Tuesday, April 18, 2017

मे दिन चिरायू होवो

CENTRE OF INDIAN TRADE UNIONS
भारतीय ट्रेड युनियन केंद्र

महान ऑक्टोबर क्रांतीच्या शतकपूर्ती वर्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मे दिनानिमित्त सीआयटीयु जगभरातील व भारतातील कामगार वर्गाला तसेच तमाम कष्टकऱ्यांना क्रांतिकारी अभिवादन करीत आहे.
नवउदार भांडवली व्यवस्थेच्या ताब्यातील शोषणकारी आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाविरुद्धच्या कामगार वर्गाच्या लढ्यांशी तसेच जगातील सर्व खंडांमधील कष्टकरी जनतेच्या लढ्यांशी आपले ऐक्य व्यक्त करीत आहे.
समाजवादाचे रक्षण करण्यासाठीच्या सर्व समाजवादी देशांमधील जनतेच्या लढ्याशी एकजूट व्यक्त करून त्यांना सलाम करीत आहे. ह्या देशांमधील समाजवादी व्यवस्था मोडकळीस आणून तिथे भांडवलशाही पुनर्प्रस्थापित करण्याची साम्राज्यवाद्यांची कारस्थाने निर्णायक रित्या हाणून पाडली जातील, आजचे हे बचावासाठीचे लढे एक दिवस ह्या शोषणकारी भांडवली व्यवस्थेपासून मुक्ती मिळवण्याच्या कामगार वर्गाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्यांमध्ये परावर्तित होण्याइतकी उंची गाठतील असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करीत आहे.
सीआयटीयु पुन्हा एकदा समाजवादाशी आपली बांधिलकी आणि माणसाचे माणसापासून होणाऱ्या शोषणापासून मुक्त असा समाज निर्माण करण्याचा लढा सुरू ठेवण्याचा आपला निर्धार व्यक्त करीत आहे.
आपल्या न्याय्य मागण्यांसाठीच्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या शौर्यपूर्ण लढ्यांना पुन्हा एकदा पाठिंबा व एकजूट जाहीर करीत आहे. इस्राईलद्वारा होणाऱ्या पॅलेस्टिनींच्या हत्या, छळ आणि अटकसत्रांचा निषेध करीत आहे. १९६७ साली अस्तित्वात असलेल्या सीमा व जेरूसलेम ही राजधानी असलेले स्वतंत्र, सार्वभौम राज्य म्हणून पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची मागणी करीत आहे.
अफगाणीस्तान, सिरिया, येमेन, लिबिया, इराक इत्यादींसहित पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमधील देशांमध्ये, तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अमेरिकेची एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी चाललेल्या, ज्याच्यामुळे लाखो लोकांना बेघर, निराधार होऊन इतरत्र आसरा घ्यावा लागत आहे, अशा अमेरिकी साम्राज्यवादाच्या नेतृत्वाखाली चाललेल्या युद्धांचा, बहुसंख्येने स्त्रिया व बालकांचा समावेश असलेल्या हजारो नि:शस्त्र लोकांच्या हत्या करणाऱ्या व त्यांच्यावर अपंगत्व लादणाऱ्या निर्घृण हल्ल्यांचा निषेध करीत आहे.
सीआयटीयु, साम्राज्यवाद व त्यांच्या आक्रमक हस्तक्षेपांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करीत आहे. साम्राज्यवादाविरोधातील लढा हा वर्गसंघर्षाचा अविभाज्य भाग असल्याच्या आपल्या विश्वासाचा पुनरुच्चार करीत आहे.
आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाच्या साम्राज्यवादाविरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यामध्ये कामगार संघटनांच्या जागतिक फेडरेशनने (डब्ल्युएफटीयु) दिलेल्या योगदानाची आपण इथे आठवण करतो व सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्ती मिळवण्याच्या कामगार वर्गाच्या अधिकाराचे रक्षण करण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या डब्ल्युएफटीयुच्या १७व्या महाधिवेशनाच्या दिशानिर्देशांचे प्रभावीरित्या पालन करण्यासाठी स्वत:ला प्रतिबद्ध करीत आहे.
ह्या मे दिनी, सीआयटीयु
याची नोंद घेत आहे की जागतिक आर्थिक संकटाचा जोर अजूनही कमी झालेला नाही, आर्थिक वृद्धी अजूनही मंदावलेलीच आहे, जी काही वृद्धी दिसत आहे तिचा फायदा फक्त भांडवलदारच उपटत आहेत. बेरोजगारीने, विशेषत: युवा पिढीमधील बेरोजगारीने भयानक पातळी गाठली आहे. विषमता धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालली आहे. जगातील सर्वात श्रीमंत अशा केवळ ८ व्यक्तींची संपत्ती जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या संपत्तीइतकी आहे. ह्या आर्थिक संकटावर आरूढ होऊन, कष्टकरी जनतेनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या कामाच्या व जगण्याच्या परिस्थितीवर हल्ले करून, राष्ट्राची संपत्ती लुटण्यासाठी राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कॉर्पोरेटसना प्रोत्साहन देऊन, आपले हितसंबंध जोपासण्याचे व नफा वाढवण्याचे सत्ताधारी वर्गाचे सातत्याचे प्रयत्न अंतिमत: त्यांच्याच अंगावर शेकणारे व निष्फळच ठरताना दिसत आहेत.
ह्या जागतिक संकटाचे सर्वसामान्य आणि गरीब जनतेवर होणारे परिणाम वेगवेगळ्या देशांमध्ये, युरोपियन संघातून ब्रेग्झीट, इटली, ग्रीससारख्या देशांमधील अनिश्चितता, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि नेदरलँडसारख्या देशांमधील उजव्या शक्तींचा उदय, परदेशी व स्थलांतरित लोकांच्या रोजीरोटीवर व अधिकारांवर पश्चिमी देशांमध्ये आणि विशेषत: अमेरिकेत होणारे वाढते वांशिक हल्ले यासारख्या घडामोडींवरून दिसून येत आहेत.
ह्या व्यवस्थागत संकटामुळे भांडवलशाहीला मौल्यवान मनुष्यबळाचा पूर्ण आणि योग्य वापर करून मानवजातीचे कल्याण करण्यात आलेले संपूर्ण अपयश आणि त्यांची अक्षमता, पर्यावरणाची आणि ज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक, आदिवासी जनतेचा समावेश होतो, अशा लाखो लोकांच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामांची काहीही पर्वा न करता भांडवलदार वर्गाकडून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या होणाऱ्या अनिर्बंध शोषणावरून ह्या व्यवस्थेची शास्वत विकास करण्याची असमर्थता स्पष्ट दिसून येते. 
भांडवलदारी व्यवस्थेची प्रेरक शक्ती असलेल्या नफ्याच्या लालसेपोटी, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीचे लाभ, जनतेच्या एका मोठ्या विभागाच्या, विशेषत: गरिबांच्या आवाक्याबाहेर राहिले आहेत. आजही २१व्या शतकात, जगभरातील कोट्यावधी लोक गरिबी, निरक्षरता, अनारोग्य यांनी ग्रस्त व निवारा आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्य सोयी सुविधांपासून वंचित अशा अवस्थेत जगत आहेत. यंत्रमानव, कृत्रिम बुद्धीमत्ता इत्यादींचा वापर, उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊन देखील लाखो कामगारांचा भार हलका करण्यासाठी नाही तर त्यांची जागा घेण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आधीच धोकादायक पातळीवर पोहोचलेल्या बेरोजगारीने अजूनच भयंकर स्वरूप धारण केले आहे.
सीआयटीयु मागणी करीत आहे की जगभरातील, विशेषत: युवांमधील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक तातडीचा उपाय म्हणून कामगारांच्या कामाचे तास आठवड्याला ३५ तासांपर्यत कमी करावेत व रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दिवसाच्या ४ पाळ्यांमध्ये काम सुरु करावे.
कॉर्पोरेट धार्जिण्या आणि श्रीमंतांच्या बाजूच्या नवउदार धोरणांचे परिणाम, उत्पन्नांमधील वाढती दरी याविरोधातील लोकांचा असंतोष व राग यामुळे त्यांच्या कामाची परिस्थिती आणि रोजगाराचे रक्षण करण्यासाठीच्या लढ्यात त्यांचा सहभाग वाढायला लागलेला आहे. अगदी विकसित भांडवली देशांमध्ये देखील कामगार, शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला अशा जनतेच्या वेगवेगळ्या विभागांचा, विकासाच्या भांडवली मॉडेलच्या बाबतीत भ्रमनिरास होऊ लागला आहे. हावर्ड विद्यापिठाच्या एका नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील १८ ते २९ वयोगटातील ५१% युवा भांडवलशाही व्यवस्थेचे समर्थन करत नाहीत. ३३% समाजवादाला पाठिंबा देतात तर अमेरिकेतील दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार ३९% भांडवलशाहीच्या विरोधात होते आणि फक्त ३३% बाजूने होते. ३६% समाजवादाच्या बाजूने होते तर ३२% लोकांचे मत त्याबाबतीत नकारात्मक होते.
सीआयटीयु खूप गांभिर्याने याची नोंद घेत आहे की मजबूत पुरोगामी आणि डाव्या पर्यायाच्या अभावी आपल्या भारत देशासहित अनेक देशांमध्ये उजव्या, प्रतिगामी आणि वर्णद्वेषी शक्ती वाढत आहेत. असंतुष्ट युवकांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित केले जात आहे. लोकांचा संताप आधीच त्यांच्या विश्वासाला अपात्र ठरलेल्या नवउदार सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या विरोधातील संयुक्त संघर्षाकडे वळू नये म्हणून उजव्या शक्ती त्यांना एकमेकांविरुद्धच्या अंतर्गत संघर्षांच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कामगार वर्गामध्ये शोषणकारी भांडवलशाही व्यवस्था आणि त्याला उचलून धरणाऱ्या शक्तींच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल जागृती करण्यासाठी, भांडवलशाही व्यवस्था उखडण्यासाठीची त्यांची प्रतिबद्धता जागवण्यासाठी आणि सर्व शोषणापसून मुक्ती मिळवण्यासाठीच्या अंतिम लढ्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आपली सर्व साधने आणि शक्ती वळवण्यासाठी सीआयटीयु वचनबद्ध आहे. 
ह्या मे दिनी, सीआयटीयु
आपल्या देशातील वाढत चाललेली एकाधिकारशाही प्रवृत्ती, समाजातील वाढती असहिष्णुता, सर्व विवेकवादी, विज्ञानवादी विचार व मतभेद व्यक्त करणाऱ्या आवाजांवर होणारे वाढते हल्ले आणि सर्व विरोधकांवर राष्ट्रद्रोही असल्याचा शिक्का लावण्याची वृत्ती याबद्दल चिंता व्यक्त करीत आहे.
लोकशाही अधिकारांवरील हल्ल्यांच्या विरोधात देशात होत असलेल्या लढ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करीत आहे. मतभेद व्यक्त करणाऱ्या किंवा वादविवादांना प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापिठांवर व त्यांच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करीत आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या विद्यार्थी, युवक, दलित आणि लोकांच्या अन्य विभागांना पाठिंबा देत आहे.
जनतेचे लोकशाही अधिकार व रोजीरोटीवर तृणमूल काँग्रेस आणि त्यांच्या गुंडांच्या अमानुष हल्ल्यांना मोठ्या शौर्याने तोंड देणाऱ्या पश्चिम बंगालमधील कामगार वर्ग व कष्टकरी जनतेला सलाम करीत आहे.
एका बाजूला देशी, विदेशी कॉर्पोरेटस आणि बड्या व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी कामगार वर्गाला गुलामी सदृष्य अवस्थेत ढकलणे आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये धर्म, प्रांत, जात इत्यादीच्या आधारावर फूट पाडून त्यांचा नवउदार धोरणांच्या विरोदातील लढा कमजोर करणे यासाठी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारद्वारा पुढे रेटल्या जाणाऱ्या, नवउदार धोरणे आणि विषारी धर्मांध अजेंड्याच्या भयंकर युतीबाबत आपल्या देशातील जनतेला धोक्याचा इशारा देत आहे.
मोदी सरकार राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कॉर्पोरेटसना आणि बड्या व्यवसायिकांना कर सवलती आणि कामगार कायदे व देशातील इतर कायद्यांमधून सूट देऊन मोठ्या भेटी देत आहे. ते करबुडव्यांना आणि बँकेची कर्जे चुकवणाऱ्यांना देखील बक्षिस देत आहेत. आपले सार्वजनिक क्षेत्र, जमिनी, खाणी, समुद्र, डोंगर आणि जंगल आणि त्याही पुढे जाऊन आपली जनता, ह्या आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे नियंत्रण ते नफ्यासाठी हपापलेल्या देशी, विदेशी कॉर्पोरेटसच्या हवाली, बेलगाम शोषण करण्यासाठी करीत आहेत.
संपत्तीचे निर्माते असलेल्या कामगार आणि शेतकऱ्यांमधील एक मोठी संख्या, गुलामी आणि दारिद्र्यात ढकलली जात आहे. त्यांच्यापासून त्यांची जमीन, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे अधिकार आणि त्यांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. कामगार कायद्यांचे, कामगार वर्गानी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या अधिकारांचे संहितेत रुपांतर करून चेष्टा केली जात आहे. सामाजिक सुरक्षा प्रदान केल्याचा आव आणत प्रत्यक्षात मात्र, सध्या अस्तित्वात असलेले भविष्य निर्वाह निधी आणि कामगार राज्य विमा सारखे वैधानिक लाभ गुंडाळायचा प्रयत्न केला जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना, मनरेगा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्यान्न भोजन योजना यासारख्या समाज कल्याण लाभावरील खर्चात, अंतिमत: त्या सेवा गुंडाळण्याच्या हेतूने प्रचंड कपात केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्राची मोडतोड केली जात आहे. खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या सपाट्यामुळे दलित आणि आदिवास्यांचा आरक्षणाचा हक्क नाकारला जात आहे. कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही नियंत्रणात येत नाहीत. मेक इन इंडिया,स्टार्ट अप इंडिया आणिस्टँड अप इंडिया चा कितीही गाजावाजा केला तरी प्रत्यक्षात मात्र रोजगार निर्मितीचा वेग मंद झाला आहे आणि काही क्षेत्रांमध्ये तर तो घटत आहे.
लोकांच्या मूलभूत लोकशाही अधिकारांवर तीव्र हल्ला केला जात आहे. विरोधातील आवाजावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे. प्रश्न विचारणारे आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकांमधील विजयामुळे आरएसएस व त्यांच्या परिवारातील धर्मांध संस्थांची हिम्मत वाढली आहे. ते गोरक्षा,रोमिओ विरोधी दल इत्यादींच्या बहाण्याने बेफामपणे लोकांवर, विशेषत: मुस्लिम अल्पसंख्यकांवर शारिरिक हल्ले करीत आहेत. त्यांच्या विरोधातील, पुरोगामी, विवेकवादी आणि वैज्ञानिक विचारसरणी असणाऱ्यांवर राष्ट्रद्रोही असल्याचा शिक्का मारला जात आहे. 
हा आपल्या काळातील एक मोठा विरोधाभास आहे की आरएसएस एक अशी संस्था आहे, जिने स्वत:ला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जाणून बुजून अलिप्त ठेवले होते, तिने आज इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे दाखले वाटण्याचा अधिकार स्वत:ला बहाल केला आहे. भाजप, सरकारच्या नेतृत्वस्थानी असलेला पक्ष, देशाला आजच्या औद्योगिक विकासाच्या पातळीपर्यंत पोहोचवायला कारणीभूत असलेल्या सार्वजनिक क्षेत्राची विक्री करून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आणि साधनसंपत्ती कॉर्पोरेट लुटारूंच्या हातात सोपवत आहे हा देखील एक विरोधाभास आहे. जे सरकार सरळ सरळ देशाच्या हिताविरुद्ध वर्तन करीत आहे, तेच अशा देशविघातक धोरणांना विरोध करणाऱ्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे! हा पण एक विरोधाभास आहे की साम्राज्यवादी डावपेचांसमोर गुडघे टेकणारे, शरणागती पत्करणारे आणि आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणामध्ये तडजोडी करणारे हे मोदी सरकार, देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच असल्याचा दावा करीत आहे. आपल्या राष्ट्रीय हितांशी तडजोड करून युएसएबरोबर व्यूहशास्त्रविषयक समर्थन करार केल्यामुळे आशिया, पॅसिफिक क्षेत्रावर आपला एकाधिकार प्रस्थापित करण्याच्या अमेरिकन साम्राज्यवादाच्या रणनितीचा दुय्यम भागिदार बनलेले भाजप सरकार, राष्ट्रीय स्वाभिमानाचा एकमेव रक्षणकर्ता असल्याचा दावा करीत आहे हा आपल्या काळातील एक मोठा उपहास आहे.
ह्या मे दिनी, सीआयटीयु
ठामपणे मांडत आहे की बहुसंख्यक आणि अल्पसंख्यक धर्मांधता आणि मूलतत्ववाद हे एकमेकांच्या आधाराने पोसले जातात. दोन्हीही लोकांमध्ये फूट पाडतात, त्यांची एकजूट भंग करतात, लोकांचे लक्ष आपल्या रोजच्या खऱ्या मुद्द्यांकडून दूर हटवतात, जीवन सुधारण्यासाठीचे त्यांचे लढे कमजोर करतात. अंतिमत: दोघेही शोषक वर्गालाच मदत करतात. हिंदुत्ववादी शक्तींच्या धर्मांध कारवायांमुळे अल्पसंख्यक मूलतत्ववाद आणि दहशतवादात वाढच होत आहे.
कामगार वर्गीय एकजुटीचे रक्षण करण्यासाठीचा, ती व्यापक आणि घट्ट करण्यासाठीचा लढा आणि धर्मांध, फाजील देशाभिमानी आणि फुटीर शक्तींविरुद्धचा जनतेचा लढा हे दोन्ही लढे, नवउदार आर्थिक धोरणांच्या आणि त्यांच्या राजकीय पुरस्कर्त्यांच्या विरोधातील संयुक्त लढ्याचा अविभाज्य भाग आहेत या आपल्या विश्वासाचा पुनरुच्चार करीत आहे.
कामगार, गरीब शेतकरी आणि शेतमजुर या सर्वांना तीव्र शोषणाचे शिकार बनविणाऱ्या नवउदारवादी, भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांनी भक्कम एकजूट करण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहे.
या विश्वासामुळे नवउदारवाद, धर्मांधता, मूलतत्ववाद व त्यांना पोषक अशी धोरणे या विरुद्धच्या लढ्यात कष्टकऱ्यांच्या सर्व विभागांची एकजूट करण्याची तसेच डाव्या लोकशाही पर्यायाच्या बाजूने वर्गीय शक्तींच्या संतुलनामध्ये सर्वंकष बदल घडवून आणण्याचा लढा पुढे नेण्याच्या कार्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव सीआयटीयुला आहे.
सत्ताधारी वर्गाच्या नवउदार अजेंड्याविरुद्धचा लढा एका नवीन उंचीवर नेण्यासाठी आणि धर्म, जात, प्रांत आणि लिंगाच्या नावाखाली त्यांची एकजूट भंग करण्याच्या प्रयत्नांना प्रतिरोध करण्यासाठी कष्टकरी जनतेच्या सर्व विभागांची- शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि युवा यांची एकजूट करण्यासाठी या देशातील कामगार वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे.
कामगार वर्गाला आणि लोकांना आश्वस्त करीत आहे की सीआयटीयु कामगारांची आणि जनतेची एकजूट अभंग ठेवण्याच्या आणि देशाच्या हिताचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात सतत पुढे असेल.                                      
२०१७च्या ह्या मे दिनी, सीआयटीयु भारतातील कामगार वर्गाला आवाहन करीत आहे की,
कामगार संघटना अस्तित्वात असो वा नसो किंवा त्यांची संलग्नता कुठेही असो, धर्म, प्रांत, जात, भाषा, लिंग इत्यादींच्या पलिकडे जाऊन सरकारच्या कामगार विरोधी, जनविरोधी आणि राष्ट्रविरोधी नवउदार धोरणांच्या विरोधातील संयुक्त लढा बळकट करण्यासाठी व्यापक आणि खोल एकजूट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
विविध क्षेत्र व राज्यांमधील एकजूट आणि आपले हक्क, रोजगार, रोजीरोटी आणि जगण्याच्या परिस्थितीवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी एक होऊन सज्ज व्हा.
कष्टकरी जनतेचे सर्व विभाग, शेतकरी, शेतमजूर, कारागीर आणि इतर ग्रामीण कामगार या सर्वांची एकजूट करून नवउदार सत्तेचा निर्णायकरित्या पराजय करण्यासाठी, त्याच्या विरोधातील लढा एका नव्या उंचीवर न्या.
कामगार वर्ग आणि कष्टकरी जनतेच्या सर्व विभागांच्या खऱ्या शत्रूला म्हणजे भांडवलशाही व्यवस्था आणि तिला पोसणारे राजकारण व शक्ती, यांना ओळखा आणि ही शोषक व्यवस्था बदलण्यासाठीच्या लढ्यासाठी सज्ज व्हा.
लोकांच्या जनवादी अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत जागरुक रहा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तींचा पाडाव करा.
कामगार वर्गाची आणि जनतेची एकजूट भंग करण्याच्या, त्यात व्यत्यय आणण्याच्या सर्व प्रयत्नांबाबत, मग ते कोणत्याही वेषात येवो वा रंगात, सावध रहा.

२०१७च्या ह्या मे दिनी सीआयटीयु
आपला झेंडा उंचावत आहे

।कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्यासाठी।
।सर्व शोषण आणि दमना विरुद्धच्या एकजुटीसाठी।


भांडवलशाही मुर्दाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद!
साम्राज्यवादी नवउदार जागतिकीकरण मुर्दाबाद!

समाजवाद झिंदाबाद!

जगातील कामगारांनो एक व्हा!

No comments:

Post a Comment