अखिल भारतीय
अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (आयफा) ची
२५ वर्षे व पुढील आव्हाने
अखिल भारतीय सेविका व
मदतनीस फेडरेशन देशातील तमाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या रजत जयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा देत आहे. ६ जानेवारी १९९१ मध्ये उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या पहिल्या
अधिवेशनात आपल्या फेडरेशनची स्थापना झाली. हे वर्ष आपले रजत जयंती वर्ष आहे.
या प्रसंगी आपण आपल्या
देशातील बालकांच्या पोषक आहार, आरोग्य आणि शिक्षणाच्या अधिकारासाठी, मजबूत व
प्रभावी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आणि त्याचे कायमस्वरूपी सरकारी विभागात
रुपांतर होण्यासाठी लढण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा मजबुतीने व्यक्त करीत
आहोत. आपण अंगणवाडी सेविका, मदतनिसांना चांगले व सन्मानाचे जीवन मिळावे, त्यांना
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, चांगले वेतन मिळून कामाच्या परिस्थितीत
सुधारणा व्हावी, पेन्शन आणि अन्य सामाजिक सुरक्षा मिळाव्यात यासाठी लढण्याचा
पुन्हा एकदा निर्धार करत आहोत.
आयफा व लाखो अंगणवाडी
कर्मचाऱ्यांना संघटित करणाऱ्या, त्यांना सातत्याने आपली परिस्थिती सुधारण्याच्या व
आयसीडीएसचे खाजगीकरण रोखण्यासाठीच्या स्वतंत्र तसेच संयुक्त आंदोलनांमध्ये उतरविणाऱ्या,
फेडरेशनशी संलग्न असलेल्या विविध राज्यांमधील संघटनांसाठी मागची ही २५ वर्षे
संघर्ष व त्यागाने भारलेली होती.
रजत जयंतीच्या ह्या
प्रसंगी आयफा अन्याय, पेलिसांची दडपशाही व राजकीय छळाला न घाबरता लढ्यात महत्वाचे
योगदान देणाऱ्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना व देशातील तमाम अंगणवाडी
कर्मचाऱ्यांना सलाम करत आहे. ह्या पुरुष प्रधान समाजाने लादलेल्या अगणित दबावांना
बळी न पडता मजबुतीने, हिंमतीने व धैर्याने आपल्या अधिकारांसाठी त्यांनी दिलेल्या
लढ्यामुळेच पूर्वीच्या अकाली बंद पडलेल्या बालविकास योजनांच्या मानाने आयसीडीएस
जास्त काळ म्हणजेच जवळ जवळ ४० वर्षे चांगल्या प्रकारे चालली आहे इतकेच नाही तर
तिचा विस्तारही होत आहे. या कालावधीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीत काही
प्रमाणात सुधारणा नक्कीच झाली आहे. सेविका, मदतनिसांचे मानधन २२५ व ११० वरून विविध
राज्यांमध्ये किमान ४००० व २००० ते ७५०० व ३७५० पर्यंत वाढले आहे. त्यांना आता
बाळंतपणाची ६ महिन्यांची पगारी रजा मिळते, बढतीच्या संधी उपलब्ध आहेत, काही
राज्यांमध्ये निवृत्ती लाभ लागू झाले आहेत तर एका राज्यात त्यांना शासकीय
कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला आहे. ४५व्या श्रम परिषदेच्या शिफारसी हे तर आपल्या
चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरलेले यश आहे.
ह्या दरम्यान २६
राज्यांमध्ये ५ लाख सभासद असलेली आणि आयफाच्या आह्वानावरून ९ लाख कर्मचाऱ्यांना
संपात उतरवणारी आपली संघटना ही देशातील
सर्वात लढाऊ संघटना म्हणून नावारुपाला आलेली आहे. आयसीडीएसला मजबूत
बनविण्यासाठीच्या आपल्या पुढाकारामुळे एक जबाबदार संघटना म्हणूनही आपली प्रतिमा
बनली आहे.
अजूनही आपला लढा संपलेला
नाही. आता तर जास्तच जोमाने व एकजुटीने तीव्र लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या
घातक धोरणांमुळे आपण आत्तापर्यंत लढून मिळवलेल्या यशावर पाणी फिरण्याचा धोका
निर्माण झाला आहे. आयसीडीएसच्या माध्यमातून देशातील महिला व बालकांना जे काही
थोडेफार कल्याणकारी लाभ मिळत आहेत ते सुद्धा शासनाच्या ह्या धोरणांमुळे धोक्यात
आले आहेत. ‘मिशन मोड’च्या नावाखाली आयसीडीएसचे खाजगीकरण करणाऱ्या पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या
पावलावर पाऊल ठेऊन चाललेल्या, कागदोपत्री बळकटीकरण करण्याच्या नावाखाली
प्रत्यक्षात आयसीडीएस मोडकळीला आणणाऱ्या आत्ताच्या भाजप सरकारने केवळ अपुरा निधीच दिलेला
नाही तर असलेल्या निधीतही कपात केली आहे.
आपल्यासमोर अजून एक धोका
उभा आहे, तो म्हणजे आपली एकजूट भंग करण्याच्या प्रयत्नांचा. एका मागून एक मंत्री,
खासदार आणि भाजपचे नेते आपल्या बेजबाबदार वक्तव्यांमधून लोकांच्या जातीय भावना
भडकवून त्यांचे धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या
धर्मनिरपेक्ष लोकशाही
देशाला एक जहाल ‘हिंदु राष्ट्र’ बनवू पाहणाऱ्या आरएसएसशी ते घट्ट बांधिलकी दाखवून देत
आहेत. यातून आपला एकजुटीचा लढा कमजोर होण्याचा आणि इतक्या वर्षांच्या लढ्यामुळे
आपण जे काही थोडेफार लाभ मिळवले आहेत ते हिरावले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आपली एकजूट अभंग ठेवून
पुढील गोष्टींसाठी आपल्याला लढा अजूनच तीव्र करावयाचा आहे-
v आत्तापर्यंत मिळालेल्या उपलब्धींचे रक्षण करणे
v शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवणे
v किमान वेतन व अन्य लाभ मिळवणे
v पेन्शन आणि अन्य सामाजिक सुरक्षा मिळवणे
आपण जगातील कोणत्याही
शक्तींना आपली एकजूट भंग करून लढा कमजोर करू देणार नाही.
आपल्यासमोर आव्हान आहे
आयसीडीएसला मोडकळीस आणणाऱ्या सर्व प्रयत्नांपासून त्याचे रक्षण करण्याचे मग ते
मिशन मोडच्या नावावर असो वा अन्य कोणत्याही निमित्ताने.
आपण आपल्या देशातील
बालकांचा पोषक आहार मिळवण्याचा आणि पूर्व प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा अधिकार
कुणालाही हिरावून घेऊन त्याला खाजगी हितसंबंधांच्या, कॉर्पोरेटसच्या आणि स्वयंसेवी
संस्थांच्या दावणीला बांधू देणार नाही.
आपल्यासमोर आव्हान आहे
आपले लाभार्थी, गरीब शेतकरी, शेतमजूर, महिला आणि असंघटित कामगारांना आयसीडीएसला मोडकळीला
आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबाबत जागृत करण्याचे, आयसीडीएसला वाचवण्याच्या
लढ्यासाठी त्यांचा भक्कम पाठिंबा मिळवण्याचे.
आपल्याला लाभार्थी आणि
त्यांच्या जनसंघटना यांच्यासोबत आपली नाळ जोडायची आहे, आणि त्यांच्याबरोबर एकजूट
करून आयसीडीएस वाचवण्याचा लढा बळकट करायचा आहे.
रजत जयंतीच्या ह्या
वर्षामध्ये आयफा पुन्हा एकदा या कार्यासाठी स्वत:ला समर्पित करत
आहे. आयफा आपल्या सर्व सभासदांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व अंगणवाडी
कर्मचाऱ्यांना संघटना मजबूत करण्याची, लाभार्थ्यांबरोबर जास्त घट्ट बंध निर्माण
करण्याची, आपल्या प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी लढा तीव्र करण्याची हाक देत आहे.
आयफा आयसीडीएसच्या लाभार्थ्यांना, जनतेला आणि समाजाच्या सर्व जनवादी विभागांना या
लढ्याला सक्रीय पाठिंबा देण्याची हाक देत आहे.
No comments:
Post a Comment