अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (आयफा)
अंगणवाडी कर्मचारी संघटना
(महाराष्ट्र)
आपले अधिकार कोणते?
प्रिय भगिनींनो,
अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना लाभार्थ्यांना सहा सेवा
द्यायच्या असतात हे आपल्याला महित आहे पण खरोखरच हा आकडा सहावर संपतो का? दर
दिवसाआड आपल्या पर्यवेक्षिका आणि अधिकारी नवीन कोणते तरी काम देत असतात आणि आपण ते
मुकाट्याने पार पाडत राहतो. दिलेले काम केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे
लागतील अशी धमकी ते सारखे देत राहतात.
पण किती अधिकारी मिळालेल्या अधिकारांची माहिती आपल्याला
देतात? किंवा आपले हक्क
आपल्यापर्यंत पोहोचविण्याची हमी घेतात? आपण इतकी वर्षे लढून मिळवलेले लाभ देखील आपल्यापैकी
अनेकांच्या पदरात पडत नाहीत. आपल्याला आपल्या हक्क आणि अधिकारांची माहिती असली
पाहिजे, तरच आपण आपल्या एकजुटीच्या जोरावर ते प्रत्यक्षात मिळवू शकतो.
Ø आपल्याला वारंवार बैठकींना बोलावले जाते पण
प्रवास भत्ता मात्र दिला जात नाही आणि दिलाच तर फक्त १ किंवा २ बैठकांचाच. आपल्यापैकी
किती जणांना महिती आहे की अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बैठक व प्रवास भत्ता
मिळण्याबाबत शासकीय आदेश आहे?
Ø अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सहा महिन्यांची
पगारी बाळंतपणाची रजा मिळते. एबॉर्शन झाल्यास सहा आठवड्यांची पगारी रजा मिळते. अनेक
राज्यांमध्ये ही रजा दिलीच जात नाही. काही राज्यांमध्ये त्यात मोठी कपात केली
जाते. आपल्याला कोणत्याही अधिकाऱ्यांनी ह्याबाबत माहिती दिली आहे काय?
Ø सेविका व मदतनिसांना वर्षातून २० पगारी रजा
मिळतात, त्यातील १० दिवस त्या आजारपणासाठी सलग घेतल्या जाऊ शकतात. अनेक
राज्यांमध्ये अशा रजा दिल्या जात नाहीत.
Ø अंगणवाडी कार्यकर्ती बीमा योजना २००४ मध्ये सुरु
झाली, जी सर्व सेविका, मदतनिसांना लागू असून तिचा हप्ता सरकारकडून भरला जातो.
सेविका, मदतनिसांच्या वारसांना त्यांच्या नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यूत विम्याची रक्कम तसेच
विमाधारकांना कॅन्सरचा इलाज व अपंगत्व यात सहाय्य मिळते तर ९वी ते १२वी मधील २
पाल्यांना प्रत्येक तिमाहीत ३०० रु शिक्षण सहाय्य मिळते. अनेक राज्यांमध्ये ही
योजना राबवली जात नाही.
Ø अनेक वर्षांच्या लढ्यानंतर अंगणवाडी केंद्रांचे
भाडे केंद्र सरकारने वाढवले आहे. ग्रामीण भागात ७५०, शहरी भागात ३००० तर
महानगरांमध्ये ५००० रुपयेपर्यंत भाडे वाढले आहे. ग्रामीण प्रकल्पांच्या शहरी भागातील
केंद्रांना ३००० रु. भाडे
मंजूर करण्यात आलेले आहे. पण किती राज्यांमध्ये याची अंमलबजावणी होते?
Ø शैक्षणिक संचासाठी
३०००, औषध संचासाठी १००० व किरकोळ
खर्चासाठी १००० रुपये रक्कम मिळाली पाहिजे. अनेक राज्यांमध्ये रजिस्टर, झेरॉक्स
यासाठी अंगणवाडी सेविकांनाच खर्च करायला लावतात. आपल्या किरकोळ तेही अनियमितपणे
मिळणाऱ्या मानधनात आपण हा खर्च कसा काय करू शकतो?
Ø आपल्या सातत्याच्या मागणीमुळे सरकारने अंगणवाडी
सेविका, मदतनिसांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार निवारण समितीचे गठन करण्याचे
मान्य केले. ह्यात सेविका मदतनिसांचे प्रतिनिधी असले पाहिजेत व त्यांची दर दोन
महिन्यातून एकदा बैठक झाली पाहिजे. पण किती राज्यांमध्ये जिल्हा व राज्य पातळींवर
यांचे गठन झाले आहे? आणि किती राज्यांमध्ये यांचे गठन झाल्यावर नियमित कामकाज
देखील होत आहे?
प्रिय
भगिनींनो,
आपण हे
लक्षात ठेवले पाहिजे की यातला लहानातील लहान लाभ देखील आपल्या सातत्याच्या
लढ्यामुळे मिळाले आहेत. आयफाने ह्या लढ्यांमध्ये नेहमीच नेतृत्वकारी भूमिका अदा
केली आहे. ह्या सर्व लाभांच्या अंमलबजावणीसाठी देखील आपण लढले पाहिजे. शासकीय
आदेशांसहित ह्या सर्व लाभांची माहिती व आपण बढे चलो या पुस्तिकेत सविस्तर छापली
आहे. ह्या पुस्तिका आपल्या कार्यकर्त्यांकडे उपलब्ध आहेत.
आपण
लढून मिळवलेले लाभ पदरात पाडून घेण्यासाठी आपण एका बाजूला लढले पाहिजे तर दुसऱ्या
बाजूला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, पेन्शन आणि अन्य सामाजिक सुरक्षा
लाभ या आपल्या मूलभूत मागण्यांसाठी आपल्याला तीव्र लढा दिला पाहिजे. सर्वात
महत्वाचे म्हणजे आयसीडीएसचे खाजगीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण रोखलाच पाहिजे.
आयफाच्या
रजत जयंतीच्या या प्रसंगी चला आपण एकजूट करून आपले सर्व अधिकार पदरात पाडून
घेण्यासाठी दक्ष राहुया आणि मुलभूत मागण्यांसाठीचा आपला लढा मजबुतीने पुढे नेऊया.
No comments:
Post a Comment