Sunday, April 17, 2011

घर कामगारांसाठीचे आवाहन पत्रक

सभासद व्हा, संघटना बळकट करा, संघर्ष तीव्र करा, हक्क मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

भगिनींनो,

गेली अनेक वर्षांपासून आपण घरकामगारांना संघटित करून आपल्या हक्कांसाठी लढा देत आहोत. घरकामगारांना किमान ताशी वेतन, आठवड्याची सुट्टी, कामाचे संरक्षण, बोनस, कामावरून काढल्यास नुकसान भरपाई इत्यादी विषयी कामाचे नियमन करणाऱ्या कामगार कायद्याचे संरक्षण मिळावे तसेच त्यांच्यासाठी विमा, आरोग्य विमा, मुलांसाठी शिष्यवृत्ती, घरकुलासाठी अनुदान, म्हातारपणी पेन्शन देणारा कल्याणकारी कायदा करावा ह्या आपल्या लढ्याच्या प्रमुख मागण्या राहिल्या आहेत. वर्षानुवर्षांच्या लढ्यानंतर आपल्या ह्या मागण्या पदरात पडण्याची काही आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात आपण काही पावले पुढे गेलो आहोत. आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ नेणाऱ्या ज्या तीन महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्यांची आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि आपल्या लढ्याच्या ह्या महत्वाच्या टप्प्यात गाफिल न राहता अजूनच ताकद लावून शासनाला हे कायदे करायला व त्यांची अंमलबजावणी करायला भाग पाडले पाहिजे.

असंघटित कामगारांमध्ये घरकामगारांचा समावेश व जनश्री विमा योजना- 2004

2004 मध्ये राज्य शासनाने असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी कायदा करण्याचे तत्वतः मान्य केले व ते लागू करण्यासाठीच्या सूचीमध्ये घरकामगारांचा समावेश केला. असंघटित कामगारांसाठी जनश्री विमा योजना लागू केली व त्याद्वारे अपघात व आयुर्विम्याचे संरक्षण व 9वी ते 12वीच्या पाल्यांसाठी काही अटींवर शिष्यवृत्तीचे लाभ फक्त वार्षिक 50 रु हप्त्यात मिळवून दिले. अर्थातच ह्यातही 15 टक्क्यांचा निकष लावून त्यांनी आपली मूठ आवळून धरत सर्वांना लाभ देण्याऐवजी काहींना वंचित ठेवले. शासन व एल आय सी च्या ह्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आपल्याला पुढील काळात जिल्हा व राज्य पातळीवरून तीव्र संघर्ष करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाचा कायदा- 2008

आपल्या अथक संघर्षामुळे व आपले त्यावेळचे आमदार कॉ नरसय्या आडम यांनी विधानसभेत दिलेल्या झुंझार लढ्यामुळे 28 नोव्हेंबर 2008 रोजी अर्धामुर्धा का होईना पण आपल्यासाठी काही मर्यादित कल्याणकारी योजनांचे संरक्षण देणारा कायदा मंजूर झाला. त्यानंतरही प्रत्यक्षात हा कायदा अमलात येण्यासाठी आवश्यक ती पावले शासनानी न उचलल्यामुळे आपण पुन्हा एकदा संघर्षाचा पावित्रा घेत सातत्याने जिल्हा व राज्य पातळीवर लढा दिल्यामुळे ह्या कायद्याच्या नियमांचा मसुदा तयार झाला आहे व उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी सह्या केल्यावर जिल्हा व राज्य कल्याणकारी मंडळांचे गठन, घरकामगारांची नोंदणी, ओळखपत्रांचे वाटप व विविध योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे त्यासाठी गरज आहे अजून जोरात पाठपुरावा करण्याची.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 99 व्या अधिवेशनात मंजूरीसाठी येणारी घर कामगारांसाठीची सनद

घरकामगारांच्या श्रमाचे महत्व, त्यांचे तीव्र शोषण व संरक्षक कायद्यांचा अभाव ह्याची दखल आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनी घेतली असून त्यांच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशात घरकामगारांना सन्माननीय व संरक्षित रोजगार, कामाचे नियमन व कल्याणकारी योजनांचे संरक्षण देणारे कायदे करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. हा सनदेचा मसूदा जून 2011 मध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडला जाईल. अधिवेशनाला आलेल्या कामगार, मालक व शासनाच्या प्रतिनिधींनी मान्य केल्यानंतर ह्या मसुद्याचे रुपांतर सनदीत होईल व सदस्य देशांनी त्यावर सही केल्यानंतर हे देश आपल्या देशात असे कायदे करण्यास बांधील राहतील. हा मसुदा तयार करण्याच्या सर्व टप्प्यांवरच्या बैठकांमध्ये सिटूचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांनी प्रभावीरित्या आपली भूमिका मांडली. सनदीत घरकामगारांना संघटन स्वातंत्र्य, किमान वेतन, कामाचे तास, आठवड्याची सुट्टी, कामावरून काढण्याचे नियम, नोंदणी, कामाला संरक्षण, निवासी घरकामगारांचे राहणीमान, वेठबिगार व बालमजुरीवर बंदी ह्या सर्व बाबतीत सदस्य देशांनी कायदे करणे बंधनकारक केले आहे. आता ही सनद अधिवेशनात मंजूर होण्यासाठी आपल्या शासनाने सकारात्मक भूमिका बजवावी, मंजूर झाल्यावर त्यावर सही करून बांधिलकी दाखवावी व त्याला अनुसरून देशात कायदे करावेत यासाठी आपल्याला आपला लढा तीव्र करून शासनावर दबाव आणावा लागेल अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता आहे. भगिनींनो आता आपण जागे झालेच पाहिजे. आपण संघटित झालो तरच कायदे होतील, त्यांची अंमलबजावणी होईल आणि आपल्याला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल.




त्यासाठी खालील पावले उचला-

• आपल्या जिल्ह्यातील सिटू संलग्न घरकामगार संघटनेचे सभासद होऊन ओळखपत्र काढून घ्या.
• सभासद असल्यास नुतनीकरण करा व जनश्री विमा योजनेचा फॉर्म भरा.
• पुढील सर्व लढ्यांमध्ये सहभागी व्हा.
• संघटनेच्या कार्यकर्त्या बनून आपल्या भागातील 100 टक्के घरकामगारांना सभासद करून घ्या.
सह्यांच्या मोहिमेत सामिल होऊन हजारो सह्या गोळा करा व सरकारवर दबाव आणा

No comments:

Post a Comment