मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (महाराष्ट्र राज्य कमिटी) ची जाती प्रश्नावरील कामाबाबत भूमिका
व राज्य कमिटी बैठकीतील निर्णय
आज दलित जनतेत संघटनात्मक काम करण्याची आवश्यकता जास्तच वाढली आहे. तसेच त्यासाठी योग्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. आजचा कालखंड दलित जनतेत काम करण्यासाठी योग्य कालखंड आहे. दलित पुढाऱ्यांची राजकीय विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. तर दुसरीकडे भांडवली पक्षांबदद्ल दलित जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. नवउदारवादी धोरणांमुळे शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण व त्यामुळे आवाक्याबाहेर गेलेले उच्च शिक्षण, बेरोजगारी इत्यादी गंभीर स्वरुपाचे प्रश्न दलित जनतेसमोर उभे ठाकले आहेत. अश्या वेळी दलित जनतेत एक प्रकारची राजकीय दिशाहीनता निर्माण झाली आहे. त्यांना अश्या परिस्थितीत योग्य राजकीय दिशा देण्याचे काम पुरोगामी व डाव्या चळवळीचे विशेषतः आपले आहे असा मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाचा ठाम विश्वास आहे. पक्षात दलित जनतेतून आलेल्या सभासदांची संख्या लक्षणीय आहे. ह्या प्रश्नावर त्यांची संवेदनशीलता साहजिकच जास्त आहे. दलित जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करणे, जाती अंताच्या उद्दिष्टांना पुढे ठेवून काम करणे, दलितावरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये तातडीने हस्तक्षेप करणे, प्रतिक्रिया देणे ह्या कामासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ह्या संदर्भात सखोल चर्चा केल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी खालील निर्णय घेत आहे.
1. जाती प्रश्नावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र मंच निर्माण केला जाईल.
2. ‘जाती-अंत संघर्ष समिती’ असे ह्या मंचाचे नाव असेल.
3. ‘आत्मसन्मान, समता, जाती-अंत’ असे ह्या समितीचे घोषवाक्य असेल.
4. वरील संघर्ष समितीचे राज्य व जिल्हा पातळी ह्या दोन्ही स्तरांवर गठन केले जाईल.
5. भांडवली पक्षांसारखा हा केवळ एक ‘दलित सेल्’ असणार नाही तर ह्या समितीत निम्मे सदस्य इतर
समाजाचे असतील व सर्व सदस्य जाती प्रश्नावर जाती अंताच्या उद्दिष्टांसाठी हिरिरीने काम करतील.
6. राज्य पातळीवर परिषद घेऊन ‘जाती-अंत संघर्ष समिती’ची जाती प्रश्नाबाबत वैचारिक भूमिका व कृती
कार्यक्रम जाहीर केला जाईल.
7. जाती प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी व त्याबाबत कार्यकर्त्यांची समज तयार होण्यासाठी राज्य स्तरावरील
अभ्यास शिबिराचे आयोजन केले जाईल.
8. पक्षाच्या सर्व नियमित अभ्यासक्रमांमध्ये जाती व धर्म ह्या प्रश्नांवर मांडणी असेल.
Red Salute dear commrade
ReplyDeleteP.K.Shaji
Kerala