Sunday, April 17, 2011
2 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे मुंबईत आंदोलन
2 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे मुंबईत आंदोलन
2 फेब्रुवारी 2011, गेल्या 8 महिन्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सहावे राज्यव्यापी संयुक्त आंदोलन.
या अगोदरच्या आंदोलनांचा धावता आढावा घेऊया.
1) 9 जुलै 2010- अखिल भारतीय लाक्षणिक संपात सहभाग.
2) 4,5 ऑक्टोबर 2011- संपाची नोटीस देण्यासाठी आझाद मैदान व जिल्हा पातळीवर मोर्चे.
3) 18 ते 26 ऑक्टोबर 2010- राज्यव्यापी संप व त्या दरम्यान 18 पासून 25 पर्यंत रोज आझाद मैदान, जिल्हा परिषदा व
आमदार, पालक मंत्री, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयांवर मोर्चे व 26 ऑक्टोबरला आझाद मैदानात प्रचंड शक्तीप्रदर्शन.
4) 14 डिसेंबर 2010- विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा 5) 28 डिसेंबर 2010- शासनाने मानधनात भिकारवाढ
दिल्याचा व अन्य सर्व मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदान व जिल्हा पातळीवर मोर्चे.
आणि आता हे सहावे आंदोलन.
आंदोलनात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यातील सुमारे 3000 अंगणवाडी सेविका, मदतनीस सामील झाल्या होत्या. अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मागण्यांचे निवेदन वेळोवेळी मा. मंत्र्यांना दिले असता सचिवांसोबत बैठक घेऊन हे सर्व प्रश्न सोडविण्याचे त्यांनी मान्य केले होते परंतु अशी एकही बैठक अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोणताही प्रश्न तडीला जाऊ शकलेला नाही. सचिवांच्या ह्या कर्मचारी विरोधी शुक्राचारी वृत्तीचा सर्व वक्त्यांनी निषेध केला. सचिव वंदना कृष्णाच्या विरोधात चले जाओ च्या घोषणा जोरदारपणे देण्यात आल्या. निदर्शनांदरम्यान शुभा शमीम, आरमायटी इराणी, एम ए पाटील, बृजपाल सिंग, भगवानराव देशमुख, हिराबाई घोंगे यांची भाषणे झाली.
मागण्या आमच्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा ही घोषणा त्या दिवशी काही अंशी खरी ठरली. मागण्या मान्य करता येत नसल्यामुळे की काय कोण जाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड दोघेही मंत्रालयातील आपली खुर्ची खाली करून निघून गेले. बुधवारी मंत्रालयात हजर राहण्याचा प्रघात मोडून सर्व मंत्री निघून गेल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांचा निषेध केला.
राज्य पातळीवर न्याय मिळत नसल्यामुळे आता मोर्चा दिल्लीकडे वळवण्याचा व 23, 24 फेब्रुवारी 2011 च्या अनुक्रमे कामगारांच्या व अंगणवाडीच्या संयुक्त मोर्च्यात पूर्ण ताकद उतरवण्याचा निर्धार करत घोषणांच्या गजरात मोर्च्याची सांगता करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment