Tuesday, April 26, 2011

पुढचा धोका - जैतापूर ????????????

चेर्नोबिल (सोव्हिएत युनियन) - 26 एप्रिल 1986 - प्रचंड अणु अपघात

फुकुशिमा – 2011 - सुनामीमुळे इंधनगळती

पुढचा धोका - जैतापूर- 20.......????????????????

विनाशकारी, सहापट महाग, देशाच्या विजनिर्मिती योजना धुळीस मिळवणारा,
आयात इंधनावर आधारित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा

पोलीस गोळीबारात तरुण आंदोलकाच्या मृत्यूबद्दल सरकारचा जाहीर निषेध

नागरिक बंघु आणि भगिनींनो,

रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर येथील प्रस्तावित 9900 मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तसेच संपूर्ण देशातील अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा तीव्र विरोध उभा राहिला आहे.

सहापट जास्त गुंतवणुकीची गरजः

अणुऊर्जा ही इतर कोणत्याही ऊर्जा स्त्रोतांपेक्षा सुरक्षित तर नाहीच पण स्वस्तही नाही. वीजेसाठी कोळसा किंवा गॅस प्रकल्पांपेक्षा 6 ते 7 पट भांडवल गुंतवणूक करावी लागणारा हा प्रकल्प अति खर्चिक व घातक आहे. जगात फ्रान्स, जर्मनी आणि जपान वगळता कोणत्याही देशात अणुऊर्जा ही महत्वाचा ऊर्जास्त्रोत म्हणून वापरात आणलेली नाही. कारण मुळातच अणुऊर्जा ही जगभर महागडी व घातक ऊर्जा असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताला ऊर्जेची गरज निश्चितच आहे पण 1 मेगावॅट अणुऊर्जा पकल्पाच्या भांडवली खर्चात 5 ते 6 मेगावॅट क्षमतेचे गॅस आधारित वीज प्रकल्प होणार असतील तर कोणते तंत्रज्ञान भारताला योग्य आहे? आपण वीजेची टंचाई वाढविण्याचा निर्णय घेत आहोत की कमी करण्याचा?

जंगले व मत्स्य संपत्ती बाधित होणारः

जैतापूरच्या कोकणातील ह्या प्रकल्पामुळे खारफुटीची जंगले व मत्स्यसंपत्ती तर नष्ट हेणारच आहे पण किरणोत्सर्गाचा तेथील आंबा, फणस, काजू या सर्वांच्या सुरक्षिततेवर व त्यामुळे विक्रीवर विपरीत परिणाम होणार आहे. दररोज 52 कोटी गरम व किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडल्यामुळे एकूणच पर्यावरणाची हानी होणार आहे. निसर्गसंपन्न आणि जैव विविधतेने नटलेल्या माडबनचा विध्वंस करणारा हा प्रकल्प आहे.

भूकंपाचा धोकाः

हा प्रकल्प भूकंपप्रवण क्षेत्रात उभारला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मुळातच अपघाताचा धोका संभवतो. फुकुशिमा (जपान) येथील 2500 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्यांना नुकत्याच झालेल्या अपघाताचे घातक परिणाम आपण रोज वाचत आहोत. मुळातच भूकंपप्रवण क्षेत्राचा अचूक अंदाज घेणे शक्य नाही. 1967 मध्ये कोयनेचा भूकंप होण्यापूर्वी सह्याद्री भूकंपप्रवण क्षेत्रात मानला जात नव्हता. अश्या परिस्थितीत जैतापूरच्या प्रकल्पाला घोका कायमच राहणार आहे आहे. भूकंपाव्यतिरिक्त मानवी चुकांमुळे चेर्नोबिलच्या 1000 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीला झालेल्या अपघातामुळे हजारो नागरिक किरणोत्सर्गामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

गुप्त करारः

जनतेच्या पैशातून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पासाठी परदेशी कंपनीशी सरकारने केलेला हा करार देशाच्या संरक्षणाशी संबंधित असल्याचे खोटे सांगून गुप्त ठेवण्यात आलेला आहे. तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे या प्रकल्पाचा खर्च 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. कार्यान्वित होईपर्यंत हा खर्च 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. तो पैसा बाहेरून येणार नाही तर भारतातील जनतेची बचत त्यात वापरली जाणार आहे.
त्यामुळे हा प्रकल्प त्वरीत रद्द व्हावा म्हणून स्थानिक जनतेने मोठ्या धीराने व शांततेने आंदोलन चालवले आहे. स्थानिक शेतकऱ्यांना हेक्टरी 10 लाख नुकसान भरपाई देण्याचे आमीष सरकारने दाखवले तरी ते प्रकल्पाच्या विरोधातच आहेत. कारण त्यांचे आंदोलन कोकणाच्या विनाशाच्या विरोधात आहे.

भारतातील जनता = प्रयोगशाळेतील उंदीर?

जगात कोठेही न वापरलेले तंत्रज्ञान असलेल्या इपीआर बनावटीच्या अरेवा या फ्रेंच कंपनीच्या अणुभट्ट्या जैतापूरच्या प्रकल्पात उभारल्या जात आहेत. जणूकाही गरीब भारतीय जनतेचा वापर प्रयोगशाळेतील उंदरांसारखा केला जात आहे.

दडपशाहीः

आंदोलकांची मुस्कटदाबी करण्यासाठी सरकार दिवसेंदिवस जास्त कठोर मार्ग अवलंबत आहे. आंदोलकांना जणूकाही धाक दाखविण्यासाठीच अजित पवार असे नाव असलेले प्रांत अधिकारी नेमले आहेत. माडबन येथील लोकप्रिय डॉक्टर मिलिंद देसाई यांच्यासह शेकडो आदोलकांना खोट्या आरोपाखाली 4 दिवस पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. 600 जणांवर चॅप्टर केसेस भरल्या. तडीपारांच्या यादीत जिजाबाई तुकाराम शिरवाडकर वय 90 वर्षे, सोनाबाई गवाणकर वय 80 वर्षे, माडबन गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह कित्येक गावांचे ग्रामपंचायत सदस्य अशी नावे आली आहेत. सरकारच्या दडपशाहीचा हा भयानक अनुभव आहे.
हे आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र सरकार पोलिसी बळाचा वापर करीत आहे, काही दिवसांपूर्वी तबरेज सेहकर या तरुण आंदोलकाचा पोलास गोळीबारात मृत्यू झाला आहे. परदेशी कंपन्यांना एवढी प्रचंड रक्कम देणाऱ्या सरकारमधील नारायण राणे हे मंत्री ‘बाहेरील’ आंदोलक येत असल्याची तक्रार करीत आहेत, ते ही दडपशाही करण्यासाठीच.

पोलीस गोळीबारात झालेल्या तरुण आंदोलकाच्या मृत्यूचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.

म्हणूनच इतर वीजस्त्रोतांपेक्षा 6 पट जास्त गुंतवणूक खाणारा, आयात इंधन आणि तंत्रज्ञानावर आधारित विनाशकारी, देशविघातक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प त्वरीत रद्द करा अशी मागणी आम्ही करीत आहोत.

आपले

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सी. आय. टी. यु. आयटक
जनवादी महिला संघटना स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया
डी वाय एफ आय किसान सभा

No comments:

Post a Comment