आत्मसन्मान, समता, जाती-अंत
जाती-अंत संघर्ष समिती- भूमिका व कार्य
जाती-अंत संघर्ष समितीचे उद्दीष्ट आहे भारतीय जातीव्यवस्था सर्वार्थाने उध्वस्त करणे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली पाहिजे. अर्थात जाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन असणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेची पाळेमुळे कशात रुतली आहेत ते मुळातूनच समजून घेतले पाहिजे. तिचे स्वरूप, आशय, लक्षणे, गुंतागुंत यांची सखोल माहिती हवी. या व्यवस्थेमुळे मनुष्याच्या विकासाची गती कशी कुंठित झाली ते मनोमन पटले पाहिजे. मनुष्याचे मूलभूत अधिकार, त्याची प्रतिष्ठा, सन्मान याविषयी कोणताही गोंधळ असता कामा नये. माणसा- माणसातील भेदभाव, विषमता, परस्पर तुच्छता यांचा त्याग करण्याची मनापासून तयारी असली पाहिजे. समाजातील आणि व्यक्ती व्यक्ती गणिक असणारी बहुविधता आदरपूर्वक पाहण्याची क्षमता असली पाहिजे. सामाजिक भेदाभेद, जुलूम, अन्याय-अत्याचार, द्वेष आणि असमान वागणूक याविषयी कमालीचा तिरस्कार वाटायला हवा. शोषण-छळाला बळी पडणाऱ्यांविषयी विलक्षण सहवेदना जागती हवी. जाती-अंत संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम स्वतःची अशी जडण-घडण करणे महत्वाचे आहे हे विसरता कामा नये.
भारतीय जातीव्यवस्थेतील अमानुषतेचा नेमका आणि मर्मभेदी वेध घेऊन तिला नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्राने एक अखंड परंपरा निर्माण केली आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम जातीव्यवस्थेच्या समर्थकांवर घणाघाती प्रहार केले. ब्राह्मणी वर्चस्ववादी संस्कृतीशी उभा दावा केल्याखेरीज या व्यवस्थेला सुरुंग लावणे अशक्य आहे हे त्यांनी पुरेपूर जाणले होते. उच्चवर्णीय अहंकाराने मानवाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. मानवी सन्मानाला अस्पृश्यतेसारख्या जुलुमांनी रसातळाला पोहोचवले. स्त्रियांची पराकोटीची अवहेलना हा कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठेचा अभिमानविषय बनविला गेला. अस्पृष्यतेविरुद्ध व स्त्रियांच्या मानवी अधिकारांसाठी त्यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले परिश्रम आणि भोगलेल्या हालअपेष्टा जातीव्यवस्था निर्मूलनासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादयी ठरल्या आहेत.
जाती-अंताच्या लढाईकरिता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली दिशा आणि योगदान अनन्यसाधारण आहे. जन्मसिद्ध अधिकारभेदांवर आधारलेल्या जातीव्यवस्थेचा त्यांनी केला तितका अभ्यास, प्रतिवाद, चिंतन आणि प्रत्यक्ष प्रखर व्यवहार दुसऱ्या कुणीही केलेला नाही. जातीव्यवस्थेच्या नायनाटाकरिता त्यांनी आकाश-पाताळ एक केले, सर्वस्व पणाला लावले. जाती-अंताची लढाई म्हणजे बोलघेवड्यांची सैद्धांतिक आतषबाजी नव्हे. अस्पृश्यतानिवारण म्हणजे वरवरचे दिखाऊ उपाय नव्हेत. मूळ व्यवस्थेचा ढाचा तसाच ठेवून केलेल्या केवळ सहानुभूतीच्या वल्गना नव्हेत. ही लढाई एकेका जातीने लढायची लढाई नसून ती जातीव्यवस्थेत गुरफटलेल्या परंतु तिच्या अंताचे समग्र भान आलेल्या सर्वांनी एकत्र लढायची आहे. जातीव्यवस्थेचा विनाश हा एक बिनतडजोड क्रांतीकारी आणि प्रदीर्घ असा संघर्ष आहे. मात्र समाजातील बुद्धीवादी प्रगतीशील परिवर्तनवादी समाजधुरिणांनी ही लढाई निकराने पुढे नेण्यासाठी विशेष पुढाकार घेतला पाहिजे. असे प्रतिपादन व आवाहन बाबासाहेबांनी अथकपणे केले. वर्णव्यवस्था आणि जातीसंस्था यांचा प्रच्छन्न पुरस्कार आणि गौरव करणाऱ्या भल्याभल्या दिग्गजांना त्यांनी निखालसपणे निरुत्तर केले.
राजश्री शाहुमहाराजांनी बहुजनांना शिक्षण, रोजगार आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी अनोखे पायंडे पाडले. डॉ आंबेडकरांना मोठे सहकार्य केले. अस्पृश्यता निवारणासाठी पुढाकार घेऊन ब्राह्मणी वर्चस्वाची घमेंड जिरवली. खुद्द राजाच अस्पृश्यतेविरुद्ध प्रागतिक विचार-व्यवहारांचे समर्थन करत आहे याचा मोठा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडला.
फुल्यांनी 19व्या आणि आंबेडकरांनी 20व्या शतकात केलेल्या महान कार्यामुळे जातीव्यवस्था अंतासाठी मजबूत असा ऐतिहासिक अवकाश निर्माण झाला आहे. 21व्या शतकात हे उद्दीष्ट पूर्ण करावयाच्या आपल्या वाटचालीत या ऐतिहासिक पायाभरणीचा पदोपदी उपयोग होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सैनिक म्हणून आपल्याजवळ मार्क्सवादी चिकित्सक दृष्टिकोणाचा भक्कम आधार आहे. इतिहासाची भौतिकवादी संकल्पना, जगाकडे आणि समाजाकडे पाहण्याची द्वंद्वात्मक (डायलेक्टिकल) पद्धती आणि मानवाच्या सर्वंकष मुक्तीसाठी आवश्यक असणारा दुर्दम्य आत्मविश्वास यांची शिदोरी आपल्याजवळ आहे. फुले, आंबेडकरांनी दाखवलेली दिशा व मार्क्सवादी दृष्टी या शिदोरीच्या आधारावर आपल्याला जाती-अंताचा लढा यशस्वी करावयाचा आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अद्ययावत कार्यक्रमाने याबाबतीत केलेले मार्गदर्शन असे आहे-
जातीआधारित दमन व भेदाभेदाची मुळे भांडवलशाही-पूर्व सामाजिक व्यवस्थेच्या इतिहासात खूप खोलवर रुतलेली आहेत. आपल्या देशात जातीव्यवस्थेशी तडजोड करूनच भांडवलशाही समाजाचा विकास झाला आहे. भारतीय भांडवलदारांमध्ये जातींबाबतचे पूर्वग्रह ओतप्रोत भरलेले आहेत. जातीव्यवस्था आणि दलितांच्या दमनाविरुद्ध सशक्त एकजूट ही कामगार वर्गीय एकजुटीची पूर्वअट आहे कारण दलितांमधील बहुसंख्य जनता कष्टकरी वर्गाचाच एक हिस्सा आहे. जातीव्यवस्था निर्मूलनासाठीचा लढा आणि सामाजिक सुधारणा चळवळींच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सामाजिक दमनाविरुद्धचा लढा हा लोकशाही क्रांतीचा एक महत्वाचा भाग आहे. जातीय दमनाविरोधातील लढा वर्गीय शोषणाविरुद्धच्या लढ्याशी निगडितच आहे.
पक्षाच्या पुढाकाराने दिल्ली येथे भरलेल्या राष्ट्रीय दलित अधिकार संमेलनाच्या ठरावात म्हटले आहे-
आपला अनुभव हेच दर्शवितो की जातीय दमनाच्या लढ्याला वर्गीय शोषणविरोधातील लढ्याशी जोडून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि त्याच वेळी वर्गलढ्याने देखील जातीव्यवस्था निर्मूलन व सर्व प्रकारच्या सामाजिक दमनाविरुद्धच्या लढ्यांना सामावून घेतले पाहिजे. लोकशाही क्रांतीचे हे महत्वाचे अंग आहे.
पक्षाच्या राज्य कमिटीने नाशिक येथे आयोजित केलेल्या राज्य स्तरीय दलित हक्क परिषदेच्या ठरावात म्हटले आहे-
---अस्पृश्यता, जातीय दमन आणि जातीव्यवस्था निपटून काढण्याच्या संघर्षात कम्युनिस्टांनी अग्रभागीच रहायला हवे. दलित समुदायांना गुलामीत डांबून ठेवणाऱ्या जुन्या-नव्या सर्व तऱ्हेच्या जमीनदारी वर्चस्वाचा अंत करण्याचा लढा आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अमानुष अत्याचाराविरुद्धचा लढा एकत्रितपणे जोडायला हवा. दलितांच्या मुक्ती संग्रामात पुढाकार आणि नेतृत्व देण्यात राहिलेल्या कमजोऱ्या जाणीवपूर्वक दूर करायला हव्यात.---
यावरून अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येऊ शकते. एक तर दलित जनतेचे प्रश्न जे जातीय अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाशी निगडित आहेत, ते अग्रक्रमाने सोडवण्याचे कार्य आणि जातीव्यवस्था निर्मूलनाचे कार्य सुटे-सुटे करणे मुळातच चुकीचे आहे. ही दोन्ही कार्ये परस्परांशी पक्की बांधलेली आहेत. तथापी दलित जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या कार्यातील एक कळीचे आणि मध्यवर्ती कार्य आहे याकडे कधीही डोळेझाक करता येणार नाही. त्याचप्रमाणे फक्त दलित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच सर्व लक्ष केंद्रित करणे आणि एकूण जातीव्यवस्था उध्वस्त करण्याच्या व्यापक कार्याला दुय्यम लेखणेही बरोबर नाही. त्याचप्रमाणे जातीव्यवस्थेचा नायनाट, स्त्री-पुरुष विषमता निखालसपणे संपविण्याशी घट्टपणे विणला गेला आहे. आत्मसन्मान आणि समता यांची दलित प्रश्न सोडविण्याकरिता जितकी नितांत गरज आपल्याला जाणवायला हवी तितकीच तळातून पटलेली स्त्रियांच्या सन्मानावरची आणि समतेवरची अढळ निष्ठा आवश्यक आहे.
सामाजिक विषमता, भेदभावी वागणूक, भीषण-निर्घृण अत्याचार, उघड उघड अप्रतिष्ठा किंवा छुपी तुच्छता ही जातीव्यवस्थेच्या अंगाअंगात मुरलेली विकृत वैशिष्ठ्ये आहेत. जात किंवा पोटजात ही कधीही एकटी असत नाही. ती जातींच्या समुदायात असते. जातीसंस्थेचा एक घटक असते. आणि हे घटक एकावर एक अश्या तथाकथित मानापमानाच्या उतरंडीत गच्चपणे रचलेले असतात. जाती-अंत हा एका जातीचा अंत नसतो. तो तसा एकारलेपणे, एकांड्या पद्धतीने आणि एकांगी बाजूने करताही येत नाही. जाती-अंताचा अर्थ या मानापमानाच्या अभेद्य उतरंडी रचनेचा सर्वांगानी केलेला खातमा असाच असतो.
परंतु विषमता आणि अपमानास्पद अवहेलना जातीव्यवस्थेत करकचून आवळल्या गेल्या आणि टिकून राहिल्या याची अनेक कारणे आहेत. जातीव्यवस्थेला अपरिवर्तनीयतेचे परीमाण जोडण्यामागचे एक मुख्य कारण उच्चवर्णीय-उच्चजातीयांचे वर्गीय हितसंबंध हे आहे. आर्थिक वर्गीय शोषणावर आधारित विषमता मालमत्ताधारी आणि सत्ताधारी वरीष्ठ गटांचे हितसंबंध जोपासते. जातीव्यवस्थेत सामावलेली विषमता या हितसंबंधांचे पोषण करते. आर्थिक-सामाजिक विषमता परस्परांना सांभाळत एकूण वर्चस्ववादी व्यवस्थेला कायम करू पाहतात. आज भारतात आणि महाराष्ट्रात, पूर्वीपेक्षा खूपच बदललेल्या परिस्थितीत सुद्धा, पूर्वापार चालत आलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात भांडवलशाहीत दृढ होत गेलेल्या या दोन्ही प्रकारच्या विषमतांतून उद्भवलेली वर्चस्ववादी व्यवस्था आहे. त्यात भरीस भर म्हणून अलिकडे साम्राज्यवादी वर्चस्ववादाशी लगट करणारी लटांबरेही ओघळू लागली आहेत.
जातीव्यवस्था अंताचा लढा शोषणाधारित वर्गव्यवस्थेविरुद्ध करावयाच्या वर्गसंघर्षाशी अतूटपणे जोडला गेला असल्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका सर्व प्रकारच्या वर्चस्ववादाविरुद्ध करावयाच्या संघर्षाशी भिडते हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांधतेवर आरूढ होऊन सामाजिक उत्पात घडविणाऱ्या धार्मिक वर्चस्ववादाविरुद्ध पक्षाने घेतलेली कडवी भूमिका देखील या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः बहुसंख्यकांच्या अल्पसंख्यविरोधी वर्चस्ववादाकरिता हिंदूंच्या सर्वजातीय एकजुटीची केली जाणारी आवाहने आपल्या उद्दिष्टांना किती गंभीर धोका निर्माण करीत आहेत हे समजून घेतले पाहिजे. वर्चस्ववादाविरुद्धच्या या सर्वव्यापी लढाईत शोषित-पिडीत वर्ग-जातीतील सर्व घटक सामील करावेच लागतील.
महाराष्ट्रात आपले जाती-अंताचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आताच्या पूर्वीपेक्षा बदललेल्या आणि बदलत असलेल्या काही महत्वाच्या गोष्टींची पाहणी करावी लागेल. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून मोहिमा हाती घ्यावा लागतील.
यादृष्टीने काही मुद्दे सुचवले आहेत-
• सामाजिक भेदभावामुळे राज्यातील दलित जनतेच्या होत असलेल्या विविध प्रकारच्या कुचंबणेविषयी बारीक तपशिलासहित माहिती गोळा करणे. ग्रामीण-शहरी, सुसिक्षित-अशिक्षित, रोजगार असणारे-नसणारे, उपजीवीकेची साधने आणि जीवनावश्यक सोयीसुविधा असणारे-नसणारे अश्या दोन्ही प्रकारच्या दलित जनतेतील व्यक्तींच्या जीवनातील कुचंबमा नक्की कश्या जाणवत आहेत त्याची माहिती एकत्र करणे.
• वर्ग-जातींची सरमिसळ किंवा विकीर्णता यांची गुंतागुंत कशी बदलली आहे यासंबंधी केल्या गेलेल्या अभ्यासांची नोंद घेणे. जात तशीच राहून गेलेल्या एकेका जातीतील काही व्यक्तींचा वर्ग कसा आणि किती प्रमाणात बदलला आहे, स्तर तयार झाले आहेत काय आणि त्यामुळे जाती-अंताच्या लढ्यापुढे कोणत्या शक्यता किंवा अडचणी उद्भवल्या आहेत याबाबत विश्लेषण करणे.
• बदललेल्या परिस्थितीत आपल्या उद्दीष्टपूर्ती करिता सकारात्मक आणि नकारात्मक आर्थिक- राजकीय घडामोडींची प्रक्रीया अभ्यासणे. जे विविध प्रकारचे उस्फुर्त आणि संघटित संघर्ष झाले व होत आहेत त्यांचे मूल्यांकन करणे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी- संघर्षांची व्यवस्थित मांडणी करून निष्कर्ष काढणे.
• जाती-अंताच्या आणि एकूण सर्वच वर्चस्ववादाच्या विरुद्ध आपल्या बरोबर कोण येऊ शकतील, कोणाकोणाला बरोबर घेतलेच पाहिजे आणि कोणाला कसे टाळले पाहिजे किंवा दूर ठेवले पाहिजे यासंबधी विचार करणे व तसे योग्य नियोजन करणे.
आज ताबडतोबीने प्रत्यक्ष व्यवहारात खालील गोष्टींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
• वरील प्रकारचे सर्वेक्षण सुरु करणे. संकलन, संगणकीकरण आणि विश्लेषणाचे कार्य समित्या बनवून निश्चित कालावधीत पार पाडण्यासाठी जबाबदाऱ्यांचे वाटप करणे. नियमित आढावा घेणे.
• जातीव्यवस्थेविरुद्ध सातत्याची प्रचार आणि प्रबोधनाची मोहीम उघडणे. त्यासाठी साहित्याची निर्मिती, विक्री, प्रकाशन समारंभ, निबंध- वक्तृत्व पुरस्कार, ग्रंथ प्रदर्शने, व्याख्याने इत्यादी संघटित करणे. प्रबोधनाचे कार्य दोन पातळीवर करणे. सर्वसामान्य जनतेला अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीप्रथा, अस्पृश्यता आणि भेदाभेद यापासून फारकत घेण्याकरिता उद्युक्त करणारे सौम्य प्रबोधन एका पातळीवर करणे. याच पातळीवर माणसा-माणसातील भेदभावांना धार्मिक अधिष्ठान देणाऱ्या तथाकथित धर्मवचनांची चिरफाड प्रबोधनातून करणे. श्रमिक समुदायांच्या संघटना बांधताना एक सातत्याची मोहीम म्हणून असे प्रबोधन करण्याची सवय लावून घेणे. दुसऱ्या पातळीवर जातीव्यवस्थेविरुद्ध विना तडजोड घणाघाती प्रहार करणारे आणि लबाड बोलघेवड्यांची थोबाडे फोडणारे प्रबोधन करणे.
• सामाजिक भेदाभेद आणि छळ-जुलुमाच्या घटना घडतील तेव्हा तत्काल प्रभावी हस्तक्षेप करण्यासाठी यंत्रणा उभारणे. असा हस्तक्षेप व्यापक अश्या अनेक जाती-धर्मियांच्या व्यक्तींचा संच तयार करून करणे. अत्याचाराला बळी पडलेल्यांना संरक्षण, दिलासा देण्यात, त्यांचे पुनर्वसन करण्यात पुढाकार घेणे. गुन्हेगारांना अद्दल घडावी यासाठी कायदेशीर आणि अन्य मार्गांनी दबाव आणणे. मुख्य म्हणजे अश्या घटनांनंतर त्या पुन्हा घडू नयेत यासाठी गावातील सर्व जाती-धर्मियांच्यात जास्तीत जास्त सलोखा निर्माण करून एकजूट बांधण्यासाठी हरतऱ्हेने उपाययोजना करणे. घटना घडलेल्या ठिकाणी सातत्याचा संपर्क ठेवून सलोखा राखण्याकरिता प्रयत्न करणे. असे हस्तक्षेप करण्याची आपली कुवत वाढवत नेणे.
• सर्व जाती धर्माच्या लोकांना वारंवार एकत्र आणून कार्यक्रमांचे आयोजन करणे. उत्सव साजरे करणे. परस्परांच्या घरात जाण्यायेण्याचे, खेळीमेळीने वागण्याचे, आनंद व्यक्त करण्याचे आणि दुःख-संकट प्रसंगी सहकार्य देण्याचे प्रघात मुद्दाम होऊन पाडण्याकरिता चालना देणे.
• आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणे. अश्या जोडप्यांचे सत्कार घडवून त्यांचे संसार थाटून देणे. त्यांना एकत्र आणून चर्चा घडवून आणणे. त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्यासाठी संस्थात्मक कार्य करण्याला उत्तेजन देणे. जातीअंतर्गत विवाहसंबंधांऐवजी आंतरजातीय विवाहांची सवय आणि प्रथा समाजात निर्माण होण्याकरिता आवश्यक ते सर्व सकारात्मक मार्गक्रमण करणे.
No comments:
Post a Comment