचे औद्योगिक आणि वित्त भांडवल देखील अस्तित्वात होते.
मक्तेदार भांडवलशाहीच्या बरोबरीने देशात असे अनेक मोठे विभाग होते जिथे भांडवली
संबंधांची नुक्तीच सुरवात झाली होती. रशियातील आर्थिक विकासाची आणि त्याच्या
सामाजिक संबंधांची खास वैशिष्ठ्ये होती, भांडवलशाहीच्या सर्वोच्च विकसित रचना आणि
मक्तेदारी-पूर्व रचना यांचे आंतरसंबंध आणि भांडवली संबंधांमध्ये सरंजामी वेठबिगारीचे
झिरपलेल्या शक्तीशाली अवशेषाच्या अस्तित्वाचे वास्तव. रशियाची अर्थव्यवस्था बऱ्याच
प्रमाणात विदेशी वित्त भांडवलावर अवलंबून होती.’
पहिल्या जागतिक युद्धाच्या सुरवातीला रशियात दिडशेहून अधिक मक्तेदार
कंपन्या कार्यरत होत्या आणि त्या उद्योग क्षेत्रातील सर्व मूलभूत शाखा नियंत्रित
करीत होत्या. प्रॉडामेट, त्रुबोप्रोडाझा, प्रॉड्युगॉल आणि प्रॉडवॅगन या सारख्या राक्षसी
औद्योगिक संस्थांचे देशाच्या उद्योग क्षेत्रावर वर्चस्व होते. ऑक्टोबर क्रांतीच्या
आधीच्या काळात रशियन उद्योगांचे मक्तेदारी स्वरूप खालील गोष्टींवरून स्पष्ट दिसून
येते:
प्रॉडामेट या ३० मोठ्या धातूकाम आणि वित्तीय उद्योगांच्या विलिनीकरणातून
बनलेल्या कंपनीकडे देशातील धातूकाम उद्योगांमध्ये गुंतवलेल्या भांडवलापैकी जवळ जवळ
७० टक्के भांडवलावर आणि ८० टक्के धातू उत्पादनावर नियंत्रण होते. द रेल्वेमेन्स
युनियन ह्या अजून एका मक्तेदार व्यावसायिक आस्थापनेचे ७५ टक्के रेल उत्पादनावर
नियंत्रण होते. प्रॉडवॅगनचा देशातील जवळ जवळ सर्व रेलबोर्ड कार्सच्या उत्पादनांवर
कब्जा होता. प्रॉड्युगॉलचे ७० टक्के कोळसा विक्रीवर नियंत्रण होते. नोबेल-माझूट
कंपनीचे केरोसीन विक्रीपैकी ८० टक्के विक्रीवर नियंत्रण होते. साखर उत्पादक संघाचे
९० टक्के साखर उत्पादनावर आणि काडेपेट्या उत्पादकांचे ९५ टक्के काडेपेट्यांच्या
उत्पादनावर नियंत्रण होते.
युद्ध काळात १६ अब्ज रुबल्सची संपत्ती असलेल्या सुमारे ९०० नवीन संयुक्त-भांडवल
कंपन्या अस्तिस्वात आल्या. मक्तेदार विश्वस्त संस्थांचे गठन करण्यात आले,
ज्यांच्याकडे अब्जावधी रुबल्सचे भांडवल होते. अनेक वित्त कंपन्या एकत्र आल्या आणि
औद्योगिक मक्तेदार कंपन्यांच्या जोडीला मोठ्या बँकिंग संघांचा उदय झाला. त्यात
रुस्सो- एशियाटिक बँक, सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल कमर्शियल बँक आणि अझोव- डॉन बँक
यांचा समावेश होता. १२ सर्वात मोठ्या बँकांच्या हातात एकूण ८० टक्के बँक भांडवल
केंद्रीत होते. विलिनीकरण आणि संपादनातून झालेला केंद्रीकृत बँकिंग भांडवलाच्या उदयामुळे
रशिया त्या काळातील प्रमुख भांडवलशाही देशांमध्ये सर्वोच्च स्थानावर होता.
शासन यंत्रणा आणि भांडवली मक्तेदार कंपन्या एकमेकांमध्ये जास्तच गुंतत
चालल्या होत्या. त्याच वेळेला मक्तेदार भांडवलशाहीचे रूपांतर राज्य मक्तेदार
भांडवलशाहीमध्ये होण्याची प्रक्रिया सुरु होती, ज्या प्रक्रियेला युद्ध काळात
अर्थव्यवस्थेला, सैनिकी उद्दिष्टांसाठी एकत्रित आणि नियंत्रित करण्याच्या गरजेतून
वेग आला होता. वेगवेगळ्या औद्योगिक शाखांच्या व्यवस्थापनाचे केंद्रीकरण करण्यासाठी
राज्य नियामक संस्था अस्तित्वात आल्या.
ज्या प्रमाणात उद्योगांची मक्तेदारी
तयार झाली होती, बँकिंग भांडवलाचे केंद्रीकरण झाले होते आणि राज्य मक्तेदार भांडवलशाही
उच्च पातळीला पोहोचली होती, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन रशियातील
समाजवादी क्रांतीसाठी आवश्यक असलेली सर्व भौतिक, वस्तुगत परिस्थिती परिपक्व बनली.
समाजवादाकडे संक्रमण करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक परिस्थिती अस्तित्वात आली
होती. लेनीनच्या म्हणण्यानुसार, ‘पुढचे पाऊल असेल राज्य-भाडवलशाही मक्तेदारीकडून
समाजवादाकडे संक्रमण.’
रशियामधील
सरंजामी शोषक मागास अर्थव्यवस्था
रशियातील अजून एक नोंद घेण्यासारखी परिस्थिती म्हणजे उद्योग, वाहतूक आणि
बँकिंग मधील महत्वपूर्ण यशानंतरही युएस, ब्रिटन, जर्मर्नी आणि फ्रान्सच्या तुलनेत
रशिया कृषीच्या बाबतीत तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या अजूनही एक मागास देशच होता.
ग्रामीण रशियातील आर्थिक परिस्थिती अमानुष होती. गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक
होती. भांडवलदार आणि त्झारची सत्ता यांच्या पाठिंब्यामुळे अजूनही सर्व जमीन,
जमीनदारांच्या ताब्यात होती. दिवसेंदिवस जमीनदार आणि गरीब शेतकऱ्यांमधील
अंतर्विरोध तीव्र होत चालला होता.
पुढील आकड्यांवरून जमीनदारांची
जमिनीवरील पोलादी पकड दिसून येते: १९०५ मध्ये रशियातील ३०,००० सर्वात मोठ्या जमीनदारांकडे ७ कोटी देसियातिना
(१ देसियातिना = १.०९
हेक्टर), आणि १९१३ साली १० कोटी लोकसंख्येतील १ कोटी शेतकरी कुटुंबांकडे फक्त ७.५
कोटी देसियातिना जमीन होती. मोठ्या जमीनदारांकडे सरासरी २,३०० देसियातिना तर
शेतकरी कुटुंबांकडे सरासरी फक्त ७ ते १५ देसियातिना जमीन होती. खालच्या ५० टक्के
शेतकरी कुटुंबांकडे तर फक्त १ किंवा २ देसियातिना जमीन होती. शेतकऱ्यांना मोठ्या
जमिनदारांकडून अतिशय जाचक अटींवर जमीन भाड्यावर घ्यावी लागत होती. ग्रामीण भागातील
एकूण लोकसंख्येत ६५ टक्के संख्या ग्रामीण गरिबांची होती आणि ते टोकाच्या दारिद्र्याचे
बळी होते. रशियन खेडी जमिनीची भूक आणि जास्त भाडे यामुळे त्रासलेली होती.
२०व्या शतकाच्या सुरवातीला
लेनीनने देशातील ह्या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे:
‘जमीन
मालकीची सर्वात मागास व्यवस्था, एका बाजूला सर्वात जास्त अज्ञानी शेतकरी आणि
दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त प्रगत औद्योगिक आणि वित्त भांडवल.’ लेनीन पुढे म्हणतो, ‘रशियात भांडवलशाहीचा विकास एका विशिष्ठ परिस्थितीत झाला आहे आणि तिने सरंजामशाहीच्या
व वेठबिगारीच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांच्या जाळ्यात स्वत:ला अडकवून घेतलेले आहे.’
वरच्या
विधानात दिसून आलेली, देशातील सामाजिक आर्थिक संबंधांबाबतची लेनीनची सखोल
द्वंद्वात्मक समज, त्याला ह्या निष्कर्षापर्यंत घेऊन गेली की रशियात सर्वहारा
क्रांती अटळ आहे. त्याने लिहिले की, ‘रशियाच्या
मागासपणाने भांडवलदार वर्गाविरुद्धच्या सर्वहारा क्रांतीबरोबरच, कामगार वर्गाच्या
नेतृत्वाखाली जमीनदार वर्गाविरुद्ध होणाऱ्या किसान क्रांतीचा एक असाधारण मार्ग
दिलेला आहे.’
संप लढ्याबाबत लेनीनची भूमिका
हा एक इतिहासाचा भाग आहे की रशियन क्रांतीमध्ये आक्रमक, व्यापक आणि प्रदीर्घ संप
लढ्यांनी फार मोलाची भूमिका निभावली आहे. रशियातील कामगार वर्गाच्या लढ्याचे वर्णन
करण्याअगोदर आपल्याला हे नमूद करावे लागेल की कामगार वर्गाचा क्रांतिकारी
दृष्टीकोन आणि संप लढ्यांचा तीक्ष्णपणा या गोष्टींनी लेनीनचे लक्ष वेधून घेतले
होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दिवसांपासूनच त्याने संप लढ्यांवर
विशेषत्वाने लिहिले होते.
१८९९ मध्ये लेनीनने ‘संपावर’ हे पत्रक लिहिले.
त्याने कामगारांना वर्ग संघर्षाचा एक भाग म्हणून फक्त तातडीच्या आर्थिक
फायद्यांसाठी, त्यांच्या मालकांविरुद्धच नाही तर त्यांच्या लढ्याची दिशा संपूर्ण
भांडवलदार वर्ग आणि त्यांच्या सरकारविरुद्ध वळविण्यासाठी संप करायचा सल्ला दिला.
लेनीनचे असे मत होते की संपामुळे फक्त भांडवलदारांच्याच नाही तर त्यांच्या सरकारांच्या
खऱ्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या कामगार विरोधी धोरणांबाबत कामगारांचे शिक्षण होत
असते. त्याने नोंद केली की, “संप कामगारांना संघटित व्हायला शिकवतात, ते त्यांना दाखवतात की ते जेव्हा
संघटित होतात तेव्हाच भांडवलदारांविरुद्ध लढू शकतात. संप त्यांना एक संपूर्ण
कामगार वर्ग म्हणून, संपूर्ण मालक वर्गाविरुद्ध आणि सत्तेचा अमर्याद वापर करणाऱ्या
पोलीस यंत्रणेविरुद्ध विचार करायला शिकवतो. म्हणूनच समाजवादी, संपाला ‘युद्धाची शाळा’ म्हणतात, एक अशी शाळा ज्यात कामगार सर्व लोकांना, सर्व कष्टकऱ्यांना, सरकारी
अधिकाऱ्यांच्या आणि भांडवलाच्या जोखडापासूनच्या मुक्त करण्यासाठी, आपल्या शत्रूशी
युद्ध करायला शिकतात.”
लेनीनने संप कसे संघटित करावेत, त्यांचा प्रसार कसा करावा
आणि संप कृतींमध्ये यश कसे मिळवावे याबाबतही लिहिले आहे. त्याने नोंद केली आहे, ‘संप तिथेच यशस्वी होतात जिथे कामगार पुरेसे वर्ग-जागृत
असतात, जिथे त्यांना संप करण्याच्या योग्य क्षणाची निवड करता येते, जिथे त्यांना
आपल्या मागण्या पुढे कशा रेटायच्या ते कळते, आणि जिथे त्यांचे समाजवाद्यांशी
संपर्क असतात आणि त्यांना त्यांच्याकडून पत्रके आदी साहित्य मिळते. रशियात आजही
(१८९९) असे थोडेच कामगार आहेत, आणि कामगार वर्गाचे उद्दीष्ट सामान्य
कामगारांपर्यंत जाण्यासाठी, त्यांना समाजवादाची आणि कामगार वर्गाच्या लढ्याची ओळख
करून देण्यासाठी ही संख्या वाढली पाहिजे. हे समाजवाद्यांचे आणि वर्ग-जागृत
कामगारांचे कार्य आहे आणि ते समाजवादी, कामगार- वर्गीय पक्षाबरोबर संयुक्तपणे केले
पाहिजे.’
इथे आपल्याला कामगार वर्ग व त्याचा लढा
आणि रशियन क्रांती यांच्या परस्पर संबंधावर लेनीन किती लक्ष देत असे याचा
अर्थपूर्ण संदेश मिळतो. लेनीन! कामगार वर्गाचा महान शिक्षक, जगातील कष्टकरी लोकांचा
एतिहासिक नेता, आणि अर्थातच महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचा शिल्पकार!
कामगार
वर्गाचे रशियातील मजबूत अस्तित्व
लढाऊ कामगार वर्गाचे रशियातील मजबूत अस्तित्व ही एक
क्रांतीच्या उद्दीष्ट प्राप्तीसाठी योगदान देणारा महत्वाचा घटक होता. क्रांतीच्या
वर्षात- १९१७ मध्ये शहरी व ग्रामीण सर्वहारांची संख्या दीड कोटी होती. त्यात
कारखान्यातील कामगार ३५ लाख होते. सर्वहारा वर्ग एकूण लोकसंख्येच्या (१९१३मध्ये
१५.९२ कोटी) १० टक्के होता पण लेनीनने म्हटल्याप्रमाणे, “त्याची शक्ती एकूण लोकसंख्येच्या
तुलनेतील त्याच्या आकारात नाही तर ह्या वास्तवात आहे की सर्वहारा, भांडवलशाही
अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणि चेतासंस्थेत वर्चस्व राखणारी एक प्रभावी शक्ती आहे,
आणि सर्वहारा वर्ग भांडवलशाहीतील बहुतांश कामकरी लोकांच्या खऱ्या आर्थिक आणि
राजकीय हितांना व्यक्त करतो.”
शिवाय कामगार वर्गाचे केंद्रीकरण हे रशियाचे वैशिष्ठय
होते. १९१५ मध्ये ६० टक्के औद्योगिक कामगार मोठ्या कारखान्यांमध्ये काम करत होते,
ज्याची किमान कामगारसंख्या ५०० होती. ३५ टक्क्यांहून जास्त कामगार अशा
कारखान्यांमध्ये काम करत होते, ज्याची किमान कामगारसंख्या १००० पेक्षा जास्त होती.
देशाच्या सर्व महत्वाच्या केंद्रांमध्ये, मोठ्या उद्योगांमधले कामगारांचे मोठ्या
प्रमाणात झालेले केंद्रीकरण, भांडवलदारांकडून होणारे त्यांचे क्रूर शोषण, त्यांना
राजकीय अधिकारांपासून पूर्णपणे वंचित ठेवणारी व्यवस्था, आणि त्यांना हाताळण्याची
सत्ताधारी वर्गाची रानटी मनमानी पद्धत या सर्व गोष्टींमुळे रशियन सर्वहारांमध्ये
उच्च पातळीची राजकीय परिपक्वता आणि क्रांतिकारी चेतना निर्माण झाली. अर्थातच
त्झारच्या भयंकर अत्याचारांविरोधातील कामगार वर्गाच्या आक्रमक लढ्यांनी वर्गीय
शक्ती मजबूत करण्यात, वर्ग लढे तीक्ष्ण करण्यात आणि वर्ग युद्ध निर्णायक उंचीवर
नेण्यात खूप मोठी भूमिका निभावली.
रशियन कामगार
वर्गाचे अजून एक महान यश म्हणजे कामगार वर्गाचा सर्वात जास्त विश्वासाचा दोस्त
असलेल्या ग्रामीण सर्वहारा वर्गाशी, त्यांनी निर्माण केलेली मजबूत आघाडी. शिवाय
गाव आणि खेड्यांमधील अर्ध सर्वहारा वर्गाने सुद्धा कामगार वर्गाशी आघाडी केली. लाखो
गरीब शेतकऱ्यांना देखील सरंजामशाहीचे अवशेष नष्ट करण्यात आणि मोठ्या जमीनदारांना
दिवाळखोरीत काढण्यात रस होता. म्हणूनच त्यांनी देखील जवळ आलेल्या समाजवादी
क्रांतीत कामगार वर्गाला साथ दिली. शहरातील बिगर सर्वहारा कामकरी वर्गाचा सुद्धा
कामगार वर्गाला व्यापक पाठिंबा होता. १९१७ मध्ये रशियातील शहरांमध्ये २.२ कोटी
नागरिक, ज्यात कारागीर, फेरीवाले, निम्न स्तरावरील कार्यालयीन कर्मचारी होते, आर्थिक
आणि सामाजिक भांडवली शोषणाचे बळी होते.
समाजवादी क्रांतीमधील आघाडीची शक्ती असलेल्या, वर्ग चेतनेनी
भारलेल्या, लढाऊ कामगार वर्गाची भूमिका ही भांडवलशाही उलथवून समाजवादाची स्थापना
करण्यासाठी एक आवश्यक पूर्वअट आहे. पण कामगार वर्ग फक्त त्याच्या स्वत:च्या जोरावर समाजवादी क्रांती पूर्ण करू
शकत नाही. कामगार वर्गाच्या राजकीय पक्षाचे मजबूत अस्तित्व आणि त्याची बिनीच्या सैन्यदलाची
क्रांतिकारी भूमिका अनिवार्य आहे. कामगार वर्ग ही शिपायांची तुकडी आणि कामगार
वर्गाचा पक्ष हे बिनीचे सैन्यदल आहे. लेनीनने त्याच्या लिखाणामधून यावर वारंवार
जोर दिला आहे. खरे तर संप लढ्यांच्या राजकीय यशासाठी आवश्यक गोष्टी नमूद करताना
लेनीनने लिहिले की संपाच्या संघटकांचे ‘समाजवाद्यांशी
संबंध असले पाहिजेत आणि त्यांना त्यांच्याकडून पत्रक आदी साहित्य मिळवता आले
पाहिजे.’
वर्गीय
अंतर्विरोधाचा उदय आणि त्याची तीक्ष्णता
नोव्हेंबर १९०६ मध्ये स्टालीनने रशियातील वर्ग संघर्षावर
एक पत्रक लिहिले ज्यात त्यानी हे दाखवून दिले की कसे त्या काळात रशियन समाजाचे दोन
परस्पर विरोधी वर्गांमध्ये विभाजन झालेले होते. त्याच वेळेली स्टालीनने त्या काळात
रशियात उदयाला आलेल्या संघटित कामगार चळवळीचा आणि संप लढ्यांचा देखील आढावा घेतला.
त्या पत्रकातील निवडक भाग खाली दिला आहे:
‘आजचा समाज टोकाचा जटील बनला आहे. तो वर्ग आणि गटांची एक
मोठी गोधडी बनला आहे – मोठे, मध्यम भांडवलदार आणि किरकोळ मध्यम वर्ग, मोठा, मध्यम
आणि छोटा सरंजामी जमीनदार, अकुशल मजूर आणि कारखान्यातील कुशल कामगार, उच्च, मध्यम
आणि निम्न धर्मगुरु, उच्च, मध्यम आणि निम्न नोकरशहा, विभिन्न प्रकारचे बुद्धीजिवी
आणि अशाच प्रकारचे अन्य गट. हे आपल्या समाजाचे ढोबळ चित्र आहे.
१९०५ सालच्या जानेवारी आर्थिक संपांनी हे स्पष्टपणे दाखवून
दिले की रशिया खरोखरच दोन गटांमध्ये विभागलेला आहे. त्याच वर्षातले सेंट
पिटर्सबर्गमधले नोव्हेंबर संप आणि १९०६ मधील संपूर्ण रशियातले जून, जुलै संप यामुळे
दोन्ही गटांमधील नेत्यांची टक्कर झाली आणि आजचा वर्ग विरोध पूर्णपणे समोर आला. प्रतिक्रियावाद्यांकडून
प्रचंड छळ होऊन देखील, इथे सुद्धा स्थानिक कामगार संघटना संघटित केल्या जात आहेत,
स्थानिक युनियन्स एकत्र येऊन प्रादेशिक युनियन तयार करत आहेत, कामगार संघटनांसाठी
निधी जमवला जात आहे, कामगार संघटनांच्या छापखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे आणि
कामगार संघटनांची अखिल-रशिया काँग्रेस व अधिवेशने आयोजित केली जात आहेत...
परंतु जानेवारी आर्थिक संप, मार्ग बदलाची नांदी ठरले.
भांडवलदारांनी अखिल-रशिया संघ स्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मार्च
१९०५ मध्ये, मोरोझोवच्या पुढाकाराने त्यांनी मॉस्कोमध्ये एक सर्वसाधारण काँग्रेस
भरवली. ती भांडवलदारांची पहिली अखिल-रशिया काँग्रेस होती. काँग्रेसच्या ठरावांची
अंमलबजावणी सुरु झाली. ७२ भांडवलदारांनी सेंट पीटर्सबर्गमधल्या २ लाख कामगारांना
क्रूर टाळेबंदीची धमकी दिली. त्यांनी वेतन कपातीचा, कामाचे तास वाढवण्याचा,
सर्वहारांना कमजोर करण्याचा आणि त्यांच्या संघटना तोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कामगारांची ट्रेड युनियन
चळवळ वाढत होती, विकसित होत होती. इथे सुद्धा जानेवारी आर्थिक संपांचा (१९०५)
परिणाम जाणवत होता. चळवळीने भव्य जनचळवळीचे स्वरूप धारण केले, संपूर्ण देशात
कामगार संघटना गठित केल्या गेल्या- मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, वॉरसॉ, ओडेस्सा, रिगा, खारकोव आणि तिफलीस.
हे खरे आहे की प्रतिक्रियावाद्यांनी मार्गात अडथळे आणले, पण तरी देखील चळवळीच्या अपरिहार्यतेचा
विजय झाला आणि युनियन्सची संख्या वाढत गेली.
स्थानिक युनियन्सनंतर प्रादेशिक युनियन्स तयार झाल्या, आणि
मग तो टप्पा आला जेव्हा शेवटी १९०५च्या सप्टेंबरमध्ये कामगार संघटनांचे अखिल-रशिया
अधिवेशन घेण्यात आले. ते कामगार संघटनांचे पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाचा
इतर अनेक गोष्टींबरोबरच हा एक परिणाम झाला की त्यानी वेगवेगळ्या शहरांमधल्या
युनियन्सना एकत्र आणले आणि शेवटी कामगार संघटनांची काँग्रेस भरविण्यासाठीची तयारी
करण्यासाठी एक केंद्रीय मंडळ बनविण्यात आले.
ऑक्टोबरचे दिवस आले आणि कामगार संघटनांची ताकद दुपटीने
वाढली. वेतनवाढ, लहान कामाचा दिवस, कामाची जास्त चांगली परिस्थिती ह्या
मागण्यांसाठी आणि शोषणावर नियंत्रण आणि भांडवलदारांच्या संघटनांना विरोध ह्या
मुद्द्यांवरील लढ्यामुळे दिवसेंदिवस स्थानिक युनियन्समध्ये आणि शेवटी प्रादेशिक
युनियन्समध्ये वाढ झाली.
अशा प्रकारे आजचा समाज हा दोन मोठ्या छावण्यामध्ये विभागला
गेला आहे आणि प्रत्येक छावणी स्वतंत्र वर्गाच्या रुपात संघटित होत आहे. त्या
दोघांमध्ये भडकलेला वर्ग संघर्षाचा अजून विस्तार होत आहे आणि दिवसेंदिवस अधिक
तीव्र होत आहे आणि सर्व संबंधित गट ह्या दोन छावण्यांमध्ये एकत्रित होत आहेत.
म्हणजेच, त्यांच्या संघटनांच्या मदतीने आर्थिक संघर्ष आणि
ऑक्टोबरीस्ट पार्टीच्या सैद्धांतिक नेतृत्वाखालील राजकीय संघर्ष – हे बड्या
भांडवलदारांनी पुकारलेल्या भांडवलदारी वर्ग संघर्षाचे स्वरूप आहे.
व्यावसाय निहाय हिताच्या बरोबरीने सर्वहारांचे समान वर्गीय
हित पण आहे आणि ते म्हणजे समाजवादी क्रांती आणि समाजवादाची स्थापना. परंतु
सर्वहाराने संघटित आणि अभेद्य वर्ग म्हणून राजकीय सत्ता संपादन केल्याशिवाय तो
समाजवादी क्रांती घडवून आणू शकत नाही. म्हणूनच सर्वहाराने राजकीय संघर्ष करण्याची
गरज आहे आणि त्यासाठीच त्याला राजकीय पक्षाची आवश्यकता आहे, जो त्याच्या राजकीय
चळवळीचा सैद्धांतिक नेता असेल. आत्तापर्यंत ही भूमिका रशियन सोशल-डेमॉक्रॅटिक
पार्टीने निभावली आहे आणि त्यामुळेच त्याचे सैद्धांतिक नेतृत्व स्विकारणे हे
कामगार संघटनांचे कार्य आहे.
यात काही शंकाच
नाही की वर्ग संघर्ष वाढत्या जोमाने भडकणार आहे. सर्वहाराचे कार्य आहे त्या
संघर्षात व्यवस्था आणि संघटनेचा गाभा यांचा परिचय करून देणे. हे मिळवण्यासाठी
त्यांनी युनियन्स मजबूत करण्याची आणि संघटित होण्याची गरज आहे. आणि यात त्यांना
अखिल-रशियन ट्रेड युनियन काँग्रेस मदत करू शकते. सर्वहारांना संघटित आणि अभेद्य
वर्गामध्ये एकत्रित करण्यासाठी “बिगर पक्षीय कामगार काँग्रेस”ची नाही तर कामगारांच्या ट्रेड
युनियन्सच्या काँग्रेसची आज गरज आहे. त्याच वेळेला वर्ग संघर्षाचा सैद्धांतिक आणि
राजकीय नेता म्हणून आपला पक्ष मजबूत आणि तटबंदीने सुरक्षित करण्यासाठी सर्वहाराने सर्वार्थाने
प्रयत्न केले पाहिजेत.
रशियातील
संप लढ्यांचे लेनीने केलेले राजकीय विश्लेषण
१९०५च्या क्रांतीनंतरच्या काळातील रशियातील संप लढ्यांचे
लेनीन क्रांतिकारी अंतर्दृष्टीने निरिक्षण करत होता. ह्या काळातील संप लढ्यांना
लेनीनने इतके राजकीय महत्व दिले होते की १९१७च्या क्रांतीच्या आधीच्या कालखंडात
झालेल्या संप लढ्यांची तपशीलवार आकडेवारीची नोंद ठेवून राजकीय विश्लेषण तयार केले
होते. याचे सर्वप्रथम १९१३ मध्ये ‘कामगारांची पुस्तिका’ या नावाने प्रकाशन झाले आणि तिच्या
हजारो प्रतींचे वाटप झाले. तिच्या पहिल्या आवृत्तीची पोलिसांनी जप्त करण्याअगोदरच
एका दिवसात विक्री झाली. ती कामगारांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की १९१४मध्ये
लेनीनने तिची सुधारित आवृत्ती लिहिली. दोन्ही आवृत्या मिळून २५,००० प्रती विकल्या
गेल्या.
१८ वर्षांमध्ये रशियात दर वर्षी सरासरी साधारणपणे, ३४५,०००
संप होत होते. जर्मनीत (१८९९-१९१२) या १४ वर्षांची सरासरी दर वर्षी २२९,५०० आणि
ब्रिटनची (१८९३-१९१२) या २० वर्षांची सरासरी ३४४,२०० होती. रशियातील संप आणि
देशातील राजकीय घडामोडी यामधील संबंध स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी लेनीनने १९०५-०७
मधील प्रत्येक तिमाहीतील आकड्यांचे विश्लेषण केले. लेनीनने संपादित केलेल आकडे
पुढीलप्रमाणे आहेत:
१९०५मध्ये रशियात २८,६३,००० संप झाले ज्यात १६,६०,०००
कामगारांनी भाग घेतला. सर्व कामगारांपैकी अर्ध्या कामगारांनी वर्षात सरासरी २ वेळा
संप केले. पण ही सरासरी एका बाजूला सेंट पीटर्सबर्ग आणि वॉरसॉ, आणि दुसऱ्या बाजूला
इतर सर्व क्षेत्र यांच्यामधील मूलभूत फरक दाखवत नाही. सेंट पीटर्सबर्ग आणि वॉरसॉ
या दोन शहरांमध्ये मिळून रशियाची एकूण एक तृतियांश कामगार संख्या आहे. (१६,६०,०००
पैकी ५,५०,०००) परंतु त्यांनी एकूण संपांपैकी दोन तृतियांश संप केले. (२८,६३,०००
पैकी १९,२०,०००) १९०५मध्ये ह्या विभागातील प्रत्येक कामगार वर्षातून सरासरी ४ वेळा
संपावर गेला,. इतर विभागांमध्ये ९,४३,००० संप झाले, ज्यात ११,१०,००० कामगार सामील
झाले, म्हणजे वर उल्लेख केलेल्या दोन विभागांच्या पाव हिस्सा.
लेनीनने रशियातील प्रदेश, संप करणारी क्षेत्र, त्यांच्या
राजकीय आणि आर्थिक मागण्या आणि संपात मिळालेले यश अशा सर्व बाबींचे विश्लेषण केले.
सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को, वॉरसॉ आणि तीन दक्षिणेकडील विभाग यातील आकडेवारीकडे
पाहून लेनीनने नोंद केली, ‘तक्ता, मॉस्कोचा तुलनेनी अधिक मागासपणा, दक्षिणेकडील त्याहूनही जास्त
मागासपणा, आणि सेंट पीटर्सबर्ग आणि त्याच्या आसपासचा विभाग (रिगा सहित) आणि विशेषत: पोलंड येथील उल्लेखनीय कामगिरी
दाखवतो.’ धातूकाम, वस्त्रोद्योग, छपाई, लाकूडकाम, चामडे, रसायने, सिरॅमिक आणि अन्न
प्रक्रिया या क्षेत्रांमधील आकडे पाहून लेनीनने नोंद केली की, ‘हे पाहता असे दिसते की
धातूकामातील कामगार आघाडीवर आहेत आणि वस्त्रोद्योग कामगार पिछाडीवर, इतर कामगार तर
त्याहून जास्त मागे आहेत.’ लेनीनने संपांच्या मागणीनुसार देखील त्यांचे गट बनवले. राजकीय- ५९.९
टक्के संप, वेतनासाठी- २४.३ टक्के, कामाच्या तासांसाठी १०.९ टक्के आणि कामाच्या
परिस्थितीवर ४.८ टक्के.
लेनीन म्हटले, ‘यावरून हे सिद्ध होते की उदारमतवाद्यांची
गृहितके किती चुकीची आहेत, ज्याची आमच्या टीकाकारांनी पुनरोक्ती केली की ‘कामगारांनी त्यांच्या शक्तीबाबत
अतिशयोक्ती केली आहे.’ उलट लंप लढ्यांची आकडेवारी हेच दाखवते की त्यांनी आपल्याच शक्तीला कमी
आकले कारण त्यांनी संपाच्या आकड्यांचा वापर केला नाही.’ कामगार वर्गाच्या निंदकांना
वस्तुस्थितीवर आधारित समर्पक उत्तर देण्यासाठी लेनीनने असा अभ्यास केला.
परिस्थितीच्या वस्तुनिष्ठ परिपक्वतेची प्रगती
२०व्या शतकाच्या
सुरवातीला रशिया जागतिक साम्राज्यवादाच्या अंतर्विरोधांचे केंद्र बनला होता, साम्राज्यवादी
श्रृंखलेची सर्वात कमजोर कडी. इथे आगामी क्रांतीच्या आर्थिक आणि सामाजिक पूर्वअटी
परिपक्व झाल्या होत्या. याच काळात क्रांतिकारी चळवळीचे केंद्र पश्चिम युरोपकडून
रशियाकडे वळाले. देशात क्रांतिकारी परिस्थिती विकसित होऊन १९०५-०७ मध्ये पहिली रशियन
भांडवली लोकशाही क्रांती झाली. ही ऑक्टोबर समाजवादी क्रांतीची नांदी होती.
रशियन सर्वहारा
महान क्रांतिकारी परंपरेला सोबत घेऊन १९१७ मधल्या निर्णायक राजकीय युद्धाच्या
उंबरठ्यावर उभा होता. त्याच्या पाठिशी १९०५-०७ची जनतेची क्रांती आणि त्यानंतरच्या
सर्व वर्ग लढ्यांचा अनुभव होता. पहिल्या विश्वयुद्धाने (१९१४-१८) ही नवीन
क्रांतिकारी परिस्थिती परिपक्व होण्याच्या प्रक्रियेमध्ये तीव्र गती आणली,
ज्याच्यामुळे रशियातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय अंतर्विरोध आणि त्झारीस्ट सत्तेचे
सडलेपण उघड झाले. आणि त्यामुळे हे स्पष्ट झाले की भांडवलदार-सरंजामदारी व्यवस्था
अजूनही तशीच चालू ठेवणे देशासाठी आणि जनतेसाठी एक भयंकर अरिष्ट आहे.
पहिल्या
विश्वयुद्धामुळे उत्पादक शक्तींची प्रचंड हानी झाली होती. उद्योग, वाहतूक आणि कृषी
ही क्षेत्रे मोडकळीला आली होती. युद्धाच्या दरम्यान ३,८८४ मोठे उद्योग बंद पडले.
टक्केवारी काढायची झाली तर एकूण ९,७५० उद्योगांपैकी ३७.८ टक्के. इंजिन आणि रेल्वे
डब्ब्यांच्या कमतरतेमुळे रेलबोर्डला माल वाहतुकीचे ओझे पेलणे कठीण झाले होते.
उद्योगांना इंधन आणि कच्च्या मालाच्या तीव्र कमतरतेने घेरले होते. १९१३च्या मानाने
१९१६ मध्ये धान्य उत्पादन १६ लाख पूड्सनी (१ पूड=१६.३८
किलो) कमी झाले. पेऱ्याचे क्षेत्र देखील खूपच कमी झाले होते. रशियाचे विदेशी
सरकारांवरील आर्थिक अवलंबित्व प्रचंड वाढले होते. अशा परिस्थितीत देशाला अटळ अशा
आर्थिक अरिष्टापासून वाचविण्यासाठी एकाधिकारशाही आणि भांडवलशाही विरुद्ध निर्णायक
क्रांतिकारी पावले उचलणे आवश्यक बनले होते.
१९१५ मध्ये लेनीनने असा निष्कर्ष काढला की सर्वहारा क्रांती
अनेक देशांमध्ये किंवा अगदी एका देशात सुद्धा विजयी होऊ शकते. त्याने भांडवली
लोकशाही क्रांतीचे समाजवादी क्रांतीकडे संक्रमण होण्यासाठीचा शास्त्रीय सिद्धांत
विकसित केला. त्याने कामगार वर्ग आणि त्याच्या पक्षासाठीची धोरणे आणि रणनिती
स्पष्ट करून दाखवली. १९१६च्या पानगळीच्या दिवसांमध्ये कांतीपूर्व परिस्थिती
निर्माण झाली आणि नवीन लोकप्रिय क्रांती जवळ येऊ लागली. लेनीनने लिहिले: ‘युद्धाने असे काही तीव्र संकट निर्माण
केले, लोकांच्या भौतिक आणि नैतिक शक्तीवर इतका ताण निर्माण केला आणि त्यामुळे
संपूर्ण आधुनिक सामाजिक समाजजीवनावर असा आघात झाला, की मानवजातीने आता, जास्त उच्च
दर्जाच्या उत्पादन प्रणालीकडे वेगाने आणि अमूलाग्ररित्या संक्रमण करणाऱ्या
क्रांतिकारी वर्गाकडे आपले भविष्य सोपवावे की बुडणाऱ्या वर्गाकडे या दोघांमध्ये निवड
करायची आहे.’ युद्ध आणि त्यामुळे उद्योगांचे झालेले
सैनिकीकरण यामुळे उत्पादन आणि विक्रीचे, मक्तेदार वित्त भांडवलाच्या हातात अजूनच
जास्त केंद्रीकरण झाले.
१९१७ची फेब्रुवारी
क्रांती
आपण याची नोंद घेतली पाहिजे की १९०५च्या आधी सर्वात
महत्वाची घटना होती १९०३ मधल्या रशियन सोशल डेमॉक्रॅटिक पार्टीच्या लंडन
काँग्रेसमध्ये पक्षाचे बोल्शेविक (बहुमत) आणि मेन्शेविक (अल्पमत) अशा दोन
गटांमध्ये विभाजन झाले. या अस्वस्थ करणाऱ्या पक्षांतर्गत घडामोडीवर आपले विचार
व्यक्त करताना लेनीनने सुप्रसिद्ध रणनिती विषद केली की, लोकशाही समाजवादी लोकांनीच
भांडवली लोकशाही क्रांती करण्यासाठी काम करावे, ज्यासाठी कामगार-शेतकरी आघाडी खूप
आवश्यक आहे. या विषयावर लेनीनने १९०४ मध्ये ‘एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ आणि १९०५ मध्ये ‘लोकशाही समाजवाद्यांच्या जनवादी
क्रांतीमधील दोन रणनिती’ ही दोन पत्रके लिहिली.
रशियातील समाजवादी क्रांतीच्या मार्गातील एक महत्वाचे पाऊल
म्हणजे १९१७ ची फेब्रुवारी भांडवली लोकशाही क्रांती, जिने त्झारच्या हुकुमशाही
सत्तेला उलथवले. फेब्रुवारी भांडवली लोकशाही क्रांतीची निष्पत्ती म्हणजे त्झारच्या
पदच्युतीनंतर मेन्शेविक्स आणि समाजवादी क्रांतिकारी ह्या समन्वयवादी पक्षांच्या
पाठिंब्याने झालेली अस्थायी भांडवली सरकारची स्थापना. ह्या अस्थायी सरकारने
जनतेच्या हिताविरुद्ध साम्राज्यवादी धोरणे राबवायला सुरवात केली. क्रांतिकारी
रशियन सर्वहारा, भांडवली लोकशाही क्रांतीच्या टप्प्यावर थांबणे शक्यच नव्हते. लेनीनने
आधीपासून पाहिल्याप्रमाणे त्याचे समाजवादी क्रांतीत संक्रमण अटळ होते. फक्त
समाजवादी क्रांतीच सामाजिक प्रगतीच्या कठीण समस्या सोडवू शकतात- रशियातील
भांडवलदारी-जमीनदारी व्यवस्था नष्ट करणे, सर्व प्रकारच्या सामाजिक आणि राष्ट्रीय उत्पीडनाचा
खात्मा करणे आणि समाजवादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जाणे.
फेब्रुवारी क्रांतीनंतर ह्या दिशेने टाकलेले, मैलाचा दगड
ठरलेले पाऊल म्हणजे देशभरात व्यापक क्रांतिकारी लोकांच्या पुढाकाराने निर्माण
झालेले कामगारांचे, सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे सोवियेतस् आणि सैन्य दलातील सैनिकांच्या
समित्या आणि राखीव ठाणी. त्याच वेळेला कामगार संघटना आणि फॅक्टरी कमिट्या सर्व
ठिकाणी तयार झाल्या आणि कामगारांचे सैन्य दल आणि लाल रक्षक दलाची स्थापना करण्यात
आली. त्झारवरच्या विजयामुळे रशियातील सर्व वर्ग सक्रीय झाले. ऑक्टोबर क्रांतीच्या
झुंजार दिवसांमध्ये सोवियेतसनी निभावलेली निर्णायक क्रांतिकारी भूमिका हा आजवरच्या
इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय होता.
फेब्रुवारी
क्रांतीने लोकांना सतावत असलेला मूलभूत प्रश्न सोडवला नव्हता- साम्राज्यवादी
युद्धाचा शेवट आणि शांततेची स्थापना करणे, जमिनीच्या मालकीच्या केंद्रीकरणाची व्यवस्था
संपविणे, कामगारांच्या समस्या आणि राष्ट्राचे दमन नष्ट करणे.
एप्रिल प्रबंध
एप्रिल प्रबंधात रशियाच्या
परिवर्तनाचा आर्थिक कार्यक्रम सूत्रबद्ध करण्यात आला. त्याने राष्ट्रीय उत्पादन आणि
वस्तूंच्या वितरणावर कामगारांच्या नियंत्रणाची तरतूद केली. देशातील सर्व बँकांचे
एकाच बँकेत एकत्रीकरण आणि त्यावर सोवियेतसचे नियंत्रण, सर्व जमीनदारांच्या जमिनी
जप्त करून देशातील सर्व जमिनीचे राष्ट्रीयीकरण इत्यादी.
रशियन सोशल डेमॉक्रॅटिक पार्टीच्या एप्रिल २४-२९ (मे ७-१२)
ला झालेल्या सातव्या अखिल-रशिया अधिवेशनाने समाजवादी क्रांतीची तयारी करण्यामध्ये
महत्वाची भूमिका निभावली. पक्ष काँग्रेस इतक्याच महत्वाच्या ह्या अधिवेशनाने
समाजवादी क्रांतीकडे संक्रमण करण्याच्या लेनीनच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले आणि
क्रांतीच्या सर्व मूलभूत मुद्द्यांवर पक्षाचे धोरण तपशीलवार नमूद केले- युद्ध,
अस्थायी सरकार, सोवियेतस आणि कृषी विषयक व राष्ट्रीय प्रश्न. अधिवेशनात पक्षाच्या
एका नवीन केंद्रीय कमिटीची निवड करण्यात आली, जिचे प्रमुख लेनीन होते.
लेनीनचे युक्तीवाद हे २६ जुलै ते ३ ऑगस्ट (ऑगस्ट ८-१६)
दरम्यान पेट्रोग्राड येथे अर्ध-कायदेशीर पद्धतीने झालेल्या रशियन सोशल डेमॉक्रॅटिक
पार्टीच्या सहाव्या काँग्रेसने मंजूर केलेल्या सर्व ठरावांचा आधार होते. लेनीनने भूमीगत
असूनही (तो राझलीव येथे होता) केंद्रीय कमिटीच्या माध्यमातून काँग्रेसला
मार्गदर्शन केले. काँग्रेसमध्ये एम स्वेर्दलोव आणि जे व्ही स्टालीन यांनी अहवाल
मांडले. काँग्रेसने लेनीनने पक्षासाठी तयार केलेल्या नव्या रणनितीला मंजूरी दिली
आणि पक्षाला क्रांतीसाठी तयार होण्याचा निर्देश दिला. लेनीनने त्या आधी एप्रिल
प्रबंधात प्रस्तावित केलेल्या आर्थिक मंचाला काँग्रेसने मंजूरी दिली. समाजवादी
क्रांतीच्या विजयासाठीची मुख्य पूर्वअट असलेल्या सर्वहारा आणि गरीब शेतकऱ्यांच्या
आघाडीच्या महत्वावर काँग्रेसने भर दिला. काँग्रेसने निवडलेल्या लेनीनच्या
नेतृत्वाखालील नव्या केंद्रीय कमिटीने आपल्या जाहीरनाम्याद्वारे, लोकांना
प्रतिक्रांतीविरुद्ध निर्णायक लढा देण्यासाठी तयार होण्याचे आवाहन केले.
लेनीनचा एप्रिल प्रबंध आणि अधिवेशनाचे सर्व ठराव आणि
त्याच्याही पुढे, ‘सर्व सत्ता
सोवियेतसकडे’ ही घोषणा यांनी सुसज्ज झालेल्या बोल्शेविक्सनी आपली सर्व शक्ती,
जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि त्यांना समाजवादी क्रांतीसाठी संघटित करण्यासाठी
पणाला लावली. पक्ष, एप्रिल प्रबंधात लेनीनने सांगितलेल्या मंचाभोवती एकत्रित झाला.
त्यानी जनतेमध्ये व्यापक आणि खुले राजकीय आणि संघटनात्मक काम निर्माण केले आणि
कामगार वर्गातील सर्वात जास्त सक्रीय सभासदांना आपल्या फळीत आणले. एप्रिल
अखेरपर्यंत त्याची सदस्यता १ लाखावर गेली आणि तो रशियन सर्वहारांचा व्यापक राजकीय
पक्ष बनला.
भांडवली लोकशाही क्रांतीकडून समाजवादी क्रांतीकडे संक्रमण करण्यासाठी एक ठोस आणि
सैद्धांतिक दृष्ट्या भक्कम असा लढ्याच्या कार्यक्रम लेनीनने तयार केला होता. मार्चमध्ये
लिहिलेल्या पत्रात आणि एप्रिल प्रबंधात त्याने समाजवादी क्रांतीच्या विजयासाठी
पक्षाने घ्यायच्या मार्गाबाबत सविस्तर लिहिले आहे. क्रांतीची चालक शक्ती आणि
पक्षाची रणनिती आणि डावपेच याबाबतही त्याने स्पष्ट आखणी केली होती. लेनीनच्या
रणनितीप्रमाणे कामगार वर्ग आणि गरीब शेतकरी यांच्या क्रांतिकारी आघाडीची शक्ती,
भांडवलदार आणि जमीनदारांची सत्ता उलथवून टाकेल. भांडवलशाहीकडून समाजवादाकडे
संक्रमण करण्यासाठी त्या काळातील रशियातील सर्वोत्तम राजकीय संघटन- सोवियेत
रिपब्लिकची स्थापना करण्याच्या कार्याला कार्यक्रमात अतिशय महत्व देण्यात आले आहे.
हे लक्षात
ठेवणे आवश्यक आहे की लेनीनने त्या वेळेस ताबडतोब अस्थायी सरकार उलथवून टाकण्याची
हाक दिली नव्हती कारण त्या सरकारला सोवियेतसचे समर्थन होते. ह्या ऐतिहासिक क्षणाचे
वैशिष्ठ्य लक्षात घेऊन त्याने दोन्ही धोक्यांविरुद्ध इशारा दिला होता, एक, अस्थायी
सरकारवर थेट वार करण्याची अती-डावी साहसवादी चूक आणि दुसरी, त्याच्यावर भरोसा
ठेवण्याची उजवी-संधीसाधू वृत्ती. त्याने घोषणा केली– “अस्थायी सरकारला पाठिंबा नाही.”
जुलैचे संकट: लक्षणीय कामगार वर्गीय
लढे
अस्थायी सरकारवर जुलै २ (१५)पासून एक नवीनच संकट सुरु आले.
जुलै ३ (१६)ला पेट्रोग्राडला कामगारांचे आणि सैनिकांचे ‘सर्व सत्ता सोवियेतसकडे’ ह्या मागणीसाठी उस्फुर्त निदर्शन सुरु झाले. हा लढा शांततापूर्ण व सुसंघटित रहावा म्हणून
रशियन सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी (बोल्शेविक)ने जनतेच्या या उस्फुर्त लढ्याचे
नेतृत्व केले. जुलै ४ (१७) ला पेट्रोग्राडमध्ये एक शांततापूर्ण निदर्शन आयोजित
करण्यात आले ज्यात ५ लाख लोक सहभागी झाले. अस्थायी सरकारच्या आदेशानुसार आणि
सोवियेतसच्या अखिल-रशिया कार्यकारी कमिटीत असलेल्या एसआर-मेन्शेविक्सच्या प्रतिनिधींना
माहिती देऊन निदर्शकांवर सेना अधिकारी आणि कॅडेटसनी सशस्त्र हल्ला केला. ५६ लोक
मारले गेले आणि ६५० जखमी झाले.
जून १८ (जुलै १)ला सुमारे ५ लाख कामगार आणि सैनिकांनी ‘सर्व सत्ता सोवियेतसकडे’, ‘युद्धाचा धिक्कार असो’, ‘दहा भांडवलदार मंत्र्यांचा धिक्कार असो’ ह्या घोषणा देत निदर्शने केली.
अस्थायी
सरकारने ऑगस्ट १२- १५ (२५- २८) दरम्यान मॉस्को येथे एक तथाकथित परिषद घेतली.
त्यांचे उद्दीष्ट होते कॉर्निलोव, कॅलेदीन, केरेन्स्की, मिलियुकोव, पुरीश-केविच,
रॉडझिआंको, रियाबुशिन्स्की आणि इतरांच्या नेतृत्वाखालील रशियन प्रतिक्रांतीकारी
ताकदींना संघटित करणे. बोल्शेविक आवाहनांना प्रतिसाद देऊन मॉस्कोच्या कामगार
वर्गाने ह्या प्रतिक्रियावाद्यांच्या आणि कारस्थान्यांच्या काँग्रेसला ४ लाख
कामगारांचा निषेध संप आयोजित करून उत्तर दिले. मॉस्कोच्या कामगारांना कीएव्ह,
खारकोव, निझनी नोव्हगोरॉड (आता गॉर्की), एकाटरीनबर्ग (आता स्वेर्डलोवस्क) आणि इतर
शहरांमध्ये कामगारांनी संप करून आणि निषेध मोर्चे काढून पाठिंबा दिला.
ऑक्टोबर समाजवादी क्रांतीची पहाट
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
संबंधांना कवेत घेणारे एक देशव्यापी संकट देशात घोंघावायला लागले होते. भांडवलदारी
अस्थायी सरकारच्या धोरणांमुळे देश एका राष्ट्रीय आपत्तीच्या काठावर उभा होता.
उद्योग आणि वाहतुकीची दुरावस्था वाढली होती. जीवनावश्यक वस्तू मिळण्यातील अडचणी
वाढल्या होत्या. सकल औद्योगिक उत्पादन १९१६ सालपेक्षा १९१७ मध्ये ३६.४ टक्क्यांनी कमी
झाले होते. मार्च ते ऑक्टोबर १९१७ दरम्यान देशभरामध्ये ८०० पेक्षा जास्त कंपन्या
बंद पडल्या. लोखंड, पोलाद, कोळसा आणि पेट्रोलियमचे उत्पादन तीव्रपणे घसरले होते. उरल्स,
डॉनबास आणि इतर औद्योगिक केंद्रांमध्ये शरद ऋतूत जवळ जवळ ५० टक्के कंपन्या बंद
पडल्या. त्याच वेळेला जीवनावश्यक खर्च तीव्रतेने वाढत होता. १९१३ च्या तुलनेत
कामगारांचे खरे वेतन ४० ते ५० टक्क्यांनी खाली आले होते. ऑक्टोबर १९१७ मध्ये
रशियाचे राष्ट्रीय कर्ज ५ कोटी रुबल्सपर्यंत पोहोचले होते. त्यात विदेशी
सरकारांकडून घेतलेले कर्ज १.१२ कोटी रुबल्स होते. देशाला आर्थिक दिवाळखोरीचा धोका
निर्माण झाला होता.
१९१७च्या पानगळीच्या वेळेस सर्व
ठिकाणी कारखाना पातळीवर त्यांच्या कमिट्यांनी आयोजित केलेले कार्यक्रम, कामगार
संघटनांची वाढती संख्या, आणि युनियन्सवरचा बोल्शेविक्सचा प्रभाव या वरून
सर्वहारांच्या वर्गीय जाणिवांचा विकास दिसून येतो. ऑक्टोबर १९१७ मध्ये २० लाखांपेक्षा
जास्त कारखान्यातील कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी कामगार संघटनामध्ये आलेले
होते. त्या वेळच्या संपाची चळवळ दुर्मीळ आग्रहीपणा, उच्च कोटीचे संघटन आणि राजकीय
निर्धार यामुळे उल्लेखनीय ठरली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मॉस्को आणि
पेट्रोग्राडच्या सर्वहारांनी, डॉनबासच्या खाणकामगारांनी, उरल्सच्या धातू
कामगारांनी, बाकूच्या तेल कामगारांनी, मध्यवर्ती औद्योगिक विभागांमधल्या गिरणी
कामगारांनी आणि ४४ वेगवेगळ्या रेल्वे लाईन्सवरच्या रेल्वे कामगारांनी संप पुकारले
होते. या दोन महिन्यांमध्येच १० लाखांहून जास्त कामगारांनी ह्या भव्य संपांमध्ये
भाग घेतला. बऱ्याच कारखान्यांमध्ये उत्पादन आणि वितरणावर कामगारांनी नियंत्रण
मिळवले होते. कामगारांची चळवळ सर्वोच्च कोटीच्या परिपक्वतेमुळे क्रांतीच्या
उंबरठ्यापर्यंत पोहोचली असल्याचे हे लक्षण होते. राजकीय आणि आर्थिक संघर्षांच्या
परिणामी कामगार वर्गाला सत्ता आपल्या हातात घ्यावीच लागली.
कामगार वर्गीय चळवळीने, ज्याचे
स्वरूप समाजवादी होते, शेतकऱ्यांच्या जनवादी चळवळीला आपल्या सोबत ओढले. ऑक्टोबर
१९१७ पर्यंत जमीनदारांविरुद्ध जवळ जवळ ४२५० उठाव झाले होते. ऑगस्टमध्ये
शेतकऱ्यांचे ६९० लढे झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये हा आकडा १३०० वर
गेला. जेव्हा अस्थायी सरकारने शेतकऱ्यांचे उठाव दाबून टाकण्यासाठी शिपायांची तुकडी
पाठवली तेव्हा शेतकरी अजूनच जास्त संतप्त झाले. त्यांनी जमीनदारांच्या मालमत्ता
ताब्यात घेतल्या, जाळल्या आणि त्यांचा विध्वंस केला आणि ज्यांच्याबद्दल सर्वात
जास्त घृणा वाटत होती, त्या जमीनदारांवर वैयक्तिक सूड उगवला.
ह्याच बिंदूवर लाखो सैनिक क्रांतीच्या बाजूला आल्यामुळे क्रांतीला
फार मोठी चालना मिळाली, विशेषत: पेट्रोग्राड, मॉस्को आणि अन्य शहरातल्या आणि उत्तर व पश्चिम सीमेवरच्या
गॅरिसन्सनी, बाल्टिक आरमारातल्या नाविकांनी त्यांचे निवडलेले प्रतिनिधी मंडळ,
त्सेंट्रोबाल्ट याच्या माध्यमातून उघडपणे घोषणा केली की ते अस्थायी सरकारची हुकुमत
मानत नाहीत.
‘येऊ घातलेली आपत्ती आणि त्याचे निराकरण’ (सप्टेंबर), ‘संकट परिपक्व झाले आहे’ (सप्टेंबर अखेर), आणि ‘बोल्शेविक्स राज्यसत्ता ताब्यात
ठेवू शकतील का?’ (सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबर १) या
लिखाणांमध्ये आणि पक्षाच्या केंद्रीय कमिटी, पेट्रोग्राड कमिटी आणि मॉस्को कमिटीला
लिहिलेल्या पत्रांमध्ये (सप्टेंबर आणि ऑक्टोबर) लेनीनने हे स्पष्ट केले की संकट
परिपक्व झाले होते. तळातील लोक आता जुन्या पद्धतीने जगू इच्छित नव्हते. आणि वरच्या
लोकांना यापुढे जुन्या पद्धतीने त्यांच्यावर राज्य करणे शक्य नव्हते.
महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचा विजय
१९१७च्या शरद ऋतूपर्यंत रशियात
समाजवादी क्रांतीच्या विजयासाठीची परिस्थिती परिपक्व झालेली होती. तिचा विजय
राजकीय आणि संघटनात्मक कार्य आणि बोल्शेविक पार्टीची अचूक रणनिती यावर अवलंबून
होती. सप्टेंबर १९१७ मध्ये लेनीनने रशियन सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी (बोल्शेविक)च्या केंद्रीय
कमिटी आणि पेट्रोग्राड व मॉस्को कमिट्यांना ‘बोल्शेविक्सनी सत्ता हातात घेतलीच पाहिजे’ या शिर्षकाचे आणि दुसरे ‘मार्क्सवाद आणि उठाव’ या शिर्षकाचे पत्र लिहिले.
या पत्रांमध्ये त्याने पक्षाने सशस्त्र उठावासाठी आवश्यक ती
सारी तयारी करण्याची कल्पना पुढे केली. त्याने केंद्रीय कमिटीला सत्ता ‘बळजबरीने ताब्यात’ घेण्याच्या कारस्थानांच्या आणि
साहसवादाच्या विरुद्ध इशारा देखील दिला. ‘विजयी होण्यासाठीचा उठाव कारस्थानांवर नाही,
पार्टीवर नाही तर प्रगत वर्गावर अवलंबून असतो... उठावाने लोकांच्या क्रांतिकारी
उद्रेकावर भरोसा ठेवला पाहिजे. उठावाने पुढे जाणाऱ्या क्रांतीच्या इतिहासातील त्या
निर्णायक टप्प्यावर भरोसा ठेवला पाहिजे. लेनीनने त्या क्षणांची व्याख्या अशी केली
आहे: लोकांमधील प्रगत फळीचे कार्य सर्वोच्च पातळीवर
आहे. आणि शत्रूच्या फळीतील लोकांची आणि क्रांतीच्या कमजोर, उत्साह
विहीन आणि अस्थिर मित्रांची दोलायमान अवस्था टोकाला पोहोचली आहे.’
त्याने शिफारस केली
की पक्षाने उठावाला एक कला मानले पाहिजे, आणि त्याने उठावासाठीच्या
सैनिकी-तांत्रिक तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे, वर्ग शक्तींचे प्रचंड
प्राबल्य निर्माण करण्याचे आणि निर्णायक क्षणी, निर्णायक जागी, सर्वप्रथम
पेट्रोग्राड आणि मॉस्को येथे निर्णायक धक्का देण्याचे आवाहन केले. लेनीनने
उठावासाठीची एक ठोस योजना बनवली ज्यात उठावांच्या शाखांच्या मुख्यालयाची स्थापना करणे, शक्तींना
तैनात करणे, मुख्य शक्तींची (लाल सैन्याच्या तुकड्या, क्रांतिकारी पलटणी आणि
आरमार) कळीच्या जागी नेमणूक करणे- टेलिफोन आणि टेलिग्राफ, रेल्वे स्टेशन्स आणि
पूल, अस्थायी सरकार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अटका, आणि प्रतिक्रांतीच्या
कोणत्याही सशस्त्र कृतीचा प्रयत्न झाल्यास त्याच्या निर्णायक पराजयाची निश्चिती या
पावलांचा समावेश होता.
१० (२३)
ऑक्टोबरला सशस्त्र उठावाच्या प्रश्नावर पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या सत्रात चर्चा
करण्यात आली. लेनीनने, जो फिनलंडवरून बेकायदेशीर रित्या पेट्रोग्राडला परतला होता,
आपला अहवाल मांडला. दहा विरुद्ध दोन मतांनी केंद्रीय कमिटीने लेनीनने मांडलेला
सशस्त्र उठावाचा ठराव मंजूर केला. केंद्रीय कमिटीने सर्व पक्ष शाखांना ह्या
ठरावाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले रोजमर्राचे काम करण्याचा सल्ला दिला. ह्या
केंद्रीय कमिटीच्या सत्रात लेनीनच्या नेतृत्वाखाली नवीन राजकीय मंडळाची निवड
करण्यात आली.
१२ (२५) ऑक्टोबरला पेट्रोग्राड सोवियेतच्या कार्यकारी समितीने
सशस्त्र उठावाची तयारी करण्यासाठी सैनिकी क्रांतिकारी कमिटीची निर्मिती करण्याबाबत
एक अधिनियम मंजूर केला. केद्रीय कमिटीचा सशस्त्र उठावाचा ठराव पक्षाच्या मॉस्को
प्रांतिक मंडळाने ऑक्टोबर १४ (२७) ला आणि पेट्रोग्राड कमिटीने ऑक्टोबर १५ (२९) ला
एकमताने मंजूर केला. दोन्ही कमिट्यांनी एक विशिष्ठ कृती कार्यक्रम मंजूर केला.
ऑक्टोबर १६ (२९) ला केंद्रीय कमिटीने पेट्रोग्राडचे आघाडीचे पक्ष कार्यकर्ते, कामगार
संघटना आणि सैन्य दलाचे प्रतिनिधी यांची एक विस्तारित बैठक घेतली, त्यात केंद्रीय
कमिटीचा सशस्त्र उठावाचा ठराव सादर करून त्याला संमती देण्यात आली.
लेनीनची हद्दपार भूमीगत स्थितीतून वापसी
२४ ऑक्टोबरला लेनीन, जो अजूनही भूमीगत राहून काम करीत
होता, त्याला उठावाच्या भवितव्याबाबत एक चिंताजनक संकेत मिळाला. त्याने २४
ऑक्टोबरला (६ नोव्हेंबर) केंद्रीय कमिटी सदस्यांना लिहिले की: ‘माझ्या सर्व ताकदीनिशी मी कॉम्रेडसना विनंती करतो की
त्यांनी हे जाणून घ्यावे की आता सर्व काही एका धाग्यावर टांगलेले आहे. आपल्याला
अशा प्रश्नांनी घेरले आहे, जे अधिवेशने किंवा काँग्रेस सोडवू शकणार नाहीत (अगदी
सोवियेतसची काँग्रेससुद्धा), परंतु हे प्रश्न फक्त जनता, सशस्त्र लोकांचा संघर्षच
सोडवू शकतील... आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आजच्या सायंकाळीच किंवा रात्रीच
सरकारला अटक करावी लागेल, हे अगोदर केल्यानंतर शिकाऊ अधिकाऱ्यांची शस्त्रे काढून
घ्यावी लागतील (त्यांनी विरोध केल्यास त्यांचा पराजय करावा लागेल), आणि इतरही अनेक
गोष्टी कराव्या लागतील.’ पुढे लेनीन म्हणाला, ‘आपल्याला वाट बघता येणार नाही! आपण सर्व घालवून बसू!’ ‘सरकार लडखडतय. कोणत्याही किंमतीवर त्याला शेवटचा धक्का
द्यावाच लागेल... आता कृतीला अधिक विलंब करणे जीवघेणे ठरेल.’
ऑक्टोबर २४ (६ नोव्हेंबर)च्या संध्याकाळी, लेनीन परतला आणि
त्याने सशस्त्र लढ्याचे थेट नेतृत्व हातात घेतले. केंद्रीय कमिटीने त्याचे आगमन
सर्व जिल्ह्यांना, कारखान्यांना आणि सैन्य दलाच्या तुकड्यांना कळवले. लेनीन
त्यांचा म्होरक्या म्हणून लढाईच्या मैदानात स्वत: उपस्थित आहे हे पाहून, क्रांतीकारी शक्ती आक्रमकपणे
निर्णायक रित्या चाल करून गेल्या.
२४ ऑक्टोबरला
रात्रभर चाललेल्या ह्या लढ्यादरम्यान, लाल रक्षकांच्या वेगवेगळ्या युनिटसनी
पेट्रोग्राड, मॉस्को इत्यादींच्या कळीच्या जागा ताब्यात घेतल्या. अशा काही जागा
होत्या, मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत, रेल्वे स्टेशन्स, मध्यवर्ती वीज निर्मिती
केंद्र, स्टेट बँक, आणि बंधाऱ्यावरील पूल.
ऑक्टोबर
क्रांतीचा अंतिम विजय
२५ ऑक्टोबरच्या (७ नोव्हेंबर) सकाळपर्यंत राजधानी बंडखोर
लोकांच्या ताब्यात आली. २५ ऑक्टोबरच्या (७ नोव्हेंबर) सकाळपर्यंत मॉस्को
प्रांतिक मंडळाने लेनीनचे
रशियाच्या नागरिकांसाठीचे आवाहन जारी केले: ‘अस्थायी सरकारला पदच्युत करण्यात आले आहे. राज्यसत्ता
कामगारांच्या सोवियेतची पेट्रोग्राड शाखा आणि पेट्रोग्राड सर्वहारा व राखीव
सैन्यदलाचे प्रतिनिधित्व करणारी क्रांतिकारी सैन्यदल कमिटी यांच्याकडे आली आहे.’
‘ज्या उद्दीष्टासाठी लोक लढले- तातडीची लोकशाही शांतता, जमिनीच्या खाजगी
मालकीची समाप्ती, उत्पादनावर कामगारांचा ताबा, आणि सोवियेत सत्तेची स्थापना, हे
सर्व साध्य झाले आहे.’
‘कामगार, सैनिक आणि शेतकऱ्यांची क्रांती झिंदाबाद!’
२५ ऑक्टोबर (७ नोव्हेंबर)च्या दुपारी क्रांतिकारी शक्तींनी मॅर्रिन्स्की
प्रासादाचा ताबा घेतला, जिथे पराजित सरकारच्या लोकसभेचे सत्र चालू होते, ते भंग
करण्यात आले. नावाड्यांनी सैनिकी बंदरांचा ताबा घेतला, जिथल्या आरमार प्रमुखाला
अटक करण्यात आली.
दुपारी पेट्रोग्राड सोवियेतचे विशेष सत्र सुरु झाले. तिथे अस्थायी
सरकारच्या पदच्युतीची घोषणा करण्यात आली, त्यानंतर लेनीनने सद्यस्थितीवरील अहवाल
मांडला. दरम्यानच्या काळात क्रांतिकारी युनिटसनी हिवाळी राजवाड्याच्या दिशेने कूच
केले व त्यांनी आत धडक मारली. २६ ऑक्टोबर (८ नोव्हेंबर)च्या पहाटे हिवाळी राजवाडा
ताब्यात घेण्यात आला आणि अस्थायी सरकारला अटक करण्यात आली.
२५ ऑक्टोबर (७ नोव्हेंबर)च्या रात्री, सोवियेतस आणि सैनिकांच्या
प्रतिनिधींची दुसरी अखिल रशियन काँग्रेस सुरु झाली. काँग्रेसने सर्व सत्ता
सोवियेतसकडे वर्ग झाल्याची घोषणा केली. २६ ऑक्टोबर (८नोव्हेंबर)ला लेनीनच्या
अहवालावरून सोवियेत काँग्रेसने शांततेचे फर्मान आणि जमिनीबाबतचे फर्मान जारी
केले.
शांततेच्या फर्मानामध्ये, सोवियेत सत्तेने युद्धात सहभागी असलेल्या
देशांना ताबडतोब कोणत्याही सामिलीकरण किंवा नुकसान भरपाई शिवाय, न्याय्य आणि लोकशाही
शांततेसाठी वाटाघाटी सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. जमिनीबाबतच्या फर्मानाद्वारे
जमिनदारी मालकी बरखास्त करण्यात आली. जमीनदारांची मालमत्ता आणि राज्यसत्ता, मठ आणि
चर्चच्या जमिनी, सर्व पशुधन, अवजारे आणि इमारती, आणि त्यासंबंधातल्या सर्व गोष्टी
जमीनदारांना कोणतीही नुकसानभरपाई न देता ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना देण्यात आल्या.
जमिनीच्या खाजगी मालकीचा अधिकार समाप्त करण्यात आला आणि त्याजागी जमिनीची
राष्ट्रीय मालकी प्रस्थापित करण्यात आली. ह्या फर्मानाच्या अंमलबजावणीमुळे
शेतकऱ्यांना १५ कोटी हेक्टर्सपेक्षा जास्त जमीन मिळाली आणि त्यांची जमीनदारांना
एकूण ७० कोटी गोल्ड रुबल्स इतके वार्षिक भाडे देण्यापासून सुटका झाली.
काँग्रेसने अखिल
रशिया केंद्रीय कार्यकारिणी कमिटीची निवड केली आणि पहिल्या सोवियेत सरकारची-
लेनीनच्या नेतृत्वाखालच्या लोकांच्या कॉमिस्सार्स कौन्सिलची स्थापना केली. सोवियेत
सरकारच्या स्थापनेबरोबरच सोवियेत राज्याची, कामगार वर्गाच्या राज्याची बांधणी सुरु
झाली.
सोवियेत समाजवादी राज्याची स्थापना
ऑक्टोबर क्रांतीच्या विजयामुळे
कम्युनिस्ट पक्ष सत्ताधारी पक्ष बनला. आजतागायत उत्पीडित आणि शोषित असलेला कामगार
वर्ग प्रबळ वर्ग बनला आणि एका नवीन राज्याची स्थापना झाली- सर्वहारांचे राज्य.
समाजवादी क्रांतीचे पहिले कार्य होते जुनी शासकीय यंत्रणा नष्ट करून नवीन यंत्रणा
निर्माण करणे. सैन्य, न्यायालये, पोलीस आणि नोकरशहा- अधिकाऱ्यांची यंत्रणा नष्ट
केल्यामुळे शोषक वर्ग आणि त्यांच्या पक्षांकडून, जुनी शोषक व्यवस्था पुन्हा
प्रस्थापित करण्याची सर्व शक्तीशाली साधने हिरावून घेतली गेली.
सोवियेत सत्तेने विजयाकडे कूच केल्यामुळे
झालेल्या बदलांचा आढावा घेताना, मार्च १९१८ मध्ये लेनीन लिहितो: “भांडवलदारांना उलथवून टाकल्यानंतर, काही
आठवड्यांमध्येच आम्ही गृह युद्धातील त्यांच्या खुल्या प्रतिरोधाचा खात्मा केला. बोल्शेविक्सची
विजयी मिरवणूक आम्ही आपल्या विशाल देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत नेली.
त्झार आणि भांडवलदारांकडून उत्पीडित झालेल्या सर्वात तळातील कष्टकरी लोकांना आम्ही
स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर जीवनाच्या उंचीपर्यंत नेले. आम्ही सोवियेत रिपब्लिकची
स्थापना करून त्याचे बळकटीकरण केले.”
मार्क्सवाद-लेनीनवादाच्या प्रयोगाचा चिरस्थायी धडा
लेनीनसारख्या
नेत्याकडून मार्क्सवाद-लेनीनवादाच्या प्रयोगातील क्रांतिकारी धडे शिकणे म्हणजे
रशियन क्रांतीच्या काळातील सातत्याने वळणे घेणारी परिस्थिती आणि वर खाली होणाऱ्या
घडामोडी यांना कसे तोंड द्यावे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे वस्तुगत
परिस्थितीचे आकलन आणि पक्षाच्या शक्तीचे आत्मगत मूल्यांकन अचूक कसे करावे याचे
शिक्षण घेणे. खालील उद्धरणे सोवियेत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मूळ जुन्या
साहित्यामधून मिळवलेली आहेत:
‘१९१७ मध्ये
लेनीनीस्ट पक्षाने ऐतिहासिक पुढाकार, वर्गीय शक्तींच्या संतुलनाचे आणि त्या क्षणाच्या
विशिष्ठ लक्षणांच्या अचूक आकलनाचे उत्तम उदाहरण सादर केले. क्रांतीच्या विविध
टप्प्यांवर पक्षाने लढ्याचे लवचिक आणि वैविध्यपूर्ण डावपेच वापरले. शांततापूर्ण
आणि सशस्त्र, कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी वैविध्यपूर्ण साधने वापरून आपली अशा
सर्व साधनांचे मिश्रण करण्याची, लढ्याच्या एका पद्धतीकडून दुसऱ्या पद्धतीकडे
एकापाठोपाठ जाण्याची क्षमता दाखवून दिली. लेनीनवादी रणनिती आणि डावपेचांचे हेच
मूलभूत वैशिष्ठ्य त्याचे लोकशाही समाजवादी सुधारवाद आणि मध्यमवर्गीय संधीसाधूपणा
यापेक्षा असलेले वेगळेपण दर्शवते.’
‘जनतेशी असलेले घट्ट नाते
असलेला पक्षच आगामी वर्ग लढ्यांमध्ये नेहमी लढण्यासाठी सज्ज राहू शकतो. लेनीनने
लिहिले, निर्णायक क्षणांमध्ये, सत्ता ताब्यात घेताना, सोवियेत गणराज्याची स्थापना
करताना बोल्शेविकवाद संघटित होता, त्याने समाजवादी विचारसरणीच्या सर्वोत्तम धारा
आकृष्ट केल्या होत्या आणि सर्वहारांच्या सर्व बिनीच्या शिलेदारांना आणि कामकरी
लोकांच्या प्रचंड बहुमताला आपल्याभोवती जमा केले होते.’
कामगार वर्ग आणि कष्टकरी वर्गाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची
समाजवादी पुनर्बांधणी करताना सर्वात जास्त सर्जनशील बांधिलकी आणि क्रांतिकारी
उत्साहाचे दर्शन घडवले. उत्पादनाच्या साधनांचे समाजीकरण करून त्यांचे सार्वजनिक
मालमत्तेत रूपांतर करण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या क्रांतिकारी वादळामुळे
जुनी भांडवलदारी उत्पादन व्यवस्था नष्ट होऊन समाजवादी अर्थव्यवस्थेची स्थापना
झाली. उद्योगांमध्ये भांडवली उत्पादन संबंध नष्ट करून नवीन, समाजवादी संबंध
प्रस्थापित करण्यात आले. जमिनीचे राष्ट्रीयीकरण आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाच्या
साधनांचे सामूहिकीकरण यामुळे लक्षावधी कष्टकरी हळू हळू समाजवादाच्या दिशेने
वळण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली.
काही उज्ज्वल ऐतिहासिक परिणाम
ऑक्टोबर
क्रांती ही १९१७ मध्ये महान लेनीनच्या पुढारपणाखाली संघटित झालेल्या कम्युनिस्ट
पक्षाच्या (पूर्वाश्रमीचा रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक))नेतृत्वाखाली,
रशियन कामगार वर्गाने गरीब शेतकऱ्यांबरोबर आघाडी करून पूर्ण केलेली इतिहासातील
पहिली विजयी समाजवादी क्रांती होती.
महान ऑक्टोबर
समाजवादी क्रांतीने मार्क्सवाद-लेनीनवादाच्या विजयाचे आणि शाश्वततेचे सत्य स्थापित
केले. त्यानी मानवतेच्या इतिहासातील एका नव्या युगाची सुरवात केली: भांडवलशाहीपासून
समाजवादाकडे संक्रमण. त्याने समाजवादी क्रांतीचा अटळपणा देखील सिद्ध केला. ऑक्टोबर
क्रांतीने भांडवलशाही सामाजिक व्यवस्थेमधून समाजवादाच्या दिशेने होणाऱ्या क्रांतिकारी
परिवर्तनामध्ये, सर्वात प्रगत आणि लढाऊ वर्गीय शक्ती असलेल्या कामगार वर्गाची
ऐतिहासिक भूमिका अधोरेखित केली.
ऑक्टोबर
क्रांतीचा सर्वात जास्त काळ टिकलेला क्रांतिकारी परिणाम म्हणजे निरनिराळ्या देशांमध्ये
कम्युनिस्ट पक्षांची स्थापना. उदाहरणार्थ १९१७ नंतर लगेच कम्युनिस्ट पक्षाची
स्थापना झालेले काही देश आहेत: १९१८ ग्रीस,
१९२० ग्रेट ब्रिटन, टर्की, भारत आणि फ्रान्स, १९२१ इटली, चीन आणि स्पेन, १९२२
चिली, १९२५ कोरिया.
रेड आर्मी आणि
युनायटेड सोशालिस्ट स्टेट ऑफ रशिया (युएसएसआर)च्या लोकांनी नाझी- फॅसिझम विरुद्ध
दुसऱ्या साम्राज्यवादी विश्वयुद्धात निभावलेली भूमिका आणि २ कोटी लोकांनी केलेले
प्राणार्पण ह्यामागे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचीच प्रेरणा होती हे कधीच विसरता
येणार नाही.
साम्राज्यवादी
सत्ताधाऱ्यांची त्यांच्या वसाहतींमधली पकड, ऑक्टोबर समाजवादी क्रांतीमुळे प्रचंड
धक्के बसून ढिली झाली. रशियातील समाजवादी क्रांतीच्या यशामुळे जगभरात राष्टीय
मुक्ती संग्रामांची एक निर्णायक लाट निर्माण झाली. तसे पाहता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे
सुद्धा बरेचसे श्रेय ऑक्टोबर समाजवादी क्रांतीलाच जाते.
आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे, भारतातील कामगार वर्गीय
चळवळीला रशियन क्रांतीने खूपच प्रभावित केले होते. याचे एक प्रखर उदाहरण म्हणजे
भारतातील पहिल्या संयुक्त कामगार संघटनेची- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची
१९२० मध्ये झालेली स्थापना. भारतातील कामगार वर्गीय चळवळीला ऑक्टोबर समाजवादी
क्रांतीमुळे कसे प्रचंड उत्तेजन मिळाले याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सोवियेत युनियनचा शेवट का झाला?
‘समाजवाद नाही
तर समाजवादाच्या
बांधणीतील विकृती आणि सैद्धांतिक भटकाव यामुळे सोवियेत युनियनचा पाडाव झाला.
सोवियेत युनियनमधल्या समाजवादाच्या बांधणीच्या अनुभवाचा ऐतिहासिक आढावा घेताना हे
म्हणावे लागेल की योवियेत युनियनच्या शेवटामुळे आजच्या जगातील समाजवादाची
प्रासंगिकता संपत नाही.’
(सीपीआय(एम))
हो, ऑक्टोबर
क्रांतीने हे सिद्ध केले आहे की समाजवाद हा चिरंतन काळासाठी प्रासंगिक आहे.
भांडवलशाहीच्या या व्यवस्थागत संकटाच्या काळात, समाजवादी शक्तींनी आक्रमक प्रचार
केला पाहिजे की ‘समाजवाद’ हा अंतिम
पर्याय आहे. उत्पादन शक्तींचा अटळ क्रांतिकारी विकास आणि भांडवली उत्पादन
संबंधांचे मूल्य कमी होत ते नगण्य बनणे या दोन्हींमुळे अप्रासंगिक बनणे हे ‘भांडवलशाही’चे अटळ भविष्य आहे
आणि ती शेवटी समाजवादी शक्तींकडून उलथवून टाकली जाणारच आहे.
व्यवस्थागत
संकटाच्या गर्तेत खोल, अधिक खोल कोसळणाऱ्या भांडवलशाहीविरुद्ध शेतमजूर, गरीब
शेतकरी यांना सोबत घेऊन कामगार वर्गाने आक्रमक मोहीम, प्रचार, आंदोलन आणि कृती
कार्यक्रम करणे ही काळाची गरज आहे. २००८ मध्ये युएसएमध्ये सुरु झालेली आर्थिक मंदी
आणि त्यानंतर त्याच्या परिणामी आलेले भांडवली संकट लगेच संपूर्ण युरोपमध्ये पसरले.
शेवटी या संकटाने संपूर्ण भांडवली जगाला गिळले. वर्गीय दृष्टीकोनातून उभारलेल्या
कामगार चळवळीने, भांडवलशाही व्यवस्थेच्या रानटी शोषणाचे बळी असलेल्या विश्वभरातील
कष्टकरी लोकांना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटित करणे आवश्यक आहे.
कष्टकरी
लोकांच्या जगातील विकसित आणि मागास अशा दोन्ही अर्थव्यवस्थांमधल्या दु:खाबाबतीत
सीआयटीयुने २०१७च्या आपल्या मे दिन जाहीरनाम्यात तीक्ष्णपणे वर्णन केले आहे:
‘जागतिक आर्थिक संकटाचा जोर
अजूनही कमी झालेला नाही, आर्थिक वृद्धी अजूनही मंदावलेलीच आहे, जी काही वृद्धी
दिसत आहे तिचा फायदा फक्त भांडवलदारच उपटत आहेत. बेरोजगारीने, विशेषत: युवा पिढीमधील बेरोजगारीने भयानक पातळी गाठली आहे.
विषमता धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालली आहे. जगातील सर्वात श्रीमंत अशा केवळ ८
व्यक्तींची संपत्ती जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या संपत्तीइतकी आहे. ह्या आर्थिक
संकटावर आरूढ होऊन, कष्टकरी जनतेनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या कामाच्या व
जगण्याच्या परिस्थितीवर हल्ले करून, राष्ट्राची संपत्ती लुटण्यासाठी राष्ट्रीय व
बहुराष्ट्रीय कॉर्पोरेटसना प्रोत्साहन देऊन, आपले हितसंबंध जोपासण्याचे व नफा
वाढवण्याचे सत्ताधारी वर्गाचे सातत्याचे प्रयत्न अंतिमत:
त्यांच्याच अंगावर शेकणारे व निष्फळच
ठरताना दिसत आहेत.’
‘ह्या
व्यवस्थागत संकटामुळे भांडवलशाहीला मौल्यवान मनुष्यबळाचा पूर्ण आणि योग्य वापर
करून मानवजातीचे कल्याण करण्यात आलेले संपूर्ण अपयश आणि त्यांची अक्षमता,
पर्यावरणाची आणि ज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक, आदिवासी जनतेचा समावेश होतो, अशा
लाखो लोकांच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामांची काहीही पर्वा न करता भांडवलदार
वर्गाकडून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या होणाऱ्या अनिर्बंध शोषणावरून ह्या व्यवस्थेची
शाश्वत विकास करण्याची असमर्थता स्पष्ट दिसून येते.’
‘ही खूप चिंतेची गोष्ट आहे की
मजबूत पुरोगामी आणि डाव्या पर्यायाच्या अभावी आपल्या भारत देशासहित अनेक
देशांमध्ये उजव्या, प्रतिगामी आणि वर्णद्वेषी शक्ती वाढत आहेत. असंतुष्ट युवकांना
दहशतवादी कारवायांकडे आकर्षित केले जात आहे. लोकांचा संताप आधीच त्यांच्या
विश्वासाला अपात्र ठरलेल्या नवउदार सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या विरोधातील
संयुक्त संघर्षाकडे वळू नये म्हणून उजव्या शक्ती त्यांना एकमेकांविरुद्धच्या
अंतर्गत संघर्षांच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
समाजवादाच्या
बाजूने आणि भांडवलशाहीच्या विरोधात भक्कमपणे उभे राहत असतानाच, पूर्ण विश्वासाने
युएसएसआरच्या अद्वितीय यशाबद्दल प्रचार करणेही तितकेच आवश्यक आहे. फारच थोड्या
काळात त्यांनी लक्षणीय औद्योगिक आणि शेतकी विकास साधला. निरक्षरता नष्ट केली गेली
आणि शिक्षण व खेळांमध्ये सार्वत्रिक प्रवेश दिला गेला, बेरोजगारी पूर्णपणे नष्ट
केली गेली, सर्वांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षेची हमी दिली
गेली आणि प्रोत्साहन दिले गेले. महिला, बालके, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या
हक्कांची हमी घेतली गेली. त्यांनी उच्च वैज्ञानिक आणि तांत्रिक स्तर संपादित केला.
युएसएसआर हा जगातील पहिला देश होता ज्याने कामाचा
अधिकार, ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी सुट्ट्या, कुटुंबात, समाजात आणि कामावर,
स्त्री, पुरुषांना समान अधिकार, मातृत्व लाभाचा अधिकार आणि सुरक्षा, निवाऱ्याचा
अधिकार, मोफत वैद्यकीय सुविधा, सार्वत्रिक आणि मोफत सामाजिक सुरक्षा आणि मोफत
शिक्षण ह्या सर्व गोष्टींना मान्यता दिली. सोवियेत युनियनने, अंतराळात पहिला कृत्रिम
उपग्रह- स्फुटनिकला आणि अंतराळात पहिला मानव- युरी गागारीनला पाठवले, असे मानवजातीसाठी
महत्वाचे यश जगात पहिल्यांदाच संपादित केले. हे लक्षात ठेवले पाहिजे की वर उल्लेख
केलेले अधिकार आणि सोयीसुविधा आजपासून १०० वर्षे आधी युएसएसआरच्या नागरिकांना
मिळाल्या होत्या, जेव्हा भांडवलशाही देशांमध्ये त्यांची कल्पना देखील केली गेली
नव्हती, मग त्या अंमलात आणणे तर सोडूनच द्या.
ऑक्टोबर क्रांती आणि वर्ल्ड फाडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स
(डब्ल्युएफटीयु)
महान
ऑक्टोबर क्रांतीपासून, युएसएसआरच्या आणि संपूर्ण जगातील कामगार वर्गीय चळवळीपासून
आणि विशेषत: वर्गीय दृष्टीकोनाने प्रेरित,
पुरोगामी आणि लढाऊ कामगार वर्गापासून
मिळालेली राजकीय, सैद्धांतिक प्रेरणा आणि नैतिक उभारी, प्रेरणा
आणि प्रोत्साहन मोजता न येण्यासारखी आहे. हे वास्तव डब्ल्युएफटीयुच्या स्थापनेसाठी
अत्यंत प्रासंगिक होते.
१९२०
साली मॉस्कोमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक युनियन्सच्या आंतरराष्ट्रीय कौन्सिलचे
गठन करण्यात आले. ह्या कौन्सिलने वर्ग समन्वयवादाविरुद्ध लढा देण्याचा निर्णय
घेतला आणि वर्ग संघर्षाचा मार्ग स्विकारला. ते शेवटी एका नव्या शक्तीशाली
आंतरराष्ट्रीय ट्रेड युनियन्सच्या संघटनेकडे वळाले आणि त्यानंतर रेड इंटरनॅशनल
लेबर युनियन्सची (आरआयएलयु) स्थापना झाली. आरआयएलयुने कामगार संघटना चळवळीत दोन
दशकांहून जास्त काळापर्यंत महत्वाची भूमिका बजावली. ह्या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय
कामगार एकजुटीचा मुद्दा पुढे आला. ३ ऑक्टोबर १९४५ रोजी पॅरीस काँग्रेसमध्ये
डब्ल्युएफटीयुची स्थापना झाली. ती पहिली कामगार संघटनांची संयुक्त आंतरराष्ट्रीय
फेडरेशन आहे जी आज ऑक्टोबर क्रांतीचा वारसा चालवते, साम्राज्यवाद, त्याच्या
वेगवेगळ्या एजन्सींच्या विरुद्ध आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वर्ग
समन्वयवाद्यांविरुद्ध लढते. २०१५ मध्ये डब्ल्युएफटीयुने आपला वैभवशाली ७०वा
वर्धापन दिन आपले लाखो सभासद, समर्थक आणि हितचिंतकांच्या सोबत साजरा केला.
आपल्या स्थापना काँग्रेसमध्येच डब्ल्युएफटीयुने
साम्राज्यवाद आणि फॅसिझमविरुद्धच्या लढ्यांना बांधिलकी, शांततेसाठीच्या, वसाहतवाद
विरोधी आणि राष्ट्रीय मुक्ती लढ्यांना पाठिंबा यासाठी आपला ठाम विश्वास दाखवून
दिला. डब्ल्युएफटीयुचे संस्थापक सरचिटणीस लुईस सायलांट म्हणाले, ‘डब्ल्युएफटीयु ऐक्याचे,
कामगारांच्या फॅसिझमविरुद्धच्या संयुक्त
लढ्यांचे, शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि वसाहतीमधील लोकांना मुक्त करण्यासाठीच्या
निर्धाराचे, अधिक चांगल्या जगण्याच्या परिस्थितीसाठीच्या लढ्यांचे, शोषक मक्तेदार
आणि युद्ध पिपासूंविरुद्धच्या लढाईचे बालक आहे... या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या
सुरवातीला इटालीमध्ये फॅसिझमचा जन्म झाला. १९३३ मध्ये हिटलर जर्मन साम्राज्याचा
चॅन्सलर झाला. या दोन्ही घडामोडींमुळे फॅसिझम हा साम्राज्यावादाचा सर्वात घातक
पैलू बनला आहे. तो वित्त भांडवलाच्या हिंसक हुकुमशाहीचे प्रतिनिधीत्व करतो,
म्हणजेच सामाजिक आणि राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी बळाचा वापर करण्याचा सिद्धांत
आणि कृती, भांडवली लोकशाहीत असलेल्या सर्व अधिकार आणि स्वातंत्र्याचा संपूर्ण
विध्वंस. जागतिक कामगार वर्गाने फॅसिझमचा हा धोका ओळखून आपले लढ्याचे शस्त्र
म्हणजेच आंतरराष्ट्रीय एकजूट निर्माण करण्यासाठी एकत्र यायला सुरवात केली.’
निष्कर्ष
अशा
प्रकारे, कामगारांच्या मूलभूत गरजा आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच्या
जागतिक लढ्याचा एक मैलाचा दगड ठरलेल्या मे दिनापासून (१८८६) ते ऑक्टोबर १९१७ मध्ये
भांडवलशाही व्यवस्थेचा पाडाव करून पहिले समाजवादी राज्य स्थापन करण्यापर्यंतचा
कामगार वर्गाचा प्रवास हा एक घटनांनी भरलेला प्रवास आहे. संकटप्रवण भांडवलशाही
व्यवस्थेविरुद्धचा वर्ग संघर्ष तीव्र करण्यावरचे जिवंत भाष्य आहे. शोषक भांडवलशाही
व्यवस्था नष्ट करून सर्वसमावेशक सामाजिक न्यायावर आधारित शोषण मुक्त राज्य स्थापन करण्यासाठी
वर्ग जाणीवा परिपक्व झालेल्या कामगार वर्गीय चळवळीच्या क्रांतिकारी हस्तक्षेपाची
ही गोष्ट आहे. ठोस परिस्थितीच्या ठोस विश्लेषणामधून कामगार वर्गीय विचारसरणी लागू
करण्याच्या दिशेने होणारा हा प्रवास आहे. ह्या प्रक्रियेत कामगार वर्ग आणि त्याचा
सिद्धांत साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि फॅसिझमला हरवून जास्त मजबूत बनला.
ह्या
प्रवासाने मानवतेला एक शक्तीशाली हत्यार दिले आहे- कामगार वर्गीय विचारसरणी.
त्याचा आधार आहे भांडवलदारी व्यवस्थेचे शास्त्रीय विश्लेषण. ती कामगार वर्गाला,
भांडवलदारी व्यवस्थेला शेवटचा ठोसा देण्यासाठी आवश्यक अशी संघटनात्मक तत्वे देते. ती
फक्त अमानुष भांडवलदारी व्यवस्था, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती
होऊन देखील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीची तिची अक्षमताच उघड करत नाही
तर ती संपूर्ण मानवजातीला शोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी, भांडवलदारी व्यवस्थेचा
निर्णायक पाडाव करण्यासाठीची कामगार वर्गाची नेतृत्वकारी भूमिका आणि त्याची शक्ती
देखील सिद्ध करते. ही ती विचारसरणी आहे, जी कामगार वर्गाला भांडवलदारी व्यवस्थेशी
भिडून ती नष्ट करण्यासाठी, संपूर्ण दु:खी, कष्टी समाजासोबत एकजूट करण्याचा मार्ग दाखवून देते.
आज
भांडवलदार कामगार वर्गावर आणि कष्टकऱ्यांच्या अन्य विभागांवर अजूनच जास्त ओझे
लादून जागतिक संकटातून बाहेर पडायला बघत आहेत. सत्ताधारी वर्गाकडून लोकांचे लक्ष
दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांची एकजूट भंग करण्याचा प्रयत्न
केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे शोधली जात आहेत- धर्म, जात, प्रांत, भाषा,
वंश, रंग, लिंग.
आपल्या
देशात सत्ताधारी वर्गाच्या समर्थनामुळे, जातीवादी शक्ती नवउदार अजेंडा पुढे रेटण्यासाठी
एक अतिशय धोकादायक कारस्थान करीत आहेत- तथ्य खोटी ठरवण्यासाठी मिथकांचा वापर करणे,
भ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या घोषणा करणे, अक्षम्य अशा राष्ट्रविरोधी कृत्यांचे
समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादाला आवाहन करणे, देशप्रेमाच्या नावावर घृणा निर्माण
करण्याचा प्रयत्न करणे, सतत न्यायाच्या गमजा मारून, प्रत्यक्षात मात्र उत्पीडित,
वंचित लोकांना सामाजिक न्याय नाकारणे.
ती
कामगार वर्गीय विचारसरणी आणि कार्यच होते, ज्याने १०० वर्षांपूर्वी महान ऑक्टोबर
क्रांतीला मार्ग दाखवला. ती कामगार वर्गीय विचारसरणी आणि कार्यच आहे जे आजही
सत्ताधारी वर्गाच्या कारस्थानांना तोंड देण्यासाठी कामगार वर्गाला मार्ग दाखवत
आहे. तो एकमेव शिक्षक आहे जो कामगार वर्गाला आपले खरे मित्र ओळखायला मदत करतो आणि
आपल्या शत्रूला एकटे पाडून त्याला हरविण्यासाठी आपल्या मित्रांना संघटित करण्याचा
मार्ग दाखवतो.
कामगार
वर्गाने आव्हानांशी दोन हात करत असताना आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे आपले
अंतिम उद्दीष्ट प्राप्त करण्यासाठी लढत असतानाच ह्या वैज्ञानिक वर्ग विचारधारेत
प्राविण्य मिळवून ती लागू करण्यासाठीची दृष्टी विकसित केली पाहिजे. लेनीनच्या
नेतृत्वाखालील रशियातील कामगार वर्गाने १०० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे त्यांचे
कार्य केले त्याचप्रमाणे आजच्या कामगार वर्गाने देखील आपले ऐतिहासिक कार्य पूर्ण
केले पाहिजे.