अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (आयफा)
अंगणवाडी कर्मचारी संघटना
(महाराष्ट्र)
हो, आपण आदर मिळवला आहे
आता वेतन आणि नियमितीकरण मिळवायचे आहे.
प्रिय भगिनींनो,
आपल्यापैकी अनेक जणी अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून गेल्या
दोन, तीन दशकांपासून काम करीत आहेत तर अनेक जणींनी त्यानंतर कालांतराने
आयसीडीएसमध्ये प्रवेश केला आहे. आपल्याला आठवतय का, आपण संघटित होण्याअगोदर
आपल्याला कसे वागवले जात होते? बहुतेक प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका आपल्याशी कसे
अवमानकारक भाषेत बोलत असत?
आपण
पाहतोय की अनेक राज्यांमध्ये आता परिस्थिती नाट्यमयरित्या बदलली आहे. अनेक
राज्यांमध्ये विशेषत: जिथे आपली संघटना मजबूत आहे, तिथे
आपला योग्य मान राखला जातो. पूर्वीसारखा आपला अपमान करायला कुणी धजावत नाही.
आपल्या संघटनेने आणि लढ्याने हे महत्वाचे यश मिळवले आहे. हो, आपण आदर मिळवला आहे,
पण आपल्याला ‘मानधना’चे
रुपांतर ‘वेतना’त
करण्यासाठीचा लढा हा सुरुच ठेवला पाहिजे.
आपल्याला ते दिवस आठवत असतील जेव्हा अंगणवाडी केंद्राबाहेरच्या
लोकांना आयसीडीएसबाबत काहीच माहिती नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आयसीडीएसच्या
लाभांबाबत आता सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या आंदोलन व लढ्यांतून फक्त
नियमितीकरण आणि किमान वेतनासारख्या मूलभूत मागण्याच पुढे आणलेल्या नाहीत तर देशाचे
भावी मनुष्यबळ असलेल्या बालकांच्या विकासासाठी आयसीडीएस देत असलेल्या सेवांचे
महत्वही लोकांच्या लक्षात आणून दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
सरकारला आयसीडीएसचे सार्वत्रीकरण करावे लागले. लवकरच आयसीडीएसला ४० वर्षे पूर्ण
होतील. त्या अगोदरच्या बाल विकासाच्या योजना व कार्यक्रम काही वर्षसुद्धा चालले
नव्हते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या संघटित लढ्यांनी आयसीडीएसने तग
धरण्यात मिळवलेल्या यशासाठी दिलेले योगदान दुर्लक्ष करता येण्यासारखे नक्कीच नाही.
हो, आयसीडीएसने ४० वर्षे तग धरला पण सरकारने मिशन मोडची घोषणा केल्यामुळे आता
आयसीडीएस पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. ‘आयसीडीएस बचाव’साठी
आपल्याला आपला संघटित लढा अजून तीव्र केला
पाहिजे.
१९७५ साली आयसीडीएसची सुरवात झाली तेव्हा मानधनाच्या नावावर
आपल्याला किती क्षुल्लक रक्कम मिळत होती ते आठवतय ना? सेविकांना १५० तर
मदतनिसांना ३५ रु मानधन मिळत होते. आपल्या संघटित लढ्यामुळेच आज अंगणवाडी सेविका
मदतनिसांना ३००० व १५०० केंद्रीय मानधन मिळते. २०-२५ वर्षांपूर्वी कोणत्याही राज्य
सरकारकडून काहीच अतिरिक्त मानधन मिळत नव्हते. ज्या राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचारी
संघटित झाले त्या राज्यांनी सेविकांना २०० ते ४५०० आणि मदतनिसांना २०० ते २०००
रुपये मानधनवाढ दिलेली आहे. आज पुदुच्चेरीमधील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय
कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला आहे आणि त्यांना अनुक्रमे १९८४० आणि १३३३० रुपये वेतन
मिळत आहे! हो, आपण आपले मानधन
काही प्रमाणात का होईना, वाढवून घेतले आहे, परंतु अजूनही किमान
वेतनापेक्षा ते कमीच आहे. किमान वेतन मिळविण्यासाठी आपल्याला आपला लढा यापुढेही
सुरुच ठेवायला हवा.
त्या काळी बाळंतपणाची पगारी रजा आपल्या ध्यानीमनी सुद्धा
नव्हती. बाकीच्या सुट्ट्या तर सोडूनच द्या. आपल्या मुलांच्या आजारपणात काही दिवस
जरी सुट्ट्या घ्याव्या लागल्या तरी आपले मानधन कापले जात होते! आज
आपल्याला बाळंतपणाची सहा महिन्यांची पगारी रजा, अबॉर्शनसाठी पगारी सुट्टी, आणि
अनेक राज्यांमध्ये तर उन्हाळ्याची, हिवाळ्याची, दिवाळीची सुट्टी देखील मिळायला
लागली आहे.
आपल्या लढ्यामुळे सरकारला आपल्याला बढतीच्या काही संधी
द्याव्या लागल्या आहेत. भारत सरकारने पात्र सेविकांना पर्यवेक्षिकांच्या आणि पात्र
मदतनिसांना सेविकांच्या पदांवर बढती देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक
राज्यांमध्ये आपल्या लढ्यांमधून आपण जास्त मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका,
मदतनिसांना फायदा मिळण्यासाठी बढत्यांसाठीचे निकष शिथिल करण्यात यश मिळवले आहे.
काही राज्यांमध्ये सणांचा बोनस/ सानुग्रह अनुदान, निवृत्तीनंतर एकरकमी लाभ, मासिक
पेन्शन, कल्याणकारी मंडळाचे गठन आदी लाभ मिळवण्यात आपल्याला यश आले आहे.
आपल्या संघटित लढ्यामुळे मिळालेले हे यश आहे ह्यात काही
शंकाच नाही. आज जेव्हा आपण आयफाची रजत जयंती साजरी करत आहोत, तेव्हा आपल्याला
आयफाने केंद्रीय पातळीवर व त्याला संलग्न असलेल्या संघटनांनी आपापल्या
राज्यांमध्ये दिलेल्या अनेक ऐतिहासिक लढ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. २००६
मध्ये संसदेजवळ सतत १० दिवस रात्रंदिवस केलेले साखळी उपोषण, २००७ मधले जेल भरो
आंदोलन, २००८ मध्ये लाल गणवेशात काढलेला संसद मार्च, २०१० मधला देशव्यापी संप
ज्यात लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता, २०११ मधला संसदेजवळचा दोन
दिवसांचा महापडाव, २०१२ मधला काळे कपडे घालून केलेला देशव्यापी निषेध दिवस ह्या
राष्ट्रीय पातळीवर केलेल्या काही लढ्यांचा उल्लेख करता येईल. याशिवाय विविध
राज्यांमध्ये अनेक लढाऊ आंदोलने झाली ज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अटकसत्र, लाठी
मार, खोट्या केसेस, छळ आणि अन्याय यांना तोंड द्यावे लागले. देशात व राज्यांमध्ये
सातत्याने केलेल्या अशा संघर्षांमुळेच आपल्याला काही लाभ मिळवता आले आहेत. आज संपूर्ण देशात अंगणवाडी कर्मचारी एक लढाऊ
शक्ती म्हणून ओळखल्या जातात. आपले अनेक लढे कामगारांच्या अन्य विभागांनादेखील
प्रेरणादायी ठरलेले आहेत.
इतक्या संघर्षानंतरही नियमितीकरण, किमान वेतन, पेन्शन आणि
अन्य सामाजिक सुरक्षा ह्या मूलभूत मागण्या अजून आपल्याला मिळवायच्याच आहेत. सर्वात
महत्वाचे म्हणजे खाजगीकरणाच्या व पूर्णपणे मोडकळीला आणण्याच्या सरकारच्या घातक
प्रयत्नांपासून आयसीडीएसचा बचाव करायचा आहे.
त्यासाठी गरज आहे सशक्त संघटन आणि संघटित लढ्याची. आयफाच्या
रजत जयंतीच्या निमित्ताने आपण तमाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या मूलभूत मागण्या
मान्य करून घेण्यासाठी एकत्र येण्याचे, संघटन मजबूत करण्याचे व लढा तीव्र
करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन करीत आहोत.
No comments:
Post a Comment