Friday, October 14, 2011

आझाद मैदानात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे, निदर्शन




आझाद मैदानात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे, निदर्शन

महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 12 ऑक्टोबर 2011 रोजी आझाद मैदान येथे धरणे धरले व आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र निदर्शने केली. सुमारे 10 हजार कर्मचारी ह्या निदर्शनात सामील झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महिला बाल विकास मंत्र्यांशी अनेकदा चर्चा करूनही कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या भावना अत्यंत तीव्र बनल्या होत्या याचे प्रत्यंतर आझाद मैदानात पहायला मिळाले. काही अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी स्विकारण्यास नकार देत असल्यामुळे वाया जात असलेली टिएचआरची पाकिटे डोक्यावर उचलून आणली होती व ती पाकिटे मैदानात फेकून देत सर्वांनी राज्य शासनाच्या कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांना व त्यांच्या नफ्याला लाभार्थ्यांच्या वाढलेल्या कुपोषणापेक्षा जास्त प्राधान्य व महत्व देण्याच्या भ्रष्ट धोरणांचा जाहीर निषेध केला.
कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे नेते एम ए पाटील, शुभा शमीम, सुकुमार दामले, कमल परुळेकर, भगवान देशमुख, रमेशचंद्र दहिवडे, हिराबाई घोंगे, दिलीप उटाणे, राम बाहेती, माया परमेश्वर, नितीन पवार उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या आक्रमकपणामुळे महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने बैठकीसाठी वेळ दिला. शिष्ठमंडळात एम ए पाटील, शुभा शमीम, रमेशचंद्र दहिवडे, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, यांचा समावेश होता. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली.
• कृती समितीने दिलेल्या मसुद्यानुसार 2005 पासून सेवामुक्त झालेल्या सेविकांना 20 वर्षांच्या सेवेसाठी रु 1 लाख व त्यावरील प्रत्येक वर्षासाठी रु 5000 तर मदतनिसांना 20 वर्षांच्या सेवेसाठी रु 75,000 व त्यावरील प्रत्येक वर्षासाठी रु 3750 एकरकमी निवृत्ती लाभाची योजना लागू करा.
• अंगणवाडीच्या आहार, निरिक्षण, परिक्षणासहित कोणत्याही कामाचे खाजगीकरण करू नये. राज्यातील बालकांचे कुपोषण वाढवणारा निकृष्ट दर्जाचा पाकीटबंद आहार- टी एच आर त्वरीत बंद करा. नियमित पुरक पोषक आहाराचा दर वाढवून तो अंगणवाडीत शिजविण्याचे काम प्राधान्याने सेविका मदतनीस व त्यांची तयारी नसल्यास स्थानिक बचत गट किंवा महिला मंडळांना द्या.
• अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या केंद्रीय मानधनवाढीची त्वरीत अंमलबजावणी करा. वाढीव मानधनाचा फरक त्वरीत द्या.
• सेविका, मदतनिसांची रिक्त पदे त्वरीत भरा. कार्यरत मदतनिसांना 8 वी पासच्या जुन्या निकषांप्रमाणे गावातील सेविकांच्या कोणत्याही रिक्त पदावर प्राधान्याने थेट नियुक्ती देण्याचा आदेश त्वरीत अंमलात आणा.
• कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये. बाल सेवा केंद्र- व्हिसिडिसी पद्धत रद्द करून तीव्र कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्याची पूर्वीचीच पद्धत अवलंबा.
• योजनेतील भ्रष्टाचार निपटून काढा.
• दिवाळीपूर्वी वाढीव फरकासहित वाढीव मानधन व भाऊबिजेची रक्कम सेविका, मदतनिसांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
मा मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत खात्याचे अवर सचिव व उपायुक्त पातळीचे अधिकारी उपस्थित होते. कृती समितीच्या निमंत्रक व प्रतिनिधी शुभा शमीम यांच्या सोबत प्रत्यक्ष चर्चा करून पेन्शनचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची व त्यावर खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या असून फाईल मा मंत्र्यांच्या सुपूर्त केली असल्याची माहिती अवर सचिवांनी दिली. यावर आठ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून फाईल वित्त खात्याकडे पाठवण्याचे त्यांनी मान्य केले. फरकासहित वाढीव मानधनाची सर्व प्रकिया पूर्ण झाली असून दिवाळीपर्यंत शासन तो निधी खाली पाठवेल अशीही त्यांनी माहिती दिली. फक्त 1 वर्षा साठी मंजूर केलेली वाढीव भाऊबीज ह्या वर्षीही देण्याचेही त्यांनी मान्य केले. टीएचआरच्या बाबतीत मात्र शासन, प्रसासन व उत्पादक कंपन्या यांचे हितसंबंध लाभार्थींच्या हिताच्या आड येत असल्याचा प्रत्यय ह्या बैठकीत आला. कोर्टाच्या आड दडत त्यांनी टीएचआर बंद करू शकत नसल्याचे सांगितले व शिष्ठमंडळाने देखील लाभार्थी स्विकारत नसल्यामुळे आम्ही ह्यापुढे टीएचआर उतरवूनच घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
सिटूचे राज्य पदाधिकारी कॉ कृष्णन व जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा मरियम ढवळे यांची अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारी भाषणे झाली.
शिष्ठमंडळ परत आझाद मैदानात आल्यानंतर शासनाबरोबर झालेल्या चर्चेचा सविस्तर वृत्तांत मांडून शासनाच्या आश्वासनांची पूर्तता 1 महिन्याच्या आत न झाल्यास नागपूर येथे प्रचंड मोर्चा काढण्याची व त्यातूनही निर्णय न झाल्यास जानेवारी 2012 मध्ये बेमुदत संप करण्याची घोषणा करून प्रचंड घोषणांच्या गजरात निदर्शनांचा समारोप करण्यात आला.
सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या संपूर्ण महाराष्टातून सुमारे 2000 कर्मचारी रमेशचंद्र दहिवडे, शुभा शमीम, आरमायटी इराणी, कल्पना शिंदे, गणेश ताजणे, रसिला धोडी, आनंदी अवघडे, एम जी बागवान, माधुरी क्षीरसागर, मधुकर मोकळे, पंजाबराव गायकवाड, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, प्रतिभा शिंदे, सफिया खान, शकुंतला ढेंगरे, शोभा बोगावार, हिराबाई घोंगे, रजनी पिसाळ, आशाबी शेख, बकुळा शेंडे, संपदा सैद, संगिता कांबळे, मीना मोहिते, सुप्रिया पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्यात सामील झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment