Saturday, September 15, 2012

कामगार महिलांच्या लढ्याबाबत सिटूची भूमिका

कामगार महिलांच्या लढ्याबाबत सिटूची भूमिका सुप्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत एन्गेल्स यांनी आपल्या साहित्यात कुटुंब, खाजगी मालमत्ता व राज्य यांचे विश्लेषण केले आहे व महिलांच्या गुलामीची कारणे त्यात समर्थपणे मांडली आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या वर्ग समाजाच्या उत्पत्तीबरोबरच महिलांच्या समाजातील दुय्यम स्थानाची देखील निर्मिती झाली. वर्ग समाजाची उत्पत्ती खाजगी मालमत्तेच्या संबंधातून म्हणजेच उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीमुळे झाली. ह्या मालकीमुळे समाजात दोन वर्ग निर्माण झाले एक मालकांचा वर्ग व दुसरा कामगारांचा. ह्या वर्ग विभाजनामुळे इतिहासात महिलांच्या वाट्याला दोन भूमिका आल्या. त्यांना निसर्गाने प्रदान केलेल्या पुनरुत्पादनाच्या जबाबदारीला वर्ग समाजाने एका बाजूला खाजगी मालमत्तेचा वारस निर्माण करणे, वंश वाढवणे, घराची देखभाल करणे ह्या कामात बंदिस्त केले तर दुसऱ्या बाजूला कष्टकरी समाजाचा भाग म्हणून उत्पादक कामात सहभागी कामगार, वंश वाढवून कामगार वर्गाची निरंतरता कायम ठेवणारी तसेच समाजाने दिलेली घरकामाची जबाबदारी पार पाडून घरातील लोकांच्या झिजलेल्या श्रमशक्तीची पुनर्निर्मिती करणारी व्यक्ती म्हणून एक महत्वाची भूमिका महिला पार पाडत आल्या आहेत. सरंजामी अवस्थेत खाजगी मालमत्तेमुळे निर्माण झालेले हे दुय्यम स्थान भांडवलशाहीत देखील दुय्यमच राहते कारण भांडवली समाजात देखील माणसांचे आपसातील संबंध मालमत्तेच्या खाजगी मालकीवरच वरच आधारलेले असतात. आणि मुळातच भांडवलशाही शोषणावरच आधारलेली व्यवस्था आहे. भांडवलशाहीत कामगार महिलांचे अनेक बाजूंनी शोषण आणि उत्पीडन होते. एक तर पारंपारिक समाजात कुटुंबांअंतर्गत तिचे श्रम बंदिस्त असल्यामुळे श्रमाच्या बाजारात उशिराने प्रवेश करणारी अकुशल, अर्ध कुशल कामगार म्हणून, घरात करायच्या बाल संगोपन, रुग्णसेवा आदी सेवांची पुनरावृत्ती समाजासाठी देखील मोफत किंवा अल्प मोबदल्यात करावी ह्या अपेक्षांचे ओझे वाहणारी, श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करणारी स्त्री म्हणून भांडवलशाहीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या तिच्या स्वस्त श्रमांचे नेहमी शोषणच केले. इतकेच नाही तर कामगारांची राखीव फौज म्हणून उत्पादनाच्या क्षेत्रात श्रमाला मिळणारे मूल्य कमी ठेवण्यासाठी व गरज पडेल तेव्हा स्वस्त मजूर म्हणून वापरून घेण्यासाठी आणि गरज संपली की कामगार कपातीची कुऱ्हाड सर्वप्रथम महिला कामगारांच्याच रोजगारावर कोसळवून त्याना पुन्हा एकदा घरात ढकलण्यासाठी नेहमीच त्यांच्या दुय्यमत्वाचा फायदा घेतला. महिला कामगारांचे श्रम कामाच्या ठिकाणी स्वस्तात व घरात श्रमाचे पुनरुत्पादन करण्यासाठी मोफत वापरून भांडवलशाही करत असलेल्या दुहेरी शोषणाच्या पार्श्वभूमीवर आता आपण त्यांचे महिला कामगार म्हणून प्रश्न व त्याबाबत सिटूची भूमिका व कृती कार्यक्रम याबाबत माहिती करून घेऊया. संघटीत क्षेत्रातील कामगार महिलांचे प्रश्न - • संघटीत कामगारांचे एकूण कामगारांमध्ये असलेले प्रमाण फक्त ७ % आहे. पण महिला कामगारांचे संघटीत क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण फक्त ४ % आहे. ह्याचा अर्थ महिलांना मुळातच संघटीत क्षेत्रात रोजगार मिळण्याचे प्रमाण कमी आहे. संघटीत क्षेत्रात स्त्रियांच्या प्रवेशावारच अघोषित बंदी आहे. त्यातूनही अकुशल कामात व प्रत्यक्ष उत्पादनात नव्हे तर पूरक कामांमध्ये त्यांना रोजगार दिला जातो. संघटीत क्षेत्रात लागू असलेल्या कामगार कायद्यांचे लाभ व विशेषत: मातृत्व लाभांपासून त्यांना वंचित ठेवण्यासाठीच त्यांना रोजगार नाकारला जात आहे. • महिलांना संघटीत क्षेत्रात रोजगार जरी मिळाला तरी त्यांचे प्रश्न संपत नाहीत. कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी न करण्याच्या व त्या माध्यमातून स्वत:चा नफा वाढवण्याच्या मालक वर्गाच्या वृत्तीचा सर्वात जास्त फटका महिला कामगारांना बसतो. प्रामुख्याने पुढील कायदे व सोयी सवलतींपासून त्यांना वंचित ठेवले जाते. समान कामाला समान वेतन, मातृत्व लाभ कायदा, पाळणाघर, स्तनपान करविण्यासाठी कामातून ठराविक काळानंतर अवकाश, स्वतंत्र स्वच्छतागृह, भोजन व आरामाचा कक्ष, रात्रपाळीच्या वेळी सुरक्षितता व घरून आणण्या व पोहोचविण्याची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था, कामाच्या ठिकाणी सुरक्षित व सन्मानाचे वातावरण मिळण्याचा अधिकार, लैंगिक छळापासून सुरक्षा असे अनेक कायदे प्रत्यक्ष अमलात येत नाहीत व उलट त्यांना महिला कामगारांचा अधिकार न मानता उलट त्यांना त्यापासून वंचित केसे ठेवता येईल असाच मालक वर्गाचा व व्यवस्थापनेचा प्रयत्न असतो. • कामगार कपातीचा अथवा कायम कामागारांसाठीच्या सर्व लाभापासून वंचित ठेवण्याच्याच हेतूने लागू करण्यात येणाऱ्या स्वयं निवृत्ती योजना, लवचिक वेळ किंवा अर्धवेळ नोकरी अश्या योजनांचा सर्वप्रथम फटका महिला कामगारांनाच बसतो व अनेकदा रोजगार वाचविण्यासाठी त्यांना कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह सोडून द्यावा लागतो. असंघटीत क्षेत्रातील कामगार महिलांचे प्रश्न - • असंघटीत क्षेत्रात एकूण कामगार महिलांमधील जवळ जवळ ९६ % महिला कामगार काम करतात. शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कौशल्य मिळवण्यासाठी मुळातच महिलांच्या दुय्यम सामाजिक दर्ज्यामुळे त्यांना संधी कमी मिळते व त्यामुळे अत्यंत अल्प मोबदल्याची कमी कौशल्याची कामे महिलांना मिळतात जी असंघटीत क्षेत्रात असतात. • असंघटीत क्षेत्रात कोणत्याही कामगार कायद्याचा लाभ कामगारांना मिळत नाही. त्यामुळे ह्या ९६ % महिला कामगारांना कामाची सुरक्षा नाही. त्यांना किमान वेतन, समान वेतन मिळत नाही. आरोग्य विमा, निवृत्ती वेतन आदी सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत नाही. • रोजगार व घरातील कामाचा दुहेरी बोजा कामगार महिलांना उचलावा लागत असल्यामुळे घरातील काही आजारपणासारख्या संकटांच्या वेळी किंवा मुलांच्या परीक्षांच्या वेळी त्यांना रजा घ्याव्या लागतात. परंतु पगारी रजेची सुविधा बहुसंख्य असंघटीत क्षेत्रातील कामगारांना नाकारण्यात येत असल्यामुळे त्यांना बिन पगारी रजा घ्याव्या लागतात व त्यामुळे पगार अजूनच कमी मिळतो. कुपोषण, रक्तपांढरी इत्यादीमुळे आजाराच्या प्रमाणात वाढ होते पण वैद्यकीय रजा किंवा उपचाराचा खर्च मिळत नसल्यामुळे आजार अंगावर काढले जातात व त्याचा परिणाम पुढे गंभीर आजार, काम करण्याची क्षमता मंदावणे असा होतो. • कामाच्या असुरक्षिततेमुळे काम टिकवण्यासाठी लैंगिक छळाला बळी पडावे लागते. विशेष: बांधकामासारख्या ठेकेदार व मुकादामांसारख्या सरंजामी मानसिकतेच्या लोकांच्या ताब्यातील क्षेत्रात हा धोका जास्त संभवतो. • कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा व एकूणच सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. कामगार महिलांची लढाऊ क्षमता अनेक समस्या व प्रश्नांनी घेरल्यामुळे व कुटुंब चालवण्याच्या जबाबदारीबाबत जास्त गंभीर असल्यामुळे ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी देखील महिला कामगार पोटतिडीकेनी तयार होतात. एका मर्यादेपलीकडे अन्याय सहन करू शकत नाहीत व त्यामुळे त्या लढण्यासाठी लगेच पुढे येतात. एकदा लढायला पुढे आल्यावर त्या चुकीच्या तडजोडी न करता आक्रमक लढे करण्यासाठी पुढे येतात. कोणत्याही संघर्षाला अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य, त्याग करण्याची तयारी त्यांच्यामध्ये अंगभूतच असल्यामुळे त्या लढ्याला एक वेगळे परिमाण जोडू शकतात. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणाऱ्यां म्हणूनच प्रलोभनांना बळी न पडता लढ्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या अश्या महिला कामगारांच्या सहभागामुळे लढ्याला एक नैतिक बळ मिळते व त्यांच्या सहभागाशिवाय कोणतेही परिवर्तन घडूच शकत नाही. लढा करण्यासाठी पुढे आल्यानंतर त्या सहसा माघार घेत नाहीत. समोरच्या व्यक्तीचा वाईट हेतू लगेच हेरायच्या आपल्या नैसर्गिक व आयुष्यातील अनुभवांमुळे अजूनच समृद्ध झालेल्या दृष्टीमुळे त्या आपल्या वर्गशत्रूंना देखील लगेच ओळखतान व त्यांच्याविरुद्ध लढा द्यायला सज्ज होतात. त्यांच्या ह्या गुणांना ओळखून त्यांचा विकास करणे व भांडवलशाही गाडण्याच्या व समाजवाद प्रस्थापित करण्याच्या लढाईत त्यांच्या ह्या लढाऊ वृत्तीच्या आधारे पुढे वाटचाल करणे हे वर्गलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कामगार संघटनाचे कर्तव्य आहे. महिला कामगारांबाबतचा भेदभाव हा केवळ महिलांचा व महिलांनीच लढवायचा प्रश्न नाही तर हा एक वर्गीय प्रश्न आहे व तो संपूर्ण कामगार चळवळीचा प्रश्न आहे. कामगार महिलांवर अन्याय करून भांडवलशाही स्वत:ला बळकट करते व हे प्रश्न प्राधान्याने घेतले नाहीत तर कामगार चळवळीत फूट पडण्याचा व अर्धी ताकद कमी होण्याचा धोका आहे. म्हणून महिला कामगारांचे प्रश्न, समस्या व मागण्या घेऊन लढा उभारण्याची जबाबदारी संपूर्ण कामगार चळवळीची आहे फक्त महिला नेत्यांची नाही. अर्थातच त्यांनी ह्या लढ्यात पुढाकार घेतल्यास कामगार महिलांचा विश्वास त्या कमी वेळात संपादन करू शकतात व कामगार महिलांचा लढा बळकट होऊ शकतो. भांडवलशाही उलथून समाजवाद आल्याशिवाय महिलांचे व कामगारांचे शोषण संपू शकत नाही व त्यामुळे सिटू ला अभिप्रेत असलेली व्यवस्था परिवर्तनाची लढाई बळकट केल्याशिवाय आपली मुक्ती होऊ शकत नाही हे सत्य एकदा महिला कामगारांना समजले कि त्या ह्या लढ्यात स्वत:ला झोकून देतात. एकूणच महिला कामगारांच्या सहभागाशिवाय भांडवलशाही नष्ट होणार नाही व भांडवलशाही नष्ट झाल्याशिवाय महिलांची मुक्ती संभवत नाही. म्हणूनच केवळ क्षणिक व तात्पुरत्या मागण्या, लढे व विजय यांवर समाधान न मानता शोषण मुक्त समाज निर्मितीचे व कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली उत्तरोत्तर तीव्र व व्यवस्था बदलण्यासाठीचे लढे उभारून अंतिमत: समाजवादी व्यवस्था आणण्याचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱया सिटू सारख्या कामगार संघटनेनी कामगार महिलांना संघटीत करून त्यांना ह्या लढ्यात पुढे आणण्याला प्राधान्य दिलेच पाहिजे. सिटू ची कामगार महिलांना संघटीत करण्याबाबतची भूमिका कृती व कार्यक्रम - • कामगार महिलांचे संघटन व लढे यांना प्राधान्य दिले पाहिजे परंतू हा लढा स्वतंत्रपणे नव्हे तर संपूर्णपणे सिटूच्या लढ्याचा एक अविभाज्य भाग म्हणून लढवला गेला पाहिजे. त्यांचे संघटन सिटूच्याच अंतर्गत केले जायला हवे ही सिटूची भूमिका आहे. • कामगार महिलांचे संघटन करणे, त्यांचे स्वत:चे कामाच्या ठिकाणचे वा सामाजिक भेदभावाचे प्रश्न उचलणे हे एक वर्गीय संघटना म्हणून जरी सिटूचे कर्तव्य असले व सिटूच्या झेंड्याखाली हे कार्य प्राधान्यानी करणे हे एकूणच सिटूचे काम असले तरी त्या कामात महिला कामगारांचा सहभाग वाढण्यासाठी व नेतृत्व पुढे येण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज देखील सिटूने ओळखली आहे. व त्या दृष्टीने अखिल भारतीय पातळीवर व राज्यांमध्ये कामगार महिला समन्वय समित्यांचे गठन १९८० पासूनच सुरु केले आहे. • ह्या कामगार महिला समन्वय समित्यांचे जिल्हा, राज्य व केंद्रीय पातळीवर गठन करणे, दर ३ वर्षांनी संमेलन घेऊन त्यांची पुनर्रचना करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, आवश्यक ती साधने उपलब्ध करून देणे व आर्थिक तरतूद करणे हे त्या त्या पातळी वरील सिटू कमिट्यानी करायचे काम आहे. कमिटीच्या बैठकांमध्ये नियमितपणे विषय घेणे, एका पदाधिकार्यावर ह्या कामाची जबाबदारी सोपवणे व सातत्याने आढावा घेणे हे काम सिटूच्या पातळीवरून झाले पाहिजे. कामगार महिलांना संघटीत करण्यात येणारया अडचणी व समस्या- • कामगार महिलांना संघटीत करण्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांना मिळणारा कमी वेळ. त्यांच्यावर असलेल्या तिहेरी बोज्यामुळे त्यांना ह्या प्रत्येक जबाबदारीसाठी वेळ अपुरा पडतो. हा तिहेरी बोजा म्हणजेच कारखाना, कार्यालये इत्यादी कामाच्या ठिकाणची जबाबदारी, दुसरी त्यांच्या घरातील संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी व तीन कामगार संघटनांचे सभासद किंवा पदाधिकारी म्हणून जबाबदारी. ह्या बहुविध जबाबदारया पार पाडण्यासाठी त्यांना सर्व आघाड्यांवर सहकार्य मिळण्याची गरज आहे व ही गोष्ट कामगार संघटना व चळवळ तसेच एकूणच जनवादी चळवळीने समजून घेतली पाहिजे व समाजात कामगार महिलांना सहकार्य मिळण्यासाठी पूरक वातावरण तयार केले पाहिजे. • अजून एक मोठी अडचण म्हणजे महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, स्वयं अध्ययन व कौशल्य वाढवण्यासाठी संधी मिळण्याच्या पूर्ण विरोधात असणारी सामाजिक परिस्थिती. त्यामुळे त्यांची जाणीवेची पातळी वाढवण्याची जबाबदारी कामगार संघटनेवरच येउन पडते. • धार्मिक व सांस्कृतिक धारणा, परंपरा व जातीव्यवस्थेच्या बंधनांमध्ये त्या जखडल्या गेलेल्या असतात व त्यामुळे त्याना घरी परतायच्या वेळा, सण, व्रत वैकल्ये ह्यांच्या दडपणाखाली राहावे लागते. समाजात एकूणच अंधश्रद्धा, धर्मांधता ह्याच्या जोखडातून स्त्रीयांना मुक्त करणे हे देखील कामगार चळवळीचे कार्य आहे. • बहुसंख्य महिलांना लग्नाआधी घराच्या व लग्नानंतर सासरच्या लोकांचा विरोध सहन करावा लागतो. कामगार संघटनेतील सहभागावर त्यामुळे बंधने येतात. एकूणच समाजात व कुटुंबात लोकशाही अधिकारांवर गदा येऊ नये व स्त्रियांच्या सामाजिक सहभागावर असलेली नियंत्रणे दूर व्हावीत यासाठी देखील कामगार संघटनांना काम करावे लागेल. • कामगार चळवळीत पुढे येताना अनेकदा त्यांना चारित्र्यहननाच्या धोक्याला बळी पडावे लागते त्यामुळे देखील त्यांच्या सहभागावर मर्यादा येतात. म्हणूनच संघटनेत योग्य वातावरण राखण्याची व असा प्रकार होत असल्यास थांबविण्याची जबाबदारी कामगार संघटनांची आहे. कामगार महिला समन्वय समित्यांचे कामकाज व कृती कार्यक्रम - • कारखाना, संघटना व कामाच्या प्रत्येक ठिकाणी महिला सब कमिट्या बनवणे. त्यांच्या माध्यमातून महिलांचे विशिष्ठ प्रश्न युनियन समोर मांडणे व व्यवस्थापनेसमोर त्या मांडून सोडवून घेण्यासाठी संघटनेकडे पाठपुरावा करणे. • व्यापक मागण्या व महिला कामगारांच्या विशिष्ठ मागण्यांवर मोहिमा आयोजित करणे. • महिला कामगारांच्या समस्यांचा व प्रश्नांचा अभ्यास करून संघटनेला त्यांची माहिती लिखित स्वरूपात देणे. • लढ्याच्या, शिक्षणाच्या कार्यक्रमात स्त्रीयांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे. • विविध विभाग व युनियन मधील महिला कामगारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणणे. • कामगार महिलांच्या प्रश्नांवर साहित्य निर्मिती करणे. शक्य झाल्यास स्वतंत्र मासिक किंवा कामगारांच्या मासिकात नियमितपणे लिखाण करणे. • कामगार महिलांच्या शिक्षण, प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न करणे व कार्यक्रम आयोजित करणे. त्यांच्या जाणीवेची पातळी उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे. • सरकारच्या कामगार महिलांसंबधीच्या धोरणांचा अभ्यास करून त्यांवर भूमिका घेण्यासाठी सिटू ला मदत करणे. • विविध क्षेत्रात काम करणारया महिलां कामगारांच्या त्या क्षेत्रातील विशिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी सिटू समोर मांडणे व पाठ पुरावा करणे. प्राधान्याच्या क्षेत्रांबाबत अभ्यास करून लढे आयोजित करण्यासाठी सिटू ला मदत करणे. • विविध क्षेत्रातील महिलां कामगारांना संघटीत करण्यासाठी सिटू ला सहकार्य करणे. • विविध सिटू सलग्न युनियनच्या महिलां कामगारांच्या समस्या उचलणे व सोडवणे ह्या कार्याचे मूल्यांकन करून कमिटी पुढे मांडणे. • कामगार महिलांच्या व त्याना न्याय मिळण्यासाठीच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी मध्ये काम करणे. • कामगार महिलांचे नेतृत्व पुढे येण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे तसेच संघटनांमध्ये पुरुषप्रधान व सरंजामी मानसिकतेच्या प्रभावाखाली काही घटक असल्यास अंतर्गत संघर्षाच्या माध्यमातून ती मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणे.

No comments:

Post a Comment