मे दिनाचा जाहिरनामा - 2011
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
पुणे जिल्हा समिती
3,4,5,ब, उमाशंकर कॉम्प्लेक्स, कन्याशाळेजवळ, 594, नारायण पेठ, पुणे 30. 02024452956.
कॉम्रेडस्,
2011च्या मे दिनाच्या प्रसंगी, कामगार वर्गाची एकजूट व आंतरराष्ट्रीय एकतेच्या दिवशी, सिटू देशातील व संपूर्ण जगातील कामगार व कष्टकरी वर्गाला हार्दिक क्रांतिकारी अभिवादन करीत आहे. ह्या महान दिवशी सिटू, संपूर्ण मानवी समाजाची सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त करणारी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीच्या वर्ग संघर्षाशी आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करीत आहे.
भातृभावी अभिवादन
ह्या मे दिनी रोजंदारीत वाढ, जमिनीचा हक्क, शेतमालाचा रास्त भाव, कमी व्याजदराने कर्ज, पायाभूत सुविधा व शेतीसाठी आवश्यक साधनांसाठी होणाऱ्या शेतमजूर, गरीब व मध्यम किसान यांच्या लढ्यांशी सिटू आपली भक्कम एकजूट व्यक्त करीत आहे. युवक व विद्यार्थी संघटनांच्या शिक्षण व रोजगाराच्या अधिकारासाठी व शिक्षणाच्या बाजारीकरण व खाजगीकरणाविरुद्धच्या लढ्यांशी तसेच भेदभाव, हिंसेच्या विरुद्ध आणि सर्व क्षेत्रातील समानतेसाठीच्या महिला संघटनांच्या लढ्याशी देखील सिटू एकजूट व्यक्त करीत आहे. भांडवलदारी जगात रोजगार, जगण्याइतके वेतन, सामाजिक सुरक्षा व कामगार संघटन अधिकारांसाठीच्या कष्टकरी जनतेच्या लढ्याशी असलेली बांधिलकी सिटू पुन्हा एकदा व्यक्त करीत आहे.
ह्या मे दिनी सिटू समाजवादी देशातील कामगार वर्गाला समाजवादी व्यवस्थेच्या सर्वोत्तमतेची बूज राखल्याबद्दल भातृभावी अभिवादन करीत आहे. अमेरिकी साम्राज्यवादाने लादलेल्या आर्थिक बंधन व बहिष्कारांना टक्कर देऊन आपला विकास पुढे नेण्यात समाजवादी क्युबाने यश मिळवल्याबद्दल सिटू आनंद व्यक्त करीत आहे. अमेरिकेच्या एकाधिकारशाहीपुढे नमते न घेण्याची क्युबाची स्वाभिमानी भूमिका जगभरातील कष्टकरी जनतेच्या आंदोलनांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे.
ह्या मे दिनी सिटू,अरब जगतात हुकुमशाही विरुद्ध व लोकशाही अधिकारांसाठी होत असलेल्या जनतेच्या वाढत्या उठावांचे स्वागत करीत आहे, ज्यांची सुरवात ट्युनिशियातील जनतेच्या उठावाने व त्यानंतरच्या इजिप्तमधील होस्नी मुबारक सरकारच्या हकालपट्टीने झाली. त्यानंतर जणू एक लाटच आली आणि बाहरीन,लिबिया, येमेन, ओमान, मोरोक्को, तुर्कस्तान, अल्जिरिया आणि इतरही काही ठिकाणी देशाला लोकशाहीच्या जास्त जवळ नेणारे बदल घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिटू याची अभिमानाने नोंद घेते की ह्या सर्व हुकुमशाहीविरुद्धच्या जनतेच्या उठावांमध्ये कामगार वर्गाने कळीची व आघाडीची भूमिका बजावली आहे. अरब जगतात लोकशाहीच्या मागणीसाठी होणाऱ्या उठावांचे स्वागत करत असतानाच सिटू, जगातील शांतता प्रेमी जनतेबरोबर साम्राज्यवाद्यांच्या व त्यांच्या हस्तकांच्या अरब जगतामधील हस्तक्षेपाचा धिक्कार करीत आहे. इराण व अफगाणिस्तानावरील ताबा कायम ठेवून अमेरिका सतत हस्तक्षेप करण्यासाठी नवीन ठिकाणांच्या विशेषतः तेल समृद्ध अरब जगतातील ठिकाणांच्या शोधात असते. अमेरिकेच्या सैनिकी शक्तीच्या सक्रीय पाठिंब्यावर होणाऱ्या इस्रायलच्या सैनिकी हल्ल्यांच्या विरोधात लढणाऱ्या पॅलेस्तिनी जनतेशी सिटू एकजूट व्यक्त करीत आहे. अमेरिकी साम्राज्यवाद्यांच्या इराण, सिरिया व डेमोक्रेटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया वर हल्ले करण्याच्या सुरुच असलेल्या कारस्थानाचा सिटू धिक्कार करीत आहे.
भारतीय उपखंडा सहित पूर्वेकडील विकसनशील देशांमधील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर ताबा ठेवण्यासाठी अमेरिका कसोशीने प्रयत्न करत आहे. व्यूहात्मक व सामरिक सहकार्य आणि भारत अमेरिका अणु करारातून हाच हेतू व्यक्त होतो. आपला हस्तक्षेप व ढवळाढवळ करण्याला भारतासहित इतर विकसनशील देशांमधील डाव्या व अन्य पुरोगामी शक्तींचा होणारा विरोध कमजोर करण्यासाठीची कारस्थाने अमेरिकी साम्राज्यवादाने दुपटीने वाढवली आहेत. विकीलिक्स च्या ताज्या खुलाश्यांमधून अमेरिकी प्रशासन आपल्या देशातील मंत्र्यांची निवड, महत्वाची राजकीय आणि आर्थिक धोरणे व विदेशनिती इत्यादी आघाडींवरील नेहमीच्या शासकीय बाबींमध्ये कश्या प्रकारे निर्देश आणि हस्तक्षेप करते हे उघड झाले आहे. भारतातील सत्ताधारी स्वेच्छेने ह्या प्रक्रियेपुढे लोटांगण घालत आहेत हे देखील पुढे आले आहे.
जगातील वाढते लढे
ह्या वर्षीचा मे दिन भांडवलदारी व्यवस्थेवरील आत्तापर्यंतच्या सर्वात भयंकर जागतिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाणे, कामावरून काढून टाकणे, कारखाने बंद होणे, वेतन कपात इत्यादींमुळे होणाऱ्या कामगार अधिकार व रोजीरोटी वरील हल्ल्यांविरुद्ध जगभर होत असलेल्या व्यापक विरोध प्रदर्शन व कष्टकरी जनतेच्या संयुक्त कृतींच्या दरम्यान साजरा केला जात आहे. जागतिक पडझडीनंतर दिवाळखोर बँका व वित्त संस्था वाचवण्यासाठी सार्वजनिक निधीचा मुक्त हस्ताने वापर केला गेला. ह्या देशांमधे खर्चात कपात करण्याच्या व काटकसरीच्या नावावर सार्वजनिक सेवांवरील खर्च कमी करण्यात आले आणि त्याच वेळी भांडवलदारांना मात्र कामगार व जनतेची लूट करण्याची खुली सूट देण्यात आली. लोकांच्या कामासंबंधीच्या सर्व बाबी, रोजगाराचा अधिकार, सामाजिक सुरक्षा, वेतन, कामाचे तास ह्यांवर काटकसरींमुळे तीव्र हल्ले होत असून संपूर्ण जगभर ह्या लूट व शोषणाविरुद्ध संप व आक्रमक लढे होत आहेत. मे 2010 नंतर संपूर्ण युरोप व अमेरिकेत असे अनेक प्रचंड मोठे संप व लढे पहायला मिळाले. ह्या लढ्यांमध्ये महागाई, बेरोजगारी, वेतन कपात आणि सामाजिक सुरक्षा ह्या समस्या, जीवन व रोजीरोटी व संघटित हेण्याचा अधिकार यावरील हल्ले यामुळे चिडलेल्या लाखो कामगारांनी व कष्टकऱ्यांनी भाग घेतला. जगभरात आलेल्या ह्या कामगार वर्गाच्या लढ्यांच्या लाटेमुळे सिटूला बळ आणि प्रेरणा मिळत आहे. सिटू ह्या लढ्यांशी आपली एकजूट व्यक्त करते व नवउदारवादी भांडवलशाही धोरणे परतवून लावण्यासाठी संघर्ष अजूनच धारदार करण्याच्या आवश्यकतेवर भर देते.
सध्याचे संकट जागतिक वित्तीय पडझडीमुळे निर्माण झाले असून तो नवउदार साम्राज्यवादी व्यवस्थेतील वित्त भांडवलाच्या संकटाचा अटळ परिणाम आहे. वित्त भांडवलाच्या शक्य तेवढा लवकर नफा कमवण्याच्या वखवखी आलेल्या ह्या संकटामुळे नवउदार व्यवस्थेअंतर्गत चालणाऱ्या आधुनिक भांडवलशाहीची शंकास्पद कार्यपद्धती देखील उघड झाली आहे. जेव्हा तेजी असते तेव्हा कोणत्याही प्रकारचे नियंत्रण त्यांना नको असते आणि सट्टेबाजीचे अनिर्बंध राज्य चालते. व्यक्तिगत फायद्यासाठी सार्वजनिक निधीचा वापर केला जाऊन भ्रष्ट मार्गानी कृत्रिम तेजी निर्माण केली जाते. जेव्हा तेजीच्या भ्रमाचा भोपळा फुटून मंदी येते तेव्हा मात्र सरकार सार्वजनिक निधी वापरून कोसळणाऱ्या संस्थाना वाचवावे लागते. ह्या दोन्ही कालखंडांमध्ये लोकांचे मात्र बेरोजगारी, आयुष्यभराची बचत नष्ट होणे, वेतन कपात ह्या स्वरुपात नुकसान होतच राहते. हा आजच्या नवउदारवादी जागतिकीकरणाच्या कब्ज्यातील भांडवलशाहीचा खरा चेहरा आहे. लोक आणि अर्थव्यवस्था यांची लूट आणि लुबाडणूकच हा भांडवलदारी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. ह्या मे दिनी सिटू, लोकांमध्ये ह्या भ्रष्ट व बेभरोश्याच्या व्यवस्थेबद्दलचे सत्य उघड करून त्याविरुद्धच्या लढ्याशी असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा व्यक्त करीत आहे.
भारतातील परिस्थिती
संपूर्ण कष्टकरी वर्गाबरोबर सिटूलाही ह्याचा अभिमान आहे की कामगार वर्गाचा सातत्याचा विरोध व देशव्यापी एकजुटीचा लढा आणि लोकसभेतील डाव्या शक्तींचा भक्कम विरोध यामुळे, देशातील वित्त क्षेत्र पूर्णपणे खाजगी वा विनियंत्रित विभागाकडे ढकलले गेले नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण थांबवता आले आणि जागतिक अर्थव्यवस्था ढासळत असताना देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला कोसळण्याच्या अटळ संकटापासून काही प्रमाणात का होईना वाचवता आले. परंतु त्याचवेळी सिटू अत्यंत खेदाने ह्याची नोंद घेते की ह्या संकटापासून धडा घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची धोरणे वित्त क्षेत्राचा तोच विनियंत्रण व खाजगीकरणाचा अयशस्वी मार्ग पुढे रेटत आहेत आणि त्या दिशेनी काही विधेयके देखील आणण्यात आली आहेत. त्याचवेळी सर्वदूर फैलावलेला भ्रष्टाचार, लूट आणि घोटाळे यांचा भडीमार जनतेवर केला जात आहे. दरम्यानच्या काळाने दूरसंचार, खाणविभाग, संयुक्त राष्ट्र संघ स्पर्धां साठीचे बांधकाम, विविध जमिनींचे व गृहनिर्माण संस्थांचे व्यवहार ह्या विभागांमध्ये सार्वजनिक निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान व देशी, विदेशी मोठ्या औद्योगिक संस्थाचा फायदा करून देणारी भ्रष्टाचाराची अनेक भयंकर प्रकरणे उघडकीस आलेली पाहिली. ह्याच्या परिणामी काळ्या धनाची एक मोठी गटारगंगाच परदेशी बँकापर्यंत वाहून नेऊन साठवली गेली आहे. ज्या पद्धतीने शासनकर्ते हे भ्रष्ट व्यवहार करत आहेत त्यावरून सत्तेचे गुन्हेगारीकरण किती खोल गेले आहे हे उघड होते. त्याचवेळी नवउदारवादी आर्थिक व्यवस्थेमध्ये संपूर्ण शासन भांडवलदारांच्या कसे कब्ज्यात गेले आहे हे ही स्पष्ट दिसते. सातत्याने वाढणारी महागाई विशेषतः अन्नविषयक दरवाढ नियंत्रित करण्यात आलेल्या अपयशाच्या मागेही शासनाची हीच भ्रष्ट धोरणे आहेत. शासन आणि औद्योगिक सट्टेबाज ह्यांच्या संगनमताने होणाऱ्या ह्या गैरव्यवहारांमुळे वस्तूंच्या बाजारातील अन्न धान्य व खाद्य वस्तूंची कृत्रिम कमतरता आणि टंचाई आणि त्याच्याच परिणामी भाववाढ निर्माण केली जात आहे, आणि ह्या बाजारातील औद्योगिक सट्टेबाजांना घबाड नफा मिळवून देण्यासाठी अजूनच वाढवली जात आहे. शासनाचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करण्यास नकार व अन्न अधिकाराचा कायदा करण्याची टाळाटाळ ह्याच संगनमताचा एक भाग आहे एका बाजूला अन्न धान्य पिकवणाऱ्या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना जगण्यासाठी पुरेल असा योग्य भाव मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना जिवंत राहण्यासाठी अन्नावर प्रचंड खर्च करावा लागतो.
याच्या जोडीला भरीत भर म्हणून मालक आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षणकर्ते यांच्या संगनमताने सर्व मूलभूत कामगार कायद्यांची सरासर पायमल्ली केली जात आहे. अनेक ठिकाणी कामगार संघटना बांधण्यास मनाई केली जाते तर कामगार संघटना तयार केल्याबद्दल कामगारांची दडपणूक करण्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत. त्या मागे शासनाच्या जन-विरोधी धोरणांना व देश-विघातक कारवायांना लोकांचा असलेला तीव्र विरोध कमजोर करण्याचेच उद्दीष्ट आहे. इतिहासाने हे दाखवून दिले आहे की कामगार कायद्यांवर होणारे हल्ले ही लोकशाही अधिकार व संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांची पूर्व तयारी असते. अलिकडे तर ह्या पायमल्लीला कायदेशीर स्वरुप देण्यासाठी आणि मालकांना मनाला वाटेल तेव्हा कामावर ठेवणे व काढण्यासाठी पूर्ण मुखत्यार बनविण्यासाठी कामगार कायदे पूर्णपणे बदलण्यासाठी सक्रीय पावले उचलली जात आहेत. पेन्शनचा निधी देशी आणि विदेशी सट्टेबाजांच्या ताब्यात देण्यासाठी आणि निश्चित रकमेच्या पेन्शन कडून बाजारातील शक्तींवर अवलंबून असलेल्या अनिश्चित पेन्शनकडे ही व्यवस्था वर्ग करण्यासाठी पेन्शन व्यवस्थेचे पूर्ण खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.
आजच्या ह्या मे दिनी सिटू, संपत्ती निर्माण करणाऱ्या व आपल्या घामातून व रक्तामधून देशातील उत्पादन वाढवणाऱ्या जनतेवर लूट व शोषण लादणाऱ्या सत्तेला विरोध करण्यासाठी कष्टकरी वर्गाला संघटित करण्याच्या कामात दुप्पट जोमाने पुढाकार घेण्याचा निर्धार करीत आहे. मालक वर्गाचा निर्घृणपणा कितीही अत्याचारी असला तरी तो शासनकर्त्यांच्या सक्रीय पाठिंब्याशिवाय टिकू शकत नाही. मागील लोकसभा निवडणुकीतील डाव्यांची पिछेहाट व लोकसभेतील घटलेल्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर शासनकर्त्या आघाडीच्या जन विरोधी व देश विघातक कारस्थानांना टक्कर देण्याची ऐतिहासिक जबाबदारी देशातील डाव्या चळवळीवर म्हणजे पर्यायाने त्याची जीवन रेखा असलेल्या कामगार वर्गावरच येऊन पडली आहे.
सिटू विश्वासपूर्वक ह्याची नोंद घेते की लोकसभेच्या राजकीय रिंगणातील शक्तींचे संतुलन उजव्या बाजूला झुकलेले असले तरी बाहेरच्या घडामोडी काही वेगळेच संकेत देत आहेत. संलग्नतेच्या सीमा मोडून सर्व कामगार संघटना महागाई, सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावर होत असलेले कामगार कायद्यांचे उल्लंघन, बेलगाम कंत्राटीकरण व रोजंदारीकरण, निर्गुंवणुक व खाजगीकरण या विरुद्ध आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या सार्वत्रिक सामाजिक सामाजिक सुरक्षेच्या मागणीसाठी एकाच मंचावर आल्या. विविध क्षेत्रातील कामगार आपापल्या उद्योगात कडवटपणे लढा देत आहेत. 5 मे 2010 रोजी निर्गुंतवणुकीविरुद्ध एकट्या सिटूच्या पुढाकारातून 3 लाख कोळसा कामगार देशव्यापी संपावर गेले. मध्यंतरीच्या काळात बँक आणि वित्त विभाग, दूर संचार विभाग यांमध्ये देखील कामगारांनी प्रचंड मोठ्या संयुक्त संपाच्या कृतींद्वारे विनियंत्रणाविरुद्ध आपला आवाज बुलंद केला. अंगणवाडीचे देखील राज्य व केंद्रात संयुक्त आंदोलन गाजले. 7 सप्टेंबर 2010च्या देशव्यापी सार्वत्रिक संपामध्ये देशभरातील 10 कोटी कामगारांनी भाग घेऊन देशाच्या कामगार चळवळीत एक इतिहास घडवला. ह्या ऐतिहासिक कृतीचा पाठपुरावा म्हणून 5 लाख कामगारांनी 23 फेब्रुवारी 2011 ला देशाची राजधानी दिल्लीवर हल्लाबोल करून लोकसभेसमोर आक्रमक निदर्शने केली. सिटू ह्या मे दिनी कामगार वर्गाला तळागाळातील कामगार संघटनांची एकजूट अजूनच व्यापक करून कष्टकरी जनतेचा संयुक्त लढा पुढे नेऊन एका आक्रमक उंचीवर घेऊन जाण्याचे व सत्ताधाऱ्यांची ही जन विरोधी व साम्राज्यवादाच्या बाजूची धोरणे परतवून लावण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करत आहे.
डाव्या व लोकशाही चळवळीवरील ह्ल्ल्याशी दोन हात करा.
2011 चा मे दिन अश्या वेळी साजरा केला जात आहे ज्या वेळी कामगार वर्गाच्या चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या आणि जिथे डाव्या व लोकशाही शक्ती राज्य सरकारे चालवित आहेत अश्या दोन प्रमुख राज्यांमध्ये तीव्र राजकीय लढा सुरु आहे. ह्या दोन्ही राज्यांमध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका, नवउदारवादी भांडवलदारी धोरणे राबवणारी सत्ता व त्या धोरणांना विरोध करत जनतेच्या बाजूच्या पर्यायी धोरणांसाठी लढणाऱ्या पुरोगामी ताकदीं यांमधील संघर्षाचे प्रतिक बनल्या आहेत. देशातील कामगार वर्गाच्या चळवळीने डाव्या व लोकशाही शक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे कारण कामगार वर्गाची चांगले जीवन जगण्याची आणि जास्त अधिकार मिळवण्याची आकांक्षा फक्त डाव्या शक्तींच्याच विचारदृष्टीशी जुळते. म्हणूनच ह्या मे दिनी सिटू कामगार वर्गीय चळवळीला सतत त्यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांना साथ देणाऱ्या आणि त्यांच्या चिंतांना आवाज मिळवून देणाऱ्या डाव्या व लोकशाही चळवळीवर होणाऱ्या गंभीर हल्ल्याशी टक्कर देण्याचे आणि विधानसभेच्या निवडणुका चालू असलेल्या सर्व राज्यांमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करण्याचे आवाहन करीत आहे.
मे दिन 2011 चे आवाहन
2011च्या ह्या मे दिनी सिटू, कामगार वर्गाच्या साम्राज्यवादी हल्ल्याविरुद्ध व नवउदार व्यवस्थेविरुद्ध तसेच त्यांच्या अधिकारांच्या व रोजीरोटीच्या रक्षणासाठी संपूर्ण जगात चाललेल्या लढ्यांशी आंतरराष्ट्रीय एकजूट सांधण्याशी असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करीत आहे. सिटू उजव्या प्रतिक्रयावादी व साम्राज्यवादी शक्तींशी लढणाऱ्या डाव्या शक्तींना पुन्हा एकदा आपला भक्कम पाठिंबा जाहीर करीत आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तमिलनाडू मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कामगार वर्गाने डाव्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी हाक सिटू देत आहे.
मोठ्या औद्योगिक संस्थांच्या ताब्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी कामगारांच्या अधिकारांवर व रोजीरोटीवर होणाऱ्या आक्रमणाशी टक्कर देण्यासाठी वर्गीय एकजूट बांधण्याची हाक सिटू देशातील कष्टकरी जनतेला देत आहे. कामाच्या ठिकाणी कामगार अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध होणाऱ्या संघर्षांना अन्य ठिकाणच्या पाठिंब्याच्या कृतींची जोड मिळाली पाहिजे. अश्या पाठिंब्याच्या कृती हा कष्टकरी जनतेच्या सामूहिक जीवनातील रोजच्या कामाचा एक भाग असला पाहिजे. हीच मे दिनाच्या निमित्ताने सिटूने दिलेली हाक आहे.
ह्या मे दिनी सिटू, कामगार वर्गाला सतत दक्ष राहण्याची, धर्मांधता, जात पात, प्रांतवाद अश्या विघटनकारी ताकदींविरुद्ध लढा देण्याची आणि दमन व शोषणाविरुद्ध लढण्यासाठी वर्गीय एकजूट बांधण्याची हाक देत आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार एकजुटीचा विजय असो
भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद
नवउदार साम्राज्यवादी जागतिकीकरणाचा धिक्कार असो
समाजवाद झिंदाबाद
No comments:
Post a Comment